Login

नवरा माझ्या मिठीत गं (भाग २)

लग्नानंतरच्या प्रेमाची एक आगळीवेगळी कथा
"बाबा प्लिज सांगा ना!"

त्यापाठोपाठ आई पण बोलली,

"अहो सांगा ना! काय एवढं भाव खात आहात!"

" अगं तू सासू होणार आहे...सासू."

" अय्या!!! हम्म आणि तुम्ही सासरे."

" हो..हो..नशीब काढलं रागिणी एवढं चांगलं स्थळ मिळालं . खूप मोठी फॅमिली आहे, घरात नंदा, सासू सासरे खुश राहील आपली रागिणी."

"हो ना इकडे काय आपण तिघे, आता तर दोघचं...."

आणि आईच्या डोळ्यात पाणी आलं.तिने हळूच ते पदराने पुसलं आणि स्वयंपाक घरात गेली.


आईच्या पाठोपाठ रागिणी गेली...

" काय हे आई! तुम्हाला माझ्या लग्नाची घाई आणि आता लग्नाला होकार मिळाला तर डोळ्यात पाणी."


आईने रागिनिला मिठी मारली..

" बाळा तुला नाही कळणार आईचं मन. ते कळायला तुला आधी आई व्हावं लागेल."


"आईssss चल वाढ पटकन भूक लागली आहे."

आईने पटापट जेवण वाढले, जेवणं झाली. रागिणी तिच्या रूम मध्ये निघून गेली. आईने घरातलं आवरलं आणि आई बाबा शतपावली करायला निघून गेले.


काही दिवसातच रागिणीचं लग्न झालं.रागिणी सासरी गेली. ईकडे आई बाबा मात्र एकटे पडले. रागिणी रोज फोन करून आई वडिलांची चौकशी करायची.

रागिणीचा संसार सुरू झाला. काही दिवसात तिने नोकरी करायचं विचार रोहित म्हणजे तिच्या नवऱ्या जवळ मांडला.

" रागिणी माझी काहीही हरकत नसेल पण तुला घर आणि नोकरी दोन्ही जमेल?"

" हो.. का नाही जमणार? माहेरी सुद्धा घरचं करावं लागायचं मला कारण आईला वेळच मिळायचा नाही तिच्या शिवण कामातून."

" मग ठीक आहे कारण माझ्या आईचा स्वभाव जरा तापट आहे. उगाच तुला काही त्रास नको म्हणून बोललो मी."


काही दिवसात रागिणीला नोकरी मिळाली आणि तिने नोकरी करायला सुरुवात केली. ईकडे मात्र सासूबाईंना ते फारस आवडलं नाही. 

कारण या महिन्याभरात रोहित बराच तिच्या मनासारखं वागू लागला होता आणि  सुनबाई चक्क नोकरी करायला लागली म्हणजेच आपल्या मुलाला सूनबाईने मुठीत केले असे तिला सारखे वाटायला लागले.

आता लग्नाला चार महिने होऊन गेले होते. खर तर रागिणीला सुद्धा माहीत झालं होत की तिने नोकरी केलेली सासूबाईंना आवडली नाही. सासूबाई आता फक्त देवपूजा करून बसत होत्या. बाकी काहीच जबाबदारी त्यांनी उचलली नाही. कधी घरी पाहुणे मंडळी आली तरीही त्या अजिबात काही करत नव्हत्या.

हे सगळं रोहितला कळत होते म्हणून तो म्हणाला,
" रागिणी अगं तुझी फार दगदग होते,जमत नसेल तर सोड नोकरी."


" अहो ते माझ्यासाठी रूटीन आहे, तुम्ही नका टेन्शन घेऊ."

रागिणी रोहित जवळ आली आणि त्याला मिठी मारली.


" बस तुमची साथ मला अशीच राहू द्या. बाकी मला काहीच नकोय."

सासूबाईला जणू त्या दोघांचा चांगला चालेलेला संसार आवडला नाही. हळूहळू सासूबाई रोज काही ना काही कंप्लेंट करायच्या रोहित जवळ आणि रोहित रागिणीला त्याबद्द्ल विचारायचा.

त्यावर रागिणी त्याला उत्तर द्यायची. खरं तर तिने सासूबाईची कधीही कंप्लेंट केली नाही किंवा त्या तिला लहान सहन गोष्टीवरून काही बोलतात,तिच्या माहेरच्या लोकांना काही उलट सुलट बोलतात ते कधी रोहितच्या कानावर गेलं नाही. त्यामुळे रागिणी त्याच्या अजून जवळ आली आणि त्याचं प्रेम दिवस न दिवस अधिकच वाढत गेले.

आता दिवाळी हा मोठा सण आला आणि पहिली दिवाळी होती म्हणून रोहित रागिणीला म्हणाला,

"तुला काय हवं आहे सांग तुझी पहीली दिवाळी आहे ना."


"पहिल्या दिवाळीची आठवण म्हणून मला मस्त साडी हवी बाकी काही नको."


दिवाळीचा पहिला दिवस होता.दोघांनी मस्त शॉपिंग केली आणि सासूबाई सासरे यांच्यासाठी सुद्धा कपडे घेतले. दिवाळी सण आनंदात साजरा झाला. पाडव्याच्या दिवशी रागिणी ने रोहितला ओवाळलं आणि रोहितने मस्त सोन्याचा नेकलेस तिला गिफ्ट केला.

ते बघून तिला फार आनंद झाला आणि तिने त्याला मिठी मारली.तेवढ्यात सासूबाई आल्या.


" अरे वा! आज तर खूप आनंदात आहात दोघे. काय गं रागिणी उद्या माहेरी चाललीस,  तुझी पहिली भाऊबीज तूला तर भाऊ नाही मग कशाला जातेस? तुझी नणंद येणार आहे तरी इथेच थांब."


" सासूबाई...अहो भाऊ नसला म्हणून काय झालं बाबा आहेत ना मला आणि लग्नापासून एकदाच माहेरी गेले मी फक्त."

" अगं ते सोड तुझं गिफ्ट दाखव ना आईला."


"  हो....विसरले मी..हे बघा."


" बापरे! घरात एवढी अडचण असताना तू चक्क सोन्याचा नेकलेस आणला. हिच मागे लागली असेल तुझ्या."

" आई!...."

रोहितने डोळ्याने खूनावलं की काहीही बोलू नको.

दुसऱ्या दिवशी रागिणी माहेरी निघून गेली.
माहेरी गेल्यावर सगळ्या मैत्रिणी भेटल्या गप्पा टप्पा झाल्या. सर्वांनी पाडव्याला काय गिफ्ट मिळाले याची चौकशी सुरू केली.सगळ्यांनी आपापले गिफ्ट सांगितले.


रागिणीचा नेकलेस बघून रक्षा म्हणाली,
" अय्या!नवरा मुठीत केलास वाटत, चक्क सोन्याचा नेकलेस मिळाला."


आणि सगळ्याजणी हसायला लागल्या.
रागिणी चार दिवस राहून सासरी जाण्यासाठी निघणार होती.पहिली दिवाळी म्हणून रोहित तिला घ्यायला येणार होता.पण त्या दिवशी तो आलाच नाही.

रागिणीने  फोन केला मात्र त्याने उचलला नाही. आणि परत त्याने फोन पण केला नाही.

का नसेल उचलला फोन रोहितने ? काय झालं असेल? वाचूया पुढच्या भागात