Login

नवरा माझ्या मिठीत गं ( भाग ३)

लग्नानंतरच्या प्रेमाची एक आगळीवेगळी कथा
तो दिवस निघून गेला.अजून एक दिवस गेला. रोहित तर आलाच नाही त्याचा फोन पण बंद येत होता.

" अगं रागिणी तुमचं काही भांडण झाले होते का?"


" अगं काहीच नाही."


" मग सासूबाई तुझी नणंद अजून कुणाला तरी लाव फोन."


"अगं कुणीच उचलत नाही."


"अगं पण आता आठ दिवस झाले.तू जातेस का नाहीतर बाबांना घेवून सोबत."


"नाही...नको...अगं पण आई काही अडचण असेल तर त्यांनी बोलावं ना."


अस करता करता एक महिना निघून गेला. तिच्या मैत्रिणी सुद्धा विचारात पडल्या.त्यात एकीने तिला सल्ला दिला की तू घरी जावून ये.
कुठेतरी ती बरोबर बोलली असं रागिनीच्या मनाला वाटलं म्हणून ती दुसऱ्याच दिवशी आईला सांगून  सासरी गेली.


रागिणी सासरी जात असतांना तिच्या मनात असंख्य प्रश्नांनी थैमान घातले होते. रागिणी सासरी पोहचली.तिने दरवाजा वाजवला. सासूबाईंनी उघडला, रागिणी घरात पाऊल ठेवतच होती तर सासूबाई म्हणाल्या,


" अगं आता कुठे जात आहेस?"

" म्हणजे?"

"तुला सांगितलं नाही का रोहितने?

" काय?"


"अगं त्याला डिव्होर्स हवा आहे तुझ्यापासून. नोटीस येईल दोन दवसात."

रागिणी एक पाऊल मागे सरकली. ती तशीच काहीही न बोलता परत माहेरी यायला निघाली. तिला काहीच कळत नव्हत काय करावं म्हणून.


ती घरी आली तेव्हा संध्याकाळ झाली होती. आईने दारासमोर दिवा लावण्यासाठी  दरवाजा उघडला तर समोर रागिणी दिसली.तिचा चेहरा बघून आईला धडकी भरली. ती काही न बोलता तिच्या रूममध्ये गेली. आई तिच्या मागे गेली.


" रागिणी अगं तुझा चेहरा का पडलाय? काय झालं आणि तू परत का आलीस?"

"का ? माझे घर नाही का हे? नाही राहू शकत का मी ह्या घरात? नसेल तर जाते मी."

आणि रागिणी ताडकन उठली आणि आईच्या गळ्यात पडुन रडायला लागली. तेवढ्यात बाबा आले. तिला रडतांना बघून  बाबा म्हणाले,


"रागिणी, अगं शांत हो बाळा. काय झालं ? सांग तरी?"


"बाबा अहो, काही कळायला मार्ग नाही.त्यांना डिव्होर्स हवा आहे."

"काय??? "

बाबा एकदम खाली बसले.आईने तर डोक्याला हात लावला.

" बाळा शांत हो...उपाय काढू आपण त्यांना विचारू आपण आपली काय चूक आहे."


" नको बाबा. अहो...रोहित तर काही बोलायला तयार नाही. आज मला घरात घेतलं नाही मग तुम्हीच सांगा ना मी पुढे  काय करू, काय बोलू."


दोन दिवसांनी डिव्होर्सची नोटीस आली. पण रागिणीने मनाशी ठरवले की त्याला डिव्होर्स द्यायचा नाही.


साधारण आठ दिवस झाले. दारावरची बेल वाजली. रागिणीने दरवाजा उघडला समोर बघते तर काय .....चक्क रोहित उभा होता.ती त्याच्याकडे बघत उभी राहिली.


आईने आतून आवाज दिला,

" रागिणी अगं कोण आहे?"

आई बाहेर आली,


"हे काय जवाईबापू ..या...ना...या घरात. रागिणी अगं पाणी आण."

रागिणीच्या डोळयात त्याला राग दिसत होता मात्र रोहितच्या डोळयात तिला अपराधी असल्या सारखे दिसत होते.


" रागिणी अगं मला माफ कर. मी काहीही करू शकत नाही.मी हतबल झालो."

रागिणी फक्त हसली.

" रागिणी अगं बोल ना काहीतरी."

" तू तुझ्या निर्णयावर ठाम आहेस मग माझ्याकडुन तुला का उत्तर हवं आहे. आता मी माझी काय चूक हे सुद्धा विचारणार नाही. तुला काय करायचे ते तू कर."

रागिणीला तो न बोलताही सगळं कळलं होते म्हणून ती यावेळी शांत राहिली.


थोड्या वेळाने रोहित घरी निघून गेला.


" रागिणी अगं काय ठरवलं मग तू?"

तेवढ्यात बाबा आले. बाबांना आईने सगळं सांगितलं.


" बाबा मी रोहितला मी डिव्होर्स देणार नाही."


एवढं बोलून ती आत गेली.


आई बाबा मात्र खूप टेन्शन मध्ये होते. खरं तर अजून सहा महिने देखील झाले नव्हते एकमेकांना भेटून मात्र रागिणीने त्याला आपलं सर्वस्व मानले होते. तिने त्यावर मनापासून प्रेम केले होते.


रागिनीच्या मैत्रीणींना जेव्हा हे सगळं माहीत झाले तेव्हा त्या घरी आल्या. रागिणीने काय केले पाहिजे हे आपापले मत सांगून मोकळ्या झाल्या.

तेव्हा त्या बोलून गेल्या की, नवरा हा जर मुठीत ठेवला असता तर त्याने एवढी हिंमत केली नसती. पण रागिनिने त्या बोलण्याचा काहीही विचार केला नाही. ती तिच्या मतावर ठाम होती.


असेच काही दिवस निघून गेले. रागिणीने इकडेही नोकरी करायला सुरुवात केली. बऱ्याचदा रोहितने तिला कॉल केला मात्र तिने तो उचलला नाही.


मग एके दिवशी तो पुन्हा तिच्या घरी आला. आता रोहित का आला असेल तिच्या घरी तिला डिव्होर्सवर सही कर म्हणायला की त्याला त्याची चूक कळली असेल.नेमक काय असेल कारण वाचूया पुढच्या भागात.