Login

नवरा माझ्या मिठीत गं ( भाग ४) अंतिम भाग

लग्नानंतरच्या प्रेमाची एक आगळीवेगळी कथा
रोहितचे स्वागत नेहमी प्रमाणे झाले. कुणीही त्याचा अपमान केला नाही.यावेळी मात्र तो आला तेव्हा रागिणी घरी नव्हती.

आईने त्याला घरात घेतले.त्याला पाणी दिले.
आई काही विचारण्याआधी तो म्हणाला,

" रागिणी माझा फोन उचलत नाही."

अगदी दबक्या आवाजात रोहित तिच्या आईला म्हणाला.

आज मात्र रागिणी घरी नसल्यामुळे आई मनातलं सगळं बोलून दाखवाव असा निर्णय घेतला.

" हो, नाही उचलणार ती फोन कारण तुम्हाला फक्त सही हवी आहे. तुम्ही काही महिने झाले सोबत आहात तिच्या, मी तिला जन्म दिला आहे , मी पूर्णपणे ओळखते तिला. ती नाही बोलत आमच्याशी या विषयवार पण आम्हाला सगळं कळतं. अहो जीवापाड प्रेम करते तुमच्यावर ती. ती बाकी मुलींसारखी अजिबात नाही. ती आधी समोरच्या व्यक्तीचा विचार करते मग तिचा स्वतःचा. तिचं पहिलं आणि शेवटचं प्रेम म्हणजे लग्नानंतरचे म्हणजेच तिच्या नवऱ्यावरचे...."

एवढं बोलून रागिणीच्या आईच्या डोळ्यात पाणी आले. रोहित उठला आणि त्यांच्या जवळ बसला.

" रडू नका प्लिज."

" तिच्यापुढे नाही रडता येत आम्हाला,तिच्या जीवाची घालमेल कळते आम्हाला.ती खुश दिसण्याचा खुप प्रयत्न करते पण तिला नाही जमत ते. तिने तुमच्यावर प्रेम केले हीच तिची चूक."

हे ऐकल्यावर रोहित तिथून उठून निघून गेला. तो थेट घरी गेल्यावर त्याची  आई त्याला म्हणाली,

" किती दिवस लागणार आहे अजून  डिव्होर्सला काय माहीत. सुख तर माझ्या नशिबातच नाही."


रोहित काहीच बोलला नाही मात्र त्याच्या मनात अनेक प्रश्न उभे राहिले. खरचं आईच्या सांगण्यावरून  आपण नोटीस पाठवली. तिची तर काहीच चूक नव्हती. तिने तर सगळ्यांना सांभाळून घेण्याचा पुरेपूर प्रयत्न केला. खरचं मी तिचा विचार केला नाही. मी चूकच केली तिला नोटीस पाठवून. तिने जीवापाड प्रेम केले माझ्यावर मी जे जे म्हटलं ते सगळं तिने केले. चूक नसतांनाही आईची माफी मागितली आणि मी...खरच मी चुकलो.


  तो हॉलमध्ये आला आणि म्हणाला,

" आई  प्रेम हे लग्नाआधी होते असं काही नाही ते तर लग्नानंतर आपल्याच बायकोशी पण होऊ शकते."


" हो..पण रागिणी तशी नाही. तिला फक्त नवरा हवा आहे."


आई अजून काही बोलायच्या आतच रोहित बोलला,


" आई अगं तुझ्या मुलाचा संसार का मोडायला निघाली तू."


"मी कशाला मोडू तुझा संसार? मला काय वेड लागला का?"


आई रागातच आत निघून गेली. दुसऱ्या दिवशी रोहित ऑफिसला निघून गेला.त्याला ऑफिस मध्ये करमेना, आता बरेच दिवस झाले होते.  त्याला रागिणीची खूप आठवण येवू लागली. तिच्या बोलण्याचा ,तिच्या हसण्याचा त्याला आवाज येवू लागला. आज त्याला खूप  अस्वस्थ वाटू लागले.

त्याने रागिनिला फोन केला पण तिने तो उचलला नाही. खर तिला आईने सगळं सांगितलं होते की, तो घरी येवून गेला.

दुसऱ्या दिवशी रोहित मात्र तिच्या घरी न जाता. तिच्या ऑफिस मध्ये गेला. त्याला बघून ती जरा कावरीबावरी झाली. त्याला बघताच ती ऑफिस मधून बाहेर आली.


" रोहित झाले तो तमाशा पुरे नाही का झाला, आता तू चक्क माझ्या ऑफिस मध्ये आलास. अरे मला अजून साधा महिना नाही झाला ऑफिस मध्ये प्लिज तू इथे काही तमाशे करू नको."


तो तिच्याकडे बघत राहिला.


" रोहितsss अरे ..रोहितsss मी तूझ्याशी बोलत आहे."


रोहितने काहीही न बोलता तिला मिठी मारली.

ती स्वतःला मिठीतुन सोडवत म्हणाली,


" रोहित... अरे, जगाचे भान ठेव. काय झाले आज तुला?"

त्याच्या डोळ्यात पाणी आलं,

"मला माफ कर रागिणी खरचं मला माफ कर. मी चुकलो, आईच्या सांगण्यावरून मी खूप मोठं पाऊल उचललं. मी स्वतःचा संसार मोडायला निघालो होतो. आई मला म्हटली तिने तुला मुठीत ठेवले पण नाही तू तर मला एका शब्दाने काहीच नाही म्हटलं. "


" रोहित थांब जरा, आपण बाहेर जावून बोलू ऑफिस मधली सगळी माणसं बघत आहे.तू थांब आलेच मी."

रागिणी गेली आणि ऑफिस मधून सुटी काढून आली दोघे बाजूच्या हॉटेल मध्ये गेले.


" रोहित मला ना तुला माझ्या मुठीत  ठेवायचे नव्हते....तुला ना माझ्या मिठीत ठेवायचं  होते. तू माझे पाहिलं प्रेम आहेस मला माहित नाही तुला मी किती आवडते पण मला तू खूप आवडतो, मी जीवापाड प्रेम करते  म्हणून मी तुझ्या घरी कुणाचीही काहीही कंप्लेंट न करता राहिले.एक ना एक दिवस त्यांनाही माझे प्रेम कळेल या आशेवर पण तू मला साधं समजून घेतलं नाही याचं दुःख वाटते."

" मला माफ कर ...खरचं मी चुकलो जेव्हा तू घरी होतीस तेव्हा मला काही फरक नाही पडला पण तू जेव्हा दूर गेलीस तेव्हा मात्र तुझ्याशिवाय माझ्या डोक्यात दुसरं काहीच नव्हते. तू गेल्यावर तुझी किंमत कळली. तुझ्यावर किती प्रेम करतो हे कळलं.चल आता उशीर लावू नकोस, चल आपल्या घरी परत."

"आई?"

" मी सांगेल तिला समजून, प्लिज परत मला सोडुन जावू नकोस"


रागिणी घरी आली, तिने तिच्या माहेरी सगळं सांगितली की ती परत सासरी निघाली. हे एकूण सगळे खुश झाले.


सासरी आल्यावर सासूबाई काहीच बोलल्या नाही कारण त्यांना आता कळून चुकलं होते की आपण स्वतः च आपल्या मुलाचा संसार मोडायला  निघालो, पण आता मुलगा आपलं काहीच एकणार नाही.

त्यानंतर त्याचा दोघांचा संसार हा परत एकदा नव्याने  सुरू झाला.


खरच लग्नानंतरचे प्रेम काही वेगळेच असते नाही का. फरक एवढाच की सगळ्यांचे अनुभव वेगवेगळे. नवरा हा मुठीत नाही तर खरच मिठीत हवा.
समाप्त...
©® कल्पना सावळे

🎭 Series Post

View all