Login

नव्या वाटेवर चालताना लघुकथा

एक नवीन निर्णय घेतला आहे
नव्या वाटेवर चालताना


“रोहिणी मला तुझा घटस्फोटाचा निर्णय पटलेला नाही”

जया जरा चिडक्या आवाजात म्हणाली .रोहिणी यावर म्हणाला,

“जया ज्याचं जळतं त्याला कळतं मला काय दुःख आहे हे मलाच कळतं. त्याची धग तुला लागणार नाही”

“ असं काय घडलंय ग तुझ्या आयुष्यात? सगळं तर चांगलं आहे. सूख बोचतं म्हणतात नं ते हेच.”

जयाची बोलण्याची पट्टी अजून वर गेली.

“ आम्ही पण कष्ट घेतले संसारात. तुझ्या एवढा सुखासीन आयुष्य नव्हते जगत मी लग्न झाल्यावर. “

जया कणीक मळताना फुत्कार टाकल्या सारखं बोलली.

“ जया तू गप्प बस. हे घर माझ्या आईवडिलांचे आहे. इथे मला तू वेड वाकडं बोलू शकत नाहीस.’

“ घर तुझ्या आई वडिलांचं असेल पण चालवतो आम्ही. काय खर्च नाही येत घर चालवायला ?”

“ माझ्या येण्यानं तुमचा खर्च वाढत असेल तर मी देईन दरमहा पैसे.”

“ हो. बरं शहाणपण सुचलं आता. देच तू पैसे “

“ हे घे “

रोहिणी ने रागाने जयासमोर दोन हजार रुपये ठेवले आणि रागाने स्वयंपाक घराबाहेर पडली.

रोहिणीचे आई आणि बाबा बाजुच्या खोलीत बसले होते. दोघींचं संभाषण ऐकून ते जरा चिंतीत झाले.

****

ही रोहिणी, आपल्या कथेची नायिका. एक शांत आणि सशक्त स्त्रीआहे. स्वत:च्या पायावर ऊभी आहे. रोहिणी तिच्या माहेरी परत आली आहे. तिने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे कारण तिचे पतीसोबतचे नातेसंबंध खूप विचित्र झाले आहेत. माहेरी येताना, तिला आशा होती की कदाचित माहेरी आपल्याला समजून घेतल्या जाईल.पणमाहेरी तसं घडलं नाही.

रोहिणीचा घटस्फोटाचा निर्णय जयाला मात्र पटलेला नाही कारण तिला वाटत असतं की नाती सांभाळण्याची जबाबदारी स्त्रीची असते.. स्त्री ने थोडी पडती बाजू घ्यायला हवी. जयाचे विचार जुन्या काळातील आहेत म्हणून तिला रोहिणीचे घटस्फोट घेण्याच्या निर्णयावर ठाम असणे खटकत असते.

या वादात पराग, जो रोहिणीचा भाऊ आहे आणि जयाचा पती आहे, तोदेखील सामील होतो. सुरुवातीला तो आपल्या पत्नीच्या बाजूने असतो, पण नंतर त्याच्या मनातही गोंधळ निर्माण होतो कारण त्याला त्याच्या बहिणीची परिस्थिती एक दिवस समजते.

निशांतचं म्हणजे रोहिणीच्या नव-याचं दुस-या मुलीबरोबर असलेलं नातं कळतं. तेव्हा परागच्या मनात बहिणी विषयी कणव निर्माण होते.

****

एक दिवस रोहिणी आणि तिची आई सुनंदा, स्वयंपाकघरात काम करत असतात. रोहिणी मूडमधे नसते. तिच्या डोक्यात सतत विचार चालू असतात. सुनंदा तिच्या जवळ येते. शांत आणि ममतेने ती रोहिणीशी बोलते.

सुनंदा म्हणाली ,

“रोहिणी, अग, बस जरा. तुझ्या चेहऱ्यावरचा इतका ताण पाहवत नाही गं मला.

रोहिणी जरा दुर:खी स्वरात म्हणाली,

“आई, मी ठीक आहे. फक्त काही गोष्टींचा विचार करतेय.”

“मला कळतंय, पोरी. पण असा ताण घेऊन काही साध्य होत नाही. तू घेतलेला निर्णय खूप मोठा आहे, आणि तू निर्णय घेतलास, त्यामागे नक्कीच काहीतरी कारण असणार हेही आम्हाला कळतंय पण तरी एकदा तुझ्या निर्णयावर विचार करशील का?”

रोहिणी थोडं वैतागून म्हणाली,

“आई, मी आधीच सगळा विचार केला आहे. तो विचार आणि माझा निर्णय तुझ्या आणि बाबांच्या मानासारखं नाही, पण मला यापुढे त्या घरात राहायचं नाही. मी ती तोडफोड, अपमान, सगळं सहन केलंय. आता पुरे झालं. किती दिवस हे सहन करू. आज नाही उद्या निशांतची वागणूक सुधारेल म्हणून लग्न होऊन आठ वर्षे झाली मी वाट बघतेय. आता बस्स ! आता नको मला ती लग्नाची बेडी.,”

सुनंदा तिच्या डोक्यावर हात ठेवत म्हणाली ,

“मला माहित आहे, पोरी. मी आई आहे ना तुझी, तू काय सहन केलंय ते कळतय मला जरी तू बोलली नाहीस तरी पण एकदा स्वतःच्या मनाशी विचार कर. कधीकधी मनाच्या घालमेलीत आपण चुकीचं पाऊल उचलू शकतो. कोणताही निर्णय घेण्याआधी थोडा वेळ दे.

“आई, मला असं वाटतं की मी आधीच खूप वेळ दिला आहे. मी किती सहन करायचं? कितीवेळ स्वतःला तडजोड करत राह्यचं ? तू म्हणशील तर मी विचार करीन पण फार दिवस सहन करणार नाही.”

रोहिणी थोडं शांत होत म्हणाली.


“तडजोड करायची वेळ प्रत्येकाच्याच आयुष्यात येते पोरी. पण ती तडजोड आपल्या मर्जीने असली पाहिजे. कधी कधी आपल्याला स्वतःचं समाधान सापडत नाही, आणि आपण निर्णय घाईघाईत घेतो. मी तुझं दुःख समजू शकते पण एकदा मन शांत ठेवून सगळ्या गोष्टींचा विचार कर. काय चुकलं, काय नाही, आणि तुझ्या मनातील खरी भावना काय आहे, ते समजून घे.”

सुनंदा हळुवार हसत रोहिणीच्या पाठीवर थोपटत म्हणाली,

“आई, माझं मन खूप वाईट अनुभवांनी जखमी झालय. मनावर खूप ओरखडे ऊमटलेत ग. या जखमा फक्त मलाच नाही माझ्या मुलाच्या मनाला ही झाल्या आहेत.निशांतला कुठे याची पर्वा आहे? मी खूप वेळा प्रयत्न केला, पण काहीच सुधारणा झाली नाही आमच्या नात्यामधे . त्या नात्याला सुधारण्यात मी स्वतःला हरवून बसलेय, मी आता स्वतःला शोधतेय. माझा जगण्याचा उद्देश काय आहे हे शोधतेय जे मी या आठ वर्षात विसरून गेले होते. “

रोहिणी हळवी होत आईच्या कुशीत शिरून म्हणाली,



“हेच महत्त्वाचं आहे, पोरी. स्वतःला शोधणं. पण जगात कोणतीही आणि कितीही वाईट परीस्थिती आली तरी काही काळाने सगळं नीट होतं. घटस्फोट हा शेवटचा मार्ग आहे, यावर ठाम होण्याआधी, एकदा अजून विचार कर. कधीकधी आपण शांत राहून घडलेल्या गोष्टींना वेगळ्या नजरेने पाहू शकतो. निर्णय तुझाच असेल, पण अजून थोडा वेळ देऊन बघ.”

सुनंदा रोहिणीचा हात हळुवार पणे कुरवाळत म्हणाली.


“ मला माहिती आहे आई, तू मला समजून घेतेस. मी अजून विचार करेन, पण माझं मन बदलणं आता खूप कठीण आहे.*

“बेटा बदलण्याची गरज नाही. फक्त नीट पाहणं गरजेचं आहे. तुझं सुख महत्त्वाचं आहे, आणि जो निर्णय तुला खरी शांती देईल, असं तुला वाटतं तोच योग्य निर्णय असेल.”

रोहिणीच्या चेहेऱ्यावर एक समाधान झळकलं. तिने आईच्या कुशीत हसून तोंड लपवलं. आई तिच्या डोक्यावरून हात फिरवत होती.

*******

रात्रीचा गडद अंधार पसरलेला होता. . रोहिणी आपल्या खोलीत एकटीच बसलेली होती. शेजारी तिचा मुलगा झोपला होता.तोच या काळात तिच्या साठी ओयासीस होता.

बाहेर थोडी थंडी जाणवत होती , पण तिच्या मनात मात्र विचारांचा गरमागरम गोंधळ चालू होता. ती स्वतःच्या विचारांमध्ये हरवलेली होती. तिच्या डोळ्यांमध्ये अस्वस्थता, चेहऱ्यावर चिंता, आणि मनात निर्णयाचा संघर्ष या गोष्टींचं द्वंद्व चालू असतं.

रोहिणीच्या मनात विचार फेर धरुन नाचायला लागले. मी खरंच हा निर्णय घेतला आहे तो बरोबर आहे नं? हे ती पुन्हा एकदा स्वतःला विचारत होती.

आमच्या नात्यात जेव्हा प्रश्न निर्माण झाले तेव्हा किती प्रयत्न केले मी! किती वेळा निशांतशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. किती वेळा स्वतःला बदलायचा प्रयत्न केला. पण त्याने काहीच फरक पडला नाही. सगळं तुटतंच चाललं होतं.. पण तरीही... घटस्फोट हा निर्णय योग्य आहे का? आई म्हणाली तसं पुन्हा विचार करायला हवा का?

माझं आयुष्य मी असं वाट बघण्यात का घालवू ?. मी प्रत्येकवेळी त्याच्या अपेक्षांमध्ये अडकत राहिले, त्याच्या रागाला, दुर्लक्षेला सहन करत राहिले. किती वेळा वाटलं की तो आता बदलेले सगळं नीट होईल, पण तो बदलला नाही. मी सतत स्वतःला कमी समजून घ्यायला लागले . पण आता असं वाटतं की... घटस्फोट घेणे योग्य निर्णय आहे कारण मी आता थकले आहे.


आई, बाबा, आणि जया हे सगळे मला सांगतात की थोडा वेळ घे, विचार कर, पण किती वेळ विचार करायचा? माझं मन आता इतकं गोंधळलेलं आहे की मला काय योग्य, काय चुकतंय हेच कळेनासं झालंय. एकीकडे वाटतं की, हा शेवटचा निर्णय असू शकतो, माझ्या आयुष्याचा एक मोठा बदल असू शकतो, आणि मला स्वतःवरचा विश्वास टिकवायचा आहे.

पण आई म्हणते तसं तर नाही ना होणार की मी घाईघाईत निर्णय घेतलाय का ?

आणखी वेळ दिला तर काय फरक पडेल ? मी आठ वर्षं धीर धरला, आता किती धीर धरू ? या घरात येऊन मला पुन्हा माझी मुळं शोधायची आहेत, पण इथेही सगळ्यांचं मत माझ्या मतापेक्षा वेगळे आहे.

जया माझ्या निर्णयावर नाखुश आहे. तिच्या मते मी चुक करतेय, समाज काय म्हणेल हे तिला महत्त्वाचं वाटतं. पण समाजानं मला काय दिलं? समाजाच्या मताने मी आयुष्य कसं जगू?

आता मी माझ्या निर्णयावर ठाम असायला हवं.

मी जे सहन केलं ते कोणीच समजू शकत नाही. माझ्या आयुष्यातील तुटलेले क्षण, माझ्या स्वाभिमानाचा अपमान, आणि मी स्वतःला गमावून बसलेय. आता मात्र मला स्वतःला पुन्हा शोधायचंय. एक नवी सुरुवात करायची आहे, एक नवं आयुष्य, जिथे मी स्वतःला पूर्ण करू शकेन. तडजोडीने मी किती काही गमावलंय, पण आता मला तडजोड करायची नाही.

आता मी माझं आयुष्य स्वतःच्या मर्जीने जगण्याचा निर्णय घेतलाय. घटस्फोट घेतला तर मला हवी ती शांती मिळेल. मला स्वतःला सिद्ध करायचं आहे. या संघर्षातून बाहेर पडून मी माझं भविष्य घडवू शकते.

विचारात हरवलेल्या रोहिणीला केव्हा तरी झोप लागली.

*****

“जया, मला तुझं म्हणणं समजतं, पण आपण कधी शांत बसून रोहिणीच्या परिस्थितीचा विचार केलाय का? तिनं जे काही सहन केलंय ते ऐकून खरंच असं वाटतं का की तिचा निर्णय बरोबर आहे?”

पराग म्हणाला.

जया कडकपणे म्हणाली,

“पराग, मी मान्य करते की तिच्या लग्नानंतरच्या आयुष्यात खूप ताण निर्माण झालाय पण ते एवढं मोठं पाऊल उचलण्याजोगं आहे का? कुटुंबात तडजोडी करतात. माझ्या मते, एकदा तिच्याशी तू नीट बोलणं आवश्यक आहे.”

पराग थोडा गंभीर होत म्हणाला

“जया, मला निशांतबद्दल खूप विचित्र गोष्टी ऐकायला आल्या आहेत. त्याचा स्वभाव असा आहे की कोणताही माणूस त्याच्याबरोबर राहणं सोपं नाही. त्यात त्याचं बाहेर एका स्त्री शी संबंध आहेत. त्याच्या वागणुकीमुळे रोहिणीवर किती दबाव होता हे कदाचित आपण नीट लक्षात घेतलं नाहीये.”

“"बापरे! असं आहे. हे मला माहित नव्हतं."


“अग. निशांत बद्दल खूप तक्रारी आहेत. त्याचा राग, त्याचं असं बेफिकीर वागणं... आणि फक्त घरातच नाही, बाहेरही त्याचं वागणं विचित्र आहे असं ऐकलंय. अशा व्यक्तीसोबत रोहिणीने इतकी वर्षं काढली, हेच खूप आहे. मला वाटतंय, तिनं जो निर्णय घेतला आहे तो योग्यच आहे. ती कायम दबावाखाली होती, आणि त्यातून बाहेर पडणं तिला आवश्यक होतं.”

“" मी तिचं म्हणणं समजून घेते, तरीही असं वाटतं की मुलासाठी ती अजून प्रयत्न करू शकली असती.”

पराग थोडं हसत म्हणाला,

“ जया, तू रोहिणीला ओळखतेस ना? ती खूप धाडसी आहे. ती स्वतःच्या पायावर उभी राहू शकते. ती मुलाचा उत्तम सांभाळ करेल, यात मला शंका नाही. शिवाय आपण आहोत ना तिच्या मदतीला? ती एकटी नाहीये. आणि मी तिला पाठिंबा देईन. तिच्या निर्णयात तिच्या पाठीशी उभा राहीन.”


“पराग लोक काय बोलतील?”

“जया, समाज नेहमी बोलतोच, पण आपण आपल्या माणसांच्या पाठीशी उभं राहायला हवं. तिच्या आयुष्याचा निर्णय तिला घ्यायचा आहे, आणि ती जेव्हा आपल्याला सांगत होती तेव्हा आपण तिचं म्हणणं ऐकायला हवं होतं. तिच्या आत्मविश्वासावर आपल्या विचारांनी घाला घालू नये. तिचं भवितव्य तिच्या हाती आहे, आणि ती स्वतः ते चांगलं घडवू शकते आपला पाठिंबा असेल तर हे पाऊल ती हिमतीने उचलू शकेल आणि नव्या वाटेवर आत्मविश्वासाने चालू शकेल.”

“तू बरोबर बोलतोयस, पराग. मी पण तिच्या पाठीशी उभी राहीन. “

पराग ने जयाच्या हातावर थोपटलं.

रोहिणीच्या पंखात आता नव्या दमाचं बळ आलं कारण तिचं कुटूंब योग्य वेळी तिच्या पाठीशी उभं राहिलं. ती आता आपल्या आयुष्यात नव्या वाटेवर आत्मविश्वासाने चालणार आहे.
_____________________________________
©® मीनाक्षी वैद्य.