नव्या वाटेवरची सुरुवात. भाग - २
ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५
"का गं, काय झालं? तू अशी गप्प का आहेस?" काव्या काही बोलली नाही म्हणून शैलजाने विचारलं.
"काय होणार आहे कंप्लेट करून, थोडे दिवस शांत राहतील आणि नंतर परत आहे तसेच चालू होईल. मग त्यापेक्षा घर सोडलेलेच बरे, म्हणून मग मी आता ठरवले आहे मी परत तिथे जाणार नाही. तुम्ही मला ठेवणार नसाल तर मी जाते. बघते दुसरीकडे काही सोय होते का!" काव्या थोडं रडक्या सुरात बोलली.
"अगं, पण तू अशी तरणी ताठी बाहेर कुठे जाशील? तू सध्या रहा इथे, मग बाकी आपण नंतर बघू." शैलजा म्हणाली. त्याचवेळी आदित्यने त्याच्या आईला डोळ्यांनी खुनावलं तशा त्या त्याच्या मागे आत त्याच्या रूममध्ये गेल्या. दोघेही आत गेल्यावर आदित्यने बोलायला सुरुवात केली.
"आई त्यांना बरे वाटेपर्यंत इथेच असूदे. नंतर मग तुझ्या एन जी ओ मध्ये घेऊन जा. तिथे त्यांची चांगली सोय होईल." आदित्य म्हणाला.
"हो, अरे माझ्या डोक्यात पण हेच आहे, पण मला वाटते की पोलीसांच्या कानावर ही गोष्ट घालावी. म्हणजे आपल्याला पुढे जाऊन या गोष्टीचा त्रास होणार नाही." शैलजा म्हणाली.
"तुला जसे योग्य वाटते तसे कर, बरं चल मी निघतो मला उशीर होत आहे." आदित्य म्हणाला.
"हो चल बाहेर ती एकटीच आहे. उगाच तिला वेगळं काही वाटेल." शैलजा म्हणाली तसं ते दोघेही बाहेर गेले.
आदित्य त्याच्या आईचा निरोप घेऊन जाऊ लागला तोच त्याने एक नजर काव्याकडे टाकली तेव्हा त्याला ती अगदी निरागस वाटत होती. तो ऑफिसला गेला पण त्याच्या डोक्यात सारखे तिचे विचार येत होते. तिच्याबद्दल एक सहानुभूती पण वाटत होती. कारण एवढ्या कमी वयात तिच्या आयुष्यात खूप मोठे दु:ख आले होते. दिवसभर त्याच्या डोक्यात तिचेच विचार होते.
आज शैलजा घरीच होती, ती काव्याची नीट काळजी घेत होती. काव्या पण आता तिच्याशी थोडी खुलून बोलत होती. दिवसभर दोघीही एकमेकींशी गप्पा मारत होत्या. शैलजाने आदित्यला संध्याकाळी घरी येताना तिच्या साठी काही वस्तू आणि ड्रेस आणायला सांगितले होते. मग तो येताना सर्व घेऊन आला. शैलजाने काव्याला ड्रेस दाखवले आणि ते तिला घालून बघायला सांगितले तर तिने सरळ नकार दिला.
"नको मला हे ड्रेस. मी लग्न झाल्यानंतर कधी ड्रेस घातलेच नाही आणि घरीही कोणालाही मी ड्रेस घातलेले आवडत नाही." काव्या म्हणाली.
"अगं तू आता इथे राहणार आहे ना, मग घरच्यांचा विचार कशाला करतेस. आणि बिनधास्त पणे वागायला शिक आता. दुसऱ्यांना काय आवडतं याचा विचार करण्यापेक्षा तुला काय आवडतं याचा विचार कर." शैलजा म्हणाली.
क्रमशः
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा