नव्या वाटेवरची सुरुवात. भाग - ४ (अंतिम भाग)
ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५
"म्हणजे मी तिच्या प्रेमात पडलो आहे आणि तिच्याही मनात माझ्याविषयी काहीतरी आहे पण ती घाबरून तसं दाखवत नाही. आणि मला तिच्याशी लग्न करायला नक्कीच आवडेल पण तुझी इच्छा असेल तरच." आदित्य.
"तू हे मनापासून बोलतोय की, तिच्या बद्दल सहानुभूती वाटते म्हणून बोलतोय." शैलजा.
"आई, मी अगदी मनापासून बोलतोय, मी तिला सुद्धा बोलणार आहे पण मला हे सगळे आगोदर तुला सांगायचे होते म्हणून मग मी तिला नाही सांगितले." आदित्य.
"तू जर मनापासून तयार असशील तर माझी पण काही हरकत नाही. उलट मला तुझा अभिमानच वाटेल, ती आली की आपण दोघेही तिच्याशी या विषयावर बोलू." शैलजा.
"नको आधी मीच तिच्याशी बोलतो मग तू बोल, तुला माहीत आहे ना ती किती घाबरट आहे. आपण दोघेही एकत्र बोललो तर ती अजून घाबरेल." आदित्यचं हे बोलणं शैलजाला पटलं.
"हो तेही आहेच, बोल तू तिच्याशी बघ काय म्हणतेय. हो म्हणाली तर मला आनंदच होईल." शैलजा असे बोलत होती तोच काव्या आत आली, मग दोघांनीही तो विषय तिथेच थांबवला.
"संध्याकाळी आदित्य त्याच्या रूममध्ये लॅपटॉप वरती काम करत होता. शैलजाने मुद्दामच काव्याला त्याच्या रूममध्ये चहा घेऊन पाठवलं. मग तिही त्याला चहा घेऊन गेली आणि त्याच्या बाजूला येऊन उभी राहिली. तेवढ्यात त्याचे लक्ष तिच्याकडे गेले.
"काय ग? अशी का उभी आहेस?" आदित्यने विचारलं.
"चहा आणलाय तुमच्यासाठी." ती खाली मान घालून म्हणाली.
"अरे व्वा आता मला खरचं गरज होती याची." असे बोलून त्याने तिच्या हातातून चहा घेतला आणि तो चहा प्यायला. त्याचा चहा पिऊन झाल्यावर ती जाऊ लागली. तोच त्याने तिला थांबवलं.
"काव्या, थांब मला तुझ्याशी थोडंसं बोलायचे आहे."
"काय झालं? माझं काही चुकलं का? तिने घाबरून विचारलं.
"अगं नाही, तू बस इथे आणि मी काय बोलतोय ते ऐकून घे." आदित्य म्हणाला तसं ती घाबरतच बसली.
"हा बोला काय बोलायचे आहे?" काव्या.
"काव्या, माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे आणि मला तुझ्याशी लग्न करायचे आहे." आदित्य म्हणाला तसं ती घाबरून मागे सरकली.
"अहो, पण मी एक विधवा आहे." काव्या.
"माहितीये मला, पण त्यात तुझा काही दोष नाही आणि तुला पुन्हा नव्याने आयुष्य जगण्याचा अधिकार आहे. आणि मला हेही माहीत आहे की तुला सुद्धा मी आवडतो. तू रोज मला चोरून बघते ते मला माहीत आहे." असे बोलून त्याने तिचा हात हातात घेतला. तोच ती लगेच रडू लागली. तिला कसं व्यक्त व्हायचं हेच कळेना. मग त्याने तिला शांत केले.
"तुझ्या मनात जे काही आहे ते बोलून मोकळी हो आजिबात घाबरू नकोस. तुला सुद्धा तुझ्या मनाप्रमाणे जगण्याचा अधिकार आहे." आदित्यने तिला धीर दिला. तेव्हा कुठे ती बोलू लागली.
"मला तुम्ही खूप आवडता पण मी तुम्हांला सांगायला घाबरत होते. मला कोणाचाही आधार नसताना तुम्ही आधार दिला, मग तुमच्या घरात राहून मी या घरातलीच होण्याचे स्वप्न कसे पाहू. असे मला वाटत होते. माझेच मन मला खात होते. आणि मी एक विधवा असताना असा विचार करणे देखील चुकीचे वाटत होते." काव्याने अखेर तिचं मन मोकळं केलं.
"तू आता कसलाही विचार करू नको. मी शेवटच्या श्वासापर्यंत तुझी साथ देईल हा शब्द आहे माझा." आदित्य म्हणाला.
"पण, काकींना हे सगळे मान्य होईल का?" काव्याने विचारलं. तोच शैलजा आत आली. तिला बघून काव्या अजूनच घाबरली आणि पटकन उठून उभी राहिली.
"मी सगळं काही ऐकलं आहे काव्या, आणि मला हे मान्य आहे. आज तुम्ही दोघांनी मिळून जो काही निर्णय घेतला आहे त्यामुळे मी खरचं खूप खूश आहे. आणि मी स्वतः लवकरच तुम्हा दोघांचे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला आहे." शैलजा.
"पण, काकी माझ्या आईवडिलांना ही गोष्ट सांगायला हवी असे मला वाटते." काव्या.
"हो आपण त्यांच्या घरी जाऊन त्यांना सगळे काही सांगू. आणि आजपासून मला आई म्हणायचे." असे बोलून शैलजाने दोघांना जवळ घेतलं आणि दोघांच्याही डोक्यावरून मायेने हात फिरवला.
एक दिवस ते तिघेही काव्याच्या आई बाबांकडे गेले आणि त्यांना काव्याच्या बाबतीत जे काही घडलं ते सगळं सांगितलं.
"काव्याच्या बाबतीत जे घडलं होतं ऐकून त्यांचे डोळे भरून आले आणि त्यांनी शैलजाचे आभार मानले. नंतर त्यांनी काव्याला रीतसर लग्नाची मागणी घातली. काव्याच्या आई बाबांनी आपल्या मुलीच्या भविष्याचा विचार करून लग्नाला होकार दिला आणि एक चांगला मुहूर्त बघून काव्या आणि आदित्यचं लग्न लावून दिलं. आणि तिथून काव्याचा एक नवीन वाटेवरचा प्रवास सुरू झाला. त्या प्रवासात आदित्य कायम तिच्यासोबतच होता.
समाप्त
©® सौ. रोहिणी किसन बांगर
टिम - सुप्रिया
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा