नील आणि सुनयना भाग-१

नील आणि सुनयना यांची घर जपण्याची कथा!
#कौटुंबिककथालेखन
#ईरास्पर्धा

शीर्षक:- नील आणि सुनयना भाग-१

"काय झालं रे ? तू असा का शांत बसला आहेस?" नीलचा मित्र त्याला विचारत होता.

"अरे तुला काय सांगू. माझ्या घरी दररोज काही ना काही भांडणं होतच असतात. वैताग आलाय मला तर."

"कशावरून भांडणं होतात?" त्याच्या मित्राने विचारले.

"अरे माझ्या लग्नाला आता सहा महिने झालेत. त्यात माझी बायको सर्व नीट करण्याचा प्रयत्न करते पण होते काय आईला काही वेगळे आवडते आणि ती पुन्हा मी बदलला म्हणून बोलत असते."

"ते तर प्रत्येक घराची कहाणी आहे त्यात काय. दुर्लक्ष करायचे रे."त्याचा मित्र सांगत होता.

नील आणि त्याचा मित्र ऑफिसनंतर घरी जाताना एका ठिकाणी थांबून चहा पित बोलत होते.

नील आणि सुनयना ह्यांचे सहा महिन्यांपूर्वी लग्न झाले होते. त्यांचा प्रेमविवाह नसल्याने आधी एकमेकांना समजून घेण्यात त्यांना वेळ गेला. नीलच्या वडिलांचे एका वर्षापूर्वी दुर्धर आजाराने निधन झाले होते. वर्षाच्या आत लग्न करण्यासाठी त्यांनी नीलचे त्यांच्याच दूरच्या नातेवाईक असलेल्या मुलीशी लग्न लावले होते.

नीलला मोठी बहीण होती आणि तिचे लग्न झालेले होते. तिला एक मुलगीही होती. जवळच तिचे सासर असल्याने ती माहेरी सारखी येत-जात होती.

सुनयना ही शांत स्वभावाची मुलगी होती. तिने फार्मसीचा डिप्लोमा केला होता. घरची आर्थिक परिस्थिती नाजूक असल्याने तिला पुढचे शिक्षण घेता आले नव्हते. छोटे-मोठे काम करत ती घरच्यांना हातभार लावत होती.

लग्न ठरल्यानंतर सासरी जावे लागणार म्हणून तिला तिची नोकरी सोडावी लागली होती. तसेच नीलने तिला पुढे नोकरी करण्याची इच्छा असेल तर करू शकते असे सांगितले होते.

नील हा बँकेत नोकरी करत होता. त्याने कर्ज घेवून स्वतःसाठी एक फ्लॅट विकत घेतला होता. आईवर त्याचा जास्त जीव होता. वडिलांच्या निधनानंतर त्याने तिला दुखवायचे नाही म्हणून ती म्हणेल त्या मुलीशी लग्न काहीही न विचारता केले होते.

नील घरी पोहोचला आणि पाहतो तर त्याची बहीण नेहमीप्रमाणे आजही तिथे होतीच. त्याची आई आणि बहीण टीव्ही बघत होते.

त्याची बायको त्याला पाणी देवून गेली. तिच्या चेहऱ्यावरूनच ती थकलेली आहे ते दिसले होते.

रात्री जेवण करून ती भांडत घासत होती.

"आज काय काय बनवले होतेस ?" तिच्याजवळ येवून तो म्हणाला.

"आईंनी सांगितल्यामुळे आणि ताईंना पण आवडते म्हणून घावणे, पुरणपोळ्या आणि कोथिंबीर वड्या हे बनवले होते." ती सांगत होती.

एवढ्या भांड्यांचा पसारा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठावे लागते हे त्याला समजून तिच्याबद्दल वाईट वाटत होते.

त्याने तिच्या हातातून काही भांडी घेवून धुवायला घेतली. तिने खूप वेळा नकार देवूनही त्याने तिला मदत केली.

रात्री झोपताना तिने दिवसभर काय काय केले हे तिला विचारत होता. नेहमीसारखे वेगळे काही केले नाही म्हणून ती मोजकच सांगत होती.

"अहो एक विचारू?" सुनयना विचारत होती.

"हो,विचार." तो म्हणाला.

"मी तर तेच तेच काम करते मग तुम्ही मला ते दररोज का विचारता?" तिने न राहून विचारले होते.

"कारण मला तू दिवसभरात काय काय करतेस हे समजायला नको का? तुझा दिवस कसा गेला हे मला पण समजायला हवे ना?" त्याने एक भुवई उंचावून विचारले.

त्यालाही आपल्याबद्दल जाणून घेण्याची इच्छा आहे हे समजून ती मनोमन सुखावली होती.

सकाळ झाली पण सुनयना लवकर उठली नव्हती. तिकडे चहा अजून दिला नाही म्हणून सासू सकाळपासून ओरडत होती.

नीलने आईला आणि स्वतःला चहा करून घेतला.

"काय रे? आज तुझी बायको उठली नाही? तुला जेवणाचा डब्बा बनवून देण्याचे काम पण तिच्याकडून होत नाही का?" रागातच त्याची आई बोलली.

"तिची तब्येत ठीक नसेल. कदाचित त्रास होत असेल म्हणून ती उठली नाही. मी दिला ना चहा करून आई? आज बाहेर खाईन." एवढे बोलून तो त्याच्या खोलीत ऑफिससाठी तयार होण्यासाठी गेला.

जाताना त्याने सुनयनाच्या कपाळावर हात लावून तिला ताप आहे का पाहत होता, त्याच्या स्पर्शाने तिला जाग आली.

"काय गं तब्येत ठीक नाही का?" त्याने काळजीने विचारले.

"हो ते दुसरा दिवस आहे." ती म्हणाली.

"काळजी घे आणि आराम कर. मी ऑफिससाठी निघतो."

ती "अहो पण.."

"मी आज बाहेर खाईन. तू तुझी काळजी घे. त्रास जास्त होत असेल तर डॉक्टरकडे जावून ये किंवा मला फोन कर;आपण जावू." त्याने तिचे पुढचे विचार समजून उत्तर दिले.

"हो."

ती तो गेल्यानंतर उठली पटापट तयार होऊन खोलीच्या बाहेर आली तर तिच्या सासूने बोलायला सुरुवात केली.

"काय ह्या आजकालच्या मुली. नवऱ्याला डब्बा द्यायला जीवावर येते. आम्ही पण आजारी पडत होतो पण कधी नवऱ्याला बाहेरचे खाऊ दिले नाही." सासूने टोमणा मारतच सकाळची सुरुवात केली.

तिने त्याकडे दुर्लक्ष केले. नाश्ता बनवून त्यांना दिला आणि दुपारच्या जेवणासाठी विचारणार तर सासूबाईंनी त्या त्यांच्या मुलीसोबत बाहेर जाणार आहे हे सांगितले.

तिने मग स्वतःसाठी खिचडी भात बनवला. आपली सून वरचढ होऊ नये म्हणून सर्व त्यांनी मला विचारून करायचे अशी ताकीद दिली होती. त्यामुळे सुनयना त्यांना सारे काही विचारूनच करायची. तसेच तिला स्वतःच्या इच्छेनुसार काही बनवायला मुभा नव्हतीच.

रात्र झाली होती. सर्व जेवण बनवून झाले होते. सुनयना एकटीच घरात होती. नीलही अजून आला नव्हता.

सुनयनाचा फोन वाजला आणि तिच्या चेहऱ्यावर त्यावरील नाव वाचून आनंद झाला.

क्रमशः

© विद्या कुंभार

सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.


🎭 Series Post

View all