Login

नील आणि सुनयना भाग-२

नील आणि सुनयना यांची घर जपण्याची कथा!
#कौटुंबिककथालेखन
#ईरास्पर्धा

शीर्षक:- नील आणि सुनयना भाग-२

सुनयनाचा फोन वाजला आणि तिच्या चेहऱ्यावर त्यावरील नाव वाचून आनंद झाला.

"बोल ग मीना." सुनयना हसत म्हणाली.

"काय गं , कशी आहेस तू? खूप दिवस झाले फोन नाही आला तुझा." मीना पलीकडून फोनवर विचारत होती.

"अगं कामात व्यस्त होते. त्यामुळे नाही बोलणे झाले. तू बोल तू कशी आहेस?" ती म्हणाली.

"मी मस्त. एवढ्या कोणत्या कामात व्यस्त असतेस तू?" मीनाने विचारले.

"अगं घरचे काम संपतच नाही. दिवस कसा जातो ते समजतच नाही. त्यात दररोज काहीना काही नवीन बनवावे लागते. पूर्ण थकून जाते पण कोणाला काही बोलू शकत नाही." आपल्या मनातील विचार ती मैत्रिणीला बोलून दाखवत होती.

थोडा वेळ त्या बोलतच होत्या.

"तुझी नणंद पण तिथेच राहते का?" मीनाने विचारले.

"नाही. त्यांचे घरजवळ आहे. त्यांचे सासू-सासरे गावी असतात. नवरा कामावर गेल्यावर एकट्या असतात म्हणून येतात. त्यात सासऱ्यांना जावून मागच्या महिन्यात एक वर्ष झाले मग सासूबाईंना सोबत म्हणून येतात."

"हो पण ती मदत करते की नाही ? कारण सर्व तुलाच करावे लागते." तिची मैत्रीण बोलली.

"नाही. त्यांना काम सांगितले की सासूबाईंना राग येतो आणि माहेरी माझ्या मुलीने आराम करावा असे त्यांना वाटते." सुस्कारा सोडत उद्याच्या डब्ब्यासाठी ती गवारची भाजी तोडत म्हणाली.

"माहेरपण हे काही दिवसांचे असते ती तर सारखीच येते. त्यात तू सांगितले की त्यांना मुलगी पण आहे. तिचे बनवणे आणि ही नवऱ्याला रात्री जेवणाचा डब्बा घेवून जाते ते पण तू बनवलेला. त्यातही तुला मदत करत नाही. काय बोलावे? तुझा नवरा हे सर्व कसे काय सहन करतो ?" मीनाला तर तिच्या सासरच्यांचा रागच आलेला.

"जावू दे गं, हा विषय सोड." सुनयनाला त्यावर पुढे बोलायचे नव्हते.

"तू ह्याबद्दल काहीतरी कर,नाहीतर आयुष्यभर तुला सहन करावे लागेल." मीना तिला समजावत म्हणाली.

काम करत असल्याने हे सर्व ती मोबाईलचा स्पीकर ऑन करून बोलत होती.

"चल ठेवते मी फोन नंतर बोलू." सुनयना असे बोलून फोन ठेवते.

फोन ठेवल्यावर ती मागे वळून पाहते आणि तिला आश्चर्याचा धक्काच बसतो. कारण मागे तो उभा होता.

आता त्याने कितपत आणि काय काय ऐकले हे तिला माहीत नव्हते. त्यामुळे तिला भीती वाटत होती.

" पाणी." तिने त्याला पाणी आणून दिले.

"आई कुठे आहे ? दिसत नाहीये." त्याचे असे सहजपणेच विचारलेले पाहून ती त्याने काही ऐकले नाही म्हणून निश्चिंत झाली होती.

"त्या आणि आई बाहेर गेल्या आहेत." तिने सांगितले.

"तू नाही गेलीस त्यांच्यासोबत चित्रपट पाहायला?" त्याने मोबाईलमध्ये पाहून विचारले.

"चित्रपट? " तिने प्रश्नार्थक चेहऱ्याने विचारले.

"हो, हा बघ ताईचा स्टेटस  त्यात दिसत आहे आज चित्रपट पाहायला गेल्या आहेत." त्याने त्याच्या मोबाईलमध्ये दिसत होता म्हणून दाखवला.

"जेवायला घेवूया? " तिने विचारले.

"हो चल ,मला पण भूक लागली आहे." तो म्हणाला.

रात्री खूप उशीरा त्याची आई,बहीण आणि भाची घरी आले.

"मामी आम्ही आज खूप फिरलो आणि मज्जा केली." भाची येवून आनंदाने तिला बिलगून म्हणाली.

"छान." हसतच सुनयना म्हणाली.

"बाळा, तू सोबत मामीला नाही नेलेस ?" नीलने विचारले.

"हो ना, मी मम्मा आणि आजीला विचारले होते की मामीला का आपण सांगितले नाही. तर आजी बोलली की तिला काही कळत नाही." अगदी निरागसपणे ती म्हणाली.

"ताई आणि आई काय कळत नाही माझ्या बायकोला?" त्याने त्यांना थेट विचारले.

"अरे तिची तब्येत बरी नव्हती ना म्हणून मी नाही म्हंटले." त्याची बहीण बोलली.

"आणि हिने लगेच तुला सांगितले? नव्हते सांगायचे आम्हाला म्हणून मी नाही सांगितले." त्याच्या आईला रागच आला.

"एकतर तिने मला काही सांगितले नाही. दुसरी गोष्ट तिला माहीत पण नाही की तुम्ही बाहेर कशासाठी गेला होता. मी तुमचे फोटो पाहून तिला सांगितले. आई तू तिचा का विचार का करत नाहीस? ताईला जसे सोबत घेवून जातेस तसे सुनयनाला घेवून जावू शकतेस ना?"

"मुलगी आणि सुनेमध्ये फरक आहे नील. तुला कसे समजत नाही?"

"तू केलास तर फरक आहे आई. नाहीतर कसा काय असणार? तू जसा ताईचा विचार करते तसाच माझ्या बायकोचा पण विचार करावा. ताई तिच्या घरी कमी इथे जास्त आहे का तर ती जवळ राहते म्हणून?" तो थोडा आवाज चढवून म्हणाला.

"वाह वहिनी, खूप छान कान भरले माझ्या भावाचे. आता मी इथे येते ते पण तुम्हाला आवडत नाही. पाहिलेस ना आई?" त्याच्या बहिणीला आपला लहान भाऊ असा बोलेल हे अनपेक्षित होते.

"हे तुझे पण घर आहे. तू केव्हाही येवू शकतेस. त्याचे कशाला ऐकतेस." आई पण रागाने बोलली.

"आई मागच्याच महिन्यात मी तुला सुनयनाला तिच्या माहेरी पाठव असे म्हणालो होतो तेव्हा तू बोललीस की नको तिने कशाला माहेरी सारखे जायला हवे. "तो म्हणाला.

"अरे मग इथले कोण काम करणार? आता सर्व करायला मला जमत नाही ." आई म्हणाली.

"मी लग्न करून इथे तिला फक्त आपली कामे करण्यासाठी आणलेले नाही आहे. तसेच तू ताईला इथे आल्यावर काही मदत कर पण म्हणत नाहीस. एकटीने सर्व सुनयना करत असते. त्यातही तुम्हाला हवे नको ते सगळं करते. आजच काय मागे पण खरेदीसाठी तुम्ही तिला नेले नव्हते. ती मला सांगत नसली तरी मला माझ्या डोळ्यांनी दिसते." आज तो त्याच्या बायकोसाठी बोलत होता.

सुनयना फक्त ऐकायचे काम करत होती. कारण ती मध्ये बोलली तर पुन्हा भांडण वाढेल असे तिला वाटत होते.

"ताई, तू इथे येतेस मला त्याबद्दल काहीच समस्या नाही पण माझी बायको सर्व काम करेल हे मला मान्य नाही. तुम्ही तिला मदत करा. इथून तू हिने बनवलेले जेवण घरी घेवून जाते तेव्हा तुला काहीच वाटत नाही का? एकदा दोनदा ठीक आहे पण किती वेळा हे वारंवार होत आहे. माझ्या जबाबदारीवर तिला तिच्या घरच्यांनी इथे पाठवले आहे आणि आपण काय करतोय तर तिला कामे लावत आहे."


"घरची सून आहे तर तिने काम केलेच पाहिजे. तिचे हे कर्तव्य आहे. मी नाही का केले तुझ्या काका-काकूंचे आणि आणि आजोबांचे ? मला होते का मदत करायला कोणी?" आईला काही त्याने तिची बाजू घेतलेली आवडले नव्हते.

क्रमशः

© विद्या कुंभार

सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

🎭 Series Post

View all