Login

नेहाची कमाल राधाची धम्माल

भन्नाट विज्ञान कथा
*नेहाची कमाल राधाची धम्माल*

.अग नेहा! उठ लवकर कॉलेजला जायला उशीर होतोय!" आईचा आरडा ओरडा सुरू होता. मी पण उठुन तयारी केली. तो पर्यत बाबा आणि लहान भाऊ निखिल नाष्टा करयला थांबले होते माझ्या साठी.

"चल! आई लवकरच आण काय असेल ते मला कॉलेजला जायला उशीर होतोय! आज आमच्या वर्गाची मोटो रिसर्च सेंटरला विजिट आहे. सगळेजण थांबले असतील माझ्या साठी!"

"हो ग बाई! तयारच आहे सगळं! तुझी ना ही नेहमीचीच घाई असते. कधी चांगल व्यवस्थित बसुन खाशील तर नशीब!.आईची बडबड सुरू होती. त्यांत नेहमीप्रमाणे बाबांनी उडी घेतली. "अग काय हे नेहा! रोज रोज तूझ घाईच रडगाण ते जाऊ दे तूझ्या लग्नाच काय? इतकी चांगली चांगली मुलं सांगुन येतात. त्यांना काय उतर देऊ मी? आताच एका मित्राचा निरोप होता. त्यांचा मुलगा चांगला आहे. मी आई कडे त्याची माहिती दिलीय नंतर घाल एकदा नजरे खालून!"

"बाबा! किती वेळा तोच तोच विषय मी सांगितलय ना तुम्हांला की, मी सध्यातरी चार-पाच कोटी वर्ष लग्न करणार नाही म्हणून. मला आयुष्यात अजुन भरपूर काही करायचे आहे. आता तर मी कुठे तिसऱ्या पायरीत प्रवेश केलाय!" माझ नेहमीचे उत्तर.

. अग हो! पण मी आता पाचव्या म्हणजे शेवटच्या पायरीवर आहे. आता मला पुनर्जन्मासाठी फक्त दहा कोटी वर्ष राहीलीत. त्या आधी करुन घे अस मी म्हणतोय बाकी काही नाही!"

" हो बाबा! तोपर्यंत नक्की करेन तुम्ही काळजी करू नका!"

"ताई!तु आज मोटो रिसर्च सेंटरला चाललीस काही विशेष?" छोट्या निखिलने विचारले." हो! महत्वाचे काम आहे. कारण काही काळानंतर आमची एक ग्रह भेट आहे. त्यासाठी आपल्या मोटोलीनी त्या ग्रहांवरचे जे जीव आणले आहेत. त्यांच्या गुणधर्माचा अभ्यास करण्यासाठी आम्ही जात आहोत. जेणेकरून त्या ग्रहांवर भेट दिल्यानंतर आम्हांला त्याचा उपयोग होईल!"

"कोणत्या ग्रहावर भेट आहे ग ताई?" छोटयाचे प्रश्नपुराण चालू झाले. तसं त्याला उत्तर देण आवश्यक होत. म्हणून मी त्या ग्रहाची थोडक्यात माहिती सांगितली .

"आपली मोटोको सूर्यमाला आहे ना तशी आपल्या उतर दिशेला सातशे प्रकाशवर्ष लांब एक सूर्यमाला आहे. त्या सूर्यमालेत तिसऱ्या क्रमांकावर एक ग्रह आहे. तेथील जीव त्याला पृथ्वी अस म्हणतात. विशेष म्हणजे त्या ग्रहावर आपल्या सारखेच दिसणारे जीव आहेत. त्या ग्रहावर जायचे आहे आम्हांला अभ्यास करायला एका वर्षासाठी!"

"फक्त एका वर्षासाठी?" छोट्याने फार कुतुहलाने विचारले. तो पहिल्याच पायरीत असल्याने त्याने असे प्रश्न विचारणे साहजिक होते.

"अरे! आपल्या मोटो वरचे एक वर्ष नाही तर त्या पृथ्वी ग्रहावरच एक वर्ष. आपल्या मोटो वर तर एक वर्ष क्षणात होते. कारण आपला मोटो ग्रह प्रकाशवेगाच्या दुपटीने स्वतः भोवती फिरतो. आणि त्याचं वेगानं तो आपल्या सूर्याभोवती देखील फिरतो. त्यामुळे आपले आयुष्यमान स्थिर आहे.काही काळापूर्वी आपल्या कडे म्रुत्यु देखील होत. पण आज आपण इतकी प्रगती केली आहे की, आता आपण म्रुतु वर सुद्दा विजय मिळवला आहे.त्यामुळे आपली लोकसंख्या मोठ्या प्रमाणात वाढेल अशी भीती होती म्हणुन आपण निसर्गचक्र कायम राखण्यासाठी पुनर्जन्म मशीन तयार केली. त्यांत शंभर कोटी वर्ष पूर्ण झालेल्या मोटोलीला पुनर्जन्माच्या मशीन मधे टाकून नवीन गर्भधारणा झालेल्या मोटोस्त्रीच्या गर्भात स्थलांतरित केले जाते. तो पर्यत त्याची मागची सगळी मेमरी डिलीट केली जाते.गर्भधारण प्रक्रियेनुसार मुळे त्याचा पुनर्जन्म कोणत्या कुटुंबात होईल हे देखील कोणाला माहिती नसते.आपल्या कडे जन्मदर आणि म्रूतूदर सारखाच आहे.त्यामुळे आपली लोकसंख्या नियंत्रित आहे. आणि निसर्गचक्र देखील अबाधित राखले आहे!"


"आपला मोटो ग्रह पृथ्वीच्या तुलनेने पाचशे पट मोठा आहे. आणि आपला सूर्यदेखील त्यांच्या तुलनेत वीस पट मोठा आहे. तेथे वेगवेगळे आकाराचे हजारो प्राणी आहेत.आपल्याकडे फक्त एकाच प्रकारचे म्हणजे आपण मोटाली!"

" पृथ्वी ग्रहावर दिवस रात्र पण होतात!"

"रात्र म्हणजे काय ग ताई?"

"अरे! रात्र म्हणजे अंधार आपण घराच्या दरवाजा खिडक्या बंद केल्यावर होतो तसा. पण आपला सूर्य मावळत नाही त्यामुळे आपल्याकडे तो करावा लागतो. आणि तिकडे तो नैसर्गिक रित्या होतो. तिथे बारा तासांची रात्र आणि बारा तासांचा दिवस असतो!"

" चल, चल! निघते मी मला आधिच उशीर झाला आहे!"

मी कॉलेज गाठले सगळेजण माझीच वाट पाहत होते. लगेच आम्ही अँतर्धान पद्दतीने मोटो रिसर्च सेंटर गाठले. हे सेंटर आमच्या मोटो ग्रहावरील सर्वात मोठे रिसर्च सेंटर होते. त्यानंतर पुनर्जन्म रिसर्च सेंटर चा क्रमांक होता. मोटो रिसर्च सेंटर नुसते आभ्यासकेंद्र नव्हते तर एक मोठ पर्यटनस्थळ देखील होते. तेथे वेगवेगळ्या ग्रहावरून आणलेले प्राणी व वस्तू यांच्या प्रतीक्रुती ठेवल्या होत्या. तर आभ्यासविभागांत हे प्राणी व वस्तु प्रतेक्ष स्वरूपात उपलब्ध होत्या.

पाचशे किलोमीटर पर्यत या सेंटर चा विस्तार होता. त्यांत वेगवेगळ्या ग्रहांसाठी स्वतंत्र विभाग होता. तेथे त्या ग्रहाची आवश्यक ती बरीचशी माहिती उपलब्ध होती. आजपर्यंत चारशे बावन्न ग्रहावरील जीव व इतर नमुने आणले गेले आहेत. हे सर्वच नमुने आकाशगंगेतीलच . आकाशगंगेच्या बाहेर अजुन मोटोलीची झेप गेली नव्हती. पण ती देखील लवकरच जाईल अशी आशा होती. कारण मेरू नावाच्या अत्याधुनिक यानांचे काम आता अंतिम टप्प्यात होते.त्याची वेगमर्यादा प्रकाशवेगाच्या शंभर पट वाढवण्याची सोय असेल.आणि महत्वाची बाब म्हणजे आकाशगंगेच्या बाहेर जाण्याची संधी आमच्यातील दहा जणांपैकी कोणाला तरी मिळणार होती. कारण आमच्या आभ्यासक्रमाच्या शेवटच्या टप्यात ग्रहभेट अनिवार्य होती. त्यानंतर ऐच्छिक तीन शाखा होत्या एक म्हणजे अंतराळ प्रवास व अभ्यास, दुसरी टाईम मशीन भूतकाळ प्रवास व आभ्यास, तर तिसरी शाखा टाईम मशीन भविष्यकाळ प्रवास व अभ्यास ही होती.

आमचा दहा जणांचा ग्रुप होता त्यांत सहा मुली व चार मुलं होती. ग्रहभेटी नंतर जो तो आपल्या आवडत्या शाखेत जाणार होता.

सेंटरच्या गेटवरची आवश्यक प्रक्रीया पार पाडल्यानंतर आमच्यासाठी एक गाडी आली. पृथ्वी विभागाचा क्रमांक पस्तीस होता. विभागाच्या गेटवर कळ दाबल्यावर दार उघडले. आतमध्ये एक अदभुत नजारा आमची वाट पाहत होता. आत मधील द्रुष्य पाहिल्यानंतर आम्ही सर्वच आश्चर्यचकित झालो. अतिशय निसर्गरम्य वातावरण, नदी, नाले, झाडे,वेगवेगळे प्राणी आणि त्यांत आपल्या सारखेच दिसणारे जीव. सगळं अदभुत होत. त्यांत तोडा क्रूत्रिम पणा असला तरी ते जीव मात्र खरे होते.. ते एकमेकांशी बोलत होते.

तेथे असलेल्या गाईड ने अतिरिक्त माहिती दिली. की, या जीवांना त्या ग्रहावरील एका समुद्रातुन आपल्या त्या ग्रहावरच्या प्रवेश द्वारातून आणले आहे. त्या प्रवेश द्वाराला पृथ्वीवासी बर्मुडा ट्रेन्गल अस म्हणतात. यात त्या ग्रहावरचे बरेचसे सैनिक व वैमानिक आहेत. यातील महिला, मुलं व इतर लोकं प्रवासी बोटीतुन आणले आहेत.

या सगळ्यांना येथे आणल्यापासुन त्यांच्यावर वेगवेगळे प्रयोग सुरू आहेत. त्यांच्या मागच्या सर्वच मेमरी नष्ट केल्यात त्यामुळे ते कोण आहेत या विषयी त्यांना काहीच माहिती नाही. ती सध्या भाषा बोलत आहेत ती देखील आपली मोटोलीन्ची आहे. या सर्वांना इथे बंदिस्त ठेवणे आपल्याला पटत नाही पण अभ्यास करण्यासाठी कराव लागतंय. म्हणुन तर त्यांच्या आवश्यक त्या सगळ्या प्राथमिक गरजा पूर्ण केल्या जातात.

तसं पृथ्वी बद्दल आम्हांला प्राथमिक माहिती होती. पण येथे आल्यानंतर बरीचशी माहिती मिळाली. आणि त्या ग्रहावर आपण प्रतेक्ष फिरत आहोत असा अनुभव देखील आला.

आमचा ग्रहभेटीचा काळ ठरला. आमच्या प्रवासासाठी कोल्कू या अंतराळ यानाची व्यवस्था केली गेली होती. याना विषयी संपुर्ण माहिती आम्हां सगळ्याना होती.कोल्कू यान मेरू च्या तुलनेत साधे होते. कारण याचा अंतिम वेग प्रकाशवेगाच्या फक्त पाच पट होता.

आम्ही पृथ्वीवर जाऊन काय काय करायचे. याचे सगळे नियोजन. आमच्या हायकमांड नियोजन समितीने केले होते. त्यामुळे तेथे जाऊन कोणी काय करायचे हे वेगळे सांगायची गरज नव्हती. कोल्कू यानाची वेग मर्यादा प्रकाशवेगाच्या पाच पट म्हणजे आकाशगंगेत फिरण्यापुरती ठीक- ठाक होती त्यामुळे आम्ही लवकरच पृथ्वीवर पोहोचणार होतो.

आम्ही आमच्या पृथ्वीद्वारा जवळ म्हणजे बर्मुडा ट्रेन्गल मध्ये पोहोचलो. सगळ्याना पृथ्वीवर वेगवेगळी ठिकाण दिली गेली होती. सर्वानी एकमेकांना शुभेच्छा दिल्या व आप आपल्या ठिकाणी जायला अँतर्धान पावले.

माझ लोकेशन भारत देशांतील महाराष्ट्र राज्यात मुंबई हे शहर होते. काही क्षणातच मी मुंबईला आले. मुंबईची आधिच बरीचशी माहिती होती. आता पुढची महत्वाची पायरी म्हणजे शरीरप्रवेश यांसाठी मात्र आम्हांला सूट दिली होती. आम्ही आमच्या परीने शरीर निवडायच होत. मी देखील माझ्यासाठी एक शरीर शोधले.

राधा... हो राधा नाव होत तीच इयत्ता दहावीत शिकणारी एक मध्यमवर्गीय कुठूंबातील मुलगी. दिसायला खूपच सुंदर पण अभ्यासात तितकीच कमकुवत .कधी पन्नास पंचावन्न टक्क्यांच्या वर गेली नाही. पण राधा अतिशय सरळ स्वभावाची होती. कोणालाही उलटून न बोलणारी घरात आईला मदत करणारी. म्हणजेच थोडक्यात नाका समोर चालणारी. तीरात्री झोपलेली असतांना मी तिच्या शरीरात प्रवेश केला. शरीरात प्रवेश केल्यानंतर मी लगेचच तिच्या मेंदूतील सर्वच माहिती माझ्या मेंदूत भरली. आणि मी तिच्या शरीरात असे पर्यत तात्पुरता तिचा मेंदु निकामी केला. आता तिच्या शरीरावर माझ नियंत्रण होत.

सकाळी उठल्यावर काहीसे वेगळे वाटले. माझ्या थोड्या नवीन सवयी पाहुन राधाच्या आईला संशय येणे साहजिक होते.कारण राधाचा शांत स्वभाव होता आणि माझा अतिशय चंचल. पण नवीन वर्षात नवीन संकल्प केलेत अस सांगुन निभावल.

शाळेत जायला निघाले तेंव्हा तिच्यावर कोणच्या कश्या वाईट नजरा आहेत ते समजले. त्याचं बरोबर तिची छेड काढणारे चिडवण्यासाठी टपलेले त्रास देणारे सर्वच पाहिले. पण आता मी जोपर्यंत तिच्या शरीरात आहे तोपर्यंत तिला काहीच काळजी नव्हती. कारण पृथ्वीवरच्या माणसांपेक्षा आमच्या मोटोली कडे कितीतरी क्रूत्रिम तसेच नैसर्गिक शक्ती होत्या.. त्यामुळे त्यांची मी कशी जिरवली ते सांगेन कधी तरी..असो.

दोन महिने झाले राधाच्या शरीरात राहून मी माझे काम नियोजित पद्दतीने करत होते. मार्च महिना सुरू झाला. आणि चीन या देशातून आलेल्या करोना नावाच्या आजाराने देशांत थैमान घातले. पृथ्वीवरच्या अनेक देशामध्ये हा आजार पसरला होता पण भारतासारख्या जास्त लोकसंख्या असलेल्या देशात तर या आजाराने अतिशय भयंकर स्वरूप धारण केले होते.


मुंबई सारख्या शहरात तर फारच भयानक परिस्थिती होती दिवसागणीक सातशे आठशे लोकं या रोगाला बळी पडत होती.
विशेष म्हणजे यांवर अजुन कोणतीच लस किंव्हा औषध उपलब्ध नव्हते. त्यामुळे सगळीकडे या आजारा बद्दल दहशत होती.रोजच्या रोज मानस किडया मुंग्या सारखी मरत होती. सरकार ने यांवर उपाय म्हणुन कडक लॉकडाऊन लावले होते. तरी हा आजार आगीसारखा शहरात पसरत होता.


ही सगळी परस्थिती पाहुन राधाच्या शरीरातील माझे मन विचलित झाले. म्रुत्यु काय असतो आणि त्या नंतर घरच्या लोकांचा आक्रोश काय असतो तोअगदी जवळून पाहिला. हा फार वेगळा अनुभव होता. कारण आमच्या कडे म्रुत्यु हा प्रकारच नव्हता.

आता परिस्थिती फार हाताबाहेर गेली होती. एकट्या मुंबईचा दिवसाचा म्रुत्यु आकडा पंधराशेच्या वर गेला होता. शेवटचा पर्याय म्हणून मी आरोग्यमंत्री यांना मी एक मेल केला त्यांत संगितले की, या रोगांवरच्या लसीचा फार्मूला माझ्याकडे आहे. आणि त्या विषयी अधिक माहिती लिहली. आरोग्यमंत्री स्वतः डॉक्टर असल्याने त्यांना यात थोड तथ्य वाटल्याने त्यांनी माझ्या पत्राचे उत्तर दिले.

कु. राधा आपले पत्र मिळाले. तुम्ही दिलेल्या माहितीनुसार आपण सध्या दहावी इयत्तेत शिकत आहात. इतक्या लहान या औषधाचा फार्मूला शोधणं काहीस अवघड आहे. त्यामुळे यांमध्ये काही राजकीय स्वार्थ किंव्हा निव्वळ प्रसिद्धीसाठी अस काही करून सरकारची दिशाभूल करण्याचा प्रकार आढळल्यास आपल्यावर कडक कार्यवाही केली जाईल याची नोंद घ्यावी.

दुसऱ्या दिवशी सकाळीच एक रुग्णवाहिका सुरक्षा पथकासह आमच्या सोसायटीत येऊन मला घेऊन गेले. मला का नेले जात आहे या विषयी कुठूंबात देखील कोणाला कल्पना नव्हती. माझा रिपोर्ट सकारात्मक आला असेल असेच सगळ्याना वाटले. तसं मी राधाच्या शरीरात असेपर्यंत करोना काय इतर आजार ही होण अशक्य होत. मला गाडीतुन नेताना सगळी सोसायटी आपआपल्या खिडकी तुन पाहत होती. मला सहानुभुती देण्या ऐवजी मनातल्या मनात शिव्या शाप देत होती. कारण आमच्या सोसायटीत अजुन कोणी रुग्ण सापडला नव्हता. मी पहिलीच होते.आणि आता ही सगळ्या सोसायटीत पसरवून टाकेल अस त्यांना वाटत होत.

गाडीतुन मला अतिशय मोठ्या दवाखान्यात गुप्ततेत नेण्यात आले. एका बंद खोलीत आरोग्यमंत्री व संशोधक मंडळ बसले होते.त्यांच्या समोर मला बसवण्यात आले.


मला पहिला प्रश्न विचारण्यात आला तो म्हणजे हा फार्मूला तुम्हांला कुठून मिळाला. तसा तो प्रश्न मला अपेक्षित होता. त्यांवर मी म्हणाले परवाच्या रात्री स्वप्नांत पाहिला. माझ्या या उत्तराने त्यांचे काहीच समाधान होणार नाही हे माहिती असुन मी हे उत्तर दिले. कारण एव्हाना त्या पथकाने शाळेतून राधाची सर्वच अभ्यास कुंडली काढली असेल. त्यामुळे असच काही उतर देण गरजेचे होते.

त्यानंतर त्यांनी या फार्मूला विषयी त्यांनी मला बरेचसे प्रश्न विचारले त्या सगळ्यांची मी अतिशय समाधानकारक उत्तरे दिली. आधार शेवटी त्या स्वप्नाचाच घेतला. संशोधक पथकाला हे सगळे विचित्र वाटत होते. पण इतिहासात अश्या घटना घडल्या आहेत अस त्यातील एक संशोधक म्हणाले. बाकी फार्मूला चांगला आहे याविषयी मात्र सर्वांचे एकमत होते.

लगेचच तो फार्मूला वापरून लस तयार केली गेली. त्या लसीचा पहीला प्रयोग मी माझ्यावरच करण्याची विनंती केली. कारण मला पूर्ण खात्री होती की, ती लस एकदम सुरक्षित आहे. पथकातील काहींचा याला विरोध होता पण वेळ फार कमी होता. त्यामुळे त्या लसीचा पहीला प्रयोग माझ्यावरच करण्यात आला. दोन तासा नंतर माझी तपासणी करण्यात आली तर मी म्हणजेच राधाच शरीर एकदम नॉर्मल होते.

त्या नंतर तो फार्मूला वापरून शेवटच्या घटका मोजणाऱ्या दोनशे रुग्णांना ती लस देण्याचे ठरले. ही सगळी गुप्त योजना होती कारण या लसीच्या आवश्यक त्या चाचण्या झाल्या नव्हत्या. खरतर इतका वेळही नव्हता. कारण परस्थिती हाताबाहेर गेली होती.

मला सुरक्षा कारणा वरून अजुन काही दिवस अतिशय कडक सुरक्षेत त्याच प्रयोगशाळेत ठेवले होते. दुसऱ्या दिवशी शेवटच्या घटका मोजणाऱ्या दोनशे जणांना ती लस देण्यात आली.आणि काय चमत्कार दहा-बारा तासांतच त्यांच्या तब्बेतीत बरीचशी सुधारणा झाली. पुढच्या दिवशी तर ते ठणठणीत वाटायला लागले. पथकाने सर्वांची पुन्हा तपासणी केली. त्यांच्यावर त्या लसीचा कोणताही दुष्परिणाम झाल्याचे आढळले नाही. या प्रकरणावर आरोग्यमंत्री नजर ठेऊन होतेच. पथकाने ही आनंदाची बातमी त्यांना दिली.

तिसऱ्या दिवसापासुन या लसीचे उत्पादन युध्द पातळीवर सुरू झाले. पाच-सहा दिवसांतच मुंबई शहराचा म्रुत्युदर घटला पंधराशे वर गेलेला आता शंभरावर आला. लवकरच ही लस राज्यभर आणि काही दिवसांनी देशभरातील बाधित रुग्णांना देण्यात आली. त्यांत लक्षणीय सुधारणा दिसुन आली. या लसी मुळे संपुर्ण देशांतील करोना परिस्थिती पूर्ण नियंत्रणात आली. सरकार ने देखील सुटकेचा श्वास टाकला.


परस्थिती सामन्य झाल्यावर आरोग्यमंत्र्यांनी विशेष पत्रकार परिषद घेतली. मलाही कडक सुरक्षेत प्रयोगशाळेतून पत्रकार परिषदेत नेण्यात आले.आरोग्यमंत्र्यांनी त्यांचा बाजूलाच मला बसवले. सगळ्या पत्रकारांना आश्चर्य वाटले. कारण मला कोणी ओळखत नव्हते. कोण असावी ही मुलगी? असा त्या सगळ्याना प्रश्न पडला होता.

या पत्रकार परिषदेत जवळ पास सर्वच मोठे पत्रकार उपस्थित होते. आरोग्यमंत्री काय बोलणार या कडे सर्वांचे लक्ष लागुन होते.

सर्वच जनतेचे आभार मानून त्यांनी बोलायला सुरवात केली. ही विशेष पत्रकारपरिषद घेण्यामागे महत्वाचे कारण म्हणजे ही माझ्या बाजुला इयत्ता दहावीत शिकणारी मुलगी.त्या नंतर त्यांनी माझ्या संपूर्ण करोना फार्मूला कामगिरीचे वर्णन केले. लोकं मला लाईव्ह पाहत होती. सगळी कडे माझीच चर्चा चालु होती. एकदोन तासांतच मी सेलिब्रिटी झाले प्रसारमाध्यमात सगळीकडे मीच दिसत होते.आई वडील आणि कुटुंबीय यांचा आनंद गगनात मावत नव्हता.

काही दिवसांनी सरकारने राधाचा मोठा सत्कार केला. तिची सर्वोच्च नागरी पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. तसेच देवदूत ही पदवी देखील बहाल करण्यात आली.या सगळ्या करोना कामगिरीची जागतिक आरोग्य संघटनेने देखील चांगली दखल घेतली आणि या कामगिरी बद्दल नोबल पारितोषिका साठी राधा ची शिफारस केली.

या सगळ्या घाई गडबडीत बरेचसे दिवस निघुन गेले. खरतर हे काम नियोजनात नव्हते.त्यामुळे याची विचारणा समिती कडुन होईल हे मी जाणून होते.पण वेळ येईल तेंव्हा पाहुन घेऊ अशी मी मनाची तयारी केली.

पृथ्वीवरील मानस चांगली होती यात वादच नाही. पण काही गोष्टी मात्र खटकायच्या त्यांत अतिरिक्त धर्मवेडेपणा ही महत्वाची बाब. आपल्या धर्माच्या रक्षणासाठी ते समोरच्याचा जीव देखील घ्यायला मागे पुढे पाहत नसत. त्यामुळे अनेक देशांमध्ये तणावाचे वातावरण असे.कारण मोटो वर ना देश ना धर्म होता. त्यामुळे असे वाद होण्याचा प्रश्नच नव्हता.

या सगळ्याचा अभ्यास करताना वर्ष कस निघुन गेले काही समजलेच नाही.आमची परत जाण्याची वेळ जवळ आली पृथ्वीवासीनां सोडून जाणे कसतरीच वाटत होत. खास करून राधाला कारण तिच्याशी वेगळच भावनिक नात तयार झाल होत. मी गेल्यावर भविष्यात तीच कस होईल याची देखील काळजी वाटत होती.

शेवटी अतिशय दुःखद मनाने मी तिच्या शरीराबाहेर पडले. तिचा मेंदु पूर्वीप्रमाणेच करून दिला. पुन्हा एकदा राधाला डोळे भरून पाहिले व अँतर्धान पावले.

आमचा परतीचा प्रवास चालु झाला प्रवासात सगळ्यानी आपले बरे वाईट अनुभव संगितले. काही काळातच आम्ही मोटो वर पोहोचलो. सगळ्यानी सेंटर गाठले व आपआपले रिपोर्ट सादर केले माझा रिपोर्ट सादर करताना माझ्या नियोजित कामा व्यतिरिक्त कामाची चौकशी झाली. त्यांवर मी उत्तर दिल की, आपण इतके पृथ्वीजीव प्रयोगासाठी आणतो त्यांच्यावर आपल्या हितासाठी प्रयोग करतो त्याचं स्वातंत्र हिराउन घेतो. याची परतफेड म्हणा किंव्हा प्रायश्चित्त म्हणा मी तेथील माणसांचे प्राण वाचवले. माझ्या या उतराने समिती खूष झाली. फार चांगल काम केले म्हणून माझ अभिनंदन केले.

आता आमचा ऐच्छिक विषय निवडण्याची वेळ होती. तीन जणांनी भूतकाळ प्रवेश निवडला तीन जणांनी भविष्यकाळ प्रवास निवडला. आमच्या आवडीप्रमाणे आम्ही चार जणांनी अंतराळ प्रवास निवडला.


सगळ्यानी आप आपल्या प्रवासाला सुरवात केली. भूतकाळ वाले विश्वनिर्मीतीच्या कोड्या पर्यत जाणार होते तर भविष्यवाले विश्वअंताचे कोडे सोडवनार होते. आणि आम्ही अंतराळात लाखो कोटी अब्ज प्रकाशवर्षे दूर जाऊन नवीन जीवन अज्ञात वस्तु यांचा शोध घेणार होतो आमच्या अत्याधुनिक मेरू यानाचा अंतिम वेग प्रकाश वेगाच्या शंभरपट होता. त्यामुळे लवकरच आम्ही आकाशगंगेच्या बाहेर पडलो. आणि देवयानी या जवळच्या दिर्घिकेमध्ये प्रवेश केला. तेथे आम्हांला अनेक अदभुत आणि अज्ञात वस्तु दिसल्या. या सगळ्याचा आवश्यक तो डाटा आम्ही जमा केला. आता पर्यत आम्ही कितीतरी अब्ज प्रकाशवर्षे प्रवासात अनेक नवनवीन जीवन व इतर गोष्टी पाहिल्या.

सगळ्यानी आवश्यक तो डाटा गोळा केल्यानंतर ठरलेल्या वेळी परत यायचे होते. आम्ही देखील आमचा आवश्यक डेटा गोळा करून मेरू यानाची दिशा मोटोच्या बाजूने वळवली व परतीचा प्रवास सुरू केला. आता विश्व निर्मिती पासुन विश्व अंता पर्यत सर्वच प्रश्नांची उत्तरे मिळतील असा विचार करत असतानाच आमच्या मेरू याना समोर एखादी प्रचंड अशी अज्ञात वस्तु प्रकाश वेगाच्या तीस पट वेगानं येत असल्याचे संगणकावर दिसत होते. ती अज्ञात वस्तु पाहून आमच्या चारही जणांच्या मनात धडकी भरली. काय कराव काही सुचत नव्हते. यानाची दिशा बदलून उपयोग नव्हता. कारण त्या वस्तूचा आकार प्रचंड मोठा होता. ती अज्ञात वस्तु आमच्या डाटा मध्ये देखील नव्हती. ती वस्तु आमच्या यानाच्या फारच जवळ आली. आता आमची टक्कर अटळ होती. आम्ही सर्वांचे हात एकमेकांच्या हातांत घेतले व डोळे मिटले. धडाम!

"नेहा! नेहा!! कसला आवाज आला ग? अग! उठ लवकर साडेसहा वाजले शाळेला जायला उशीर होतोय!" आई ओरडत होती मी डोळे उघडले तर पलंगावरून खाली पडले होते त्याच्याच तो धडाम! असा आवाज होता. मी माझ्या डोक्यावर एक टपली मारली आणि खळखळून हसले...

लेखन - चंद्रकांत घाटाळ
संचालक - अनुजा अवकाश निरिक्षण केंद्र कासा
मो.७३५०१३१४८०
0