Login

घरटं भाग १

घरटं
घरटं भाग १

विराज. मुंबईच्या धावपळीच्या आयुष्यात रोजच्या रोज कॅमेऱ्यातून जग पाहणारा एक तरुण. लोकांच्या चेहऱ्यांमागचे भाव टिपणारा, क्षणांचा मागोवा घेणारा. पण सध्या तो या सर्व दिनक्रमाने खूप थकला होता. माणसांच्या कल्लोळाणे, सततच्या लाईट्स आणि शूटिंगने. त्याला वाटायचं, या सगळ्यात काहीतरी हरवत चाललंय. काहीतरी ज्याला 'शांतता' म्हणतात. एक दिवस, अचानकच, त्याच्या मनात एक जागा येऊन गेली कोकणातले दूर वसलेले एक गाव जे हिरवळीत गुप्त झालेलं. त्याच्या या प्रवासामागचं कारण होतं ती म्हणजे त्याची उत्सुकता कारण त्या गावाला कोणी 'शापित' म्हणायचं, कोणी 'विघ्नाचं माहेर'.अश्या गावाच्या शेवटी उभं असलेलं एक मोडकळीस आलेलं, पण बोलकं असे घर.त्या घराच्या श्वासाची कहाणी शोधायला निघालेला होता.“खूप काही घडलंय तिथं, जीव घेतलाय त्या जागेनं.”असे बोलायचे काही लोक जिथे कधीकाळी हसणं ऐकू यायचं, घरट्यासारखं कुणाचं एक छोटं सुख वसलेलं होतं आणि आता? आता तिथे फक्त भिंतींचा ओलसरपणा, आणि एक न संपणारी शांतता. पण विराजसाठी मात्र, त्याला वाटत होतं, तिथे काहीतरी आहे जे त्याच्या कॅमेऱ्यात साठवून ठेवावं. एखादी जिवंत गोष्ट.

सायंकाळची वेळ सूर्य डोंगराआडून आकाशात आपली केशरी रंगांची चादर पसरवत होता.तेव्हा विराज त्या गावात पोहोचला. गावाच्या टोकाला एक मोडकळीस आलेलं घर होतं. बाहेरूनच वाटत होतं, कित्येक वर्षांनी कुणीतरी पाय ठेवतोय इथे.ओसाड अंगण. पडलेली कुंपणं. भिंतींवर झाडांच्या सुकलेल्या वेली तर काही ठिकाणी कोपऱ्यांना बिलगलेली कोळ्यांची जाळी.

त्याने दार हलकसे ढकलून आत पाऊल ठेवलं.पहिलं पाऊल जसे टाकले तसे आतला थंडावा अंगावर सरसरून गेला. जणू कुणीतरी नजर लावून पाहतंय. असे त्याला वाटले.घराच्या छताला लावलेला पंखा धुळीने पूर्णपणे माखला होता. कोपऱ्यात लाकडी झोपाळा हवेमुळे हलका हलका हेलकावत होता. नक्की हवेमुळे का कोणाच्या अस्तित्वामुळे होतं कोणास ठाऊक?

सगळीकडे धूळ तर होती पण काळजाला थेट भिडणारा परिचित गंध सुद्धा त्याला जाणवत होता.

एका भिंतीवर एक फ्रेम होती थोडी वाकडी झाली होती,पण आतला फोटो स्पष्ट होता एक तरुण जोडपं. त्यांच्या मध्ये एक छोटी मुलगी. सगळ्यांच्या चेहऱ्यावर ते काळाचं हसू होते.विराजचा कॅमेरा ऑन होता.तो प्रत्येक कोपऱ्यातून काळ टिपत होता.

तो त्या फ्रेमजवळ गेला, आणि इतक्यात मागून एक जबरदस्त वाऱ्याचा झोत आला.धाडकन!

दार आपटलं. जोरात. त्या आवाजाने संपूर्ण घर हादरल्यासारखं झालं.

आणि त्याच वेळी, विराजच्या कॅमेऱ्याचे लाइट्स अचानक बंद पडले आणि त्यानंतर आवाज नाही, हलचाल नाही जाणवत होता तो फक्त गडद अंधार.

त्या गडद अंधारात फक्त विराजचा श्वास ऐकू येत होता. खोल. थरथरता.त्याच्या नकळत, मागे कुठे तरी, भिंतीवरून एक सावली सरकली. काहीतरी क्षणभर चमकलं. विराज थबकला. त्याच्या पाठीमागे कोणीतरी होतं. कुणीतरी, जे हलत नव्हतं. फक्त बघत होतं. एकटक.


कथा कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा.जान्हवी साळवेला फॉलो करा पुढील भाग मिस होऊ नये म्हणून!तुमच्या प्रतिक्रिया, शब्द, प्रेम माझ्यासाठी अमूल्य आहेत. कथा लेखनाधिकार जान्हवीकडे सुरक्षित. कृपया नावासह शेअर करा. लेखन चोरणे हा कायद्यानुसार गुन्हा आहे.