सकाळी वॉकवरून आल्यावर कमिशनरसाहेब आपल्या बंगल्यासमोरील गार्डनमध्ये, आपली पत्नी जयासोबत छान उगवत्या सूर्याचे दर्शन घेत चहाचा आस्वाद घेत होते. तेवढ्यात त्यांना टेबलवर असलेला लिफाफा दिसला. त्यात एका श्रीमंत घरातील मुलीचा फोटो आणि बायोडाटा होता. त्यांनी लिफाफा उचलला. आणि पाहिल्यावर ते आपल्या पत्नीला म्हणाले, " रोज नवीन मुलीचा फोटो आणि बायोडाटा येतोय. आता सम्राटचं लग्नाचं वय झालयं. चांगली स्थळं ही येत आहेत. तर यंदा कर्तव्य आहे, म्हणून उडवून द्यायचा का लग्नाचा बार ?" कमिशनरसाहेब हसत-हसत आपल्या पत्नीला म्हणाले.
--------
सम्राट कमिशनरसाहेबांचा एकुलता एक लेक होता. श्रीमंत बापाचा लेक असूनही वेळेचे आणि कष्टाचे मोल जाणत होता. तसेच स्त्रियांबद्दलही त्याच्या मनात आदर होता. सर्वगुणसंपन्न असलेल्या आपल्या लेकाचा आईवडिलांना अभिमान होता. त्याच्यासाठीच वधू संशोधन सुरू होते. पण आईच्या अटीत बसणारी मुलगी मिळेल का ? हा प्रश्न अनुत्तरित होता.
-------
" या अशा श्रीमंत घरातल्या लाडावलेल्या मुलीला तर मी मुळीच माझी सून करून घेणार नाही. माझी सून उठ म्हणल्यावर उठणारी आणि बस म्हणल्यावर बसणारी अशी हवी. मी ही तशीच होते डोक्यावर अक्षता पडल्यापासून सासू-सासरे जिवंत असेपर्यंत. आता कुठे मी तुमच्यासोबत बसून, असा हा चहा घेऊ शकतेय." जया म्हणाल्या.
"अगं जया, काळ खूप बदललाय आणि त्याप्रमाणेच आपल्यालाही बदलायला हवं!" समंजसपणे कमिशनरसाहेब म्हणाले.
"म्हणजे काय म्हणायचंय काय तुम्हांला ? एकही सापडणार नाही का , माझ्या मनाजोगी सून ?" जया पुन्हा थोड्या चिडून म्हणाल्या.
\"जयाच्या हाताखाली नोकर-चाकर आहेत, पण तरीही त्यांना घरात सून नव्हे; तर एक मोलकरीण आणायची आहे. हे त्यांच्या बोलण्यातून कमिशनसाहेबांनी बरोबर हेरले होते. प्रत्येक गोष्ट बोलून न दाखवता अनुभवाने कळाली की , चांगली लक्षात राहते. हा मनात विचार करून कमिशनरसाहेब गप्प बसले.
------------------------------------------------------------
रविवारचा दिवस असल्यामुळे सम्राटही त्यादिवशी घरीच होता. सम्राटसाठी एक स्थळ आलं होतं. बाबा आणि सम्राट गप्पा मारत होते. कंपनीतील सखारामकाका जयांच्या सांगण्याप्रमाणे गरीब घरातील मुलीचा फोटो आणि बायोडाटा घेऊन घरी आला होते. सखारामकाकाला नाष्टा आणि चहापाणी देऊन कमिशनर साहेबांनी त्यांना कंपनीत परत पाठवले. सहजच त्यांनी फोटो सम्राटला दाखवला. फोटो पाहताच क्षणी सम्राटचा चेहरा आनंदाने खुलला होता. लाडक्या लेकाच्या चेहऱ्यावरून ओसांडून वाहणारा आनंद कमिशनरसाहेबांनी अचूक हेरला.
"ही तीच मुलगी आहे बाबा , जिने , दाट आणि काळेभोर असलेल्या आपल्या लांबसडक केसांची वेणी मिरवत प्रेझेंटेशन केलं होतं. अहाहा! काय तिचे ते घारे टपोरे डोळे आणि नाजूक बांधा. खरंच बाबा, मला ही मुलगी माझी बायको म्हणून खूप आवडेल. तिच्या त्या प्रचंड आत्मविश्वासाच्या आणि प्रगल्भ ज्ञानाच्या मी प्रेमात पडलोय." आनंदाच्या भरात सम्राट सर्वकाही बोलून गेला.
(श्वेता आणि सम्राट एका बिझनेस संदर्भातील मिटींगसाठी पूर्वी भेटले होते. आणि श्वेताने बिनधास्तपणे दिलेल्या प्रेझेंटेशनमुळे अनेकजण तिच्या आत्मविश्वासाच्या प्रेमात पडले होते आणि त्यातलाच एक सम्राट होता.
"श्वेता, व्हॉट अ प्रेझेंटेशन यार! यू आर सो ब्रिलियंट." सम्राट श्वेताचा हात हातात घेऊन म्हणाला.
श्वेता चटकन हात मागे घेत म्हणाली, "थॅंक्स सर तुम्ही मला प्रेझेंटेशन करण्याची संधी दिलीत.)
"ही मुलगी नोकरी करते का ?" कमिशनरसाहेब घाबरून म्हणाले.
"हो बाबा." सम्राट म्हणाला.
कमिशनरसाहेब जया आजूबाजूला नाहीत म्हटल्यावर हळूच आपल्या लेकाला काहीतरी कुजबुजले.
"काय! पण हे कसं शक्य आहे बाबा ? मी आईशी खोटं बोलू शकत नाही आणि माझ्या आईच्या हट्टापायी माझ्या बायकोला नोकरी करू नकोस अशी सक्ती करू शकत नाही." सम्राट म्हणाला.
"अरे सम्राट, तुझी आई सांगून ऐकेल असं मला बिलकुल वाटत नाही. आणि मी तुला प्रॉमिस करतो, फक्त लग्न होईपर्यंत खोटं बोल परत मी करेन सगळं ठीक. तुझा आहे ना माझ्यावर विश्वास?" कमिशनरसाहेब म्हणाले.
"तरीही बाबा, एकदा तुम्ही आईशी बोलून बघा. प्लीज माझ्यासाठी." सम्राट म्हणाला.
"लगेच, तू फक्त शांत उभा रहा. काही बोलू नकोस."कमिशनरसाहेब म्हणाले.
सम्राटने होकारार्थी मान हलवली.
कमिशनरसाहेबांनी जयाला बोलावले आणि ते आपल्या पत्नीला म्हणाले, "जया, तुला नोकरी करणारी सून चालेल का?"
"किती वेळा मी तुम्हाला सांगितले आहे. मुळीच चालणार नाही. म्हणूनच मी सम्राटसाठी गरीब घरची मुलगी शोधत आहे. कारण हे जे वैभव आहे, ते केवळ माझ्या पतीमुळे दिसतेय आणि पत्नी म्हणून मी त्यांच्या सुखदुःखात खंबीरपणे त्यांची साथ दिली आहे. मग मी सांगेन ते माझ्या सुनेने ऐकावे आणि तसेच वागावे हा माझा अट्टाहास असणार. मी तिला नोकरी करू देऊन काय तिचाच तोरा बघत बसू का? " जया ठामपणे म्हणाल्या आणि तिथून निघून गेल्या.
कमिशनरसाहेबांनी आपल्या लाडक्या लेकाला आईच्या मायेने समजावलं. ते म्हणाले, "आई जे बोलली ते चुकीचं आहे असं मी मुळीच म्हणणार नाही. कारण तिने माझ्या आई-वडिलांची खूप सेवा केली. सून म्हणून सर्व सहन केलं, ते सांगतील तसेच ती वागली. पण आता ती तिच्या सूनेकडून जी अपेक्षा करतेय ती चुकीची आहे. कारण काळाप्रमाणे बदलायला हवं हे तिला मान्यच नाही. आता उतारवयात आमच्या तारुण्यातील कष्टाचं सूनेकडून तसेच आपल्या लेकाकडून कौतुक व्हावं अशी प्रत्येक सासूसासऱ्याची अपेक्षा असते. पण असं कौतुक करा, म्हटल्यावर कोणी कौतुक करत नसतं ना रे. आपलं वागणं इतकं प्रभावी असावं लागतं की, समोरच्याकडून कौतुकाचा वर्षांव झाला पाहिजे. पण हे आमच्या श्रीमतीच्या कधी लक्षात येणार कुणास ठाऊक?"
"मग आता काय करायचे बाबा?" सम्राट म्हणाला.
"वेळ ही प्रत्येक परिस्थितीवरच उत्तम औषध असतं. म्हणूनच मी म्हणतोय तसं तू कर. फक्त लग्न होईपर्यंत ही मुलगी नोकरी करतेय हे तुझ्या आईला कळू देऊ नकोस." कमिशनरसाहेब म्हणाले.
"बरं बाबा, मी नाही सांगणार आईला काही." सम्राट म्हणाला.
"ठरलं तर मग. मी उद्याच त्या मुलीला भेटतो. मुलगी कशी आहे हे पाहतो. ती चांगली असेल तर तुझ्या आईच्या मनातील खाष्ट सासू काढायला तिचीच मदत घेतो." कमिशनरसाहेब म्हणाले.
"कसं बाबा?" सम्राट म्हणाला.
"मुलगी पसंत पडली तर म्हणालो मी. आधी मुलगी तर पसंत पडू दे. मग ठरवू कसं? काय? ते. " कमिशनरसाहेब हसत-हसत म्हणाले.
दुसऱ्याच दिवशी कमिशनरसाहेब त्या मुलीच्या घरी तिला भेटायला गेले. दारातूनच त्यांनी पाहिलं, एक मुलगी आपल्या विधवा आईला घास भरवत होती.
"तू जा गं श्वेता कामावर. तुला उशीर होत असेल." आई अगदी व्याकुल होऊन बोलत होती.
"आई, तू ह्या गोळ्या घे बरं पटकन. मग मी जाईन." श्वेता आईला म्हणाली.
"या गोळ्या घेतल्यावर सुद्धा, तुझी आई बरी होणार नाही श्वेता." आई म्हणाली.
का असा विचार करतेस तू आई ? बाबांना तर मी पाहिलंच नाही, निदान तू असं बोलू नको." म्हणून श्वेता रडायला लागली.
"आत्ताच नाही जाणार पोरी मी. माझ्या गुणी लेकीच्या डोक्यावर अक्षता पडल्या की मी मरायला मोकळी." आई म्हणाली.
"मी तुला काहीही होऊ देणार नाही." आईचा हात हातात घेऊन श्वेता म्हणाली.
मायलेकीचा संवाद ऐकून कमिशनरसाहेब खूप काही समजून गेले. \"श्वेताच्या आईंना पाहिल्यावर असे वाटतेय की, त्या बर्याच दिवसांपासून अंथरुणावर पडून आहेत.\" कमिशनरसाहेबांनी मनात विचार केला.
श्वेता उठली आणि तिने बॅग अडकवली. समोर तिला अनोळखी असलेले कमिशनरसाहेब दिसले.
"कोण आपण?" घाबरून श्वेता म्हणाली.
स्वतःची ओळख करून देत कमिशनरसाहेबांनी श्वेताला, आपण तिच्या घरी का आलोय? याचं खरं कारण सांगितलं.
श्वेताने सरांना आत बोलावले. तिने ऑफीसमध्ये आज तिची रजा आहे हे कळवले. आणि स्पष्टच म्हणाली, "सर तुम्ही जी तुमची ओळख सांगितली, त्यावरून तुम्ही खूपच श्रीमंत व्यक्ती आहात हे मला समजलं आहे. मला माफ करा सर, पण माझ्यासारख्या गरीब मुलीला तुमच्या घरची सून होणे कसे शक्य आहे?"
"का शक्य नाही. आम्हीही माणसंच आहोत. आणि परिस्थितीच म्हणत असशील तर माझंही बालपण अत्यंत गरीब परिस्थितीत गेलंय. त्यामुळेच पाय जमिनीवर आहेत माझे." कमिशनरसाहेब श्वेताला म्हणाले.
"सॉरी सर. माझी चूक झाली तुम्हांला ओळखण्यात. पण हिंदी फिल्ममधल्यासारखं तुमच्या बिघडलेल्या मुलाला मी सुधारावं अशी तुमची अपेक्षा असेल आणि म्हणून तुम्ही गरीबा घरची मुलगी सून म्हणून स्वीकारत असाल तर मात्र मी लग्नाला तयार नसेल." श्वेता स्पष्टपणे म्हणाली.
"त्याच संदर्भात मला तुझ्याशी बोलायचं आहे." श्वेताच्या आजारी आईला कसलेही टेन्शन नको म्हणून कमिशनरसाहेब अंगणातील बाजेवर येऊन बसले. पाठोपाठ शवेताही आली.
"श्वेता माझा मुलगा अत्यंत सुस्वभावी आणि गुणी आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे तोही तुझ्या प्रेमात आहे. सम्राट सरपोतदार नाव ऐकले आहेस तू ?" कमिशनरसाहेब म्हणाले.
"हो मागे एकदा भेटलेलो आम्ही." श्वेता म्हणाली.
कमिशनरसाहेबांनी मुलाच्या आईला सुधारण्यासाठी सुनेची मदत हवी आहे हे सांगितले. श्वेतालाही ते पटले. अखेर श्वेताचे धूमधडाक्यात लग्न झाले. आणि श्वेता सासरी आली. एक महिन्यानंतर पोलीस घरी आले त्यांनी कंपनीच्या मालात भेसळ आढळली म्हणून सम्राटला अटक केली. तसेच कमिशनरसाहेबांची पेन्शन बंद झाली.
"आता काय करायचं ?" म्हणून जया रडू लागल्या. आर्थिक चडचण भासू लागली. पैशाची किंमत त्यांना कळाली होती. जया आडाणी असल्यामुळे काहीच करू शकत नव्हत्या. दोन महिन्यांनंतर त्या आपल्या सुनेला श्वेताला म्हणाल्या, "श्वेता, तू शिकलेली आहेस ना, मग आपल्या कुटुंबावर आलेलं हे संकट दूर करण्यासाठी नोकरी करशील ? मी पाण्याचा ग्लासही तुझ्या हातात देईन आणि शिवाय घरातली सगळी कामंही करीन."
घरातल्या सगळ्यांना हेच हवं होतं. आणि मग हसत कमिशनरसाहेबांनी सम्राट फोन करून बोलावून घेतलं सम्राटला पाहून जया म्हणाल्या, "तू तर तुरूंगात होतास ना?"
"नाही आई, हे सर्व नोकरी करणारी सून तुला नको होती म्हणून आम्ही नाटक केलं होतं." सम्राट म्हणाला.
"काय ?" जया म्हणाल्या.
"होय जया. हे सगळं मी मुद्दाम केलं. आता आपली आर्थिक बाजू भक्कम आहे, पण उद्या कशी वेळ येईल ? सांगता येत नाही. शिकलेल्या व्यक्तीच्या ज्ञानाचा मोबदला कमी असो अथवा जास्त तो कष्टाचा पैसा असतो आणि तो टिकवायचा कसा ? हे ही त्यांना समजतो. नाहीतर आई-वडिलांच्या संपत्तीवर बसून खाणारी मुलंही आजूबाजूला दिसतातच की, ती सुखी असतात ? की आपल्या कष्टाने आई-वडिलांच्या संपत्तीत भर घालणारी मुलं सुखी असतात? हा विचार तुला सांगून पटला नसता म्हणून वस्तुस्थितीचे प्रत्यक्ष दर्शन घडवले. आता आपल्या सुनेला नोकरी करू द्यायची की नाही ? हा सर्वस्वी तुझा निर्णय असेल." कमिशनरसाहेबांनी मोजक्या शब्दात आणि प्रत्यक्ष अनुभवातून आपल्या पत्नीला समज दिली.
"देव न करो आणि अशी वेळ माझ्या कुटुंबावर येवो. सूनबाई तू नोकरी कर. मी नाही आता विरोध करणार तुला." जयांच्या या वाक्याने सर्वांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून आले. आणि खऱ्या अर्थाने आज सासूबाईंनी जुना चष्मा उतरवला व नवा दृष्टीकोन स्विकारला.
सौ. प्राजक्ता पाटील.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा