Login

मायाची नवीन सुरुवात...

आधुनिक युगातील एकविसाव्या शतकातील सत्य परिस्थितीवर आधारित वास्तव दर्शवणारी कथा...
माया देसाई..., २८ वर्षांची, मुंबईत राहणारी एक ग्राफिक डिझायनर होती. तिचं आयुष्य इंस्टाग्राम, डेटिंग ऍप्स आणि झूम कॉल्स भोवती फिरायचं. ती हुशार, स्वतंत्र, आणि करिअरवर फोकस्ड होती, पण तिच्या वैयक्तिक आयुष्यात नेहमी काहीतरी कमी वाटायचं. ह्याला कारण तिचा भूतकाळ होता....


मायाचं लग्न दोन वर्षांपूर्वी मोडलं होतं ...म्हणजे तिचा डिव्हॉर्स झालेला होता. तिचा नवरा, राहुल देशमुख..., एक यशस्वी बिझनेसमन होता, पण त्यांच्यात कम्युनिकेशन गॅप आणि वेगळ्या अपेक्षा होत्या.

राहुलला बिझनेस ट्रीप्स आणि पार्टीज हव्या होत्या; मायाला स्थिरता आणि भावनिक जवळीक हवी होती. दोघांचे वाद वाढले होते, आणि एकदा राहुलने सांगितलं,


"माया, आपण एकमेकांना अजिबात मॅच नाही करत."
राहुलने सांगितलं तसं माया एकदम गप्प झाली.
मायाने डिव्हॉर्सला सहमती दिली, पण तिचा आत्मविश्वास डगमगला. ती विचार करायची, "माझ्यातच काही कमी आहे का? माझी नेमकी काय चूक आहे?"


पण ह्या सगळ्या नादात कधी डिव्हॉर्स झाला हे वेळे गणिक कळलच नाही.... पण डिव्हॉर्सनंतर माया एकटी पडली. तिला डिप्रेशन आल्या सारखं वाटू लागल.
तिच्या मैत्रिणींनी तरी पण तिला समजावून सांगितलं, "माया, यातून बाहेर पड. स्वतः च मन रमव दुसरीकडे.
फ्रेंड्स बनव....जास्तच वाटल तर डेटिंग ऍप्स ट्राय कर!"

तस मग तिने टिंडरवर प्रोफाइल बनवलं. तिथे तिला विक्रम भोसले भेटला. विक्रम भोसले, वय ३०, एक मार्केटिंग प्रोफेशनल, मजेदार आणि गोड बोलणारा होता. ते रात्री उशिरापर्यंत चॅट करायचे ... मीम्स, गाणी, आणि आयुष्याच्या गप्पा व्हायच्या. मायाला त्याच्याशी बोलताना बरं वाटायचं. पण विक्रम कधीच भेटायला तयार नव्हता.
त्याची सतत काही न काही कारण असायची....

पण तो सतत म्हणायचा, "मुंबईत ट्रॅफिक आहे," किंवा "आठवडा बिझी आहे." अशी त्याची कारण त्याची ठरलेली होती.
पण इकडे मायाच्या मनात विचार चक्र सुरू होत.
माया गोंधळली यामुळे. ती विचार करायची,
"हे प्रेम आहे का फक्त डिजिटल सिच्युएशनशिप?"
तिला हा प्रश्न सतत सतवयाचा.

तरी तिने एकदा विक्रमला विचारलं, "आपलं नातं नेमक काय आहे?"

पण त्यावर विक्रम हसला,
"अगं, फक्त मजा करतोय. तू का इतकं सीरियस घेतेस?" पण ह्यावर मायाला धक्का बसला. तिला समजलं की ती पुन्हा एका अस्पष्ट नात्यात अडकलीये, जिथे तिच्या भावना एकतर्फी होत्या.


मायाने विक्रमशी संपर्क तोडला, पण तिला एकटेपणा जाणवायला लागला. त्या काळात तिचा कॉलेजमधला मित्र, आदित्य पाटील, परत तिच्या आयुष्यात आला.

आदित्य आणि माया कॉलेजमध्ये बेस्ट फ्रेंड्स होते. आदित्य आता सिंगल होता आणि मायाला भेटायला आला. एकदा रात्रीच्या जेवणानंतर, दोघांनी वाईन पित गप्पा मारल्या, आणि गोष्टी पुढे सरकल्या. ते फ्रेंड्स विथ बेनिफिट्सच्या नात्यात आले. मायाला हे सोयीस्कर वाटलं ...भावनिक गुंतवणूक नाही, फक्त मजा...शारीरिक जवळीक..... यासाठी आदित्य ही सहमत होता,

"माया, आपण फक्त मित्र आहोत, ठीक आहे...ह्याच्या पुढे नको जायला...बंधन नकोत. कमिटमेंट म्हंटल की बंधन आली." आदित्यने तिला हे सांगितलं.
तिला पण ते पटल.

पण काही आठवड्यांनी मायाला आदित्यबद्दल भावना वाटू लागल्या. जेव्हा तिने हे सांगितलं, तेव्हा आदित्य गोंधळून गेला.

त्यावर आदित्य म्हणाला, "माया, मला फक्त कॅज्युअल रिलेशन हवंय. तुला जास्त हवं असेल तर आपण थांबवूया इथे हे सगळ." पण आदित्यच्या बोलण्याने मात्र मायाचं पुन्हा हृदय तुटलं. तिला जाणवलं की ती स्वतःला फसवत होती, कारण तिला खरं प्रेम हवं होतं, फक्त शारीरिक नातं नाही.

या सगळ्या अनुभवांनी माया थकली. तिने ठरवलं, "आता स्वतःला प्राधान्य द्यायचं." तिने डेटिंग एप्स डिलीट केले, आदित्यशी मैत्री राखली पण बाउंडरीज ठेवल्या.

तिने थेरपी सुरू केली, जिथे तिने तिच्या डिव्हॉर्समधील दुख आणि सिच्युएशनशिपमधील गोंधळ समजून घेतला. तिने नवीन छंद जोपासले ... पेंटिंग आणि योगा यावर फोकस ठेवला. तिच्या ऑफिसात तिला एक नवीन प्रोजेक्ट मिळाला, जिथे ती नील घाटगेला भेटली. नील घाटगे... वय ३२, एक प्रोजेक्ट मॅनेजर, शांत आणि समजूतदार होता. त्याने मायाशी मैत्री केली, तिच्या गोष्टी ऐकल्या. हळूहळू त्यांचं नातं पुढे सरकलं. नील आणि माया जवळ येत गेले...

नीलने शेवटी तिला सांगितलं, "माया, मला खरं नातं हवंय, जिथे आपण एकमेकांना समजून घेऊ. त्यात प्रेम, विश्वास, कमिटमेंट आणि बाकी सगळ असेल." मायाला पण हे पटल होत.
पण आत्ता एकदा दुधाने तोंड पोळल की माणूस टक पण फुंकून पितो... ट्स झालं होत तिचं.... आत्ता मायाने पहिल्यांदा स्पष्टपणे तिच्या अपेक्षा सांगितल्या. मग त्याला पण ते पटल. तस दोघांनी डेटिंग सुरू केलं, आणि मायाला पुन्हा प्रेमाची आशा वाटू लागली.


काही महिन्यांनी, मायाने तिच्या डिव्हॉर्सच्या अनुभवावर एक ब्लॉग लिहायला सुरुवात केली. तिने डिजिटल सिच्युएशनशिप आणि फ्रेंड्स विथ बेनिफिट्समधील तिच्या चुकांबद्दल लिहिलं. तिचा ब्लॉग व्हायरल झाला, आणि अनेक तरुण-तरुणींनी तिला मेसेजेस केले, "तुझ्यामुळे आम्ही स्वतःला प्राधान्य द्यायला शिकलो." मायाने तिच्या अनुभवातून शिकून स्वतःला सापडली आणि इतरांना प्रेरणा दिली.


ह्यातच दोघांचं लग्न झालं. आणि मायाच्या आयुष्याची नवीन सुरुवात झाली.


©® रितीका
0