Login

सेकंड इंनिंग

विधवा बाईचे संसारात पदार्पण
दोन वर्षं झाली होती अजितला जाऊन. चाळीस वर्षांच्या सहजीवनाचा आधार अचानक निखळून पडला आणि शुभाच्या आयुष्यात एक खोल, निःशब्द पोकळी तयार झाली. दिवस कसेबसे सरत होते, पण रात्री… रात्री तर काळोख जणू तिच्या उशाशी बसून राहायचा. मुलं आपापल्या संसारात गुंतलेली होती. आई आहे हे त्यांना माहीत होतं, पण आईचं एकटेपण त्यांच्या दिनक्रमात कुठेच बसत नव्हतं. शुभा मात्र प्रत्येक पहाट नव्या वेदनेसोबत स्वीकारत होती.
अशाच एका लग्नसमारंभात मंदार तिच्या आयुष्यात आला. कोणतंही नाट्य नाही, कोणतीही अपेक्षा नाही फक्त सहज ओळख. एकाच शहरात राहणं, एखादी भेट, मग दुसरी… आणि नकळत संवादांचा ओलावा वाढत गेला. वयात अंतर होतं, समाजाच्या चौकटी होत्या, पण बोलायला कोणताही विषय वर्ज्य नव्हता. हसणं, आठवण काढणं, शांत ऐकणं या सगळ्यातून एक अनामिक नातं आकार घेत होतं.मैत्री म्हणावी इतकी साधी नव्हती आणि प्रेम म्हणावं इतकी धाडसीही नव्हती. ती होती एकमेकांची गरज हळू, संयत, सन्मानाने जपलेली.समाज आपत्ती घेत होत. विधवा बाईला असं स्वैर वागण्याची परवानगी समाज देत नाही. पण विधवा बाईला पण मन असत ना. तिला पण आनंदी राहण्याचा हक्क आहे ना!
मंदारला परदेशात कामाची संधी मिळाली, तेव्हा त्याच्या डोळ्यांत स्वप्नं होती, पण मन शुभाकडे अडकलं होतं. उंच भरारी घ्यायची होती, पण पाय जणू जमिनीत रुतले होते. शुभा मात्र शांत होती. स्वतःच्या संभाव्य एकटेपणाकडे पाठ फिरवून ती त्याला धीर देत होती. “जा,” ती म्हणाली, “तुझं आकाश तुला हाक देतंय.” प्रेमाची खरी पराकाष्ठा कदाचित हीच असावी स्वतःच्या वेदनेपेक्षा दुसऱ्याच्या यशाला मोठं मानणं.
चार वर्षं व्हिडिओ कॉल्स, वचनं आणि प्रतीक्षेत निघून गेली. आणि मग तो परत आला शुभाला भेटायला, तिला सोबत न्यायला. त्याने लग्नाचा प्रस्ताव ठेवला तेव्हा तिच्या होकारात शंका नव्हती, फक्त कृतज्ञतेचं समाधान होतं. मुलांना विश्वासाने सांगितलं. त्यांनीही समजूतदारपणे होकार दिला.
ती विधवा होती, पण आयुष्य संपलेलं


नव्हतं. तिने एक पाऊल उचललं दुःखाच्या राखेतून पुन्हा उभं राहण्यासाठी. आणि पाहता पाहता दोघंही नव्या संसाराकडे
उडून गेले. काही कथा अशाच संपतात… हसऱ्या शेवटाने.अशी हिम्मत महिलांनी दाखवली तर त्यांचा पुढचा प्रवास सुखकर होऊ शकतो. फक्त प्रवाहात विरुद्ध जाण्याची हिम्मत दाखवावी लागेल.
मनिषा डोंगरे, बडोदे.
0