Login

रंग नवा इंद्रधनूचा

रंग नवा इंद्रधनूचा
*चॅम्पियन ट्रॉफी 2025*


*रंग नवा इंद्रधनूचा*


पावसाळ्यातल्या त्या सकाळी मुंबईची लोकल नेहमीपेक्षा जास्त भरलेली होती. डब्यात गोंगाट सुरु होता तर कुणी मोबाईलवर बोलत होतं, कुणी पुस्तकात डोकं खुपसून बसलं होतं. या गर्दीत, हातात एक साधीशी बॅग घेऊन धावत आत चढला अरव.

अरव एका साध्या कुटुंबात जन्मलेला. आई शाळेत शिक्षिका, वडील बँकेत अधिकारी. लहानपणापासूनच तो हुशार, शांत, कलात्मक स्वभावाचा. त्याला चित्रं काढायला, कविता लिहायला आवडायचं. शाळेत सगळ्यांना आवडणारा, समजूतदार मुलगा. पण वय वाढू लागलं तसं त्याला कळायला लागलं की तो इतर मुलांसारखा नाही.

मित्रांप्रमाणे त्याचं मन कधी मुलींकडे वळलंच नाही. उलट मुलांबद्दल एक वेगळं आकर्षण त्याच्या मनात दाटून यायचं. सुरुवातीला त्याला स्वतःवरच शंका वाटली “हे काहीतरी चुकीचं आहे का? ही तात्पुरती अवस्था असेल का?” पण हळूहळू त्याला सत्य कळलं तो गे आहे.

घरात, शेजारपाजारात किंवा माध्यमांत गे लोकांविषयी फक्त टिंगल, हशा आणि तिरस्कारच दिसायचा. कुणी म्हणायचं, “अशामुळे घराची इज्जत जाते.” असं ऐकताना अरवच्या छातीत धस्स व्हायचं.
“जर आई-बाबांना माझ्याबद्दल कळलं तर? ते मला स्वीकारतील का? की कायमचं दूर करतील?” या विचारानेच तो थरथरायचा.

मित्रांमध्ये प्रेमाच्या गप्पा निघाल्या की तो गप्पच बसायचा. कुणी “गर्लफ्रेंड आहे का?” विचारलं की तो खोटं हसून विषय टाळायचा.

त्याचं आयुष्य दोन तुकड्यांत विभागलं गेलं होतंएक, जे बाहेरचं होतं आणि त्याला ‘सामान्य मुलगा’ मानत होतं; आणि दुसरं, जे खरं होतं पण मनात खोलवर दडलेलं होतं.

याच काळात कॉलेजमध्ये त्याची ओळख झाली राघवशी. राघव बिनधास्त, आत्मविश्वासू, आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःला लपवून न ठेवणारा.

एकदा दोघं कॉलेजच्या कॉरिडॉरमध्ये गप्पा मारत उभे होते. अचानक राघव म्हणाला,
“आपण आपल्या भावना का लपवायच्या? प्रेम म्हणजे प्रेम. त्याला नाव, बंधन किंवा परवानगी लागत नाही.”

अरव दचकला. पहिल्यांदाच त्याच्या मनातलं कोणी इतकं सहजपणे शब्दांत मांडलं होतं. त्या दिवसापासून ते जवळ आले. सुरुवातीला फक्त मित्र होते, पण हळूहळू ते नातं प्रेमात फुललं. तरीही अरवच्या मनात भीती कायम होती.
“आपल्याला कुणी पाहिलं तर? लोक काय म्हणतील?”

राघव ठामपणे उत्तर द्यायचा,
“जगाचं काम बोलणं. पण आपण जर स्वतःचं सत्य दाबलं, तर ते आपल्यालाच आतून खात जाईल.”

पण एके दिवशी ती भीती खरी ठरली. अरवच्या आईने चुकून त्याच्या फोनवर राघवसोबतच्या चॅट्स वाचल्या. ती हादरली.
“अरव, हे काय आहे? तू असं का वागतोयस? लोक काय म्हणतील?”

तो क्षण अरवच्या आयुष्यातला सर्वात कठीण होता. पण यावेळी त्याने स्वतःचा आवाज उंचावला.
“आई, मी असाच आहे. हे चुकीचं नाही. मला दुसऱ्यांसारखं व्हायचं नाही. तू मला जसा आहे तसा स्वीकारलंस, तरच मी खरं जगू शकेन.”

आईला धक्का बसला. वडील संतापले. घरात तणावाचं वातावरण पसरलं. काही दिवस संवाद बंदच झाला. अरव आतून तुटत चालला होता, पण राघव त्याच्यासोबत घट्ट उभा होता.

हळूहळू आईच्या नजरेला मुलाच्या डोळ्यातलं खरं दुःख दिसायला लागलं. तिने मनाशी ठरवलं, “जगाचं काय? क्षणभर चांगलं बोलतील, क्षणभर वाईट. माझं लेकरू सुखी आहे की नाही, हेच खरं महत्त्वाचं.”

वडील मात्र कठोर राहिले. ते सरळ म्हणाले, “आमच्या घरात ही लाजीरवाणी गोष्ट सहन होणार नाही.”

अरव खूप रडला. पण यावेळी त्याने स्वतःला कोसळू दिलं नाही. कॉलेज संपल्यावर त्याने नोकरी धरली आणि राघवसोबत छोटंसं घर घेतलं. समाजाकडून अजूनही उपहास, नजर, टोमणे मिळत होते, पण त्यांच्या नात्याचं बळ त्या सगळ्यांपेक्षा मोठं होतं.

ते दोघं आता स्वतःला लपवू न लागता  LGBTQ (Lesbian, gay, bisexual, transgender and queer) चळवळीत सहभागी होऊ लागले. कार्यक्रमांमध्ये गे जोडप्यांच्या समस्या मांडू लागले. काहींनी त्यांची हेटाळणी केली, तर काहींनी साथ दिली.

हळूहळू अरवला जाणवलं त्याचं आयुष्य आता फक्त त्याचं उरलेलं नव्हतं. त्याच्यासारख्या अनेकांसाठी त्याने सावलीपलीकडचं इंद्रधनुष्य दाखवायचं होतं.

प्राइड परेडच्या दिवशी अरव रंगीबेरंगी झेंड्याखाली उभा होता. डोळ्यांत पाणी, पण ते आनंदाचं. त्याला जाणवलं तो एकटा नाही. त्या झेंड्याच्या प्रत्येक रंगात कुणाची तरी कहाणी दडलेली होती.

आणि त्या क्षणी गर्दीतून आई आली. हात पुढे करून ती म्हणाली,
“माझा मुलगा जसा आहे तसा मला मान्य आहे. तू आनंदी राहिलास, तर माझं जग पूर्ण झालं.”

अरव रडतच आईच्या मिठीत शिरला. राघवने त्याला घट्ट धरलं. आणि त्या क्षणी अरवला उमगलं
प्रेमाच्या पलीकडे कोणतीच ओळख मोठी नसते.

आव्हानं अजून होती, पण आता भीती नव्हती. कारण सावलीतून बाहेर पडल्यावर त्याला इंद्रधनुष्य सापडलं होतं. आणि त्या इंद्रधनुष्याच्या प्रत्येक रंगात त्याने स्वतःचं खरं आयुष्य जगायला सुरुवात केली होती.

*लेखिका -जान्हवी साळवे.*
0