गौरी -"वा वहिनी! तीळ मस्त खमंग भाजलेत हो! अगदी फाटकापर्यंत घमघमाट येतो आहे."
मीना -"गौरी उद्या भोगी आहे. केस धुवून ऑफिसला जा. सकाळी थंडी असते ग पण ड्रायरने सुकवून घे केस आणि जमलं तर संध्याकाळी लवकर ये घरी."
गौरी -"हो वहिनी तुम्ही म्हणाल अगदी तसं!"
मीना -"मी काही म्हणत नाही ग पण, आईंचा अगदी कटाक्ष असतो सगळीकडे. बर ह्या भाज्या सगळ्या चिरून घे. मी रात्रीच्या स्वयंपाकाचे बघते."
गौरी -"वहिनी मी करते आज स्वयंपाक. तुम्हीच चिरा ह्या भाज्या, नाहीतर वालाच्या शेंगा पाच सेंटीमीटर तोडल्या म्हणून उगाच घरात गदारोळ नको."
एवढे बोलून दोघी जावा एकमेकींकडे बघून सूचक हसल्या आणि कामाला लागल्या.
गौरी -"वहिनी मी करते आज स्वयंपाक. तुम्हीच चिरा ह्या भाज्या, नाहीतर वालाच्या शेंगा पाच सेंटीमीटर तोडल्या म्हणून उगाच घरात गदारोळ नको."
एवढे बोलून दोघी जावा एकमेकींकडे बघून सूचक हसल्या आणि कामाला लागल्या.
दुसऱ्या दिवशी घरी येताना गौरीने पाच सुगडे आणले. भोगीच्या दिवशी रात्री जागून मीना- गौरीने तिळगुळ, तिळगुळाच्या वड्या, लाडू आणि थोडासा रंगीत हलवा ही बनवला.
संक्रांतीच्या दिवशी सकाळी सूस्नात होऊन मीना आणि गौरी काळी चंद्रकला नेसून पूजेला बसल्या. सासूबाईंच्या सूचनेप्रमाणे देवघरात सागवानी पाटाखाली आणि सभोवताली रांगोळी काढून त्यावर मीनानं हळदीकुंकू वहिले. सागवानी पाटावर गौरीने मातीचे गाजर, बोर ,हरभरा, वाटाणा-वालाची शेंग, उसाचे पेरकांड आणि गहू भरलेली पाच सुगडी झाकून ठेवली. दोघींनी त्याला हळदीकुंकू वाहिले. त्या सूगड्याच्या समोर चांदीच्या वाटीत तिळगुळ ठेवले.
गुरुजींनी संक्रांतीचे महत्त्व सांगितले-
भास्करस्य यथा तेजो मकरस्थस्य वर्धते l
तथैव भवतां तेजो वर्धता मिती कामये ll
मकर संक्रांति पर्वण: सर्वेभ्य: शुभाशया: l
गुरुजी सांगू लागले -"खरंतर हिंदूंच्या इतर महत्त्वाच्या सणांप्रमाणे, संक्रांतीचा हा सण सुद्धा कृषी संस्कृतीचे प्रतीक आहे. पौषातला गार वारा आणि बोचर्या थंडीत आरोग्य हितकारक तिळगुळ दोन्ही उष्णतावर्धक यांचे सेवन आरोग्यदायी मानले जाते. याच दिवशी सूर्य धनु राशीतून मकर राशीत जातो. त्याचे तेज आणि दिवसाचा काळ तीळ वाढतो. दक्षिणायन संपून ऊर्जावर्धक उत्तरायण आणि सूर्याचा राशी बदल म्हणजे संक्रमण होते, म्हणून मकर संक्रांत.
सुघट किंवा सुगड हे धन-धान्य, ऐश्वर्य आणि समृद्धीचे प्रतीक आहे. या सूघटात गाजर, बोर, हरभरा, वालाची-वाटाण्याची शेंग टाकून, ते देवीला देऊन, समृद्धीचे मागणे घालायचे असते."
गुरुजी पूजा सांगून निघून गेले. संध्याकाळी मीनाकडे हळदीकुंकवाची तयारी सुरू झाली.
हॉलमध्ये भिंतीला छान छोटे-छोटे पतंग लावले होते. ती टेबलवर तीळ गुळाची छान आरास केली होती. त्यामध्ये तिळगुळापासून बनवलेली छोटी छोटी भांडी ठेवली होती. तिळगुळाचे सूप, जातं, पोळपाट-लाटणं, छोटीशी चूल आणि काय काय ठेवले होते. बांगड्या, बोर यांची सुबक मांडणी करून रांगोळी काढली होती. हलव्याचे दागिने आकर्षक रितीने मांडले होते. दोघी जावा पारंपारिक महाराष्ट्रीय पोशाखात, कपाळाला चंद्रकोर, नाकात नथ आणि नऊवार घालून अगदी सुंदर दिसत होत्या.
गौरीची पहिली संक्रांत म्हणून ती हळदीकुंकू आणि वाणात मातीच्या कुंड्या वाटणार हे ऐकून सासूबाईंनी नाक मुरडले. आता मात्र गौरीचा धीर संपला आणि गौरी बोलू लागली.
गौरी -"आई संक्रांत हा सणं गुरुजींनी सांगितल्याप्रमाणे कृषी संस्कृतीचे प्रतीक आहे. दिवसेंदिवस पर्यावरणाचा ऱ्हास होत आहे लोकांना पुरेसा प्राणवायू मिळणे कठीण झाले आहे म्हणूनच मी प्रत्येक गृहिणीने एक तरी झाड लावावे म्हणून कुंडी देणार आहे. एका झाडाची किंमत म्हणजे
एक सामान्य झाड वर्षभरात 20 किलो धूळ शोषते.
वर्षभरात सुमारे 700 किलो ऑक्सिजन तयार करते.
दरवर्षी 20 टन कार्बन डाय-ऑक्साइड शोषते.
एका मोठ्या झाडाखाली उन्हाळ्यात तापमान सरासरी चार अंश कमी राहते.
एका सर्वसामान्य मोठ्या झालेल्या झाडांमध्ये 80 किलो पारा, लिथियम, शिसे यासारख्या विषारी धातूंचे मिश्रण शोषण्याची क्षमता असते.
घराजवळ असणारे झाड अकॉस्टिक वाल सारखे काम करते, म्हणजे आजूबाजूचा आवाज आणि ध्वनी शोषून घेते.
विस्कॉन्सिन इन विद्यापीठाच्या अभ्यासानुसार ज्यांच्या घराच्या आजूबाजूला झाड असते त्यांच्यामध्ये भीती, तणाव, नैराश्याची शक्यता कमी असते.
कॅनडाचे जर्नल \"सायंटिफिक रिपोर्ट\" नुसार घराजवळ जर दहा झाडे असतील तर आयुष्य सात वर्षांनी वाढते.
एलीनॉईस विद्यापीठाच्या संशोधनानुसार घराजवळ जर झाड असेल तर झोप चांगली येते विशेषतः वृद्धावस्थेत याचा फार फायदा होतो.
गौरी पुढे बोलू लागली "आई महामारीच्या काळात प्राणवायूसाठी अक्षरशः शेकडो लोकांनी आपला जीव गमावला. त्यामुळे आजच्या ग्लोबल वॉर्मिंगच्या काळात झाड लावणे हे प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. त्याशिवाय दुसरा पर्याय नाही. इतर प्लास्टिकचे सामान वापरून, पर्यावरणाला हानी करून, मानव जातीचे अजिबात भलं होणार नाही."
सासुबाईंना आपला मुद्दा पटला आहे असं बघून मग गौरीने तिच्या मनातलं ही बोलून टाकलं.
"आई प्रत्येक वेळी तुमचंच कसं बरोबर असेल? मीना वहिनी काही बोलत नाही याचा अर्थ असा नाही की त्यांना काही त्रास होत नाही. आपण सगळ्यांनी जर एकमेकांच्या भावनांचा आदर केला आणि स्वाभिमान जपला तर आपलं घर खऱ्या अर्थाने गोकुळ होईल."
गौरीच्या अशा अभ्यासपूर्ण आणि संशोधना वर आधारित झाडांचे फायदे सांगितल्याने सासूबाईंचा राग दूर झाला. आणि मीना ची आपल्या घराविषयीची धडपडही त्यांच्या लक्षात आली.
गौरीने सगळ्यांना झाडे लावण्यासाठी कुंड्या दिल्या तर, मीनाने मूग डाळीची कच्ची खिचडी वाणात वाटली.
आपल्या दोन्ही सुनांचा कौतुक सोहळा दोन्ही सासवा डोळे भरून पाहत होत्या. या वेळेच्या संक्रांतीने नात्यांच्या सगळ्या अढी गळून पडल्या होत्या आणि सासु सुनेचा नात्याला एक नवीन झळाळी आली होती.
©® राखी भावसार भांडेकर.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा