Login

संक्रांतीचे हळदीकुंकु

Story Of A Relations


मीना स्वयंपाक घरात फुलके करत होती. दुपारी साडेबारा-एकची वेळ म्हणजे माई-आज्जे सासूबाई आणि आई-सासूबाई यांच्या जेवणाची वेळ. ती वेळ जर चुकली तर घरात रामायण, महाभारत आणि आणखीन काय काय होणार याची शाश्वती खुद्दा मिनालाच नव्हती.

मीना एकीकडे भराभर फुलके बनवत होती तर, दुसरीकडे वरणाला तडका देऊन तेही उकळत होतं. मधल्या शेगडीवर मंद आचेवर मटार-फ्लावर शिजत होती. मीनाची नुसती लगबग सुरू होती. डोक्यात उद्याच्या भोगीचे आणि परवाच्या संक्रांतीचे नियोजन तर दुसरीकडे सगळं व्यवस्थित पार पडेल की नाही? याची धाकधूक सुरू होती.

तेवढ्यात आतल्या खोलीतून सासूबाईंचा रागावलेला चिडका आवाज आला.


सासूबाई -"किती वेळ आहे अजून? साडेबारा कधीच वाजून गेलेत. आज जेवायला देणार आहेस की करावी आम्ही निर्जला एकादशी?"

मीनाने स्वयंपाक घरातल्या घड्याळाकडे एक कटाक्ष टाकला आणि ती आज्जे सासू आणि सासूचे ताट वाढू लागली.

ताट वाढता वाढता मीनाच्या मनात अनेक विचारांची गर्दी झाली होती.

\"सकाळपासून माझी कितीही दमछाक झाली तरी घरातल्या सगळ्यांना सगळं अगदी वेळेवर लागतं. अरे पण मीही एक माणूस आहे, मशीन नाही. सकाळी साडेपाचला उठूनही घड्याळाच्या काट्यासोबतची शर्यत मी कधीच जिंकू शकणार नाही का?\"

मीनाचे मन आज खूपच हळवे झाले होते, पण तिच्या भावनांशी घरात कोणालाच काही देणे घेणे नव्हते. कुठल्याही कामात जराही वेळ झाला तर मीनाच्या सासूची तोंडाची टकळी सुरू झालीच म्हणून समजा.


मीनाची सासू आणि आज्जे सासू दोघीही जेवायला बसल्या, पण मीनाच्या जीवाला मात्र घोर लागला होता, आणि मीनाच्या अंदाजाप्रमाणे झाले ही अगदी तसेच. वरण थोडं पातळ झालं म्हणून आज्जे सासूचा कुत्सीत कटाक्ष शब्दावरून शस्त्राचे काम करून गेला. तर फ्लावर थोडी करपली म्हणून सासूबाईंचे तोंड सुरू झाले.

सासुबाई -"स्वयंपाक करताना लक्ष कुठे असते हिचे कुणास ठाऊक? दहा वर्षे झाली हिच्या लग्नाला, पण एक वेळ कधी धड स्वयंपाक नाही की पोटभर जेवण नाही. कधी नुसता तिखट जाळ तर कधी अगदीच मिळमीळीत, कधी रस्सा म्हणजे अगदी फुळुक पाणी तर कधी एवढा घट्ट की जणू श्रीखंडच! बारा गाडे बोंब नुसती कामाची!! तुझ्या आईने तुला साधा स्वयंपाकही कसा करायचा तेही शिकवले नाही का?"

सासूबाई अजूनही काही बोलणार होत्या पण आज्जे सासूच्या इशाऱ्याने त्यांनी तोंडाचा तोफखाना आवरता घेतला.

मीनाला आताशा या सगळ्याची सवय झाली होती पण तरीही मीनाच्या मनात कुठेतरी कळ दाटून येत होती. मीनाच्या प्रत्येक कामात काही ना काही दोष काढायचा आणि तिला बोल लावायचा. त्यासोबतच तिच्या माहेरचा, आईच्या संस्कारांचा उद्धार करायचा हा मीनाच्या सासूचा आता स्वभावच झाला होता.

मीनाच्या घरात ती, तिचा नवरा रमेश, मुलगी मीरा, मुलगा जय, दीर सुरेश, जाऊ गौरी आणि सासू, आज्जे सासू असा सगळ भरलं गोकुळ होतं.

मीनाचे सासरे रमेश-सुरेश, आठ-दहा वर्षाचे असतानाच एका अपघातात वारले होते, त्यामुळे त्यांच्या जागी नोकरी करून मीनाच्या सासूबाईंनी मुलांना मोठे केले होते. आज्जे सासूबाई माध्यमिक शाळेत शिक्षिका होत्या. केवळ शिक्षिकाच नव्हे तर राज्य शासनाच्या पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षिका! त्यामुळे मीनाच्या सासूला घरचे सगळे करून, नोकरी करून, नवऱ्याच्या माघारी एका हाती सर्व सांभाळावे लागले होते. आज्जे सासुबाई फारच वक्तशीर, कामात दिरंगई, चालढकल, बेशिस्तपणा त्यांना अजिबात खपत नसे. प्रत्येक काम त्यांना अगदी चोख लागे. कुठल्याही कामात जराशी ही चूक त्यांना खपत नसे. मीनाच्या सासूला स्वतःच्या सासूच्या हाताखाली सर्वच करावे लागे. कामाला बाई लावलेली आज्जे सासूला आवडत नसे, त्यामुळे नोकरी करताना मीनाच्या सासूची फारच दमछाक होत होती, म्हणूनच आता निवृत्त झाल्यावर आणि घरात सून आल्याने एक परी त्या स्वतःच्या रागाला मीनावर चिडून वाट मोकळी करून देत होत्या, घर कामाला बाई लावू देत नव्हत्या. मीना सर्वसाधारण घरातली असल्याने, निमुटपणे ऐकून घेण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.