शीर्षक:- निःस्वार्थ
भाग:- १
"अनु किती छोटी होती ! माझी इवलशी परी कधी मोठी झाली कळलेच नाही." डबडबलेल्या डोळ्यांने मंद हसत श्रीपाद अल्बम मधल्या अनुजाच्या लहानपणीच्या फोटोवरून प्रेमाने हात फिरवत मनात पुटपुटले.
तो अल्बम तसाच छोट्या टेबलावर ठेऊन ते आराम करायला त्यांच्या रूममध्ये निघून गेले.
दुपारचे दोन वाजले. बी. काॅमच्या शेवटच्या वर्षात शिकत त्यांची मुलगी अनुजा काॅलेजमधून घरी आली. तिच्याकडील चावीने तिने दार उघडून आत आली आणि फ्रेश होऊन तिने तिचे पप्पा श्रीपाद यांच्या रूममध्ये डोकावले. त्यांना आराम करताना पाहून तिने त्यांना उठवणे योग्य समजले नाही.
स्वतः जेवण वाढून घेऊन तिने जेवून घेतले आणि पडलेली भांडी घासून घेतली. सर्व आवरून ती हाॅलमधील सोफ्यावर येऊन बसली.
अनुजा आणि श्रीपाद दोघेच त्या घरात राहत होते. श्रीपाद चांगल्या हुद्द्यावर सरकारी नोकरी करत होते. सध्या त्यांची तब्येत ठीक नव्हती म्हणून ते घरीच होते. कधी तरी त्यांचे नातेवाईक घरी येत असायचे.
तिला आई नव्हती. श्रीपादने तिला आई आणि वडील दोघांचे प्रेम देत तिचा प्रेमाने सांभाळ केला होता. तिला कोणत्याच गोष्टीची कमी पडू दिली नव्हती. ती लहान असताना त्यांची आई तिचा सांभाळ करायला आली होती. पंधरा-सोळा वर्षे राहिल्यानंतर वयोमानानुसार तिला काम होईना. तेव्हा त्यांनी एक मेड ठेवली. तीच सगळे करायची. नंतर काही वर्षांनी त्यांची आई वारली. ते पोरके झाले. त्यांना बहीण होती पण ती तिच्या संसारात रमली होती. राखी पौर्णिमा, भाऊबीज शिवाय तिला यायला जमत नसे.
अनुजा समजदार होती. तिने फार कमी वयात सगळे सांभाळून घेतले. आजीने तिला घरातली सर्व कामे शिकवली होती. त्यामुळे ती कोणत्याही गोष्टीत नडत नव्हती. मेड नसली की ती स्वतःच सर्व कामे करायची.
टि. व्ही. पाहावा म्हणून तिने रिमोट घ्यायला छोट्या टेबलाकडे पाहिले. त्यावर ठेवलेला अल्बम पाहून तिने फोटो पाहायचे ठरवले.
"किती दिवस झाले, फोटो पाहिलेच नाही. चला जरा आठवणींना उजाळा देऊ या." असे स्वतःशीच म्हणत ती फोटो पाहू लागली. जस जशी ती अल्बमची पाने पलटू लागली तिच्या मनात प्रश्नांची शृंखला तयार होऊ लागली.
"आज पप्पांना विचारतेच. नेहमीच मला टाळत विषयांतर करत असतात. पण आज नाही. काय होईल ते होईल, आज विचारतेच! " तिने मनात ठाम विचार केला.
"अरेच्चा! पण त्यांची तब्येत ठीक नाहीये. कसे विचारू?" त्यांची तब्येत ठीक नाही हे तिला लक्षात येताच मनातच तिने कपाळावर हात मारून घेतला आणि उठून दातांनी नखे कुरतडत विचार करत इकडून तिकडून फेऱ्या मारू लागली.
"अनु बाळा, काय गं, काय झालं?" श्रीपाद पाठीमागून तिच्या खांद्यावर हात ठेवत काळजीने विचारले.
"अं ऽ ऽ काही नाही. तुमची तब्येत कशी आहे आता?" ती त्यांच्या जवळ येत म्हणाली.
"ठीक आहे आता. तू जेवलीस का?" त्यांनी तिला विचारत सोफ्यावर विराजमान झाले.
"हो, तुम्ही जेवून गोळ्या घेतलेत ना की काही बनवू काही तुमच्यासाठी?" त्यांच्या जवळ बसत तिने काळजीने त्यांना विचारले.
"हो, बाळा. जेवण करूनच गोळ्या घेतल्या होत्या, त्यामुळे झोप लागली होती. तू आलेलेही कळलं नाही. माझी राणी किती काळजी करतेस माझी!" तिने काळजीने विचारल्याने ते सुखावून हसत म्हणाले.
तीही त्यांना बिलगली. पण तिच्या मनातील भाव त्यांनी जाणले. ते तिच्या डोक्यावरून मायेने हात फिरवत म्हणाले,"मनात काय असेल तर विचारून मोकळी हो. मनात काही ठेवू नकोस."
"तुम्हाला कसे माहिती?" तिने कुशीतून मान वर चमकून विचारले.
"बाप आहे मी तुझा! तुझ्या नखे कुरतडण्यावरून कळलं." ते हसत म्हणाले.
ती हसली आणि मनात प्रश्नांची जुळवाजुळव करत म्हणाली,"पप्पा, सर्वांबरोबर माझे फोटो आहेत ; पण आईबरोबर माझा एकही फोटो नाही. मी कितीदा विचारले तर तुम्ही टाळता नाही तर विषय बदलता. कधीही आईबद्दल, तिच्या माहेरबद्दल म्हणजे माझ्या आजोळ बद्दल तुम्ही काहीही सांगितले नाही. असं का, पप्पा?"
तिची आई युगंधराचा विषय निघताच श्रीपादचा चेहरा पडला. ते नजर चोरत रागाने म्हणाले," धराबद्दल तुला सांगितले की तू जन्माला आली तेव्हाच ती हे जग सोडून गेली आणि नव्हते तिला कोणी तर काय सांगू तुला?"
"जन्मला आल्यावर आई गेली हे माहिती आहे मला. पण प्रत्येक वेळी ते सांगताना तुमच्या चेहऱ्यावर उदासी, पश्चात्ताप दाटून का येतो, पप्पा? आणि आजी, मामा कोणीच कसे नाहीत मला? आज तुम्हाला उत्तर द्यावे लागेल." त्यांच्या चेहऱ्यावरील भाव निरखत तिने ठाम स्वरात विचारले.
ते काहीच न बोलता घराबाहेर निघून गेले. तिला राग होता म्हणून तिने त्यांना ना आडवले ना की टोकले.
संध्याकाळ होऊन रात्र होत आली तरी ते घरी परतले नव्हते म्हणून तिच्या रागाची जागा चिंतेने घेतली. तिने फोन लावला तर तोही लागत नव्हता. त्यांच्या मित्रांना फोन करून विचारले त्यांनाही माहिती नव्हते. तिला त्यांची खूप काळजी वाटू लागली. अस्वस्थ मनाचे डोळे त्यांच्या वाटेकडे होते.
"का विचारले तू, अनु? काहीतरी मोठी गोष्ट असेल म्हणूनच ते तुला सांगत नाहीत. तू समजून घ्यायला हवं होतंस. तू त्यांना प्रश्न विचारून चूक केलीस? कोठे असतील, पप्पा? " ती स्वतःला कोसत मनाशी संवाद साधत होती.
मन त्यांच्या काळजीने तर डोळे आसवांनी भरले होते. शेवटी मनाचा हिय्या करून तिने त्यांना शोधायला बाहेर पडण्याचा विचार केला. ती बाहेर पडणार तोच ते आत आले.
त्यांना सुखरूप पाहून तिच्या बैचेन मनाला हायसे वाटले. ती त्यांना बिलगून रडत म्हणाली,"आय एम साॅरी, पप्पा. मी पुन्हा नाही विचारणार काही. पण मला न सांगता, मला सोडून जाऊ नका."
क्रमशः
काय झालं असेल युगंधराचे? का टाळत असतात श्रीपाद? तिला ते सांगतिल का?
जयश्री शिंदे
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा