Login

निकिता राजे चिटणीस भाग 8

निकिता सारखी साधी आणि सरळ मुलगी आयुष्यातल्या अवघड प्रसंगांना कशी सामोरी जाते त्यांची कथा.

                                                     भाग  ८

भाग ७  वरून  पुढे  वाचा ...........

                                                   चोरघडे

दूसरा दिवस, दुपारी तीन वाजताची वेळ, battle ground अविनाश सरांची केबिन, एकमेकांना धीर देत मी आणि वाघूळकर सर पोचलो. अविनाश सर आणि नितीन सर दोघे ही आत होते. double firing ला तोंड द्यायच होतं.

May I come in sir

अरे या या तुमचीच वाट बघत होतो. काही महत्वाचं बोलायचं म्हणत होता. या बसा.

सर चेक केल्यावर अस लक्षात आलं की आपण गेल्या पांच वर्षांपासून excess vat भरतो आहोत. कुठे चुकल ते ही कळल आहे. पण आता रिफंड क्लेम करावा लागणार आहे. वाघूळकरांनी एक दमात सर्व सांगून टाकल, ओझं उतरवून टाकलं आणि नी:श्वास टाकला.

किती जास्त भरला आहे.

साडे तीन कोटी

शांतता.

पांच वर्षांनंतर कळतय आपल्याला हे ?

सॉरी सर, पण हो.

रिफंड मिळण्याची शक्यता किती आहे.

रिफंड मिळेल पण प्रोसीजर किचकट आहे ती करावी लागेल आणि वेळ पण लागेल. वकील करावा लागेल.

ठीक आहे. यांचा अर्थ पैसा सुरक्षित आहे. फक्त आपल्याकडे यायला वेळ लागेल एवढच

मध्येच नितीन सर म्हणाले की त्यांना एक महत्वाची मीटिंग आहे तर जाऊन येतो. तासा  दिड तासात येईन तोपर्यन्त तुमच चेकिंग चालू द्या.  अविनाश सर म्हणाले ओके, तू जा आम्ही बघून घेऊ.

त्याच्या नंतर बराच वेळ आम्ही सरांना सर्व तपशीलवार माहिती देत होतो. सर्व झाल्यावर सर म्हणाले

ठीक आहे. याच्यावर निर्णय घेउच पण वाघूळकर, तुम्हाला मी मघा पासून पाहतो आहे की तुमची सारखी चुळबुळ चालली आहे. अजून काही शिल्लक आहे का सांगायच ?

नाही सर पण झालेली चूक मनाला फार खाते आहे. इतकी मोठी चूक झाली एवढा मोठा फटका बसला मग आमच्या अनुभवाचा काय फायदा. यांची रुख रुख लागली आहे फार. काही सुचत नाहीये.

जे झाल ते चुकच आहे. पण ही चूक कशामुळे झाली हे बघण जरुरीच आहे. याचा शोध घेतला का ?

आमची calculations चुकली .

नाही. ती चुकली नसती. जर तुम्ही घोडे पेडणेकरांवर आंधळा विश्वास ठेवला

नसता तर नसती चुकली. त्यांनी दिलेले रिटर्न्स तुम्ही वर वर चेक करून फायनल केलेत. ही ती चूक आहे. तुम्ही जर बारकाईने बघितल असत तर मला खात्री आहे की अस झालच नसत. तुमच्या लक्षात आलच असत. असो. भविष्यात अस होणार नाही यांची काळजी घ्या. कारण आम्ही तुमच्यावर विसंबून राहतो. आणखी एक गोष्ट लक्षात घ्या, जी काही चूक झाली आहे ती positive आहे. म्हणजे आपले पैसे आपल्याला मिळतील. ते वाहून नाही गेलेत. त्याची तरतूद आधीच केली असल्याने त्याचा ताण पण नाही जाणवला पण जर उलट चूक झाली असती आणि साडे ती कोटींचा टॅक्स भरावा लागला असता तर फार महागात पडलं असतं. एवढ्या मोठ्या रकमेची तरतूद कशी केली असती ? कंपनी बंद करायची वेळ आली असती. तेंव्हा यांच्या पुढे सर्व गोष्टी फार बारकाईने बघत चला. घोडे पेडणेकर सॉरी म्हणून मोकळे झाले असते. पण आपलं काय झालं असत ?

अविनाश सर बोलत होते आणि आम्ही बसल्या जागीच वितळत होतो. सरांनी हत्याराविनाच आमचा वध केला होता. सरांनी अगदी अचूक शरसंधान केल होतं. घाव वर्मी बसत होते. सोसण्याशिवाय पर्याय नव्हता.

हो सर आम्ही लक्षात ठेऊ. यापुढे चुका होणार नाहीत याची खबरदारी घेऊ. पण या वेळेस माफ करा. मनापासून सॉरी. इति वाघूळकर.

चहा आला. बर आता रीलॅक्स व्हा, चहा घ्या मग आपण पुढच बोलू.

आणि मग सर जणू काही घडलच नाही अश्या रीतीने बोलत राहिले. आमच्या डोक्यावरचा ताण थोडा हलका झाला.

आता मला सांगा तुम्हाला अचानक पांच वर्षांनंतर रिटर्न्स चेक करायची बुद्धी कशी झाली. अस काय घडलं की तुम्हाला क्रॉस चेक करावस वाटलं.

चोरघडे सांगा वाघूळकर म्हणाले.

सर आपल्या कडे इंस्टीट्यूट मधून ट्रेनी येतात हे तुम्हाला माहीतच आहे. या वेळेची बॅच खूपच चांगली आहे. त्यात एक मुलगी तर कमालीची हुशार आहे. ती चार दिवसांपूर्वी माझ्याकडे आली म्हणाली मला पांच वर्षापूर्वीचे रिटर्न्स बघायचे आहेत. मी म्हंटल की स्टडी करता गेली पांच वर्षांचे रिटर्न्स पुरेसे आहेत. मग म्हणाली की तिला एक चूक आढळली आहे की जी पांच वर्षापासून वारंवार होते आहे. त्यामुळे आपण जास्ती टॅक्स भरला आहे. मला अजून मागे जायच आहे बघायला की कुठपासून ही चूक होते आहे.

मग मी तीच्याबरोबर रिटर्न्स तपासायला घेतले. आणि मला आढळल की ती म्हणतेय ते बरोबर आहे. तिने रिटर्न्स वरून back calculations करून घोडे पेडणेकरांच वर्किंग काय असेल ते सुद्धा करून ठेवले होते. सगळं पाहून खात्री झाल्यावर मी वाघूळकर सरांकडे गेलो आणि त्यांना पण सांगितल.

हे सगळ झाल्यावर मी वाटवे मॅडमशी बोललो कारण आधीचे तीन महीने ती त्यांच्याकडेच होती. त्यांनी जे सांगितल ते ऐकून मी तर थक्क झालो. त्यानी सांगितल की चारच दिवसांपूर्वी त्या तुमच्याकडे तिने केलेल काम घेऊन आल्या होत्या. आणि तुम्ही तिच्या कामाला ग्रीन सिग्नल दिल म्हणून.

हो खरं आहे. ही तीच मुलगी आहे का ?

हो सर .

सरांनी इंटरकॉम वरुन वाटवे मॅडम ना बोलावून घेतलं.

मॅडम आल्यावर १५ -20 मिनिटे चर्चा झाली. मग अविनाश सर मला म्हणाले की त्या मुलीला बोलावून घ्या मला तिच्याशी बोलायच आहे. काही गोष्टी जाणून घ्यायच्या आहेत. इतकी हुशार मुलगी साधी ट्रेनी म्हणून कशी आली याचच आश्चर्य वाटतंय.

मी बाहेर आलो आमच्या सेक्शन मध्ये जाऊन तिला सांगितल की मिस राजे, अविनाश सरांच्या केबिन मध्ये या. सरांनी बोलावलय.

सर मी कशाला, तुम्हीच काय ते सांगा न.  माझ नाव कशाला, मला भीती वाटते

अग घाबरण्याच काही कारण नाही. तू चूक केली नाहीस तर शोधून काढली आहेस. ये लवकर.

मी केबिन मध्ये आलो. माझ्या मगोमागच ती पण आली. सर वॉश रूम मध्ये गेले होते. सर बाहेर आले मिस राजे आमच्या मागेच उभी होती तिच्या कडे त्यांच लक्ष गेल आणि म्हणाले

अरे तू इथे काय करते आहेस ? नितीन तर मीटिंग ला गेला आहे तुला गाडी हवी आहे का, माझी गाडी घेऊन जा आत्ता एक महत्वाची  चर्चा चालू आहे  आणि मला त्यात व्यत्यय नकोय.  तू माझी गाडी घेऊन जा. ओके ? ठीक.

आम्ही तिघेही एकमेकांकडे पाहत होतो. कोणालाच काही कळेना की काय चालल आहे. साहेब या मुलीला  ओळखतात ? काही समजत नव्हत. ते  तिला गाडी, ते ही त्यांचीच घेऊन जायला का सांगत होते ? आणि ते ही तिने न मागताच ? नितीन सर मीटिंग ला गेलेत अस का सांगितल, तिचा काय संबंध ? सगळेच प्रश्न आणि उत्तर शून्य. तेवढ्यात नितीन सर आलेत. त्यांनीही तिला पाहिल त्यांनाही आश्चर्य वाटलेल दिसल. आणि म्हणाले

अरे तू इथे काय करते आहेस ? मी आत्ता कामात आहे इथे एक महत्वाची चर्चा चालू आहे. तुला गाडी हवी असेल तर माझी घेऊन जा,  मी बाबांबरोबर येईन.

सर तुम्ही हिला ओळखता ? अविनाश सरांना तिघेही आम्ही एकदमच.

व्हॉट डू यू मीन ? मी माझ्या सुनेला आणि नितीन त्याच्या बायकोला ओळखणार नाही ? तुम्हाला एवढ नवल का वाटाव हेच मला समजत नाहीये. बर. any way तू कशाला थांबली आहेस. आता नितीनची गाडी घेऊन जा. तो आलाय.

मी घरीच जायला निघाले होते पण चोरघडे सरांनी सांगितल की तुम्ही ताबडतोब बोलावलं म्हणून मी आले.

मी बोलावल ? मी कशाला बोलावू ? चोरघडे मी केंव्हा म्हंटलं की हिला बोलवा म्हणून ?

सर तुम्हीच म्हणाले की call miss Raje. म्हणून.

राजे ? my god निकिता तू ट्रेनी म्हणून आली आहेस इंस्टीट्यूट मधून ?  हे सगळ तू केलस ?

हो

ही राजे नावाची काय भानगड आहे. ? तू म्हंटलं असतस तर सरळ येऊ शकली असती. हे आडवळण कशाला ?

मग मला अनुभव कसा आला असता. सगळ्यांशी मिळून मिसळून वागतांना जो अनुभव मिळाला तो अमूल्य होता. म्हणूनच वाटवे मॅडम च्या मार्गदर्शनाखाली मी तो प्रोजेक्ट करू शकले. आणि इथे चोरघडे सरांनी मला फ्री हँड दिला आणि मार्ग दर्शन केल  म्हणून रिटर्न्स सारखी किचकट गोष्ट पण कळायला लागली. हे सगळ मी डायरेक्ट आली असती तर शक्य झाल नसत. इथला स्टाफ किती चांगला आहे हे कळलंच नसत. सगळे माझ्याशी छान छानच वागले असते. आणि आता सगळ्यांना कळल असल  तरी जी मैत्रीची नाती निर्माण झाली आहेत ती थोडीच तुटणार आहेत.

तू नुसत कामच चांगल करत नाहीस तर भाषण सुद्धा छान करतेस. I am proud of you. नितीन इस  बात पर चाय हो जाय काय मंडळी काय म्हणताय ? एंजॉय.

जायच्या आधी राजे मॅडम म्हणाल्या की सर्वांना माझी एक विनंती आहे. माझ्याबद्दल कोणालाही काहीही सांगू नका. मला आहे त्याच भूमिकेत राहू द्या. सर म्हणाले त्या प्रमाणे मी वाटवे मॅडम च्या मार्गदर्शनाखाली माझ प्रोजेक्ट करायला तयार आहे. पण मी मालकीण आहे हे कोणाला कळू नये अशी माझी इच्छा आहे. त्याशिवाय लोक माझ्याशी मोकळे पणाने बोलणार नाहीत. आणि  प्रोजेक्ट चा बोजवारा उडेल. तुम्हाला काय वाटत ?

अवघड होत. पण जे काही राजे मॅडम बोलल्या त्यात अर्थ होता. तथ्य होत. थोडी  चर्चा होऊन सर्वांनीच ते मान्य केलं.

आणि हो मला मॅडम म्हणू नका मला राजे म्हणूनच ट्रीट करा. कुठलीही एक्स्ट्रा फॅसिलिटी मला देवू नका. माझ चुकल तर रागवा जेणेकरून मी कोणीतरी वेगळी आहे अस कोणाला वाटू नये.

आम्ही संगळ्यांनीच मान्य केल. मग मीटिंग चा नूरच बदलून गेला. चहा समोसा झाल्यावर मीटिंग च विसर्जन झाल. राजे आता अर्थातच नितीन बरोबर गेली. दिवस भराच आलेल दडपण निघून गेल होत. आम्ही पण निश्चिंत मनाने घरी जायला निघालो.

बाहेर आल्यावर वाटवे मॅडम म्हणाल्या

एक नवीन बॉस आलाय पण तो बॉस नाहीये अस वागायच आहे. काय चोरघडे जमणार आहे का ?

मॅडम हे काही तरी नवीनच आहे. मालकीण बाईंनाच अरे तुरे करायच आणि वर अधून मधून रागावायच पण कठीणच आहे सगळं. अहो जो पर्यन्त माहीत नव्हत तोवर ठीकच होत पण आता जरा अवघडच आहे. आणि कोणी त्यांच्याशी वादा वादी केली तरी आपण लक्ष द्यायच नाही, कस काय होणार कळत नाही.

हो खरंय काहीही झाल तरी त्यांची identity उघड करायची नाही. डोक्यावरचा ताण वाढणार आहे हे नक्की. पुन्हा उद्या काही गडबड झाली तर साहेब आपल्यालाच म्हणणार की तुम्ही काय करत होतात म्हणून.

मॅडम काही वर्षांपूर्वी राजेश खन्ना आणि अमिताभ बच्चन चा नमक हराम नावाचा सिनेमा येऊन गेला तो थोड्या फार फरकांनी असाच होता.

हो पण साम्य कमी आहे. कारण त्यात राजेश खन्ना यूनियन चे प्रॉब्लेम्स संपवण्यासाठी सगळं करतो. यूनियन तोडणे हा मुख्य कार्यभाग असतो. त्या उलट ही मुलगी कर्मचाऱ्याच upliftment कस होईल हेच प्रामुख्याने बघणार आहे. हेतु फार वेगळा आहे. आणि त्याच्यामुळे कंपनी ला खर्चही खूप येणार आहे. पण ही मुलगी कोण आहे हे माहीत नसतांनाच साहेबांनी या प्रोजेक्ट ला हिरवा कंदील दिला आहे. त्यांनाही ही कल्पना फार आवडली आहे. चला आता निघूया. बराच उशीर झाला आहे. घरी वाट बघत असतील. गुड नाइट .

ओके गुड नाइट. आणि दिसल की नितीन सर आणि राजे काही बोलत होते. मग नितीन सर एकटेच कार मध्ये बसून निघून गेलेत. राजे नेहमी प्रमाणे बस स्टॉप कडे चालत निघाली. मी आवाज दिला राजे बराच उशीर झाला आहे मी सोडू का ? ती वळली, हसली,  मानेनेच  नको म्हणाली आणि चालू पडली.

क्रमश:..

दिलीप भिडे पुणे

मो :9284623729

dilipbhide@yahoo.com      

जर माझं लेखन आवडलं असेल तर जरूर शेअर करा, फॉलो करा.