Login

निलांती श्रापित ग्रंथाचा शोध भाग 4

निलांतीचा उद्रेक
पूर्वार्ध...

आता काय करायचं माघारी फिरायचं का आपण?... कावेरी

नाही... लोकं बोलतात म्हणजे तळघर असल्याशिवाय बोलत नाहीत... तळघर असणार... इथेच कुठेतरी असणार... फक्त लुपहोल भेटायला हवा... अर्जुन बॅटरीने ईकडे तिकडे बघत म्हणाला तसं सगळे ईकडे तिकडे शोधू लागले.

इथे कोपऱ्यात अजून एक भट्टी आहे कदाचित हा तर तळघराचा रस्ता असेल!... अर्जुन म्हणाला.

पुढे

तसं मयूरने भट्टी मध्ये उतरून बघितलं. तिथे खाली राख होती. त्याने स्वतःचा पाय आपटून बघितला. तर तिथे पोखळ रस्ता होता. त्याने असलेल्या अस्त्रांनी त्याच्यावर असणारा मार्बल उपसून काढला. तर समोर होता तळघरापाशी जाणारा एक गुप्त रस्ता.
अर्जुन पाठोपाठ सगळे एक एक करत जिना उतरू लागले.

तिथे असणारं सगळं बांधकाम हे दगडापासून केलेलं होतं. काही भिंतींमधून झाडाचे वेल दिसत होते. सगळीकडे एक मातट गंध येत होता. बरेच दिवस बंद असल्यामुळे कोंदट हवा जाणवत होती.

पुढे काय असेल याचा विचार करून सगळे आता एक्साईट झालेले होते. पण तिथे एक खोली आणि पुढे जाण्यासाठी असणारे दोन मोठे गोलाकार आकृतीचे रस्ते होते. कदाचित एक रस्ता बरोबर असणार होता आणि दुसरा चुकीचा.

मयूर उजवीकडे असणाऱ्या रस्त्याकडे गेला आणि बाकीचे त्याच्या मागे त्या रस्त्याला गेले. रस्ता बराच मोठा होता. आजूबाजूला
भिंतीवर वर्तुळ आणि त्यामध्ये ताऱ्याच्या आकारासारखे आकार काढले होते. तर काही ठिकाणी वेगळ्या प्रकारची लिपी लिहिली होती.

मयूर हे बघ संस्कृत भाषेमधून काहीतरी लिहिलंय इथे एकदा स्कॅन करून बघता का?.... कावेरी म्हणाली तसं मयूर तिथेच थांबला आणि फोन काढत त्याने गुगल वर ती लिपी स्कॅन केली.

निलांती वाचण्याची हिम्मत करत आहात तर फक्त आणि फक्त जळत्या शवाच्या उजेडात आणि एका रात्रीत हा ग्रंथ वाचायचा पण एक अट आहे जर कोणी वाईट उद्देशाने ग्रंथ वाचला तर जीव जाईल... असा टेक्स्ट मराठीतून फोनमध्ये दिसला.

तसं सगळ्यांनी भीतीने आवंढा गिळला.

म्हणजे ग्रंथाची गोष्ट खरी आहे!... कावेरी

म्हणजे भूत हडळ हे सुद्धा खरं असणार!... विनय

सगळं खरं नसतं! चला पुढे... अर्जुन म्हणाला तसं सगळे त्या रस्त्यातून चालू लागले.

त्यांच्या डोळयांसमोर आता दगडावर ठेवलेला एक अतिशय आकर्षक पण जुन्या काळातला जीर्ण झालेला ग्रंथ दिसत होता.
ग्रंथाकडे बघूनच एखादी व्यक्ती घाबरून जाईल. आणि तिची त्याला हात लावण्याची हिंमत होणार नाही. अशा अवस्थेत तो ग्रंथ होता. पण तरी सुद्धा अर्जुनने त्या ग्रंथाला हात लावण्याची हिंमत केलीच.

त्याने ग्रंथ उघडल्या नंतर मयूरने डोकावत बघितलं. अक्षरं जणू लाल रक्ताने लिहिली असावीत असं वाटत होतं. भाषा संस्कृत मध्ये होती त्यामुळे तिचा अर्थ समजत नव्हता.

समीराने अर्जुनाच्या हातातून ग्रंथ घेतला. आणि ती त्या पानांवरचे शब्द अनुवादित करून बोलायला लागली.

" मनुष्याला वाटतं त्यालाच फक्त भाषा समजते; त्यालाच फक्त बोलता येतं पण तो मूर्ख आहे. या विश्वामध्ये राहणाऱ्या प्रत्येक जीवाची भाषा आहे. त्याला सुद्धा बोलता येतं." ... समीरा हे वाक्य अतिशय गंभीर सुरात वाचत होती.

ती जसं जसे वाचत होती तसे अर्जुनला तिच्यावर शंका यायला लागली. कारण संस्कृत भाषा तिला येत नव्हती.

" मनुष्य अतिशय कमी गोष्टींशी परिचित आहे. त्याला जेवढ्या गोष्टी माहीत आहे तेवढ्याच त्याला खऱ्या वाटतात त्यांचेच तो अस्तित्व मान्य करतो. पण याने जे खरं आहे ते तर लपणार नाही" ... समीराने पुढचे वाक्य वाचले.

कोण आहेस तु?... अर्जुनने तिच्याकडे शंकेने बघत विचारलं. समीराचा चेहरा केसांनी झाकला गेला होता. त्यामुळे तो तिचा चेहरा बघू शकत नव्हता.

तसं तिने चेहरा वर केला. चेहऱ्यावरचे केस बाजूला झाले आणि तिचा विद्रूप झालेला चेहरा त्याला दिसला. क्षणभर त्याला सुचवायचे बंद झाले. डोळे मोठे आणि लाल भडक, दात काळया कोळश्यासारखे आणि चेहरा एका वयस्कर आणि विद्रूप झालेल्या स्त्री सारखा दिसत होता.

बाकीच्या तीन जणांना पळू की रडू अशी अवस्था झाली होती.

हळू हळू तिचे पाय आणि हात एका कावळ्याच्या पायासारखे दिसू लागले. तिने ग्रंथ हातातून सोडून दिला. आणि मयूरच्या मागे लागली. तिने मयूरचा गळा पकडून आपली विद्रूप नखे त्याच्या घश्यात रोवली. क्षणार्धात त्याचा तिथेच जीव गेला.

विनय आणि कावेरी आले तसेच पळत सुटले. ती त्यांच्या मागे गेली. विनय पळता पळता दगडामध्ये अडकून खाली पडला.
तिने तिची काही केस उपटून खाली टाकले. केसांनी विद्रूप सापाचे रूप धारण केले आणि सापांनी त्याचे सगळे शरीर काही वेळातच खाऊन टाकले आणि तिथे फक्त त्याचा सापळा राहिला.

आता ती कावेरीकडे गेली. कावेरीकडे आता पळण्यासाठी जागा राहिली नव्हती. कारण जेव्हा त्यांनी त्या रस्त्यामध्ये प्रवेश केला होता तेव्हाच तिथून जाण्याचा मार्ग निलंतीने बंद करून टाकला होता.

ती हवेतच कावेरीच्या दिशेने जाऊ लागली.
कावेरी भीतीने थरथरत होती. तिचे शरीर घामाने भिजलेले होते. जसजशी ती जवळ यायला लागली तसं ती मोठमोठ्याने ओरडू लागली.