निंदकाचे घर असावे शेजारी …
ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५
ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५
अवंतीचे स्टेटस पाहून उर्वशी कमालीची बेचैन झाली होती. ‘काय गरज आहे या सगळ्याची? आर्थिक स्थिती उत्तम आहे. नवरा बक्कळ कमवतोय, कशासाठी हा उपद्व्याप तेच कळत नाही’ फोटो स्क्रोल करून बघताना उर्वशीचा जळफळाट होत होता.
अवंती आणि उर्वशी या दोघी मैत्रिणी, एकाच सोसायटीमध्ये राहणाऱ्या शेजारणी. काही दिवसांपूर्वी अवंतीने गृहउद्योग सुरू केला होता. ऑर्डरनुसार ती उकडीचे मोदक, पुरणपोळी, दिवाळीचा फराळ, कोथिंबीर वडी, अळूवाडी, मागणीनुसार पदार्थ बनवून देणार होती. छोट्या प्रमाणात ऑर्डर्स स्वीकारणार होती. गेल्या काही दिवसापासून ती आपल्या व्यवसायाची जाहिरात सगळीकडे करत होती, याचाच त्रास उर्वशीला होत होता.
अवंतीने स्वबळावर व्यवसाय सुरू केला असल्याने उर्वशीला त्रास करुन घेण्याचं काहीच कारण नव्हतं. पण काही लोकं असतात ना, ज्यांना स्वतःला काहीच करायचं नसतं आणि दुसऱ्याने काही केलेलं बघवतही नसतं उर्वशी या प्रकारात मोडणारी होती.
अवंतीने काही वर्षापूर्वी मुलं लहान असल्याने, ओढाताण करत नोकरी करण्याची गरज नसल्याने जॉब सोडला होता पण आता मोठ्या मुलाची बारावी झाली होती. लेक नववीत गेली होती. “माझ्या अभ्यासात तू लक्ष घालायचे नाहीस” तिने अवंतीला बजावले होते. “मार्क कमी पडले तर मात्र मला तुझा अभ्यास घ्यावा लागेल” म्हणत अवंतीने तिचे म्हणणे मान्य केले होते. अजून तरी तशी वेळ आली नव्हती. रिया मुळातच हुशार असल्याने अवंती निश्चिंत होती. ह्या सगळयामुळे आता अवंतीकडे वेळच वेळ होता. सगळी मंडळी आपापल्या उद्योगाला गेल्यावर काय करायचे तिला प्रश्न पडत होता. नोकरी करावी का? हा विचार तिच्या मनात डोकावून गेला खरा पण बरीच गॅप पडल्यामुळे आत्मविश्वास नाही म्हटलं तरी डळमळीत झाला होता. या वयात नोकरी मिळेल का? हा ही महत्वाचा मुद्दा होता.
अवंती सुगरण होती. तिच्या हाताला चव होती. तिने केलेल्या रुचकर पदार्थांचे नेहमीच कौतुक व्हायचे. “तू ऑर्डर्स का घेत नाहीस?” गमतीने कोणी ना कोणी तिला नेहमीच म्हणायचे. ‘माझ्या आवडीचे व्यवसायात रूपांतर केलं तर…’ एक दिवस अचानक अवंतीच्या मनात आलं. तिने नवऱ्याला आपल्या मनातलं बोलून दाखवलं. त्याने पटकन संमती दिली आणि अवंती फूड्सची निर्मिती झाली.
“घरी सगळं ठीक आहे ना? श्रीधरची नोकरी, पगारपाणी?” काही दिवसांनी रस्त्यात गाठून काटकर काकूंनी अवंतीला विचारले.
त्यांच्या प्रश्नाने अवंती पुरती गोंधळून गेली. त्या असं का विचारत आहेत तिला काहीच कळेना.
“अगं इतके दिवस तू काहीच करत नव्हतीस आणि आता अचानक ऑर्डर घेणार आहेस, काय गरज आहे ह्या सगळ्याची? स्वतःच हसं करून घ्यायची? चार पदार्थ आवडीने घरी बनवणं वेगळं आणि लोकाच्या ऑर्डर्स घेणं वेगळं. पैश्याचा प्रॉब्लेम तर नाही ना? तुझ्या बाबतीत उलटसुलट चर्चा सुरू आहे आपल्या कॉलनीत. म्हटलं नक्की काय आहे ते तुलाच प्रत्यक्ष विचारावे, तुझ्या कानावर घालावे. तू राग मानू नकोस.”
काकूंचे बोलणे ऐकून अवंतीला धक्काच बसला. “असं काहीच नाही काकू, ह्यांची नोकरी व्यवस्थित चालू आहे. गेल्याच महिन्यात प्रमोशन झालंय. फावल्या वेळात काहीतरी करावंस वाटलं म्हणून मी हा उद्योग सुरू केला.” अवंतीने काटकर काकूंना आपला व्यवसाय सुरू करण्यामागचा हेतू सविस्तरपणे समजावून सांगितला. आपल्याबद्दल कोण चर्चा करत होतं ते विचारलं.
“ते तू समजून जा आणि जरा सांभाळून रहा.” मोघम बोलत काकूंनी आपला मार्ग बदलला.
“करायला गेले एक आणि झालं भलतंच. आयुष्यात एक प्रकारच रिकामंपण आलं होतं, वेळ सत्कारणी लागेल, चार पैसे मिळतील म्हणून गृहउद्योग सुरू करण्याचा विचार माझ्या मनात आला. ऑर्डरचा पत्ता नाही, लोकं नावं ठेवत आहेत” रडकुंडीला आलेल्या अवंतीने घरी आल्यावर श्रीधरला सगळी हकीकत सांगितली.
“मला माहिती आहे, कोण अफवा पसरवत आहे. आत्ताच्या आता उर्वशीला फोन करते आणि जाब विचारते.” रागाने लाल झालेली अवंती पर्स मधून फोन काढत म्हणाली.
“वेडेपणा करू नकोस.” श्रीधरने तिच्या हातातून फोन हिसकावून घेतला.
“मग काय करू, हातावर हात ठेऊन बसून राहू. तिला वाटेल तसे बरळू देऊ.”
“तुझ्याकडे पुरावा आहे का? तिचं बोलत आहे याचा. ना तू तुझ्या कानांनी ऐकले ना काकूंनी कुणाचे नाव घेतले.”
“मला माहित आहे ना कोण बोलतंय ते. काकूंना उभं करेन तिच्या पुढ्यात.”
“याने काहीच साध्य होणार नाही. चर्चेला अजून उधाण येईल. विषय नाहक चघळला जाईल. काकूंनी कोणाचे नाव घेतले नाही म्हणजे यात त्यांना पडायचे नाही. लक्षात येतंय का तुझ्या अवंती?”
“ठीक आहे. मग हा उद्योग बंद करते. फावल्या वेळात झोपा काढते. रिल्स बघत बसते.” अवंती पुरती निराश झाली होती.
“तिला तेच तर हवंय. रिॲक्ट होऊ नकोस. आक्रस्ताळेपणा करून काहीच उपयोग होणार नाही. ती उगाच कांगावा करेल. तुझ्या कामावर लक्ष केंद्रित कर. वेळ आली की तुझं यशच सगळं बोलून जाईल.”
“कामावर लक्ष केंद्रित करायला ऑर्डर तर मिळायला हव्यात. ऑर्डर्स मिळतील ना मला?” अवंतीच्या मनात शंकेची पाल चुकचुकली.
“नुकताच तर व्यवसाय सुरू केला आहे. तू उकडीचे मोदक, पुरणपोळीच्या ऑर्डर्स घेणार आहेस, हे पदार्थ रोज कोणी घरी बनवत नाही आणि विकतही आणत नाहीत. सणावारी येतील तुला ऑर्डर्स.” श्रीधरने अवंतीला समजावले. तिला त्याचे म्हणणं पटले. काही काळ गप्प बसायचे, उर्वशीकडे दुर्लक्ष करायचे तिने ठरवले.
साधारण महिन्याभराने अवंतीला पहिली अवघ्या अकरा उकडीच्या मोदकांची ऑर्डर मिळाली. अकरा वरून केलेली सुरवात हळूहळू एकवीस, एकशे एकवीस मोदकांपर्यंत पोहोचली. कामाचा व्याप वाढू लागला तशी अवंतीने एक मदतनीस नेमली. कालांतराने एकीच्या दोघी, दोघींच्या चौघी, सहाजणी झाल्या. मॅडम तुम्ही घरपोच सेवा सुरू करा; ग्राहक मागणी करू लागले म्हणून मग डिलिव्हरी बॉईजची नेमणूक झाली. व्यवसायाची रीतसर नोंदणी झाली. फूड लायसन्स घेतले. अवंती फूड्सचा लोगो बनला. कॅरी बॅग, पॅकिंग साठी लागणारे टिफीन यावर दिमाखाने झळकला. पुढच्या तीन वर्षात घरातून सुरू केलेला व्यवसाय मोक्याच्या ठिकाणी जागा घेऊन स्थिरावला. उकडीचे मोदक, पुरणपोळी, कोथिंबीर वडी, अळूवडी याबरोबरच ओल्या नारळाच्या करंजा, अनारसे, सुरळीची पाटवडी यासारख्या युनिक पदार्थाची विक्रीही सुरू झाली. मागणी तसा पुरवठा ह्या अवंती फूड्सच्या टॅगलाईननुसार मेनू कार्डत नवनवीन पदार्थांची भर पडत गेली. अवंतीचा मुलगा रोहन अकाउंट्स, मार्केटिंग बघू लागला. श्रीधर सुट्टीच्या दिवशी, वेळ मिळेल तसा कॅश काउंटर सांभाळू लागला. आजूबाजूच्या गावातूनही चांगला प्रतिसाद मिळू लागला. तिथल्या दुकानात माल सप्लाय होऊ लागला. अवंतीचा व्यवसाय काही वर्षात चांगलाच फोफावला.
अवंती फूड्सच्या कारभाराची दखल संस्कृती मंडळाने घेतली. संस्कृती मंडळ ही भोपरगावातील सामाजिक संस्था होती. दहावी, बारावीत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झालेल्या मुलांचा सत्कार, शिक्षकांचा सन्मान, नवदुर्गा पुरस्कार अश्या अनेक उपक्रमांचे आयोजन या संस्थेमार्फत केले जायचे. शून्यापासून सुरुवात करत, वेगळा ठसा उमटवत, यश संपादन केलेल्या अवंतीची या वर्षीच्या नवदुर्गा पुस्कारासाठी निवड झाली होती. नवरात्रीचे औचित्य साधून भोंडला, गरब्याचे आयोजन संस्कृती मंडळाने केले होते, या कार्यक्रमादरम्यान अवंतीला पुरस्कार प्रदान करण्यात येणार होता.
“हे काय तू अजून तयार झाली नाहीस? पावसाचा भरवसा नाही. लवकर निघावे लागेल. रोहन, रिया आपल्या सगळ्या स्टाफला घेऊन डायरेक्ट कार्यक्रमाच्या ठिकाणी पोहोचतील.” ड्रेसिंग टेबल समोर स्तब्ध बसलेल्या अवंतीला पाहून श्रीधर म्हणाला. पुरस्कार जाहीर झाल्यापासून त्याच्या आनंदला पारावर राहिला नव्हता.
“पाच मिनटात तयार होते.” श्रीधरची नजर चुकवत अवंती म्हणाली.
“आजच्या शुभदिनी डोळ्यात पाणी कशाला?” ती जे लपवण्याच्या प्रयत्न करत होती ते त्याच्या नजरेने बरोबर टिपलं होतं.
“अवंती फूड्सचा सुरवातीपासूनचा सहा सात वर्षातला प्रवास डोळ्यांसमोर आला. कडू गोड आठवणींना उजाळा मिळाला.” पापण्या अलगद टिपत अवंती म्हणाली.
“तू करून दाखवलंस. सगळ्यांची तोंड आपोआप बंद झाली.” अवंतीचा हात हाती घेत श्रीधर म्हणाला.
“तुम्ही समजावलत म्हणून. नाहीतर मी रागात व्यवसाय बंद करायला निघाले होते.”
“पटकन आवर, निघूया लवकर. उत्सवमूर्तीला उशीर झाला तर बरं दिसणार नाही.” आनंदाच्या क्षणी श्रीधरला उर्वशीचा विषय नको होता त्यामुळे तो जास्तच घाई करू लागला.
ठरल्याप्रमाणे गावदेवी मैदानात पुरस्कार सोहळा अगदी दणक्यात पार पडला. टाळ्यांच्या गजरात अवंतीने सन्मानपत्र, मानचिन्हाचा स्वीकार केला.
“मॅडम इथे उपस्थित असलेल्या, तुमच्या प्रमाणेच स्वतःचा गृहउद्योग सुरू करण्यास उत्सुक असलेल्या, भगिनींना, मैत्रिणींना, आपल्या भावी नवदुर्गानां काय सांगाल?” सूत्रसंचालिकने मनोगत व्यक्त करण्यासाठी अवंतीच्या हातात माईक दिला.
अवंतीने सभोवार नजर टाकत बोलायला सुरुवात केली. “कुठल्याही नवीन गोष्टीची केलेली सुरवात, निवडलेली वेगळी वाट पटकन लोकांच्या पचनी पडत नाही तेव्हा विरोध होणार हे धरून चला. हितशत्रूंकडे दुर्लक्ष करा, आपल्या कामावर फोकस करा. संयमाने परिस्थिती हाताळा. विचारपूर्वक निर्णय घ्या. निंदकाचे घर असावे शेजारी या उक्तीने होणाऱ्या टीकेकडे पाहिलंत तर नक्कीच यशस्वी व्हाल.” आपल्या कुटुंबीयांचे, आयोजकांचे, अवंती फूड्सच्या सहकाऱ्यांचे आभार मानत, उपस्थितांना नवरात्रीच्या शुभेच्छा देत तिने आपले भाषण संपवले. उर्वशीकडे रागाने बघत आत्मविश्वासाने स्टेजखाली उतरत अवंती फूड्सच्या परिवारासोबत आनंद साजरा करण्यात, फोटो काढण्यात अवंती मग्न झाली.
अवंतीचे मनोगत ऐकून कुतूहलापोटी तिथे उपस्थित असलेली उर्वशी मात्र मनोमन खजील झाली. कितीही प्रयत्न केला तरी आपण अवंतीचे काहीच वाकडे करू शकणार नाही हे सत्य तिने स्वीकारले. यापुढे तिच्या वाट्याला न जाण्याचे ठरवत खाली मान घालून पटकन ती तिथून बाहेर पडली.
यशाची हवा डोक्यात जाऊ न दिल्याने, निंदकाचे घर असावे शेजारी ही गोष्ट कायम लक्षात ठेवल्यामुळे अंवतीच्या प्रगतीची घोडदौड अशीच कायम सुरू राहिली.
समाप्त.
©®मृणाल महेश शिंपी.
टीम - सुप्रिया
टीम - सुप्रिया
