Login

निरावलंबी भाग -१

ध्येयासाठी झगडणाऱ्या आणि निरावलंबी बनण्याकडे वाटचाल करणाऱ्या एका स्त्रीची कथा!
प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.

शीर्षक: निरावलंबी भाग-१

"मला लग्नानंतर नोकरी करायची आहे." रक्षा म्हणाली.

"हो, तू करू शकतेस." पराग तिला म्हणाला.

रक्षा जिने कॉमर्समधून शिक्षण घेतलेले होते आणि चार ते पाच वर्ष झाले ती नोकरीच्या शोधात होती. बेरोजगारी इतकी वाढलेली होती की तिला कुठेच नोकरी मिळत नव्हती.जरी कुठल्या कंपनीचे जॉब लेटर तिला मिळालं तरी सुद्धा काही ना काही कारण देत ते नोकरी नकारात होते. कारण जिथे तिथे फक्त वशिला चालत होता. हे एव्हाना आता तिला समजून आले होते. मग तिने नोकरी शोधण्याचे प्रयत्न चालू असताना त्यासोबतच सरकारी नोकरीसाठी विविध स्पर्धा परीक्षा सुद्धा दिल्या होत्या. त्यातही थोडक्या गुणांनी तिचे पद जात होते.

एकदा असेच तिला एका पदासाठी पैसे भरून त्या ठिकाणी नोकरी मिळणार होती परंतु तिला प्रामाणिकपणे नोकरी करायची होती म्हणून तिने ती नोकरीही नाकारली.

आपल्या मुलीचे लग्नाचे वय होत आहे हे समजून तिच्या आई-वडिलांनी तिच्यासाठी मुलांची स्थळं बघायला सुरुवात केलेली होती.

त्यातच त्यांना पराग भांडे ह्याचे लग्नासाठी स्थळं रक्षासाठी आलेले होते. परागचा कारचे वेगवेगळे पार्ट्स बनवण्याचे दोन कारखाने होते आणि त्याला नोकरी करायची नव्हती म्हणून त्याने स्वतःचा हा बिझनेस टाकलेला होता.

दोघांना होकार देण्याआधी एकदा बोलण्यासाठी वेळ दिलेला होता. त्यावेळेसच रक्षाने त्याला नोकरीबद्दल सांगितले होते आणि त्याने होकारही दिला होता. तिला नोकरी करण्याची इच्छा आहे तर ती करू शकते असे तो बोलला होता.

त्यामुळे दोघांचे दोन महिन्यामध्ये लग्न झाले होते.

निवृत्तीनंतर गावचे वातावरण परागच्या आई-वडिलांना जास्त आवडत होते म्हणून ते त्यांच्या गावीच राहणार असे सांगितले होते. तसेच रक्षाचे आई-वडील सुद्धा त्यांच्या गावच्या घरीच राहणार होते. कारण डॉक्टरांनी त्यांना शहरातील प्रदूषणाचा त्रास होत आहे आणि तसेच त्यांना दमा असल्याने त्यांना श्वसनाचा जास्त त्रास होत होता म्हणून त्यांनी रक्षाच्या लग्नानंतर गावीच राहण्याचा निर्णय घेतला होता.

रक्षा आणि पराग हे त्यांच्या पालकांना असलेले एकच अपत्य होते.अधून मधून ते त्यांच्या घरी जाऊन राहत होते. त्यामुळे रक्षाला सुद्धा काही एवढे वाटत नव्हते.

परागने आपला बिजनेस वाढवण्याकडे लक्षकेंद्रित केलेले होते. रक्षा अजूनही नोकरीच्या शोधातच होती.

त्यातच पहिले सणवार आणि मध्येच गावी जाणे किंवा कोणत्या नातेवाईकांचे कार्यक्रम असले की रक्षाला जावे लागत होते.लग्नानंतर एक वर्ष कसे निघून गेले हे दोघांनाही समजले नव्हते.

रक्षा एकदा अशीच विचार करत बसली होती तेव्हा तिला वाटले की आपण नेमके काय करत आहोत? कारण आपल्याकडे शिक्षण आहे पण आपल्याला नोकरी नाही. असे तर त्यांच्याकडे आर्थिक सुबत्ता होती. परागचा स्वतःचा बिझनेस ही चांगला चालत होता आणि तिला हवे ते सर्वच घेऊन देत होता. त्यामुळे त्याला काही फरक पडत नव्हता.

त्यांच्या लग्नाचा पहिला वाढदिवस असल्यामुळे परागचे आई-वडील गावावरून त्यांच्या फ्लॅटवरतीच राहण्यासाठी आलेले होते. छोटीशी पार्टी ठेवलेली होती आणि काही जवळचे मित्रमंडळी आणि पाहुणे आलेले होते.

त्यातच एका व्यक्तीने," तुमची सून काय करते?" असा प्रश्न विचारला.

"ती गृहिणी आहे." असे परागच्या आईने सांगितल्यावर  त्या व्यक्तीचे मस्करीत हसणे बघून रक्षाला खूप वाईट वाटलं.

रात्री झोपताना तिने पराग जवळ विषय काढला.

"मला नोकरी करायची आहे. मी तुम्हाला आधीच बोलले होते. प्रयत्न तर करते पण काही यश मिळत नाहीये." ती नाराजीने म्हणाली.

"ठीक आहे ना. त्यात काय एवढं ? आणि आपल्याकडे काय पैशाची अडचण नाहीये की तुला सुद्धा नोकरी करायलाच हवी." मोबाईलमध्ये बघत सहजपणे पराग म्हणाला.

"म्हणजे? तुम्हाला नेमकं काय म्हणायचं आहे ?" तिने गंभीरपणे विचारले.

"अगं, म्हणजे कशाला एवढे कष्ट करायचे ? मी कमावतो ना. आपल्याकडे पुष्कळ पैसा तर आहेच की. त्यामुळे रक्षा तुला नोकरी करायची काय गरज आहे ?"

"मला फक्त पैशासाठी नोकरी नाही करायची. मला सुद्धा काम करण्याची इच्छा आहे." रक्षाने त्याला रागात ठामपणे सांगितले.

"ठीक आहे. मला ते समजले तर एवढे रागवून बोलायची काय गरज आहे?" परागला तिचे असे बोलणे बिल्कुल आवडले नव्हते.

रक्षाला सुद्धा राग आला म्हणून त्यांच्या खोलीमध्ये न  झोपता ती हॉलमध्ये जाऊन झोपली.

आता तिला सुद्धा वाटत होते की कोणाला असं वाटत नाही की तिने नोकरी करावी. फक्त लग्नाच्या आधी लग्न होईपर्यंतच गोड बोलले होते पण आता जेव्हा प्रत्यक्षात ते करण्याची वेळ आली तेव्हा कोणाकडूनच सकारात्मक उत्तर मिळाले नव्हते.

तिने एकदा तिच्या सासू-जवळ सुद्धा विषय काढला होता तेव्हा त्या अशाच म्हणाल्या होत्या की तिला नोकरी करायची काही गरज नाही. त्यांनीही कुठे नोकरी केली होती. हे त्यांचे बोलणे तिला त्यावेळी पुन्हा आठवले.

तिने मेरीटमध्ये पहिले येण्यासाठी जी रात्रंदिवस मेहनत केलेली होती. ते तिला आठवत होते. तसेच आपले काहीतरी करण्याचे जे स्वप्न आहे ते आता पूर्ण होणार नाही. असे नकारात्मक विचार तिच्या मनामध्ये येत होते.
गृहिणी असणे म्हणजे कमीपणा असणे असे तिचे मत नव्हते पण तिला नोकरी करायची होती.

आपल्या शिक्षणाचा काही उपयोगच नाही का असे म्हणून ती पूर्ण रात्री एकटीच आसवे गाळत उशी ओली करत होती.

क्रमशः

काय वाटते पुढे काय होईल?

© विद्या कुंभार

कथेचा भाग कसा वाटला हे कमेंट करून सांगा.

सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

फोटो सौजन्य: साभार गुगल/मेटा

🎭 Series Post

View all