प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.
शीर्षक: निरावलंबी भाग -२
दुसऱ्या दिवशी उठून रक्षाने तिचे सासू-सासरे गावावरून आलेले होते. म्हणून त्यांच्यासाठी नाष्टा वगैरे बनवला होता.
ती शांत होती आणि ते सर्वांच्या निदर्शनासही आलेले होते.
परागही त्या गोष्टीवरती काहीच बोलला नाही. कारण पुन्हा तो विषय काढून भांडण होण्यापेक्षा त्यावर न बोललेलेच बरे असा त्याने विचार केला आणि तो त्याच्या कामासाठी निघून गेला.
तो काहीच बोलला नाही म्हणजे त्याला काही फरकच पडत नाही असेच रक्षाला वाटले.
दुपारचे जेवण झाल्यावर संध्याकाळी सासू-सासरे यांना गावी सोडण्यासाठी एक ड्रायव्हर नेमलेला होता. तो त्यांना आधी एका नातेवाईकांच्या ठिकाणी पोहोचवून पुन्हा त्यांना त्यांच्या गावी सोडणार होता. त्यामुळे ते संध्याकाळी निघणार होते.
रक्षाच्या सासऱ्यांना बाहेरचे जेवण आवडत नव्हते म्हणून ती घरी सर्व जेवण बनवणार होती आणि तसाच त्यांचा डब्बा सुद्धा बनवण्याची तयारी ती करत होती.
"रक्षा प्रत्येकवेळी हट्ट कामाचा नसतो. कधी कधी आपल्याला पण समजून घ्यावे लागते." तिची सासू म्हणाली.
ती त्यावर काही बोललीच नव्हती. कारण आता तिला समजून आले होते की कोणीही तिच्या बाजूने नाहीये.
"जर नात्यामध्ये काही गोष्टी उगाच जास्त ताणल्या गेल्या तर ते तुटण्याची शक्यता असते. त्यामुळे जेवढे ते जपता येईल तेवढे जपायला हवे." पुन्हा तिच्या सासूने तिला उपदेश दिला.
' हो, पण प्रत्येकवेळी एका व्यक्तीनेच समजून घ्यायचे नसते.' तिने मनातल्या मनात त्यांना उत्तर दिले.
कारण परागचे त्याच्या आईवडिलांवरती खूप प्रेम होते आणि त्यांच्या विरोधात तो एकही शब्द ऐकत नव्हता हे एकदा झालेल्या प्रसंगावरून तिला माहीत होते आणि आता ते घरी जात असताना वाद कशाला घालायचा म्हणून ती शांत होती.
"आता तुमच्या लग्नाला एक वर्ष झाले आहे. त्यामुळे तुम्ही बाळाचा विचार करा. मग तुझा डोक्यामध्ये कोणतेच विचार राहणार नाहीत. तू त्यातच गुंग होऊन जाशील." तिच्या सासूने जणू त्यावरती उपाय सांगितल्या सारखे सांगितलं.
ती फक्त हो म्हणाली.
पुन्हा तिने वेगवेगळ्या कंपनीमध्ये नोकरीसाठी अर्ज देण्याचा विचार केला.
दोन महिने असेच गेले होते आणि एकदा तिला तिच्या ईमेल आयडी वरती एक मेल आला.
तिने तो उघडून बघितला आणि तिचा आनंद गगनात मावत नव्हता. कारण तिला शेवटी नोकरी मिळाल्याचे लेटर आलेले होते. ती कधी रुजू होईल त्याचे उत्तर देणारच होती. तेवढ्यात दाराची घंटी वाजली.
आणि समोर बघते तर तिचा नवरा उभा होता. आज मात्र तिने हसूनच स्वागत केले. कारण आपल्याला नोकरी मिळत आहे याचा अर्थ तिचे शिक्षण वाया जात नाही असेच तिला वाटत होतं पण सर्व त्या कंपनीशी नीट बोलून झाल्याशिवाय आपल्या नवऱ्याला सांगायचं नाही,असं तिने मनात ठरवलं.
रात्रीचे जेवण दोघांनी एकत्रच केले पण झोपायला जात असताना रक्षा चक्कर येऊन खाली पडली.
त्यामुळे पराग खूप घाबरला आणि त्याने तिला पलंगावर झोपून तिच्यावरती पाणी शिंपडले तेव्हा कुठे ती शुद्धीवर आली. तोपर्यंत परागने फोन करून त्याच्याच बिल्डिंग मधल्या एका डॉक्टरांना बोलावले होते.
त्यांनी तिला तपासत असताना काही प्रश्न विचारले आणि त्यावरून तिला जे समजायचे ते समजून गेले.
"अभिनंदन मिस्टर पराग. तुमच्या घरी आता एक नवा पाहुणा येणार आहे." डॉक्टरांनी हात मिळवत त्याला सांगितले.
"मी समजलो नाही. मला काही समजलेच नाही डॉक्टर." तो म्हणाला.
"म्हणजे तुमची बायको गरोदर आहे." ते डॉक्टर म्हणाले आणि निघून गेले.
दुसऱ्या दिवशी तरीसुद्धा एकदा हॉस्पिटलमध्ये तपासणी करायचे त्यांनी ठरवले होते.
आजच आलेला नोकरीसाठीचा मेल आणि आई होण्याची चाहूल यामुळे रक्षाची मनस्थिती ही द्विधा झाली होती.
असं नव्हतं की तिला हे बाळं नको होते पण नेमके आता दोघांमध्ये एक निवडायचं हा तिच्यासमोर मोठा प्रश्न उभा राहिला होता.
दुसऱ्या दिवशी परागने सुट्टी घेतली आणि तो त्याच्या आईला फोन करणार त्याच्या आधीच रक्षाने त्याला थांबवले.
"आधी आपण खरंच तपासून बरोबर आहे का बघूया आणि निश्चित झाल्यावर तेव्हाच आपण आपल्या घरच्यांना सांगूया." रक्षा म्हणाली.
"हो, तुझं म्हणणे बरोबर आहे." परागला सुद्धा तिचे म्हणणे पटले.
त्यानंतर दोघेही हॉस्पिटलमध्ये स्त्रीरोगतज्ज्ञ होते त्यांच्याकडे गेले त्यांनी तिच्या रक्ताचे नमुने घेतले आणि प्रेग्नेंसी किट सुद्धा दिली. त्यावरून त्यांना समजून गेले की रक्षा ही गरोदर आहे.
डॉक्टरांनी तिचे वजन तपासून पाहिले तेव्हा ते थोडेसे कमी वाटले.
"तुमचे वजन वाढले पाहिजे. तसेच तुम्ही आता आराम करायचा आहे. कारण की पहिले तीन महिने खूप सांभाळायचे असतात." डॉक्टरांनी तिला सांगितले.
"आणि अजून काही काळजी घ्यायची असेल तर ती सुद्धा तुम्ही सांगा." पराग म्हणाला.
"हो, मी काहीही औषध लिहून देते तसेच त्यांचे वजन वाढणे पण खूप महत्त्वाचे आहे आणि त्या थोड्या तणावात वाटत आहेत. म्हणून इथून पुढे त्या तणावात राहणार नाहीत याची सुद्धा तुम्हाला काळजी घ्यावी लागेल." डॉक्टरांनी परागकडे बघून सांगितलं.
"डॉक्टर मी नक्कीच या गोष्टीची काळजी घेईन." परागला तर खूप आनंद झालेला होता म्हणून तो म्हणाला.
रक्षाच्या चेहऱ्यावरती कोणतेच भाव नव्हते आणि परागचेही त्याकडे लक्ष नव्हतं.
त्याने तिथेच लगेच स्वतःच्या आणि रक्षाच्या आई-वडिलांना गोड बातमी फोनवरून दिली.
त्या चौघांना रक्षा गरोदर आहे हे ऐकून खूप आनंद झालेला होता. तसेच त्यांनी त्याला आता मंदिरामध्ये जाण्यासाठी सांगितले आणि त्याने सुद्धा होकार दिला.
क्रमशः
काय वाटते रक्षा काय निर्णय घेईल?
© विद्या कुंभार
कथेचा भाग कसा वाटला हे कमेंट करून सांगा.
सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा