Login

निरावलंबी भाग-३(अंतिम)

ध्येयासाठी झगडणाऱ्या आणि निरावलंबी बनण्याकडे वाटचाल करणाऱ्या एका स्त्रीची कथा!
प्रस्तुत कथा ही काल्पनिक असून त्यात नाव,गाव,
स्थळ, प्रसंग, जीवित अथवा मृत्यूशी संबंध आला तर तो योगायोग समजावा.

शीर्षक: निरावलंबी भाग-३(अंतिम)

पराग आणि रक्षा दोघेही शंकराच्या मंदिरामध्ये गेले. तिथे दोघांनीही डोळे बंद करून प्रार्थना केली आणि त्यानंतर मिठाईचा डब्बा घेऊन आपल्या घरी निघून आले.

"रक्षा, मला खूप आनंद झाला आहे." आपल्या घरी गेल्यावर तो म्हणाला.

ती त्यावर काहीच बोलली नव्हती.

"काय झालं? तू का एवढी शांत आहेस ? कोणत्याही गोष्टीची चिंता करू नकोस. सर्व व्यवस्थित होईल."
स्वतःच अंदाज लावत तिला काळजी वाटत असेल म्हणून तो म्हणाला.

"पराग, तुम्हाला एक सांगायचं राहून गेले." रक्षा म्हंटली.

"हा बोल ना, काय झालं? आज तर मी खूप खूश आहे." तो ओठांचे कोपरे रुंदावत म्हणाला.

"ते काल मला एका कंपनीचे जॉब लेटर आले आहे." ती  उत्सुकतेने म्हणाली.

"अरे वाह ! पण त्याचा काय फायदा? कारण आता तर आपलं बाळ हेच आपलं पहिलं प्राधान्य राहणार आहे ना." तो दुर्लक्ष करीत म्हणाला.

"म्हणजे मला नोकरी मिळाली हे ऐकून तुम्हाला आनंद झाला नाही का?" त्याचे असे म्हणणे तिला पटले नव्हते.

"तसे नाही, पण आता तुला तुझी जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. तू ऐकलं नाहीस का, डॉक्टरांनी सांगितलं  की तुला कोणताही तणाव नकोय आणि हे जी कोणती तुला नोकरी मिळत आहे. ती करायची म्हणजे तुला अजून जास्त त्रास होईल. त्यामध्ये तू किती दमशील आणि त्याचा परिणाम आपल्या बाळावर नको ना व्हायला." पराग तिच्या बाजूला बसत समजावत म्हणाला.

"कित्येक महिला तर गरोदर असून सुद्धा काम करतात मग मी केलं तर काय झाले?" तिने त्याला प्रश्न केला.

"मला बाकीचे लोकं काय करतात, त्याच्याशी काही घेणं देणं नाहीये आणि तसेही तू आधी नोकरी केली नव्हतीस ना. आता तुला फक्त तुझी स्वतःची काळजी घ्यायची आहे. त्यामुळे मला या विषयावरती काही बोलायचं नाही." असे म्हणून तो खोलीत निघून गेला.

रक्षाला आता समजून आले होते की परागला तिने नोकरी करावी हे पहिल्यापासूनच वाटत नव्हते. आधी फक्त गोड गोड बोलून त्यांनी होकार दिला आणि आता तर तो वेगळेच बोलत आहे. म्हणून तिला खूप वाईट वाटत होते.

रात्री झोपताना पुन्हा परागनेच विषय काढला.

" मला एक सांग रक्षा की, आपल्या घरी बाळं येणार आहे हे ऐकून तुला आनंद झाला नाही का?"  त्याने न राहून शेवटी विचारले.

"मला बाळं नको आहे असं मी म्हंटलेच नव्हते. मी फक्त नोकरीबद्दल बोलत होते. तसेही तुम्ही तुमचे मत त्यावर सांगितले आहे. म्हणून त्याबद्दल आता काही काळजी करू नका." असे म्हणून ती झोपून गेली.

दुसऱ्याच दिवशी त्याने फोन करून आपल्या आईला त्यांच्या घरी बोलावले होते. तेव्हा जे समजायचे ते रक्षा समजून गेली होती.

त्यानंतर पूर्ण नऊ महिने रक्षाची सासू तिच्यासोबतच राहिली होती. तिला जास्त काही काम पण करून देत नव्हती. वेळेवर सगळं खाणे आणि औषध देण्याचे काम जणू परागने आपल्या आईला दिले होते.

नऊ महिन्यानंतर एका गोंडस मुलाला रक्षाने जन्म दिला.
तिचे सिजेरियन झाल्यामुळे डॉक्टरांनी थोडी तिला काळजी घ्यायला सांगितली होती.

माहेरी जाण्यापेक्षा तिच्या आईला इकडे बोलावून घेऊ असे परागने आपले मत मांडले त्यावर रक्षा काही बोललीच नव्हती.

मुलगा सहा महिन्याचा झाल्यावर त्यानंतर तिने कोणालाही न सांगता नोकरीसाठी अर्ज करण्यास सुरुवात केली होती. त्यातच तिला एका ट्रेनिंगबद्दल समजले आणि ते सुद्धा घरी बसूनच ते पूर्ण केल्यावरती तिला त्याचे सर्टिफिकेट मिळणार होते. म्हणून जेव्हा बाळं झोपायचे त्यावेळेस तिने ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला.

"रक्षा, जास्त वेळ स्क्रीनकडे बघत बसू नकोस. त्यामुळे तुला त्रास होईल." रक्षाची सासू म्हणाली तेव्हा तिने त्यावर काहीच उत्तर दिले नव्हते.

बाळं जेव्हा आठ महिन्याचे झाले तेव्हा तिने फ्रीलान्सिंगचे जॉब करायला सुरुवात केली. याबद्दल पराग आणि बाकीच्यांना काहीच माहिती नव्हत.े हळूहळू तिने कंटेंट रायटिंगचा कोर्स पूर्ण केला. त्यातच तिने वेगवेगळ्या विषयावर लिहिण्यास सुरुवात केली.

एक मोठी लेखन स्पर्धा होती. त्यातही तिने जिंकण्याची अपेक्षा न करता आपण फक्त लिहायचे याचा विचार केला. त्यामध्ये एक दीर्घ कथा लिहायची होती आणि दररोज त्याचे भाग त्यांच्या साईटवर प्रकाशित करणे अनिवार्य होते. म्हणून तिने बाळाला सांभाळत ते पूर्ण केले.

बाळाचा पहिला वाढदिवस जवळ आला होता आणि त्यावेळी काय घ्यायचे याची यादी करण्यात येत होती.

तेव्हा तिने ऑनलाईनच काही गोष्टी मागवल्या होत्या ती जेव्हा पेमेंट करत होती तेव्हा परागने आपल्या मोबाईलमध्ये बघितले. कारण की त्याचेच डेबिट कार्ड वापरत असल्याने त्याला नेहमी पेमेंट केल्यावरती मेसेज यायचा पण तो आज काही आलाच नव्हता.

"तुझे पेमेंट झाले नाहीये का?  कारण मला कोणताच मेसेज आलेला नाही." त्याने रक्षाला विचारलं.

"हो, कारण तुमच्या बायकोकडे पैसे आहेत." ती हसतच म्हणाली.

"तुझ्याकडे? पैसे? कसे काय?" त्याने मुद्दाम हसतच विचारले.

त्याचवेळी नवऱ्याला उत्तर द्यायच्या आधी तिला एक फोन आला.

त्या फोनवरती बोलत असताना हळूहळू तिच्या चेहऱ्यावरचे शांत भाव आनंदात बदलत गेले.

"कोणाचा फोन होता?" परागने तिने फोन ठेवल्यावर विचारले.

तेव्हा तिने सांगितले की, ती काही दिवस फ्रीलान्सिंग करून काही पैसे कमावत होती आणि तसेच तिने कंटेंट रायटिंगचा कोर्स पूर्ण करून एका स्पर्धेमध्ये भाग घेतलेला होता. त्यात तिचा दुसरा क्रमांक आला आणि त्यामुळे तिला रोख रक्कम त्यांनी तिने दिलेल्या अकाऊंटवर पाठवली होती.तसेच तिच्या कथेवर शॉर्टफिल्म बनवण्याचा निर्णय आयोजकांनी केलेला आहे आणि त्यामुळे त्याचे सुद्धा तिला पैसे मिळणार मिळणार हे तिने सांगितले.

परागबरोबर त्याची आई सुद्धा अवाक झाली होती.

"तू हे सर्व कसे केले आणि आम्हाला सांगितले नाहीस."
पराग म्हणाला.

"हो कारण मला निरावलंबी व्हायचं होतं. स्वतःसाठी काही करून दाखवायचे होते. घरबसल्या बाळावर लक्ष ठेवून मी हे करू शकते." एवढेच आत्मविश्वासाने म्हणून तिने रडणाऱ्या बाळाला शांत करण्यासाठी त्याला कुशीत घेऊन आपल्या आई होण्याचे कर्तव्य पार पाडण्यासाठी खोलीत गेली.

पराग आणि त्याच्या आईला तेव्हा रक्षा मात्र वेगळीच भासत होती.

निरावलंबी अर्थात कोणावर अवलंबून न राहण्याचा रक्षाचा निर्णय हा ठाम होता. प्रत्येक परिस्थितीवर तिने मात करत स्वतःला आर्थिक दृष्टीने सक्षम करण्याचे तिने ठरवले होते आणि कृतीने सिद्धही केले होते.

समाप्त.

© विद्या कुंभार

कथा कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा.

सदर कथेचे हक्क हे लेखिकेकडे आहेत त्यामुळे साहित्य चोरी करून इतर ठिकाणी कॉपी करून पोस्ट किंवा युटुबसाठी वापरू नये अन्यथा कायदेशीर कारवाही करण्यात येईल ह्याची नोंद घ्यावी.

🎭 Series Post

View all