द्रौपदी ते निर्भया....

स्रिया आणि समाज


धडा महाभारताचा
पिढ्यानंपिढ्या गिरवला
ती सभा अन हा समाज
सारखाच तर वागला.....


रस्त्यावर निर्वस्त्र ती
आर्त साद घालत होती
ना नजरेला दिसली ती
ना कानांना ऐकू येत होती

एकातही हिम्मत नव्हती
अंग तिचं झाकायची...
अन मेणबत्ती घेऊन हाती
केली मागणी न्यायाची


तिच्यात आणि द्रोपदीत....
सांगा काय फरक राहिला
मदतीसाठी दोघींच्या
षंढ समाज नाही आला....

घडून गेलं रामायण....
अन....मग महाभारत केलं...
अरे वेळेवर मदतीसाठी
का नाही कुणी आलं...

धृतराष्ट्र ला डोळे नव्हते..
पण ऐकू तर येत होते ना?....
दिसत जरी नसलं
तरी समजत तरी होतं ना....

द्रौपदीने घातलेली आर्त साद
त्याच्यापर्यंत खरंच नाही पोहचली?
'कानाडोळा करण' ही म्हण
यांच्यामुळेच तर नाही ना रुजली?

उघड्या डोळ्यांनी नंगा नाच
असा किती दिवस बघायचा
पदराला हात जाताच
मुळापासून उखडायचा...