Login

रहस्य कथा निर्दयी मन भाग 2

A Story Of Woman Who Killed Her Husband
विश्वासघात भाग - २


"अव माय शांते! सरला आली का व तुया घरी? इकडे कुठे गेली ते? तुया घरीच येताना दिसली."
एका बाईने दुसरीला विचारले.

"माया घरी ते का येईन? ते अशी घरात येऊ द्यायच्या कामाची नाय बरं!"
दुसऱ्या बाईने हातवारे करत चिडून तिला उत्तर दिले.

"हो ना!"
असा गावातल्या बायकांचा संवाद होत असे. तिला कोणीही घरात घेत नसे.


ती रस्त्याने जात असताना काही जण तिची मजा घेत.
"अरे! पाहाना, त्या सोपानची बायको! कशी मजा करते. तिचा आपल्या बायकांवर असर नाही झाला पाहिजे."

"हो रामराव. पहा, कशी छम्मक छल्लो चालली. ना कुणाची लाज ना लज्जा. जनाची नाही तर मनाची तरी."


"हो ना भाऊ! या अशा बायका आपल्या गावाला कीड लागल्या सारख्याच आहे. तिले काही लाज नसल, पण त्या सोपानरावांची कमाल आहे."

"काय करणार!" तो बिचारा साधासुधा माणूस आहे. त्याचाच फायदा घेतलाय नं कैदासिननं."

"अरे तो सुन्या, तो तरणाबांड आहे. त्याले एक लेकरू आहे. त्याचं पूरं घर नासवलं हिनं."

"हो ना! तो तर तिच्या मांगच असते. ना काम धंदा काही नाही. त्याचा बाप, आई, बायको करते मजुरी आन हा फिरते हिच्या मागून अन् ते फिरते त्याच्या मागं. दिल लगा मेंढकी की से, तो  रुख्मिणी क्या चीज है!"

"हो असंच हाय, आता या जमान्यात कोण कसं काय करंन काही सांगता येत नाही. आपल्या वक्ति होतं असं, पण एवढ्या पातुर नव्हतं."
अशी पारावर बसलेली मंडळी गप्पा करीत.


सरला व सुनीलला कशाचीही तमा म्हणून नव्हती. त्यांचा तो लैला मजनूचा खेळ सतत सुरू होता. याचा परिणाम आपल्या मुलीवर होईल याची सुद्धा तिला खंत म्हणून नव्हती. प्रेम आंधळं असतं म्हणतात हे अगदी बरोबर आहे. याचा परिणाम तिच्या लेकीवर जो व्हायचा तो झालाच.

सुनील... हा सरलाचा प्रियकर.तो तरुण आणि धिप्पाड होता. तो सरलाकडे एवढा आकृष्ट झाला होता, की त्याला जळी, स्थळी, काष्ठी, पाषाणी सरलाच दिसे. ती त्याच्या दुप्पट वयाने मोठी असून तिच्यात पुरुषाला आकृष्ट करण्याचं कसब निश्चित होतं.

सुनीलचा चार वर्षाचा छोटा मुलगा सरलाच्या घरीच जास्तीत जास्त वेळ असे. त्यानिमित्ताने सुनीलचं जाणं-येणं-बसणं होत असे. त्या दोघांची अशीच कल्पना होती, की आपण आपल्या स्वतंत्र विश्वात अगदी मस्त रममाण आहोत. इतके रममाण की कोणी घरात डोकावून जरी पाहिलं तरी त्यांना कुणाशीही देणंघेणं नव्हत.

सोपानरावने बाहेरूनच रूपाला आवाज दिला.
"रूपे! ते टोपलं अन् पावडं दे इकडं. जरा ह्या उकिरडा जमा करून घेतो, नाहीतरी घरातला उकिरडा साफ करता येतच नाही. आता तो लय पसरला आहे घरात. इतका पसरला की जागोजागी सारी घाण करून ठेवलेली आहे. बसाले ही मन करत नाही घरात."
सुनील घरातच होता. त्याने त्यांचे बोलणे ऐकले.

"हं! काय म्हणता सोपानजी"? ह्या कचरा तुम्हालेच आता साफ करा लागन. मीच देतो टोपलं अन् पावडं."
आणि तो मोठ्याने हसला व घरातून बाहेर पडला.

हे नेहमीचंच असायचं. गावातील प्रतिष्ठित व्यक्ती विजय बाबू यांच्या कानावर हे प्रकरण होतच. त्यांना आपल्या घरच्या दोन नोकरांकडून ही बातमी समजली होतीच.
"काय रे सुरेश! हे सरला आणि सुनीलचं लफडं आहे म्हणते."

"हो ना बाबूजी, त्या साध्या सुध्या सोपानरावच्या संसाराची पार वाट लावली या दोघांनी."

"बरं! यांना जरा बांध घालाच लागन. पाहू कसं जमते ते. मी सरपंचाला  सांगून गावकऱ्यांची बैठक घेतो. गावातल्या चार बुर्जूग लोकांच्या समोर या दोघांना उभं करू. मग पाहू काय होते ते."
तिसऱ्या दिवशी सकाळी गावात दवंडी दिल्या गेली.

"समाज मंदिरात रात्री बैठक बोलाविली आहे. सर्व गावकऱ्यांनी रात्री आठ वाजता हजर राहावे हो!"
गावकरी मंडळी रात्री समाज मंदिरात गोळा झाले. कोणती अशी बातमी आहे, की सरपंचाला बैठक बोलवावी लागली? सर्व मंडळी कुतूहलाने एकमेकांकडे पाहत होते. अशातच काही मंडळी सरला व सुनीलचे प्रकरण आवडीने चघळत होतेच. लोकांना तो विषय आयताच मिळालेला होता. गप्पांमध्ये काहीही कारणांवरून त्या दोघांवर ताशेरे ओढल्या जात. लोकांना आता हा विषय नेहमीचाच झाला होता.

सरपंचाने विजय बाबूंना, हे प्रकरण कसं हाताळायचं हे तुम्हीच ठरवा.  त्यांच्यावरच सरपंचाने जबाबदारी दिली. विजय बाबूंना गावात त्यांच्या शब्दाला मान होता.

या बैठकीत सुनीलला बोलाविण्यात आले होते. तो तर येणारच होता. त्याला काय माहित हे प्रकरण आपल्यावरच बेतेल म्हणून. गावात बैठक आहे म्हणून तो हे सहजच या बैठकीला आला होता.

ते दोघे डोळे मिटुन दूध पीत होते; त्यामुळे त्यांना वाटले आपलं प्रकरण कुणाच्याच लक्षात येत नाही. विजय बाबूंनी विषयालाच हात घातला.


"सुनील इकडे ये." सुनील कावरा बावरा झाला. तो धिप्पाड माणूस विजयबाबूंच्या पुढ्यात जाऊन उभा राहिला.

"काय म्हणता बाबूजी! मलेच काहून आवाज दिला तुम्ही? म्या काय केलं? असं सर्वांसमोर मले काऊन उभं केलं?"
तो प्रश्नावर प्रश्न विचारीत होता.
सर्व गावकरी अगदी स्तब्ध झाले. त्यांना वाटले बरेच झाले.
"आता या सुन्याचं बिंग चव्हाट्यावर आलच शेवटी."
गावात पुरुषांचीच ही बैठक असल्यामुळे स्त्रिया अशा ठिकाणी येत नसत; त्यामुळे सरलाला सुद्धा या गोष्टीची कल्पना नव्हती, की ही सभा आपल्याच बाबतीत आहे.


सुनील पुढे काय करतो पाहूया पुढील भागात

🎭 Series Post

View all