Login

रहस्य कथा निर्दयी मन भाग ३

A Story Of A Woman Who Killed Her Husband
निर्दयी मन भाग - ३



गावात पुरुषांचीच ही बैठक असल्यामुळे स्त्रिया अशा ठिकाणी येत नसत; त्यामुळे सरलाला सुद्धा या गोष्टीची कल्पना नव्हती, की ही सभा आपल्याच बाबतीत आहे.

विजय बाबूंनी त्या धिप्पाड व धष्टपुष्ट माणसाकडे पाहिलं. आता याच्या जर आपण कानशिलात मारली, तर हा आपल्यावर हात उगारायला मागे पुढे पाहणार नाही; म्हणून त्यांनी समजाविण्याच्या स्वरात सुनीलला विचारले,
"काय सुनील, काय म्हणते तुझी बायका पोरं?" सगळे हसायला लागले.

"अहो बाबूजी, मले तर एकच बायको आहे अन् एकच पोरगं आहे. बायका अन पोरं कायले असंन?" तो बोलताच बैठकीत एकच हशा पिकला. एव्हाना सुनीलला कळून चुकले होतेच.

"बरं बाबूजी तुम्ही कोणाविषयी बोलता?"

"अरे गावात इतकी चर्चा होते आणि तुला काहीच माहिती नाही काय?  अरे, असा वेड पांघरून पेडगावला जाऊ नकोस. त्या सोपान रावांच्या घरी कशाला जात असतोस तू नेहमी?"

"असं होय काय? मी जातो असाच बसाले. आमचा घरोबा आहे. त्यांची बायको सरला अन् मी... बसत असतो गप्पा करत. सोपानरावले माहित आहे."

"अरे! सोपानरावांनाच नाही तर साऱ्या गावाला माहीत आहे तुझे आणि त्या सरलाचे संबंध."

आता सुनील जास्तच आक्रमक झाला.
"असं! म्हणून बोलावलं मले. बर आहे संबंध! आता बोला... तुमचा काय संबंध? आमचं आम्ही बगून घेऊ. काय होते तुमच्याकडून ते करून घ्या."
एव्हाना तो चांगलाच हमरीतुमरीवर आला. आता तिथे गावकऱ्यांनी एकच गलका केला.

त्याच्या अंगावर गावकऱ्यांनी हात घातला. परंतु तो एकटा सर्वांना पुरून उरला. काही लोकांनी बघ्याची भूमिका घेऊन आपले घर जवळ केले.
विजय बाबू सुद्धा मनातून विचलित झाले. आजपर्यंत गावातील कोणीही माझा शब्द खाली पडू दिला नाही. आता हे काय पाहतोय? ते सुद्धा खिन्न मनाने घरी पोहोचले.

गावात आधी सारखं राहिलेलं नाही. कुणावरही कुणाचा वचक म्हणून राहिलेला नाही.

"बाबूजी तुम्ही यात पडू नका. तो सुन्या म्हणजे लय डेंजर माणूस आहे; म्हणून कोणीच त्याच्या विरोधात बोलत नाही. आता तो तुम्हालाही त्रास द्यायले मागे पुढे पाहणार नाही. त्याच्यापासून लय लांब राहणं चांगलं हाय." नोकराने बाबूजीला शांत केले. ते खिन्न मनाने झोपी गेले.


आज सरला जास्तच खुशीत होती. तिने छानशी साडी घातली. हातभर बांगड्या भरल्या. भडक मेकअप केला. गावातल्या बस थांब्यावर गेली. लोक तिच्याकडे पाहतच राहिले. आता तर गावकरी तिच्या अशा वर्तनाकडे दुर्लक्ष करायला लागले.

तिचा मुलगा प्रशांतला सुद्धा आपल्या आईचे असे वागणे खटकत होते. तो आईशी नेहमीच बोलणे टाळायचा. तो एकटा शांत शांत राहायचा. त्याची शिक्षिका त्याची आवडती होती. शिक्षणात प्रचंड रुची असल्यामुळे तो जास्तीत जास्त वेळ शाळेतच घालवायचा. आपला अभ्यास आणि आपली शाळा या शिवाय त्याचे कशातच लक्ष नसायचे.

सरला बस थांब्यावर सुनील येण्याची वाट पाहत उभी असताना, अचानक तिची मुलगी रूपा सुद्धा नटून थटून तिच्या मागे येऊन उभी राहिली.
"तू कशी काय आली माया मांग?" सरलाने मुलीला विचारले.

"अवं! मले सुनील मामानं सांगितलं, की चल तालुक्याले तुले सिनेमा दाखवतो."
सुनीलने आता सरला सोबत रूपाला सुद्धा आपल्या प्रेम जाळ्यात ओढले होते.

"तू काय आता आमच्या सोबत येणार आहे काय?"

"मले बी यायचं आहे तुमच्या दोघांसोबत. सुनील मामा मले कानातले घेऊन देतो म्हणते."
सरला सुनीलच्या प्रेमात आकंठ बुडाली असल्यामुळे तिने सरलाला सुद्धा आपल्यात सामील करून घेतले. आता दोघीही सुनीलची वाट पाहत थांबल्या.

सुनीलने बायकोशी भांडण करून पैसे घेतले व तोही बस थांबल्यावर निघाला. तालुक्याला जाण्यासाठीची गाडी आली. तिघेही बसमध्ये बसले. तिघांनी तालुक्याच्या ठिकाणी जाऊन सिनेमा बघितला. खरेदी केली. ती सुद्धा आनंदात होती.
आईची अशी वागणूक तिच्या पथ्यावर पडत होती. सुनीलला सुद्धा तेच हवे होते.

"ए रूपा! रूपा... कुठं चाललीस? कायले आली इथं?"

"मायी आई, मी, अन् सुनील मामा... आम्ही तिघांन सिनेमा पाहिला. मस्त होता सिनेमा. मले या सुनील मामानं गळ्यातला हार आन कानातले झुमके विकत घेऊन दिले."

"अरे वा!" मस्त दिलदार आहे तुया मामा... अन् तुया आईनं बी खरेदी केलेली दिसून राहिली?"

"हो! तीनही मस्त कानातले टॉप्स घेतले."

"मजा हाय मग तुमची तर! बरं मले उशीर होते. गाडी निघून जाईन. तुम्ही या आरामात."
असं बोलून मैत्रीण निघून गेली, परंतु मैत्रिणीला त्या दोघींविषयी वेगळाच संशय येत होता.
तसं तिच्या कानावर होतच, पण आज तिने हे प्रत्यक्षात पाहिलं होतं. म्हणजे सुनीलचा आता या रूपावर सुद्धा डोळा आहे असं वाटते. तिने घरी येऊन आईजवळ त्या तिघांबद्दल घडलेली गोष्ट कथन केली. आईने शेजारच्या बाईजवळ व तिने तिसरी जवळ... असं करून ही गोष्ट सर्व गावात पसरली, की सुनील आता सरलाच्या मुलीचा सुद्धा वापर करून घेत आहे.


"रूपे! रूपे... तू कायले आलती आमच्या सोबत तालुक्यावर?"


"काहून? मले बी आवडते तुया सुनील. त्याले मी बी आवडते."

"असं! म्हणजे तू बी आमच्यात सामील आहे तर. चल लवकर स्वयंपाक कर. तुया बाप येईन आता जेवाले. त्याले चाराले धाडा लागते. त्याचा विश्वास हाय तुयावर." सरलाने मुलीला कामी लावलं.


"सरला आहे का घरात?"
सरलाने बाहेर जाऊन पाहिलं, तर तिचा भाऊ निलेश दारात उभा होता.


सरला आणि सुनील च्या मनात काय आहे पाहूया पुढील भागात

🎭 Series Post

View all