Login

निर्जीव अस्तित्व (भाग १)

रात्रीच्या काळोखात वाट चुकलेले तीन मित्र..... आणि त्यांच्या नशिबात वाढून ठेवलेला खेळ...... शेवटपर्यंत नक्की वाचा....
"अरे यार...... सम्या.... तुझी ही खटारा विकून नवीन का घेत नाहीस बे....." नील वैतागून बोलला....
तसे समीर आणि राघव फिदीफिदी हसायला लागले.....
"हसता काय माकडांनो.... उतरा आणि धक्का मारा.... मी दमलोय ही बैलगाडी चालवून...."
नील,समीर आणि राघव.... खुशालचेंडू त्रिकूट.... शाळेपासून चड्डीबडी.... काहीसा घाबरट,पण तरीही मिश्किल नील,या दोन विदूषकांसोबत कसा जुळवून घेई कोण जाणे? कारण समीर आणि राघवच्या मस्करीचा विषय बऱ्याचदा नीलचा घाबरटपणा असे..... कितीही आणि कोणत्याही गंभीर किंवा त्रासदायक प्रसंगी या दोघांची आपली मस्करी आणि थट्टा सुरूच.....
कोकणातल्या कुठल्याश्या किल्ल्यावर, ट्रेकिंग करून रात्री उशिरा घरी पोहचण्याचा प्लॅन करून निघालेले हे तिघे घरी जायच्या रस्त्यावर शॉर्टकट म्हणून गाडी आडवळणाने वळवतात, आणि गाडी नेहमीप्रमाणे दगा देते.
"ए,मी नाही धक्का बिक्का देणार.... तुझी गाडी आहे तूच मार धक्का......." राघव.
"काय दोस्तहो..... असं कसं करता राव.... मी पण दमलोय....."
"ही ढकलगाडी चालू होईल तेव्हा होईल.... तोवर कुठं थांबायची सोय होते का बघूया का?" नील मागे वळून म्हणाला...
प्रवासापेक्षा आराम करण्याच्या विचारावर तिघांचं एकमत झालं, आणि जवळ एखादं हॉटेल किंवा लॉज मिळतोय का हे पाहायला तिघेही खाली उतरले.....
"किती वाजले असतील राघू?" सम्याने विचारलं....
"पौने बारा होत आलेत....." राघव घड्याळात पाहून म्हणाला....
"नील डार्लिंग, तेवढं खादाडीच्या सामानाची बॅग घेऊन चल....." मस्करीत राघव म्हणाला.....
आधीच गाडी चालवून वैतागलेल्या नीलने बॅग उचलून बाहेर पडत,गाडीच्या चाकावर लाथ मारली आणि स्वतःच "आई आई गंssssss" म्हणत विव्हळत ओरडला....
राघव आणि समीरला हसायला आणि एक विषय सापडला....
"जवळपास तर काहीच दिसत नाही बे..... माझी तर ब्याट्री पण डाऊन झालीये...." नील म्हणाला....
रात्र सुद्धा अमावस्येची असल्याने भोवती काळोख पसरला होता... राघव,समीर फोनची बॅटरी चमकवत समोर दिसणारा सरळसोट रस्ता चालत निघाले होते... त्यांच्यापाठोपाठ नील चालत होता....
काही अंतर गेल्यावर एक इमारतवजा तीनमजली घर दृष्टीस पडलं आणि तिघे खुश झाले....
"चला, लाईट लागलेली दिसतेय म्हणजे आत नक्की कोणीतरी असणार..." राघव म्हणाला....
"ए बाबांनो,आधी खात्री करून मगच आत जाऊया.... ओळख ना पाळख आणि घुसायचं नको त्या जागी...."
"याची बघ,आधीच फाटली......" सम्या राघवच्या कानाजवळ जाऊन पुटपुटला, आणि परत एकदा त्यांच्या हसण्याचा आवाज आजूबाजूच्या गर्द झाडीत घुमला....
अपेक्षेपेक्षा खूपच लवकर तिघे त्या घरापाशी पोहोचले..... जणूकाही ते घरसुद्धा या तिघांकडे सरकत जवळ पोहोचले होते.... नीलला या गोष्टीची जाणीव होत होती,पण आधीच त्याची टिंगल करणाऱ्या समीर आणि राघवच्या हाती त्याला पुन्हा एक विषय द्यायचा नव्हता....
दरवाजा अर्धवट उघडाच होता.... बेल काम करत नव्हती म्हणून समीरने दरवाजा वाजवला....
आतून मिणमिणता कडीचा दिवा घेऊन ,एक उतारवयातला,बंडी पायजमा घातलेला मनुष्य बाहेर आला.... त्या अंधुक उजेडात तिघांचे चेहरे निरखत तो म्हणाला "काय रं पोराहो..... वाट चुकलात,का गाडी बंद पयडी....? यवड्या रातच्याला आलात सोदत म्हून म्हणलं....."
"अं..... नाही आजोबा.... म्हणजे गाडी जरा खराबच आहे....." नील सम्याकडं तिरका पाहत म्हणाला.....
"पण होईल काही वेळात ठीक.... तोवर जरा फ्रेश व्हायला म्हणून थांबायचं होतं...."
"मला काका म्हणत्याती....आजोबा न्हाय....." काका काहीसे नाराज वाटले......
"या,आत या.... घाबरू नका...."
पण नील आतून पक्का घाबरलेला....
"काका" च्या मागून तिघे चालू लागले.....
आत अनेक प्रकारच्या मूर्त्या, फोटो फ्रेम, भिंतीवर जंगली जनावरांची तोंडं,हंड्या,झुंबरं,तलवारी,फुलदाण्या,दिवे आणि कितीक जुन्या अँटिक वस्तू होत्या.... ते पाहून ,हे घर आहे की वस्तुसंग्रहालय हेच कळेना झालेलं....
तितक्यात सम्या राघवच्या कानात कुजबुजला....
"या आज्याला वय विचार,बघ..... दीडशे दोनशे वर्ष सांगेल नक्की..." आणि दोघे फिस्कन हसले....
"आरं न्हाय बा..... येवडं कुटलं वय माझं.... माझं वय म्या मोजलंच न्हाय कवा.... कंदी असतो,कंदी नसतो.... ठाव लागत न्हाय...." असं म्हणून काका भेसूर हसला.....

0

🎭 Series Post

View all