हे ऐकून मात्र सम्या आणि राघवची गत अगदी नीलसारखी झाली.... पण फक्त ते दोघे मानायला तयार नव्हते....दोघे आतून चरकले, कारण सम्याचा आवाज काकापर्यंत पोहोचणं शक्य नव्हतं....
समोरून साधारण आकाराचं दिसणारं घर,आतून चालत जावं तेवढं मोठंच मोठं वाटत होतं.... का कुणास ठाऊक,घरातल्या वस्तू,फोटोतील व्यक्तींच्या नजरा आपल्यालाच पाहत आहेत असं भासत होतं तिघांनाही....
तिघांची वाचा अगदीच खुंटली होती... पण प्रत्येकजण स्वतःच्या धारिष्ट्याचं प्रदर्शन करण्यासाठी धडपडत होता....
"वरच्या मजल्यावर मोठी खोली रिकामी हाये पोराहो....." अचानक आवाज आला... आणि तिघेही दचकलेच....
एकमेकांकडे पाहत धीराने वरच्या मजल्यावर,मंद प्रकाश असलेल्या,रिकाम्या, स्वच्छ केलेल्या खोलीत चालत गेले....
फारसं सामान नव्हतं.... फक्त खाण्याच्या सामानाची बॅग नीलकडे होती.... ती त्याने कोपऱ्यातल्या टेबलावर ठेवली.... मागे वळून पाहताच जुन्या बनावटीच्या तीन आरामखुर्च्या दिसल्या....
"या काकाला कसं माहीत या खोलीत तीनच लोक येणार म्हणून?" नीलने दोघांना भयचकित सुरात विचारणा केली....
तोच राघव आणि सम्या दोघं दोन आरामखुर्चीत बसून त्याचीच टिंगल करायला लागले.....
"अबे तू सगळ्याच गोष्टींत कसा टेन्शन घेतोस बे....." राघव म्हणाला....
"जाऊदे ना यार,नील..... आराम कर.... गाडी चालवून दमलाय तू... बाकी शंका सोड,आणि बस जरा...." समीर...
"तुम्हीच दोघं बसा.... घाणेरडे कुठले दोघंही.... मी चाललो हातपाय धुवायला..." म्हणत नील तिथून सटकला.....
तेवढ्यात काका हातात चहाचा ट्रे घेऊन कमरेत वाकत खोलीत आला....
"हे घ्या पोरानो.... चहा तुमा दोघास्नी.... आन् दूध त्या बारक्याला....."
'काकाला कसं माहीत, नील दूध घेतो ते...?'
मघाशी आत दडपलेली भीती आता पुन्हा वर आली....
"काका, या घरात कोण राहत नाही...? आणि तुम्ही कधीपासून आहात इथे...?" सम्याने काहीसं घाबरतच विचारलं....
"म्वॉप लोकं राहत्याती.... पण ती सगळी झोपल्यात.... आन् म्या........, म्या लै वरीस झाल्याती... हितं काम करतुय.... पण काम पडंल तसं असतो म्या... कंदी असतु,कंदी नसतू....."
या उत्तराने बुचकळ्यात पडलेल्या राघवला आणि एक प्रश्न पडला.....
"मग इथे एवढ्या जुन्या,ठेवणीतल्या वस्तू का आहेत? कुणाच्या आहेत आणि कोण देखरेख करतं यांची?"
"न्हाय बा.... त्यांना काय देखभालीची गरज न्हाय... त्या सगळ्या वस्तू हितल्या लोकांच्याच हायती.... परत्येकासनी जे आवडंल,ते त्याचं त्याचं हाये बगा...."
"तुम्हासनी काय आवडतं...?" म्हणताना काकाच्या डोळ्यांत वेगळीच चमक होती....
"तसं मला घड्याळं आवडतात वेगवेगळ्या प्रकारची..... पण सम्याला काय खास वस्तूंची आवड नाही..." राघव म्हणाला....
"हा आमचा तो तिसरा गडी आहे ना.... नील.... त्याला मेटलचे स्टॅच्यु आवडतात...." तो पुढे म्हणाला....
"म्हणजे धातूच्या मूर्त्या...." काकाच्या प्रश्नार्थक चेहऱ्याला पाहून सम्या म्हणाला.....
"बरं बरं..... तुम्ही घ्या दूध आन् च्या..... मी येतु..." काका लगबगीने निघाला.....
"अजबच आहे हा आजा पण.....काय बोलला काय कळलंच नाही..." राघव म्हणाला...
"अरे पण हा नील कुठे गेलाय एवढा वेळ.... हातपाय धुवायला एवढा वेळ लागतो का?का झोपला तिथंच....?" सम्या पुन्हा मस्करीच्या मूडमध्ये आला....
"मला पण सूसू करायचीये.... चल बघूयात कुठे गेलाय ते...." म्हणत राघव उठला....
दोघे त्याच मजल्यावर बाथरूम शोधू लागले पण दोघांना काहीसं विचित्र जाणवत होतं.... एवढं मोठं घर असून घराची रचना अगदीच विचित्र होती.... बरं एकदा गेलेल्या वाटेवरून परतून येताना सगळं बद्दलल्यासारखं वाटत होतं.... दोघांनाही.... पण कुणी एकमेकांना काहीच बोलत नव्हतं....
शेवटी सम्या खाली येऊन शोधायला लागला.... पण खाली वरच्या मजल्यापेक्षा जास्त मायाजाल वाटत होतं.... शेवटी त्याने काकाला विचारायचं ठरवलं.....
"काकाsssss..... ओ काका..... कुठे आहात.....?" सम्याने आरोळी ठोकली....
प्रतिसाद काही आला नाही.....
पण त्या घरातल्या वस्तू त्याला काहीशा विचित्र जाणिवा देत होत्या.... तितक्यात त्याच्या मागची सुरई ठाण् ठाण् आवाज करत जमिनीवर आदळली....
'वारा नाहीये.... कसला धक्का लागण्याची पण शक्यता नाही.... मग कशी पडली ही...?'
......
"असो....." म्हणत त्याने सुरई उचलून पुन्हा जागेवर ठेवली....
मनात भीती असली तर नको त्या गोष्टीत पण माणूस शंका काढून घाबरतो.... असा विचार करून स्वतःशीच हसून तो मागल्या दाराकडे काकांना शोधायला गेला.....
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा