Login

निर्जीव अस्तित्व (भाग ३)

संकटात सापडलेल्या मित्राला ते वाचवू शकतील....? आणि कसे....?

आतच आत नेणाऱ्या घराच्या मागच्या वाटेला त्याला काहीतरी कुजबुज ऐकू आली.....
'काका...?' समीर स्वतःशीच म्हणाला....
ते कोणासोबत बोलत आहेत हे पाहण्यासाठी तो हलकेच पुढे झुकला आणि.....
त्याच्या पायाखालची जमीन सरकली....
काका राघवसोबत हळू आवाजात बोलत होते.....
'राघव....? काय सुरू आहे या दोघांचं...?'
"मला घड्याळ आवडतं..... म्या बी एक घड्याळ हाय..... म्हण....."
"मला घड्याळ आवडतं.... मी.... मी पण घड्याळ आहे... आहे...." काकाच्या पाठोपाठ राघव बरळत होता.....
'हे,क....काय चालू आहे....?' सम्याला स्वतःशीच विचार करून घाम फुटायला लागला.... इथे घडणाऱ्या घटना म्हणजे योगायोग नाही....नक्कीच काहीतरी काळंबेरं आहे,आणि हे मला आत्ता समजतंय..... नील बरोबर बोलत होता.....पश्चात्ताप करत अंगातली शक्ती एकवटून तो ओरडला.....
"राघव..... तू काय बोलतोयस हे.... आणि तू रे,काकाच्या....
काय चालवलंय हे.... नील कुठंय....."
इतक्यात राघव समीरच्या अंगावर कोसळला.... आणि याच संधीचा फायदा घेत काकाने शेजारच्या दारातून पळ काढला....
"नील कुठंय हे मी शोधून राहणार म्हाताऱ्या..... पळून पळून कुठे पळशील...." समीर भलताच चिडला होता.....
"न.... नी.... ल.... नील इथे अssडक..... अडकलाय....." राघव म्हणाला.....
"म्हणजे.....?"
"म्ह.... म्हणजे..... हा म्हातारा... हा माझ्यासोबत जे करत होता.... ते,ते करून त्याने नील ला आधीच अडकवलंय...." राघव अर्धवट शुद्धीत होता....
"अरे पण तू वर शोधत होतास ना त्याला...?" समीरने विचारलं....
"हं.... हो..... या काकाने मला खाली आणलं.... या घरातले रस्ते,खोल्या,भिंती बदलतात.... तो काका काहीतरी जादूटोना करतोय...." राघव म्हणाला....
"इथे काहीतरी भयंकर घडतंय.... आपल्याला नीलला शोधून लवकर इथून स्वतःला सोडवलं पाहिजे... हे घर नाहीये..... इथल्या वस्तू म्हणजे जिवंत माणसं आहेत... आल्यापासून इथल्या गोष्टी सरळ सोप्या घडत नाहीयेत.... राघू..... चल, उठ.... आपल्याला निघायला हवं....." समीरच्या मनात राग,भीती,काळजी,आर्तता या संमिश्र भावनांनी कल्लोळ माजवला होता.....
राघवला आधार देत त्याने वरच्या आरामखुर्चीच्या खोलीत नेऊन बसवलं..... बॅगमधून पाण्याची बाटली काढून त्याला देत विचारलं....
"काय म्हणत होता तो म्हातारा......? सांग मला..."
"मी नीलला शोधत होतो.... मागून येऊन त्याने खांद्यावर हात ठेवून आवाज दिला...."
"राघव.... पोरा तुला घड्याळं आवडत्यात ना....? माह्याकडं म्वॉssssप घड्याळं हायती.... माह्या डोळ्यांत पाह्य...."
आणि मी त्याच्या डोळ्यात पाहिलं तर माझं मला नाही समजलं रे,की मी काय बोलतोय,वागतोय....मी कुठे आहे हेसुध्दा...."
"पण आपला नील कुठे असेल रे सम्या...." म्हणत राघव हुंदके देऊन रडायला लागला....
"आता हिम्मत हारून चालणार नाही राघू.... त्याने तुला घड्याळाबद्दल विचारलं.... म्हणजे नीलला....." समीरला मधेच थांबवत राघव म्हणाला....
"म्हणूनच तो मघाशी आवड विचारत होता..... आणि.... नील त्याच्या हाती सहजासहजी लागला....तो आपल्याला, आपल्याच आवडत्या वस्तूंमध्ये बदलतोय....."
"हो..... नीलला मेटल स्टॅच्यू आवडतात.... म्हणजे.... आपल्याला इथल्या सगळ्या मेटल फिगरिन्स शोधाव्या लागतील.... " समीरने डोकं चालवलं....
"अरे पण या घरात शेकडो स्टॅच्यू आहेत.... कसं ओळखणार...?" राघवने विचारणा केली.....
"आणि तो म्हातारा पुन्हा आला,आणि काही अघटित करण्याचा प्रयत्न केला, तर....?" आता राघव चांगलाच घाबरला होता.... त्याच्या प्रत्येक शब्दांतून, श्वासातून भीतीचं सावट दृश्यमान होत होतं.....
"त्याला मी बघून घेतो..... तू नीलला शोधायची तयारी कर...." सम्या राघवला म्हणाला....
राघव आता प्रत्येक मूर्तीला,प्रत्येक स्टॅच्यूला न्याहाळत, आर्त साद घालत होता..... त्याच्या मनात प्रचंड भीती आणि करुणा एकाच वेळी उफाळून येत होत्या.... आजूबाजूला असलेली प्रत्येक गोष्ट जिवंत आहे..... आणि स्वतःला सोडवण्यासाठी प्रत्येकजण आपल्याला हाक मारतोय असे भास राघवला होत होते..
इकडे सम्या खोल्याखोल्यांमध्ये जाऊन काकाला शोधू लागला.... पण बोलून चालून तो तिथल्या मायाजालाचा एक भाग होता.... सहजासहजी हाती लागणार नाही हे जाणून सम्या मोठ्याने ओरडू लागला....
"मी एक घड्याळ आहे.... मला घड्याळं आवडतात.....
मी एक घड्याळ आहे...... मला खूप आवडतात घड्याळं...."
आणि हा आवाज ऐकून काका समोरच्या दारातून ओढून घेतल्यासारखा आत आला....
"आलास तू.... ये काका.... माझं घड्याळ कर.... मी डोळ्यात बघतो तुझ्या...."
काकाला सगळं समजताच तो पळून जाऊ लागला.... समीरने पटकन झेप घालत काकाची बंडी धरून गळ्याभोवती हाताचा फास घातला.... काकाला हलताही येणार नाही असं समीरने काकावर ताबा मिळवला....
"बोल म्हाताऱ्या.... काय केलंस माझ्या मित्राला....बोssssल...."
"तो.... तो.... गेला त्याच्या आवडत्या गोस्टीकडं.... पाठवला मी त्येला...."
"सरळ सरळ सांग तो कुठंय,आणि त्याला कसं सोडवायचं ते.... नाहीतर बघ,गळ्याचा फास आवळून तुला जगातून पाठवीन.... बोल..."
म्हातारा पुन्हा भेसूर हसला..
"त्याची निशाणी तुमी इसरलात..... तर त्यासनी बी हितंच इसरून जा...."
0

🎭 Series Post

View all