Login

निर्जीव अस्तित्व (भाग ४)

संकटकाळी उपयोगी पडतो तोच खरा मित्र...... पण मित्राला वाचवताना आपण स्वतः अडकलो गेलो तर काय करणार....? मदत करावी की करू नये....?

समीरला काही समजेना..... त्याने एक हिसका देत काकाला ढकललं,आणि राघवच्या मदतीला धावला....
"सापडली का मूर्ती...?" समीर....
राघवने नकारार्थी मान हलवली....
"आता काय करूया???" समीर भयचकित मुद्रेने म्हणाला.....
"काका काही बोलला का? काही क्लू...? काही पळवाट...." राघवने विचारलं....
"तोंड नाही उघडलं त्याने..... काहीतरी बडबडत होता विचित्र...." समीर गोंधळलेल्या सुरात म्हणाला....
"पण म्हणाला तरी काय....? राघवला घाई झालेली...
"तुम्ही त्याची निशाणी विसरलात,तर त्याला पण विसरून जा वैगेरे काही म्हणत होता....."
"म्हणजे.... म्हणजे याचा अर्थ हा,की आपल्याला नीलची एखादी खूण, निशाणी यावरून त्याला शोधायला हवं....." राघवला थोडं हायसं वाटलं....
"आता खूण म्हणजे नक्की काय...?" समीरने राघवकडे पाहत विचारणा केली...
"त्याची बॅग....?" राघव....
"पण ती आपली कॉमन बॅग आहे.... अशी काय गोष्ट असेल जी फक्त आणि फक्त त्याची,किंवा त्याच्याकडे असेल....ज्यामुळे त्याची ओळख पटवता येईल....?" सम्याने योग्य मुद्दा समोर ठेवला...
"त्याची अशी कुठलीच गोष्ट किंवा खूण मला आठवत नाहीये...."
राघव निराशेने म्हणाला....
"त्याच्या शरीरावर काही जन्मखूण वैगरे काही....."
"अरे हो,त्याच्या हातावर पानाच्या आकाराचा उंचवटा आहे...." समीरला अचानक आठवलं....
"होय,होय..... हे मलाही आठवतंय.... पण कोणत्या हातावर....?" राघवचा प्रश्न रास्त होता....
काही केल्या दोघांनाही हात कुठला ते आठवेना.... शेवटी समोर येणाऱ्या प्रत्येक मूर्तीचे दोन्ही हात पाहून त्यावर खूण शोधायचं ठरलं....
हे सगळं आडकोपऱ्यातून 'काका' पाहत होताच,तशी त्याची बेचैनी वाढत होती.... पण समीरच्या हातचा हिसका अजून विरला नव्हता,आणि म्हणूनच काका आडूनच ओरडला...

"त्येला हाये तिथ्थंच ऱ्हाउद्या..... हितल्या कशाच्याबी वाटं जाऊ नका..... ज्येला कशालाबी हात लावसाल,त्येच्यात तुम्हास्नी अडकून पडावं लागंल..... माघं फिरा....."
अचानक आलेल्या आवाजाने दोघे पुन्हा दचकले.... पण यावेळी ते कशालाही भिणार नव्हते.... त्यांना फक्त समोर नील दिसत होता... आणि त्याची सुटका....
त्या घरात भयाण काळोखी शांतता पसरली होती.... घरभर वस्तू पसरलेल्या असल्या,तर अशात कुठूनतरी पाणी टिपटिपत असल्याचा आवाज राघवला आला...
'नील बाथरूम शोधत गेला होता... कदाचित पाण्याचा आवाज येतोय तिथे तोही गेला असेल???' तो स्वगत म्हणाला....
तीस चाळीस स्टॅच्यू पाहिल्यानंतर दोघांनी पाण्याच्या आवाजाच्या दिशेने शोधायला सुरुवात केली....
आणि खरंच तिथे नीलच्या उंचीची,त्याच्यासारखीच शरीरयष्टी असलेली मूर्ती समोर दिसली.... दोघे गडबडीने धावत जवळ गेले,आणि स्टॅच्यूचे हात पाहू लागले.....
डाव्या हाताच्या मनगटावर खूण स्पष्ट दिसत होती.... समीर आणि राघव दोघेही त्याची अवस्था पाहून स्तब्ध झाले....
"हा नील आहे हे नक्की,पण याला बाहेर कसं आणायचं...?" सम्याने विचारलं.....
"म्हाताऱ्याने सांगितलं तसं कोणत्याही वस्तूमधल्या व्यक्तीला मुक्त करण्याच्या हेतूने स्पर्श केला तर आपणही त्यात....."
"थांब,थांब,थांब राघव..... म्हणजे नीलला यातून सोडवायचं असेल,तर आपल्यापैकी एकाला स्वतःची आहुती देणं भाग आहे..." समीरने विश्वासाने म्हणाला....
आणि त्याचं हे बोलणं ऐकून राघव घाबरला.... आता दोघांपैकी कुणाचा बळी जाणार ही भीती त्याच्या मनात डोकं वर काढत होती....
समीर मात्र काहीसा निश्चिंत वाटत होता.....
वातावरणात काही क्षण शांतता पसरली..... राघवने समीरकडे प्रश्नार्थक नजरेने पाहताच समीरने नजरेने खुणावले आणि राघव सर्वकाही समजून गेला.....
वरच्या खोलीत राहिलेली त्यांची सामानाची बॅग घेण्याच्या निमित्ताने दोघेही खोलीत पोहोचले. आसपास काका नाहीये याची खात्री करून दोघेही मोर्स कोडच्या आधारे हातवाऱ्यांनी एकमेकांशी संवाद साधू लागले....
दोघांनी प्लॅन समजून घेऊन खाली जाण्याचा निर्णय घेतला....
खाली येता येता दोघेही एकमेकांशी कुजबुजतच आले.... जणू काही ते घाबरून, त्यांच्या मित्राला तिथेच सोडून,स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळून जात होते....
पण ही गोष्ट काकाला मान्य नव्हती.... तोंडात आलेल्या दोन वस्तूंच्या घासाला काका सहजासहजी जाऊ देणार नव्हता....

0

🎭 Series Post

View all