Login

निर्जीव अस्तित्व (भाग ५)

कथा वाचल्याबद्द्ल खूप खूप धन्यवाद..... कथा कशी वाटली हा अभिप्राय जरूर कळवा.....

त्यांच्या रस्त्यात आडवं येत काका गरजला.....
"हितं येयला कोंच्या परवानगीची गरज लागत न्हाई.... पर हितनं माज्या परवानगी बिगर कोनी भायेर जाऊ शकत न्हाई...."
"आलास रे 'काक्का'.... ये,तुझीच वाट पाहत होतो..." चिडून समीर म्हणाला....
तसं समीर आणि राघवने काकाच्या बखोटीला दोन्ही बाजूने धरून ओढत नील होता त्या ठिकाणी आणलं....
"मला हितं आनून तुम्हासनी कायबी गावनार न्हाई...." आणि पुन्हा काका विजयी मुद्रेने आसुरी हसला....
तसा समीर चिडून काकाच्या अंगावर धावून गेला....
"म्हाताऱ्या.... तुला काय वाटतं, तू इथला हुकूमशहा आहेस? आम्हाला अडवशील....? आम्ही नीलला घेतल्याशिवाय इथून जाणार नाही.... बोल त्याला कसं बाहेर काढायचं.... बोल..."
काका फक्त हसला....
"हा असा ऐकणार नाही समीर...." राघव म्हणाला....
"याला आता याच्याच जाळ्यात अडकून टाकूया...." म्हणत दोघांनी काकाला तसाच ओढत नीलच्या मूर्तीच्या अगदी जवळ नेले....
आता मात्र काका घाबरला.... त्याचा भयभीत चेहरा पाहून समीर आणि राघवला जणूकाही चेव चढला...
"लई पस्तावाल म्या सांगतो.... मला सोडा.... म्या काय करू सकतो ते तुम्हासनी म्हाईत न्हाई.... सोडा मला न्हाईतर लई वंगाळ होईल..... सोडा मला.... "
पेटून उठलेल्या समीरने एक हिसका दिला आणि काका त्या मूर्तीवर जाऊन कोसळला....
पुढल्या क्षणी मूर्ती कडकड आवाज करत एक बाजूने दुभंगली.... आतून नीलचा हात दिसू लागला....
राघवने क्षणाचा विलंब न लावता त्याचा हात धरून बाहेर ओढले,आणि मूर्तीच्या दुसऱ्या बाजूने दुभंगलेल्या जागेतून काका आत ओढला गेला...
काही क्षणांत मूर्ती पूर्ववत दिसू लागली.... फरक होता तो फक्त आतल्या व्यक्तीचा.....
काही वेळेपूर्वी पर्यंत नीलसारखी दिसणारी मूर्ती एकाएकी काकासारखी भासू लागली.....
समीर आणि राघवला, मूर्तीच्या आतून जीवाच्या आकांताने ओरडणारा काका खुणावत होता.....
या भयावह प्रसंगातून बाहेर आलेला नील पूर्णतः अशक्त झाला होता.... त्याला त्याच्यासोबत काय घडले आहे हे यत्किंचितही आठवत नव्हतं....
तो एक पाऊलसुद्धा चालू शकत नव्हता,पण त्या घरातून बाहेर पडणं तितकंच महत्त्वाचं होतं.....
शेवटी समीरने त्याला उचलून घेत तिथून काढता पाय घेतला.... पाठोपाठ राघव बॅग घेऊन चालू लागला......
घरातून बाहेर पडताच बाराचा टोला पडल्याचा आवाज आला.... मागे वळून पाहताना मघाशी सुस्थितीत दिसणारं घर आता पडकं आणि भग्न,भयाण दिसू लागलं होतं....
बाहेर पडेपर्यंत नीलला शुद्ध येऊ लागली होती....
घरात घडलेल्या घडामोडींचा अंदाज घेता एव्हाना पहाट होत आलेली असायला हवी होती.... पण बाहेरचा काळोख वेळेचा थांग लागू देत नव्हता....
"किती वाजलेत रे सम्या.... माझं घड्याळ मघाशीच बंद पडलं वाटतं....."
"पावणे बारा....." समीर म्हणाला.... त्या क्षणी राघव आणि समीरने एकमेकांच्या डोळ्यांत विस्मयांकित पाहिलं....
लगबगीने गाडीत बसत राघवने गाडी सुरू केली,आणि देवाची कृपा म्हणून गाडी सुद्धा लागलीच सुरू झाली.... झालेल्या प्रकाराबद्दल कुणीही बोलायचे नाही असा अलिखित नियम पाळला जात होता.....
पहाट होता होता गाडी मुख्य रस्त्याला लागायच्या आधी तिघे चहासाठी म्हणून एक टपरीवर थांबले.... तीन रस्ते मुख्य रस्त्याला जोडले गेलेल्या चौकात चहाची टपरी होती....
या तिघांना गाडीतून उतरल्यापासून चहावाला डोळे विस्फारून पाहत होता....
दोन चहा आणि एक सोडा सांगितल्यावर त्या चहावाल्याने धीर करत विचारलंच....
"साहेब,हिकडनं कंच्या रस्त्यानं आलासा तुमी...?"
"अरे हा तिसरा रस्ता आहे ना,तिथून....
का रे बारक्या...." काही घडलंच नाही असा आव आणत पण तरीही उत्सुकतेने समीर म्हणाला...
"न्हाय म्हंजी त्यो रस्ता बंद हाये.... तिकुडनं कोणपन येत जात न्हाय..."
"का रे पण असं...." राघव सुद्धा कुतूहलाने म्हणाला....
"तिकडं म्हंनं येक जिवंत घर हाये.... काल तर आवसेची रात व्हती.... तिथनं,आवसेच्या रातीला जाणारा भायेर पडला न्हाय कवाच.... त्ये घर तिथनं जाणाऱ्या वाटसरूला शोदत जातंय आन गिळून टाकतंय म्हंनं..... तुम्हासनी काय येगळं वाटलं न्हाय का....?"
ही गोष्ट ऐकताच तिघांच्या तोंडचं पाणी पळून गेलं....
आपण कुठल्या संकटातून बाहेर आलो आहोत,याची जाणीव तिघांनाही झालेली.... देवाचे आभार मानत,आणि पुन्हा कधीही अशा कुठल्याही अनोळखी ठिकाणी न जाण्याचा निर्धार करत तिघे घरच्या दिशेने निघाले.....


नमस्कार वाचकहो..... सर्वप्रथम आपणा सर्वांना कथा वाचल्याबद्दल धन्यवाद!!!!! पण जर तुम्हाला या कथेचा पूर्वार्ध किंवा उत्तरार्ध (प्रिक्वल किंवा सिक्वल) जाणून घेण्याची इच्छा असेल,तर आपले मत जरूर नोंदवा.... मी आपल्या कॉमेंट्स ची वाट पाहत आहे..... पुनःश्च धन्यवाद!!!!!
0

🎭 Series Post

View all