Login

निर्मोही

निस्वार्थीपणे काम करणाऱ्या एका मदतनीस स्त्रीची कहाणी
लघुकथा -
निर्मोही

"अगं ह्या कामवाल्यांचा रुबाब दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. आपल्याला त्यांची गरज आहे म्हणून जास्तच मुजोर होत चालल्या आहेत."लंचटाईम मध्ये शीला तावातवाने लिनाशी बोलत होती. इतक्यात विभा तिथे आली.

"अगं शीला शांत हो इतकं चिडायला काय झालं"

"काही नाही ग या कामवाल्यांचे नखरे सांभाळताना जीव मेटाकुटीस येतो. काल आमच्याकडे पाहुणे येणार हे तिला आधीच कळलं तर लगेच तिने सकाळी फोन करून सांगितलं आज माझी तब्येत बरी नाही मी येणार नाही कामाला."

"अगं खरंच तिला बरं नसेल. आपण पण थोडं त्यांना समजून घ्यायला हवं ना."

"तुला ना कामवाल्यांचा खूपच पुळका येतो कारण तुझ्याकडे कामाला बाई आहे तिच्यासारखी शोधूनही सापडणार नाही."

"अगदी खरं आहे. आमच्या आशाताईंसारखी बाई हल्लीच्या जमान्यात मिळणारच नाही. पण कसं असतं ना शीला आपण पण त्यांच्याशी प्रेमाने वागायला हवं. त्यांना प्रेम, मान दिला की त्या सुद्धा आपल्यासाठी पडेल ते काम करायला तयार असतात. काही जणी खूपच उद्धट आणि मुजोर असतात हे मी पण मान्य करते परंतु सर्वजणी तशा नसतात."

विभाला तिच्या सान्निध्यात आलेल्या सर्व काम करणाऱ्या मावशींचे चेहरे डोळ्यासमोरून तरळून गेले. सर्वप्रथम तिच्या माहेरी ती लहान असल्यापासून एकच मावशी कामाला येत होत्या. अगदी विभाचं लग्न होऊन ती पहिल्या बाळंतपणासाठी माहेरी गेली तेव्हाही त्याच होत्या. ती लग्न होऊन सासरी गेली तेव्हा सुद्धा तिच्या सासरी तिकडून दुसरीकडे राहायला जाईपर्यंत एकच मावशी होत्या त्यांना सर्वजण 'चंदाच्या आई' नावाने ओळखत. विभाच्या सासूबाई पण खूपच दयाळू होत्या. त्या नित्यनेमाने त्यांना दुपारी खायला देत असत, चहा द्यायच्या. मुख्य म्हणजे सासुबाईंचा उपवास असायचा तेव्हा चंदाच्या आईचा पण उपवास असायचा तेव्हा उपवासाचे पदार्थ सुद्धा त्यांना त्यांच्या घरीच खायला मिळायचे.

विभा आणि तिचे कुटुंबीय ती जागा सोडून उपनगरात राहायला आले तेव्हा त्यांच्याकडे एक मावशी यायच्या. त्यांना सर्वजण मावशीच म्हणायचे. त्यांचा मृत्यू होईपर्यंत त्या विभाकडेच कामाला होत्या. त्यांचं काम सुद्धा टापटीप, नीटनेटकं होतं. त्यांना वरचेवर पैसे मागायची सवय होती. पण विभा आणि तिच्या सासूबाईंनी कधीच कटकट केली नाही. त्यांनाही काही अडचणी येतच असणार ना. त्यांनी जास्तीची रजा घेतल्यावर कधी त्यांचे पैसे सुद्धा कापले नाही आणि म्हणूनच कधी पाहुणेरावणे, जास्तीचं काम काहीही असले तरी कधी त्यांनी तोंडातून ब्र काढला नाही.

त्या मावशी गेल्यानंतर विभाकडे आशाताई म्हणून कामाला येऊ लागल्या. त्या म्हणजे 'माणुसकीचा झरा'. त्यांना तीन मुलं झाल्यावर त्यांचा नवरा परागंदा झाला होता. मुलांना वाढवताना त्यांनी पाच-सहा घरची कामं धरली. आशाताईंचे दुसरे नाव 'निर्मोही'. कसला म्हणजे अगदी कसलाच मोह नव्हता त्यांना. सदा आनंदी असायच्या. म्हाताऱ्या माणसांबद्दल विलक्षण कळवळा होता त्यांना. बरं असं त्या फक्त विभाकडेच वागायच्या असं नाही तर सोसायटीत जिथे जिथे काम करायच्या तिथे अगदी समरसून काम करायच्या. काम सुद्धा एकदम लख्ख असायचं. त्यांना कोणतंही काम कधी करायला सांगायला लागलं नाही. जास्तीचं कामपण त्या स्वतःहूनच करायच्या. कधीही काही खायला दिले तर कधीच खायच्या नाहीत. म्हणायच्या असं काम करताना खाल्लं की भरभर कामं होत नाहीत. पण तेच एखादा गोडाचा पदार्थ देवाचा नैवेद्य आहे म्हणून दिला तर मात्र अगदी भक्तीभावाने खायच्या.

कुणाच्याही घरी कोण आजारी असेल तर यांचा जीव वरखाली व्हायचा. कोणाला बाम लावून दे, कोणाचे गुडघे दुखत असतील तर गरम पाण्याने शेकून दे असे सारं काही त्या निरपेक्षपणे करत असत. नंतर त्यांची मुलं मोठी झाल्यावर गावी त्यांची खूप शेतजमीन होती तिथे त्यांनी टुमदार घर बांधलं, मुलांनी शेतीचं सर्व व्यवस्थित केलं. त्यांना आपण कधी सांगितलं की उलट तुम्ही आमच्यापेक्षा श्रीमंत आहात तर त्या लाजायच्या. लहानपणापासून मुंबईत राहिलेल्या त्यामुळे त्यांना गावी राहणं पटत नव्हतं नाहीतर एका मालकिणीच्या रूबाबात नक्कीच राहू शकल्या असत्या.

सोसायटीत कामाला येणाऱ्या इतर बायकांकडे मोबाईल होता. ह्यांना मोबाईल पण नकोसा होता. विभाने एकदा त्यांना म्हटलं,

"तुम्हाला बँकेत एक सेव्हींग अकाउंट उघडून देते. दर महिन्याला थोडे पैसे बँकेत टाकत जा थोडं व्याज मिळेल आणि पुढे तुम्हाला उपयोगी पण पडतील."

"काय करायचे पुढे पैसे मला जे मिळतात ते मी नातवंडांवर, मुलांवर संपवून टाकते. मला काय झालं तर मला खात्री आहे माझी मुलं मला कधीच सोडणार नाहीत."

त्यांनी बँकेत कधी अकाउंट उघडलं नाही की कधी स्वतःजवळ पैसे ठेवले नाहीत जे मिळायचे ते खऱ्या अर्थाने ते घरातच सर्वांसाठी वापरून टाकायच्या. एकदा त्या खरोखर आजारी पडल्या तेव्हा मात्र त्यांच्या मुलाने त्यांना अगदी मोठ्या हॉस्पिटलमध्ये सेपरेट रूम घेऊन छान त्यांची व्यवस्था केली. विभा त्यांना बघायला गेली होती तिला वाटलं जनरल वॉर्ड मध्ये असतील कुठे. शोधल्यावर कळलं तर सेपरेट रूम मध्ये अगदी मस्त आरामात बसल्या होत्या. विभाला तेव्हा त्यांच्या मुलाचं खूप कौतुक वाटलं. इतकंच काय तर त्यांच्या शेतात पिकणाऱ्या ज्वारीचे पीठ, कधी गावठी कोंबडीची अंडी असं ती विभाला आणि ज्यांच्याकडे काम करायची त्या सर्वांनाच नेहमी आणून द्यायची. एकदम दिलदार स्वभाव. इतक्या विश्वासू होत्या की एक रुपया जरी खाली पडलेला दिसला तरी लगेच आपल्या हातात देणार. विभाची एक चावी शेजारी असायची. तिने शेजाऱ्यांना सांगून ठेवलं होतं या कधीही आल्या तरी यांना चावी देत जा. विभाने त्यांचे पैसे कधीच कापले नाहीत म्हणजे अगदी परदेशात जरी एक दोन महिन्यासाठी गेली तरी ती त्यांना पूर्ण पगार देई. याची जाण ठेवून त्या सुद्धा आठ-दहा दिवसातून एकदा घरी येऊन केरवारं, साफसफाई करायच्या.

आज ऑफिसमधली शिलाची चिडचिड ऐकून विभाला वाटलं की या अशा काम करणाऱ्या स्त्रियांना खरंच कोणी वाली नसतं. त्या पण आजारी पडू शकतात, त्यांना सुद्धा कधी काही अडचण येऊ शकते याची कोणालाही जाणीव नसते. कितीतरी स्त्रिया अशा कामवाल्यांचे पैसे कापतात. एक तर त्यांना असा कितीसा पगार असतो त्याच्यातून तुम्ही पैसे कापता. कामवालीकडे एक काम करणारी अशा नजरेनेच सगळेजण बघत असतात. पण सर्वात आधी ती एक माणूस आहे. तिच्याशी थोडं आदराने बोललं तर काय हरकत आहे. आपल्यापेक्षा मोठ्या असलेल्या कामवालीला सुद्धा कित्येक घरी फक्त नावाने हाक मारतात. ना ताई ना मावशी काहीही संबोधन नसतं. तुम्ही त्यांना प्रेम दिलं तर नक्कीच तुम्हाला प्रेम मिळेल.

हल्ली अशा कामावाल्या स्त्रियांची संघटना झाली आहे. म्हणून कामाला लागल्यावरच त्यांचेही नियम आणि अटी त्या सांगतात. महिन्यातून एक रजा, प्रत्येक सणाला रजा पाहुणे वगैरे आले, जास्तीचं काम पडलं तर त्याचे जास्ती पैसे द्यायला लागतील वगैरे. पण हे सगळं करण्याची त्यांच्यावर वेळ का आली तुम्हीच त्यांना समजून उमजून अधिक मेहनताना दिला तर त्यांना असं मागायची गरजच पडली नसती. त्यासुद्धा आपली पोरंबाळं, घरातली इतर कामं सोडून तुमच्याकडे कामाला येतात. काही घरात अशा स्त्रियांकडे पुरुष मंडळी वाईट नजरेने बघतात. तेव्हा त्यांना खूप असुरक्षित वाटतं. ऑफिस मध्ये जाणाऱ्या स्त्रियांना सर्व प्रकारची रजा मिळू शकते मग यांनी अडचणीच्या वेळी रजा घेतली तर काय हरकत आहे ?

आज अनेक नोकरी करणाऱ्या स्त्रियांना आणि वयोमानामुळे किंवा इतर आजारपणामुळे घरातील काम करणं शक्य नसलेल्या स्त्रियांना या कामवाल्यांचा खूप आधार असतो. त्या नियमितपणे तुमच्याकडे कामाला येतात तेव्हा तुम्हाला त्यांचं महत्त्व कळत नाही. पण त्या एक दिवस जरी आल्या नाहीत आणि घरातील सारी कामं तुम्हाला करायला लागतात तेव्हा तुम्हाला कळून चुकतं की त्या किती काम करतात. शिक्षण नसल्यामुळे अथवा इतर काही कारणामुळे त्यांना असं काम करावं लागतं. खरं तर अशा स्त्रियांना कामवाली न म्हणता 'मदतनीस' असंच म्हटलं पाहिजे. वयस्कर स्त्रीने त्यांना नुसतं नावाने हाक मारली तर हरकत नाही पण इतरांनी त्यांच्या नावापुढे ताई, मावशी असं एखादं संबोधन लावून हाक मारावी. आज त्या आहेत म्हणून तुम्ही बिनघोरपणे ऑफिसला जाऊ शकता. याची जाण ठेवून त्यांना सुद्धा प्रेमाने, आदराने वागवा. त्यांची विचारपूस करून त्यांच्या अडचणीच्या वेळी त्यांना सढळ हाताने मदत करा. बघा नक्कीच त्यांच्या मनातही तुमच्याविषयी प्रेम आपुलकी नक्कीच जागृत होईल. गरज प्रत्येकालाच असते. आज शीलाच्या चिडचिडीमुळे आशाताईंसारखा हिरा आपल्याजवळ आहे याची विभाला पुन्हा एकदा जाणीव झाली.

©️®️ सीमा गंगाधरे