ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५
टीम श्रावणी
टीम श्रावणी
आज घरात अगदीच शुकशुकाट होता. सगळे घरात असूनही सगळे मौन झाले होते. विषय देखील गंभीरच होता. किती वर्षांनी आज योग आला होता एकत्र जेवणाचा परंतु, सुखाला ग्रहण लागावे तसं आज जेवणाअगोदरच विषय काढून सगळे चिंतातुर झाले होते.
विषय होता नानांच्या निवृत्तीचा. आज नाना अठ्ठावन्न वर्षाचे झाले होते. इतकी वर्ष शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत असणारे नाना म्हणजे सदाशिव रावले आज निवृत्त झाले. दोन मुली आणि दोन मुले असा मोठा प्रपंच असणारा रावले छोटेखानी वाडा आज शांत होता. त्याला कारणीभूत ठरला तो नानांचा घेतलेला निर्णय.
" नाना... पुन्हा एकदा विचार करा. हे असं या वयात... बघा म्हणजे..." नानांचा मोठा मुलगा राघव शांततेला चिरत शेवटी बोलला.
" माझा विचार पक्का आहे राघव. मी काही आता तडकाफडकी निर्णय नाही घेतला आहे." नाना त्यांच्या आरामखुर्चीत बसून बोलले.
" तसं नाही नाना... तुम्ही विचारपूर्वकच निर्णय घेतला असणार परंतु, पुन्हा एकदा विचार करायला हरकत काय आहे." हिंमत करून छोटा मुलगा स्वर देखील मध्ये पडला.
" आता तू मला शिकवणार का? हे बघा तुमची आई गेल्यापासून मीच तुम्हाला सांभाळले आहे. तुमचं शिक्षण, तुमचं खाणंपिणं, तुमची देखभाल सगळी मी एकट्यानेच केली आहे. आणि आता तुम्ही सगळे आपापल्या संसारात बिझी झाल्यावर माझं मी बघू नको का?"
" हो नाना... तुम्हीच बघणार तुमचं परंतु, तुम्ही जे करताय ते चुकीचं नाही वाटत का. अशी सगळी प्रॉपर्टी तुम्ही दान करून तुम्ही इथून कायमचे निघून जाणार. याला काय अर्थ आहे? नाना, हि संपत्ती आणि हे वैभव फक्त तुमचं नाही. हे राघवच्या आजोबांचे आहे. त्यामुळे तुम्ही एकट्याने हा निर्णय नाही घेऊ शकत."
राघवाची बायको नीला रागात बोलली.
" त्याच काय आहे ना सुनबाई. तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे. परंतु, माझ्या वडिलांची हि प्रॉपर्टी त्यामुळे यावर पहिल्यांदा माझा अधिकार आहे नंतर माझ्या मुलांचा. आणि जिथे मी हे सांभाळले नसते तर आज तुम्हाला हे बघायला देखील मिळाले नसते. माझा निर्णय झाला आहे. त्यामुळे मी काही माघार घेणार नाही आता.." नाना ठामपणे बोलले.
नीला फणकाऱ्यात साडीचा पदर झटकून आतमध्ये निघून गेली. तिच्या मागोमाग राघव देखील आतमध्ये गेला. स्वर मात्र तिथेच उभा होता. खुंटा ठोकल्या सारखा.
" काय... तुला आत मध्ये यायला निमंत्रण देऊ का?" स्वरची बायको कामाक्षी त्याच्या कानात हळूच बोलते.
" नाही... चल..." स्वर देखील कामाक्षीसह त्याच्या खोलीत निघून जातो.
" नाना, तुम्ही जो निर्णय घेतला तो तुमच्या परीने बरोबरच असेल. तुमची प्रॉपर्टी आह तुम्हाला वाटेल ते करा तिच्यासोबत. परंतु, इथून कायमचे कशाला निघून जाता. इथेच राहा ना... आम्हाला गरज आहे अजून तुमची नाना." मगापासून शांतपणे नुसतं ऐकणारी नानांची मोठी मुलगी रचना त्याच्याजवळ आली. तिच्या डोळ्यात अश्रू होते.
" रचना बेटा. तू आता मोठी झाली आहेस. तुझ्या पदरात देखील दोन मुले आहेत. एकदा का ती मुले मोठी झाली की मग तुला कळेल मी घेतलेला आजचा निर्णय किती महत्वाचा आहे तो. जा बाळा. लांबून आलीस तू आराम कर जरा. रात्री वकील येणार आहेत. त्यावेळी मी सांगेन तुला." नानांनी तिचे अश्रू पुसले.
त्यांच्या सांगण्यावरून रचना आतमध्ये निघून गेली. नाना पुन्हा आरामखुर्चीला हलके धक्का देत मान पाठीमागे टाकून विचार करू लागले. काही वर्षांपूर्वी जेव्हा ते आणि त्यांची पत्नी राजश्री. गाव सोडून पुण्यात आले होते. एवढ्या मोठ्या शहरात येताना त्यांच्या जवळ फक्त त्यांची बी एड ची पदवी आणि दोन जोडी कपडे होते. नशीब आजमाव्याला आलेले हे जोडपे स्वतःच्या संसारासाठी काहीही करायला तयार झाले होते. घरची परिस्थिती अगदी चांगली असताना नाहक त्यांना राहत घर सोडावे लागले. गडगंज संपत्ती असताना फक्त स्वाभिमान दुखावला गेल्याने नानांनी गाव सोडले. वडिलांनी बेरोजगारीवरून केलेला अपमान जिव्हारी लागल्याने ते क्षणात सर्वकाही सोडून तिथून निघाले. कपाळावरचं कुंकू जिथे राहणार नाही तिथे मी सुखात कशी राहणार असं सांगून राजश्री देखील सासू सासऱ्यांचा आर्शिवाद घेऊन नवऱ्याच्या मागे निघाली.
पुण्यात आल्यावर आधी तात्पुरत्या वैधतेवर एका प्रायव्हेट शाळेत गणिताचे शिक्षक म्हणून काम करू लागले. पगार जेमतेम असला तरी तो स्वकष्टाचा आहे यातच ते समाधानी होते. राजश्री देखील त्यांच्या छोट्याशा परंतु, आनंदाने भरलेल्या या संसारात सुखी समाधानी होती. काही वर्षातच त्याच्या या संसाराच्या वेलीवर दोन फुले उमलली. पहिलीच वेळ आणि त्यात जुळे म्हणून राजश्रीच्या सांगण्यावरून नाना त्यांच्या आईंना पुण्याला घेऊन आले. त्या देखील लेकाची मुले म्हणून नातवंडांसाठी झालं गेलं सगळं विसरून धावतच आल्या.
क्रमश:
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा