ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५
टीम श्रावणी
टीम श्रावणी
" अरे दादा... शांत हो..." रचनाने राघवचा हात धरला.
" काय शांत हो? तुम्हाला काय जातंय शांत हो बोलायला ताई. तुमच्या वडिलांनी तर आमच्या आयुष्याची वाट लावली. सगळी स्वप्ने धुळीस मिळवली आमची.
" नाही तर काय... माझ्या तर भविष्याची राखरांगोळी केली नाना तुम्ही. एका दुकानावर कसं भागणार आहे माझं या काळात तुम्हीच सांगा? आता मी काय नोकरी करत माझे पुढचे शिक्षण पूर्ण करू का?" नीला रचनाला बोलतच होती की सान्वीने देखील सगळ्यात उडी घेतली.
" नाना तुम्ही हे बरोबर नाही केले आमच्या सोबत." स्वर देखील रागात नानांना बोलला.
" काय बरोबर केले नाही मी? आणि कोणत्या अधिकाराने तुम्ही मला हा जाब विचारत आहात? तुमची आई देवाघरी गेल्यानंतर तुमचं सगळं काही पालनपोषण मी एकट्यानेच केले आहे. ते ही घरची सगळी जबाबदारी पेलून. आणि तुम्ही काय केले? काय रे राघवा... तुझं शिक्षण पूर्ण झालं तेव्हा तुला दुकाने आणि शेतीकडे लक्ष दे म्हणून म्हणालो होतो ना मी, काय म्हणाला होतास तू तेव्हा... एवढं शिकलो मी ते काय शेती आणि दुकाने सांभाळायला का? हेच म्हणाला होतास ना. गेलास निघून तू मुंबईला. तेव्हा तुझ्या पाठीवर असणाऱ्या तुझ्या लहान बहीण भावाचा तरी विचार केलास का तू? मी कसा त्यांना सांभाळणार होतो एकट्याने? कसं त्यांचं राहिलेले शिक्षण पूर्ण करणार होतो मी? पण नाही... तू स्वतःसाठी जगायला इथून निघून गेलास. आणि रचना तू, लग्न झाल्यावर फक्त सासरच्या लोकांचाच विचार केलास नेहमी. नवरा जे काही बोलेल ते ऐकून सारखं सारखं इथे येऊन माझ्याकडून पैसे घेऊन गेलीस. त्यावेळी एकदाही विचारले नाहीस तू मला की नाना तुम्हाला काही हवंय का? स्वर, तू तर आधीपासूनच फक्त स्वतःचाच विचार करत आलास रे. आधी तुझ्या आवडीचे शिक्षण मोठं कॉलेज, महागडे क्लासेस, हायफाय करिअर. आणि त्यानंतर तुझ्याच आवडीच्या मुलीसोबत लग्न. तू देखील एकदाही मला विचारले नाहीस की तुझ्या शिक्षणाचा खर्च किती झाला? तुझ्या पसंतीच्या मुलीसोबत लग्न करण्यासाठी किती खर्च आला? त्याबद्दल कधीच तू स्वतःहून विचारले नाहीस की मदतीला पुढे आलास? तेव्हाही तू फक्त स्वतःचाच विचार केलास आणि आताही फक्त तू स्वतःचाच विचार करत आहेस. आणि काय गं सान्वी, तुझ्यासाठी तर मी काय काय केले. किती वेळा तू नापास झालीस, कॉलेजमधून तुला काढून टाकले होते तेव्हाही मी पैसे भरून तुला दुसऱ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतले. आणि आता तूच बोलतेस मी तुझ्या भविष्याची राखरांगोळी केली म्हणून. अरे... तुम्हाला प्रॉपर्टी मी दान देतोय याचा राग येतोय. परंतु, एकानेही हे नीट ऐकले नाही की समजून घेतले नाही. फक्त प्रॉपर्टीच नाही तर मी देखील आश्रमात जाणार आहे. परंतु, तुमच्यापैकी एकही जण अजुनपर्यत असं म्हणाला नाही की नाना तुम्ही माझ्यासोबत रहा. आता तुम्ही माझी जबाबदारी आहात. काय म्हणालास तू राघव, जन्माला का घातलं तुम्हाला? हेच ना. पण... मला तर माझ्याच नशिबाची कीव येतेय तुमच्यासारखी पोरं माझ्या पदरी आली म्हणून. तुम्हाला प्रॉपर्टीची वाटणी होतेय हे कळालं म्हणून धावतपळत आलात तुम्ही इथे. परंतु, तुम्हां कोणाच्याच अजूनही हे लक्षात आलं नाही की आठवले नाही. तुमच्या आईची, राजश्रीची... तिची आज पंचविसावी पुण्यतिथी आहे. साधं सकाळपासून कोणीच तिच्या फोटो समोर दोन मिनिट देखील थांबला नाहीत. कशाला हवीत अशी मुले? मी जो निर्णय घेतला तो योग्यच आहे. आणि त्यात कोणताच बदल होणार नाही. मी देवाकडे हीच प्रार्थना करीन की हा असा दिवस तुमच्या कोणाच्याच वाट्याला कधीच येऊ नये."
नानांचे शब्द ऐकून सगळेच स्तब्ध झाले. सगळ्यांचाच डोळ्यांत पाणी आले. नानांचे बोल सगळ्यांच्याच डोळ्यांत अंजनाचे काम करून गेले. सगळे खाली माना घालून आपापल्या खोलीत निघून गेले. नाना हताश होऊन खुर्चीवर बसले.
" गोपाळा... पूर्वीची माणसे म्हणायची जितकी जास्त मुले असतील तेवढी म्हातारपणाची सोय चांगली होते. परंतु, आताची मुले जर अशी असतील तर त्यापेक्षा ती नसलेलीच बरी. माझं सगळ्यांना एवढंच मनापासून सांगणं आहे आता. पोरांना जेवढी गरज असेल तेवढच द्या. प्रमाणापेक्षा जास्त लाड करू नका. स्वतःच्या म्हातारपणाची सोय मुलांवर न सोडता स्वतःचं करून ठेवा. प्रॉपर्टी काही कामाची नसते रे... मुलांमध्ये भांडण लावण्याचेच काम करते ती फक्त. पैशा सगळं काही असतो रे गोपाळा. नातीगोती, आपुलकीचा ओलावा, मायेचा झरा हे फक्त कथा कादंबऱ्यामध्येच छान वाटते. खऱ्या आयुष्यात या शब्दांचा मोल शून्य आहे. पोरांसाठी संपूर्ण आयुष्य खर्ची केले मी. आणि आता हिच पोरं त्यांच्या आयुष्यात साधी थोडीशी जागा देखील देऊ शकत नाही या थकलेल्या बापाला. वेळीच मला समजून आले म्हणून मी हा निर्णय घेतला. माझ्या सारखी म्हातारी माणसे त्यांच्या वृध्दापकाळात पोरं असताना देखील अनाथ होऊ नये म्हणून त्या आश्रमाला देणगी देऊन तिथल्या लोकांची सेवा करत मी माझं राहिलेलं आयुष्य काढणार आहे. चल गोपाळा. माझी तयारी करतो आता. निघण्याची...." एवढं बोलून नाना स्वतःच्या खोलीत निघून गेले.
गोपाळ राजवाडे यांना एका स्वाभिमानी माणसाला जो आयुष्यात कधीच परिस्थितीमुळे हरला नाही तोच आज देखील त्याच्या स्वार्थी मुलांसमोर जिंकला हे पाहून अश्रू अनावर झाले.
समाप्त
