Login

निर्णय - असाही भाग २

आपल्याच मुलांना प्रॉपर्टी साठी भांडताना पाहून हताश झालेल्या बापाची कहाणी.
ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५
टीम श्रावणी

राघव आणि रचना दोघी जुळी मुले. सुरुवातीला सांभाळताना सगळ्यांच्याच नाकीनऊ यायचे परंतु हळू हळू सगळ्यांना त्याची सवय झाली. मुले दोन वर्षांची झाली तोच नानांना सरकारी शाळेत नोकरीसाठी बोलवण्यात आले. कायमस्वरूपी सरकारी नोकरी मिळाल्यामुळे नाना आणि राजश्री खुश होते. त्यात सोन्याहून पिवळे म्हणजे नानांचे वडील देखील नानांचे कौतुक करू लागले होते. आपापसांतील सगळे मतभेद विसरून नाना आणि त्यांचे वडील पुन्हा एकत्र आले. मुलाच्या प्रगतीवर नानाचे वडील भलतेच खुश होते. आयुष्यात हा मुलगा काही करणार नाही असं बोलणारे त्यांचे तेच वडील आता स्वतःहून त्याना नावजत होते. एकुलता एक मुलगा म्हणून वाया जाईल याची त्यांना असलेली भीती आता संपुष्टात आली होती. त्यांनी सगळी जबाबदारी आता नानावर सोपवली. गावची शेती, भाड्याने दिलेली चाळ, दुकाने एवढा फापटपसारा हाताळून नाना स्वतःची पुण्यात नोकरी देखील करू लागले. 

पुन्हा तीन वर्षांनी अजून दोन फुले नाना आणि राजश्रीच्या संसारात उमलले. स्वर झाल्यावर छोटं शेंडेफळ सान्वी झाली तसं नानांनी फुल्लस्टॉप घेतला.

सगळं काही छान सुरळीत चालू होते. हसत खेळत घर गोकुळासमान भासत होते. चारी भावंडे अगदी गुण्यागोविंदाने एकमेकांसोबत राहत होती. नाना आणि राजश्रीचे नातं तर अजूनच घट्ट झाले होते. एकहाती नाना सगळं काही सांभाळत होते. त्यांचा शिक्षकी पेशा, घरची दुकाने, गाव, शेती सर्वकाही. माणसे जास्त असली तरी घरात पैसाअडका देखील अमाप जमू लागला होता. 

अशा आनंद, समाधान वास करणाऱ्या त्यांच्या घराला अचानक ग्रहण लागले. राजश्री एकाएकी आजारी पडली. आणि बघता बघता तिची प्राणज्योत मावळली. नाना एकटे पडले होते. मुले अजून लहानच होती. राघव आणि रचना तरी थोडे समजदार झाले होते परंतु, स्वर आणि सान्वी त्यांना तर तेवढी उमज देखील आली नव्हती. नानांनी त्यांचे दुःख बाजूला सारून त्या चौघांकडे संपूर्ण लक्ष दिले. सगळ्या जबाबदाऱ्या आणि राजश्रीच्या वाटणीचे कर्तव्य देखील त्यांनाच पार पाडायचे होते. त्यांनी ते ही आव्हान उत्तमरीत्या पेलले.

मुले मोठी झाली. राघव आणि रचना चांगले शिक्षण घेऊन कामाला लागले. स्वर आणि सान्वी देखील मोठ्या बहीण भावाच्या पावलांवर पाऊल ठेवून स्वतःचे करिअर करू लागले. काही वर्षात राघव आणि रचनाचे लग्न नानांनी मोठ्या थाटामाटात लावून दिले. 

आज सगळेजण आपापल्या मार्गाला व्यवस्थित लागले होते. स्वरचे नुकतेच लग्न झाले होते. ते देखील प्रेमविवाह. सान्वी अजूनही स्वतःच्या पायावर उभं राहण्याची धडपड करत होती. घरापासून दूर राहून पुढचे शिक्षण घेत होती. त्यातच अचानक सगळ्यांना नानाचा फोन आला. आणि त्यांनी घेतलेला त्यांचा निर्णय सर्वांना ऐकवला. तो ऐकून सगळेच हातातली काम जशीच्या तशी सोडून घरी परत आले होते. 

" राघव, मला तुझ्या बाबांचं काही पटले नाही. तू स्पष्टपणे त्यांना सांग. अरे आपल्याला देखील मुलगा आहे. उद्या त्याचं देखील करिअर करायचं आहे आपल्याला. ही फक्त त्यांची प्रॉपर्टी नाही ह्यावर तुझा देखील हक्क आहे बोल त्यांना. मला काही माहित नाही. आता आलोच आहे तर आपली वाटणी घेऊनच जाऊ या आपण. मुंबईमध्ये किती खर्च येतो राहायला याचा जरा देखील अंदाज आहे का तुझ्या नानांना. बाकीच्यांचे देखील लक्षण मला ठीक दिसत नाही. ती कामाक्षी, तिला पाहिलेस का? कशी घराकडे बघत होती. नक्कीच ती नानांकडे हे घर मागेल बघ. ठाण्याला भाड्याच्या घरात राहण्यापेक्षा ते इथेच येऊन बस्तान मांडतील. त्याआधीच आपण आपली वाटणी घेऊ या. या घरात, गावच्या शेतीत आणि दुकानात सुद्धा. आणि हो, ती गावाकडची चाळ आहे ना, त्यातील काही खोल्यांचं भाडं हे आपल्याला देखील मिळालं पाहिजे. आज रात्रीच वकील येण्याअगोदर हे सगळं तू नानांच्या कानावर घाल. समजलं ना राघव तुला."

खोलीत आल्यावर नीला राघवच्या मागे लागली. राघव मात्र खुर्चीवर बसून विचारमग्न होता. त्याने फक्त मान हलवत होकार दिला. इथे स्वर आणि कामाक्षी मध्ये देखील हेच बोलणे चालू होते. 

" कामाक्षी, तुला काही प्रॉब्लेम नाही ना इथे राहायला? ठाण्याला भाड्याने राहण्यापेक्षा इथे बरं आहे. पुणे देखील खूप हायफाय झाले आहे आता. उद्या आपल्याला मुले होतील त्यांच्यासाठी हे प्लेस एकदम ग्रेट आहे. मी लगेच माझी बदली इथे करून घेतो. आणि घर पण बघ ना किती मोठं आहे. तू तुझा हॅण्डमेड क्राफ्टचा बिझनेस घरातूनच करू शकतेस. त्या बाजूची खोली आहे ना तिथे तुझं ऑफिस करू आपण. काय?" स्वर कामाक्षीला मिठीत घेऊन बेडवर बसला होता. ती देखील हम्म करत त्याच्या बोलण्याला दुजोरा देत होती. 

" हॅलो... हा बोला." रचना तिच्या खोलीत बसली होती की तिच्या नवऱ्याचा म्हणजे अभय रावांचा तिला फोन आला.

" झालं बोलणं नाना सोबत." अभय अगतिकपणे बोलला.

" हम्म... झालं बोलणं. त्यांना म्हणाले मी प्रॉपर्टीचे काय करायचे तो तुमचा प्रश्न आहे फक्त तुम्ही इथून कुठे जाऊ नका. इथेच राहा. तर..." रचना बोलत होती की अभयने तिला टोकले.