ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५
टीम श्रावणी
" असं कशाला म्हणालीस तू प्रॉपर्टीचे काहीपण करा म्हणून. तुला समजत का काही? हे बघ रचना, तुला नको असेल तुझा हिस्सा तर ठीक आहे. पण एक गोष्ट लक्षात घे. आपल्याला दोन मुले आहेत. त्यांना मोठं करायचं आहे आपल्याला. त्यांचे संगोपन करताना किती खर्च होतो हे तुलाही चांगलंच माहित आहे ना. माझ्या प्रायव्हेट जॉबच्या पगारात आपण त्यांच्यासाठी चांगलं असं काहीच करू शकणार नाही. रचना, जरा समजून घे ना गं. जास्त नको परंतु, थोडा तरी हिस्सा घे. प्लिज." अभय तिला विनवणी करू लागला.
टीम श्रावणी
" असं कशाला म्हणालीस तू प्रॉपर्टीचे काहीपण करा म्हणून. तुला समजत का काही? हे बघ रचना, तुला नको असेल तुझा हिस्सा तर ठीक आहे. पण एक गोष्ट लक्षात घे. आपल्याला दोन मुले आहेत. त्यांना मोठं करायचं आहे आपल्याला. त्यांचे संगोपन करताना किती खर्च होतो हे तुलाही चांगलंच माहित आहे ना. माझ्या प्रायव्हेट जॉबच्या पगारात आपण त्यांच्यासाठी चांगलं असं काहीच करू शकणार नाही. रचना, जरा समजून घे ना गं. जास्त नको परंतु, थोडा तरी हिस्सा घे. प्लिज." अभय तिला विनवणी करू लागला.
" बघते. आज रात्री वकील येणार आहेत तेव्हा बघू काय होतंय." रचना एवढं बोलून फोन ठेवून देते.
रात्री सगळे जण डायनिंग टेबलवर जमले होते. नानांनी रखमाला सांगून आज सगळं राजश्रीच्या आवडीचे जेवण बनवायला सांगितले होते. कोणी काहीही न बोलता आपापले वाढून घेत जेवू लागला. नानांनी सगळ्यांकडे पाहत एक उसासा सोडला. त्यांनी देखील गुपचूपपणे दोन घास खाल्ले. जेवण आटोपले तसं पुन्हा एकदा सगळे हॉलमध्ये जमा झाले.
" नाना... मला बोलायचं आहे तुमच्या सोबत. एकांतात..." राघवने सगळ्यांकडे एक नजर टाकत नानांना विनंती केली.
" बरं..." नाना आणि राघव नानांच्या खोलीत आले. तिथे आल्यावर नाना त्यांच्या आराम खुर्चीत बसले. राघव मात्र त्यांच्या समोर अस्वस्थपणे फेऱ्या मारत होता.
" कसं बोलू नाना? हे बघा, प्लिज तुम्ही गैरसमज करून घेऊ नका. पण... माझा नाही तर किमान तुमच्या नातवाचा तरी विचार करा. निरवला खुप शिकवून परदेशात पाठवायचं आहे मला. तुम्हाला नाही वाटत का तुमच्या नातवाने तुमचं नाव भारताबाहेर घेऊन जावं."
" जावं ना... तो मोठा माणूस झाला तर मला अभिमानच होईल त्याचा. परंतु, ते सगळं त्याने त्याच्या स्वतःच्या हिंमतीवर केले तर गर्व वाटेल मला त्याचा. राघवा, तू हे का बोलत आहेस ते येतंय बरं माझ्या लक्षात. पण... आता तुला एवढंच सांगेन, वकील साहेब येईपर्यंत धीर धर जरा." राघव नानांना पटवून देतच होता की नानांनी त्याला थांबवले.
राघव काही न बोलता बाहेर निघून आला. नाना खोलीतच थांबले.
" बघताय का मंडळी. तुमचा लेक आज मला शिकवत आहे. एका शिक्षकाला... बरं झालं आज तुम्ही जिवंत नाही ते. नाहीतर... बघू आता तुमचा दुसरा लेक काय म्हणतोय ते. स्वरsss आत ये जरा." राजश्रीच्या फोटो सोबत बोलून झाल्यावर नानांनी स्वरला हाक मारली.
" काय नाना?" स्वर त्यांच्या समोर येऊन उभा राहिला.
" हम्म... तुला काही बोलायचं आहे का? वकील येण्याअगोदर जे काही मनात असेल ते सांग." नानांनी असं विचारताच स्वर काही क्षण विचार करू लागला.
" माझं असं काही म्हणणं नाही नाना. बस... ते... म्हणजे... नाना आता तुमच्या पासून काय लपवायचं. दादाला चांगली नोकरी आहे. मुंबईमध्ये टू बीएच के फ्लॅट आहे. पण माझं तसं नाही. माझी साधी नोकरी आहे आणि ठाण्यात मी भाड्याने राहतो. जर हे घर... म्हणजे... मी आणि कामाक्षी इथे राहायला आलो तर आमचं देखील सगळं सुरळीत होईल." स्वर अडखळत मनातलं बोलला.
" हम्म... ठीक आहे. जा तू बाहेर आणि रचनाला आतमध्ये पाठवून दे." नानांनी सांगताच तो बाहेर निघून गेला आणि रचनाला आत पाठवून दिले.
" नाना..." राजश्रीच्या फोटोकडे एकटक पाहत असणाऱ्या नानांना रचनाने हाक मारली.
" हा... बोल." नानांनी तिच्या विरुद्ध दिशेला तोंड करून हलकेच डोळ्यांतले अश्रू पुसले.
" काय बोलू मी नाना?" रचना त्यांच्यापासून नजर चोरू लागली.
" जे मनात आहे ते बोल." नाना परत येऊन त्यांच्या आराम खुर्चीत बसले.
" माझ्या मनात... काहीच नाही नाना. असं का विचारत आहात तुम्ही?" रचना गोंधळली.
" रचना, तुझ्या भावांनी ह्या प्रॉपर्टीमध्ये हिस्सा मागितला आहे. तुझं काय मत आहे यावर? तुला देखील हवा आहे का तुझा हिस्सा?" नानांनी तिला थेट प्रश्न विचारला.
" नाना... मला समजत नाही काही. तुम्ही जे योग्य असेल तेच कराल याची खात्री आहे नाना मला." रचना अजूनही त्यांच्या नजरेला नजर देत नव्हती.
" अभय रावांचे काय म्हणणे आहे?" अभयचे नाव ऐकताच रचनाने त्याच्याकडे पाहिले.
" ते... ते..." रचना बोलण्यास कचरू लागली.
" हम्म... समजलं. ठीक आहे. सान्वी कुठे आहे? पाठव तिला देखील आतमध्ये." नानांनी दुसऱ्या दिशेला पाहतच तिला सांगितले.
रचनाने बाहेर जाताना दरवाजात उभं राहून परत एकदा माघारी फिरून नानांना पाहिले. नाना अजूनही राजश्रीच्या फोटोकडे पाहत होते.
" बोला नाना..." सान्वी खोलीत आली तरी तिचे संपूर्ण लक्ष हातातल्या मोबाइलमध्येच होते.
" सान्वी, भविष्याचा काय विचार केलास तू?" नानांनी असं विचारताच तिने त्यांच्याकडे पाहिले.
" सध्या तरी काही नाही नाना. पण... असं का विचारत आहात?" सान्वी बेडवर बसून पाय हलवू लागली.
क्रमशः