Login

निसर्गराजाला प्रेमळ साद

निसर्गाने चुकलेल्या मानवावर माया करावी

प्रिय निसर्गराजा


तू माझ्या ह्रदयाच्या खूप जवळ म्हणजे माझा जीवाभावाचा सखा आहेस. तुझ्या सहवासात मी तहानभूक हरपते. तुझी हिरवाई माझं मन प्रसन्न, ताजंतवानं करतं. तुझ्या खळाळत्या निर्झरातील नितळ पाणी मला सतत कार्यरत राहण्यासाठी ऊर्जा देतं. तुझी आस्मानी निळाई मला सतत शांत राहण्यासाठी प्रेरित करते. कधी तुझी खडबडीत जमीन मला जीवनातील खाच खळग्यांबद्दल सतर्क राहण्याचे सूचित करते. तुझे मोठे वृक्ष छोट्या रोपांना आधार देतात ते बघून मलाही आपल्यापेक्षा लहानग्यांना आधार देण्याची प्रेरणा मिळते. आभाळाला भिडणाऱ्या तुझ्या पर्वतरांगा मला उंच भरारी घेण्यासाठी प्रवृत्त करतात. तुझ्या सान्निध्यात वेळ कसा जातो कळतच नाही. आबालवृद्ध सर्वानाच तू हवाहवासा वाटतो.

तुला माहित आहे लहान असताना मला जंगलाची खूप भीती वाटायची. मोठी लोकं गोष्ट सांगताना नेहमी सांगायचे, " एक जंगल होतं त्या जंगलात वाघ, सिंह, कोल्हा असे सगळे हिंस्त्र प्राणी राहायचे. कोण माणूस दिसला की ते त्याला खाऊन टाकायचे." हे ऐकून मनात एक दहशत बसली होती. त्यात ती चल रे भोपळ्या टुणूक टुणूक ही गोष्ट. त्यातला सुरुवातीचा भाग ऐकताना खूप भीती वाटायची. नंतरचा भाग मात्र मला खूप आवडायचा. एव्हढी म्हातारी आजीबाई पण तिने किती हुशारीने ह्या सगळ्या जंगली प्राण्यांना आपल्या हुशारीने फसवून आपली सुटका करून घेतली.

पूर्वी आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी लाकूडतोड्या किंवा घरच्या सरपणासाठी लाकडं आणण्यासाठी जी लोकं जंगलात यायची त्यांना तू कधीच निराश केलं नाहीस. कारण ती माणसं सच्ची होती, निर्मळ होती. ते त्यांच्या गरजेपुरती लाकडं जंगलातून नेत होती. त्यांनी कधी कसला हव्यास धरला नाही. पण आताची माणसं स्वार्थी झाली आहेत. त्यांना कितीही मिळालं तरी त्यांची हाव संपतच नाही. त्यांचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी ते कोणत्याही मार्गाचा अवलंब करतात.

निसर्गराजा तुझं सगळंच कसं शिस्तशीर असतं नाही. तुझ्या सहा ऋतूंचे सहा सोहळे कसे एका मागोमाग एक क्रमाने येतात. सर्वात पहिला ऋतूंचा राजा वसंत ऋतू. आम्हा सर्वांनाच तोषवणारा हा ऋतू. हिंदू नववर्षाचे आगमन ह्याच ऋतूत होतं. वसंत ऋतूत झाडांना नवीन पालवी फुटत असते. सर्वत्र नवचैतन्य असते. प्रेमिकांना पण आपल्या भावना वसंत ऋतूमध्ये व्यक्त कराव्याशा वाटतात. सर्वत्र हिरवाई दिसत असते.

वसंत ऋतू नंतर ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत आणि शिशिर क्रमाने येतात. ग्रीष्म ऋतूत तापमान वाढलेले असते. त्यानंतर वर्षा ऋतू सर्वांची मने हर्षवणारा आहे. शेतकरी छान पाऊस झाल्यावर आनंदित होतात. शरद ऋतूत सर्वत्र देवीचा उत्सव असतो. नवरात्रोत्सव ह्याच काळात येतो. अतिशय प्रसन्न वातावरण असते. शरद ऋतूत हवामान थंड आणि आल्हाददायक असते. फुलांना बहर येतो. आसमंतात अगणित तारे चमकत असतात. चंद्राच्या चांदण्यांमुळे तीमिर नाहीसा होतो. हेमंत ऋतूमध्ये सर्वत्र शीतल वातावरण असते. शिशिर ऋतू हा अतिशय प्रेमळ ऋतू आहे. ह्या ऋतूत पानगळ होते. ही पानगळ पुन्हा नव्याने पालवी फुटण्यासाठी आवश्यक असते.

निसर्गराजा मला माहित आहे रे की सध्या तू समस्त मानव जातीवर रुष्ट झाला आहेस. अर्थात तुझं नाराज होणं रास्तच आहे. माणूस स्वतःची प्रगती करण्यासाठी खूपच स्वार्थी होत चालला आहे. अनादी काळापासून तू सर्वांनाच मुबलक देत आला आहेस. तुझ्या सहवासात आलेलं कोणीही भुकेलं राहत नव्हतं.

आता सगळीकडे सिमेंट काँक्रीटचे जंगल विस्तारत चाललं आहे. वृक्षांची खुलेआम छाटणी होते आहे.
' वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे ' ह्या संत तुकाराम महाराजांच्या अभंगाचा सर्वांना विसर पडत चाललाय. मोकळ्या जागा बिल्डरच्या घशात जाऊन तेथील डेरेदार वृक्ष मुळापासून उखडून टाकले जात आहेत. त्यांचं मूक आक्रंदन कोणालाही दिसत नाही. रस्ता रुंदीकरणासाठी मध्ये येणारे वर्षानुवर्ष वाटसरूना सावली देणारे वृक्ष निर्दयीपणे कापले जात आहेत. माणूस स्वतःचा वेळ वाचवण्यासाठी, एखाद्या ठिकाणी जलद गतीने पोहोचण्यासाठी डोंगर फोडून रस्ते बनवतो आहे. त्यामुळे त्यांचा पाया डळमळीत होऊन दरडी कोसळण्याचे प्रमाण वाढतंय.काही महाभाग डोंगर खणून त्याच्या मातीची विक्री करत आहेत. इतकेच नाही तर समुद्रात भर टाकून भूभाग वाढवत चाललाय माणूस. तिथे मोठमोठ्या इमारती बांधल्या जात आहेत. माणसाच्या ह्या सर्व चुका अक्षम्य आहेत हे मी जाणते.

तुझा आम्हा सर्वांवर प्रकोप होतो आहे. कुठे अतिवृष्टी होऊन पूरसदृश परिस्थिती उद्भवत आहे. गावंच्या गावं वाहून जाताहेत. कोणी आबालवृद्ध पुराच्या पाण्यात वाहून जाताहेत. आपल्या बळीराजाचे नुकसान होतंय. रस्त्यावर दरडी कोसळून वाहनं त्याखाली येताहेत. गेले काही दिवस तर सगळ्यांचे धाबे दणाणले आहेत. ह्या सगळ्यात निष्पाप जीव आपल्या प्राणांना मुकत आहेत. कधी पर्यावरणाला मारक अशी वृक्षतोड होऊन उंचच उंच इमारती उभारल्या जात आहेत.

हल्ली बळीराजा तुला आळवून थकतो, त्याच्या डोळ्यातील पाणी आटतं पण तुला पाझर फुटत नाही. वर आभाळाकडे करुण नजरेने पाहणाऱ्या शेतकर्याची आर्जवं तुझ्यापर्यंत पोहोचत नाहीत. तेव्हा सगळीकडे दुष्काळाचं साम्राज्य पसरतं. पाण्यासाठी मैलोगणिक पायपीट करणाऱ्या खेडेगावातील स्त्रियांचे कष्ट तुझ्यापर्यंत पोहोचत नाहीत. लहानग्यांच्या डोक्यावरचं छप्पर नाहीस होतंय तर कुठे एखादं लहानगंच नाहीस होतंय. ह्यात सर्वात जास्त भरडला जातोय तो तळागाळातील समाज.

निसर्गाची साद आता माणसाने ऐकली आहे. आता माणूस पर्यावरणाच्या रक्षणासाठी पुढे येत आहे.
' झाडे लावा झाडे जगवा, पर्यावरणाचे रक्षण करा' , ' मुलांना द्या पर्यावरण रक्षणाची शिक्षा हीच आहे आपल्या जीवनाची रक्षा' हे आणि ह्यासारखे विचार आबालवृद्धांवर बिंबवण्यात येत आहेत. सार्वजनिक गणेशोत्सवात पर्यावरण संबंधी देखावे उभारून जनजागृती करण्याचा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर होतोय. निसर्ग आपला कसा मित्र आहे हे सर्व माध्यमातून पटवून देण्याचा प्रयत्न होतोय.

हळूहळू माणसाला आपल्या चुका उमगू लागल्या आहेत. माणसाने त्याची सर्वांगिण प्रगती साधायला तर पाहिजेच. निसर्गराजा माझी तुला कळकळीची विनंती आहे की आता माणूस सुधारतो आहे तर तू पण तुझा राग थोडासा बाजूला सार आणि आपल्या पिल्लांना कवेत घे. मोठ्या मनाने त्यांचे सर्व अपराध पोटात घाल. त्यांना माफ कर. तूच त्यांचा पिता आहेस. तुझ्या कुशीत आम्हा सर्वांना मायेची ऊब दे.


तुझी कृपाभिलाषी


©️®️सीमा गंगाधरे
0