Login

निशाणा तुला दिसला ना अंतिम भाग

एक खुसखुशीत विनोदी गोष्ट

निशाणा तुला दिसला ना अंतिम भाग


संध्याकाळ झाली आणि मस्त चिकन फ्राय आणि रस्सा याचा वास सुटायला सुरुवात झाली. तसे एकेकजण यायला लागले.

"वेताळाला दिल आवताण आन संग मुंज्यांची वरताण."
पार्वती नाक मुरडत म्हणाली.

"अय्या आई एवढे लोक कशासाठी आलेत?"
निशा मस्त आळस देत बाहेर आली.

"चिकन पार्टी करायची होती ना? आता यातील प्रत्येकजण चार भाकरी. खाईल."
सारिका चहाचा कप तिच्या हातात देत म्हणाली.

" पण आपल्या घरीच करणार होतो आपण."
निशा म्हणाली.

"सुनबाई लागा तयारीला. लवकर भाकऱ्या थापा."
सर्जा हसून म्हणाला.


निशाने डोक्याला हात लावला. तिच्या डोळ्यात पाणी आले. इतक्यात पारूच्या मैत्रिणी आत आल्या आणि त्यांनी सगळा स्वयंपाक चालता बोलता उरकला.


पहिल्याच दिवशी आपली झालेली फजिती पाहून निशा जरा घाबरली. तरीही पडले तरी नाक वर हा आपला बाणा काही तिने सोडला नाही.


दुसऱ्या दिवशी सकाळी छान आवरून खाऊन सगळे शेतावर जायला निघाले. सारिकाने एका पिशवीत बरेच साहित्य भरून घेतले होते. निशा मात्र मस्त शेतातली रिल बनवायची स्वप्न बघत तयार झाली.


"वैनी काय भारी दिसती तू. एक नंबर तुझी कंबर."
चिंगी आणि निशा नाचायला लागल्या.

"हे असेल एच आर कंपनी कशी सांभाळत असतील?" सारिकाच्या शिस्तीत भंग पाहून तिच्या कपाळावर आठ्या उमटल्या.

"चिंगे मला सांग तुला शिस्त लावणाऱ्या बाई आवडतात का तुला समजून घेणाऱ्या."

"मला आमच्या शिंदे मॅडम लई आवडतात. आक्षी तुझ्यासाख्या." अशा गप्पा मारत शेत आले.

सारिका आपल्याजवळ असलेली गोष्टीची पुस्तके आणि फराळ बायकांना देत होती. तितक्यात निशा मोठ्याने किंचाळली. सगळ्यांनी तिच्याकडे धाव घेतली.
"सुनबाई काय झालं?"
पार्वती काळजीने म्हणाली.


"मावशी ते बघा."
निशाने बोट दाखवले.
"कुठं? काय हाय?"

"अहो तिकडे बघा पाण्याजवळ काय वळवळत आहे."
तोपर्यंत गोट्याने गांडूळ हातात पकडून आणले.

"वैनी आव गांडुळ हाय ते. तुमास्नी काय वाटलं?"

"गांडुळ दिसतय की मला. त्या पलीकडे काहीतरी होते."
उसने अवसान आणून निशा म्हणाली.


सगळ्या बायका आपापल्या कामाला निघाल्या. तितक्यात निशाची उंच टाचेची चप्पल सटकली आणि निशाने धरणी मातेला आलिंगन दिले.

सारिका हळूच म्हणाली,"देश तसा वेष जुनी माणसं उगाच म्हणत नाहीत."


नंतर मात्र निशा आणि सारिकाने शेतात भरपूर गप्पा मारल्या. तरीही आपण गांडुळ बघून घाबरलो आणि सासूबाई आपल्याला हसल्या हे निशा विसरली नव्हती.


पारू आक्का आणि सारिका गप्पा मारत बसल्या.

"मावशी मी आत जाऊन पडते."

निशा असे म्हणून आत निघून गेली. इन्स्टाग्रामवर आणि फेसबुक वर फोटो पोस्ट करत असताना ती गाणी ऐकत होती.


मस्त अशोक सराफचे गाणे लागले होते. निशाणा तुला दिसला ना... झिरमिर झिरमिर पाऊसधारा.

निशा देखील छान गुणगुणत होती. मधेच फुस्स असा आवाज आला.

निशाने इकडे तिकडे बघितले. आजुबाजूला कोणीच नव्हते. पुन्हा ती गाणे ऐकू लागली. पुन्हा फुस्स फुस्स असा आवाज झाला.

निशाने गाणे बंद केले. आजुबाजूला नीट बघत असताना परत एकदा आवाज आला आणि तिने नीट लक्ष देऊन पाहिले.


"सासूबाई!"
निशा मोठ्याने किंचाळली आणि सारिकाच्या हातातला चहाचा कप खाली पडला.
गरम घोट गिळल्याने भाजलेल्या तोंडाकडे दुर्लक्ष करत सारिका सरळ आत घुसली.

" अगं कुठे आग लागली की काय?"
तितक्यात फुस्स असा आवाज झाला.


"निशा आता कसले आवाज काढू नकोस आणि त्या भिंतीवरून खाली उतर."

तितक्यात परत फुस्स आवाज झाला आणि सारिकाने मागे पाहिले त्यासरशी निशाच्या दुप्पट आवाजात सारिका किंचाळली आणि वाऱ्याच्या वेगाने पडवीत घातलेल्या अर्ध्या भिंतीवर चढली.


तिचा आवाज ऐकून सगळेच धावत आले. तोपर्यंत धप्प आवाज येऊन तो खाली पडला होता.


आता दरवाजा अडवलेला तो. अर्ध्या भिंतीवर चढलेला सासू सुना आणि बाहेर सगळे.

"सर्जा दाजी साप!"
सारिका अत्यंत हळू आवाजात बोलली.

"सासूबाई साप ऐकू शकत नाही. इतकं साध कळत नाही तुम्हाला."
निशा त्याही स्थितीत म्हणाली.


तोपर्यंत साप आत शिरू लागला. आता मात्र निशाने सासूबाईंना घट्ट पकडले.


" वैनी हलू नगा. गप रहा नायतर जनावर बिथरल." चिंगीने बाहेरून सल्ला दिला.

" जनावर? कुठ आहे जनावर?"
निशा आणखी घाबरली.


" बाई गं, सापाला बोलीभाषेत जनावर म्हणतात." सारिका मधली शिक्षिका जागी झाली.


तितक्यात साप पलंगावर चढला आणि ह्या दोघी आणखी घाबरल्या.


निशाने शेजारी सापडलेला पावडरचा डबा. सापाला फेकून मारला पण नेम चुकला आणि सगळीकडे पावडर झाली. साप त्यावर नक्षी काढत फिरायला लागला.


"अगदीच कच्चा आहे तुझा निशाणा."

असे म्हणून सारिकाने जवळ असलेले पातेले फेकले आणि ते नेमके सर्जाच्या कपाळावर.

"दाजी खिडकीत कशाला थांबले तुम्ही?"
सारिका हळूच म्हणाली.


ह्या गोंधळात शिरपा सर्पमित्र घेऊन आला. त्याने धामण पकडली.

"धामण आहे. विषारी नसते ती."

"हो का? तिच्या कपाळावर लिहिल आहे का?"

निशाने खाली उडी मारली. सारिका देखील मोठ्या प्रयत्नांनी खाली उतरली.


तितक्यात निशाला राघवने व्हिडिओ पाठवलेला दिसला. दोघी सासू सुना सापाला वस्तू फेकून मारत होत्या आणि गाणे वाजत होते. निशाणा तुला दिसला ना.


" काय वैनी कसा हाय व्हिडीओ. निशाणा तुला दिसला ना....."

चिंगी नाचतच बाहेर गेली आणि ह्या दोघींनी कपाळावर हात मारला.


कथा मनोरंजन म्हणून लिहिली आहे. तोच हेतू ठेवून वाचावी.
0

🎭 Series Post

View all