Login

निशाणा तुला दिसला ना भाग 1

एक खुसखुशीत विनोदी गोष्ट

"निशा! निशा! आवर लवकर तुम्हाला सोडून परत यायचं आहे मला."
घड्याळात बघत राघव मोठ्याने ओरडला.

"इतकी काय घाई रे,आता तिकडे आठ दहा दिवस राहायचे आहे. सगळे नीट न्यायला नको.मला ओरडतोस तिकडे आईंचे आवरले का बघ?"
बाण अचूक लागल्याने राघव गप्प बसला.

" सारिका, किती ह्या पिशव्या? कायमची नाही जात आहेस तू? आवर लवकर. राघव केव्हाचा तयार आहे."

मनोज कुरकुर करू लागला.

" गप्प बसा हो, एकतर किती वर्षांनी चालले मी पारू आक्काकडे. तिकडे तुमच्या लाडक्या सुनेच आवरलं का बघा." मनोज बिचारा तोंडाला कुलूप लावून बाहेर पडला.


तर ही आपली सासू सुन जोडी आठ दिवस गावाकडे निघाली होती. सारिकाच्या मावस बहिणीच्या गावाला यात्रा होती म्हणून. निशा लहानपणापासून मुंबईत वाढलेली त्यामुळे गावी जायचे ह्या कल्पनेनेच तिच्यातली कविता ओसंडून वहात होती.

राघव आणि त्याचे बाबा आठ दिवसांनी यात्रेच्या दिवशी येणार होते. तसेही हे दोघे नसल्याने निवांतपणा असणार होता.


निशा कशीबशी साडी नेसून आणि चार बॅग घेऊन बाहेर आली.
"निशा? चक्क साडी?"
राघव किंचाळत म्हणाला.

"हो, आज नेसावी म्हंटले साडी. नाहीतरी लोकांना वाटतच मी आपली अर्ध्या कपड्यात फिरते..."

पुढचे वाक्य सासूबाईंना बघून तिने मनातच गिळले.

चक्क छानसा कॉटन ड्रेस घालून सारिका तयार होती. अखेरीस एकदाचे ह्या दोघींना गाडीत कोंबून राघवने मनातच हुश्श केले.


"खेड्यामधले घर कौलारू घर कौलारू."
सारिका सहज गुणगुणत होती.

"हे कोल आरु कोण आहेत?"
निशाने प्रश्न विचारताच सारिका खो खो हसत सुटली.

"अगं ते कौलारू आहे. मॉम वरून आईवर आणायला वर्ष गेले माझे."

"चहा! चहा घेऊया का आपण."
राघवने पुढील अनर्थ ओळखून गाडी एका हॉटेलात घेतली.


"राघव प्लीज गाडी आणखी पुढे घे ना."
निशाने लाडिक आवाजात विनंती केली.

"घे बाबा, नाहीतर साडीत पाय अडकून पडायची."
सारिका उतरताना बोललीच.

" बघितलं कशा बोलतात. ह्या म्हणे मुलांच्या लाडक्या शिक्षिका."
निशा फणफण करत खाली उतरली.

"मावशीच्या गावी पोहोचायला दोन तास लागतील तर खाऊन घ्या इथेच काहीतरी."
असे फर्मान आल्यावर दोघीही खाली उतरल्या.

हॅशटॅग वापरून सेल्फी काढून झाले आणि पुढचा प्रवास सुरू झाला.


जवळपास चार तासांनी मौजे येडे पिंपळगाव बोर्ड दिसला आणि राघवचा जीव भांड्यात पडला.
"हुश्श पोचलो एकदाचे."

तितक्यात मागून जोरात हाक ऐकू आली.

"सारिका, अय सारिका."
"अय्या, सर्जा दाजी तुम्ही? आम्हाला घ्यायला आला होय?"
" हाय का आता? मेव्हणी येणार मंजी कवतिक नग व्हय. बारक्या गाडी माझ्या मागन आण."
असे म्हणताच राघव चिडला.
" काका, बारक्या काय? "
"बारक्या नायतर काय? ते दंड बघ? "
तितक्यात निशाकडे बघून सर्जा जीभ चावून पुढे झाला.

"बघ राघव, मी म्हणत होते थोडे वेट गेन कर. पप्पा हेल्दी आणि तू..."
सारिकाचा लालबुंद चेहरा बघून निशाने शब्द गिळले.

तितक्यात पोचल्याचा इशारा सर्जाने दिला.

"मम्मे, निशा वहिनी आली बघ."
चिंगी पळतच बाहेर आली.
"चिंगी तुला ओळखते?"
सारिकाने विचारले.
"अर्थात,मला फॉलो करते ती इन्स्टाग्रामवर."
खाली उतरत निशाने उत्तर दिले.

"वैनी थांब,आपला कोलॅब व्हिडिओ करायचा हाय."
निशाला अडवत चिंगी थांबली.

"चिंगे व्हय बाजूला. मावशीच्या हातातल्या पिशव्या घे." पार्वती हात धुवत बाहेर आली.


पाय आपटत चिंगी आत गेली. निशा डोक्यावर पदर घेऊन खाली वाकायला गेली तितक्यात तिच्या डोक्यावर टोची मारून एक कोंबडा पसार झाला.

"बया, सारिका आग लाल साडी घालू नका सांगितल व्हत म्या." पार्वती हात ओवाळून म्हणाली.

"अस कसं आक्का, गावाची रीत नको का पाळायला."
एवढे म्हणेपर्यंत कोंबडा परत आला आणि निशा आत पळून गेली.

पुढच्या दोन मिनिटात आपल्या नेहमीच्या अवतारात ती हजर झाली. राघव त्यांचा निरोप घेऊन निघून गेला.


"पारू मावशी,आज मस्त चिकन फ्राय करू. तो कोंबडा कुठे आहे?"
निशा म्हणाली.

"सूनबाई त्यो नवसाचा हाय. त्यो सोडून दुसरा कोणताबी घ्या कोंबडा."
पारू समजावत म्हणाली.

"मावशी, माझी खूप ईच्छा होती असा लाल कोंबडा खायची." "पारू आक्का,त्यापेक्षा आपण मस्त पिठलं भाकरी खाऊ."
सारिका असे सुचवू लागताच सर्जा आत आला.

" ते काय नाय, सुनबाई कोंबडा म्या आणतो." निशा हळूच हसली. सारिका मात्र चिडून चहा पिऊ लागली.


ह्या सासू सुनांची पुढे काय धम्माल होणार?
वाचत रहा.
निशाणा तुला दिसला ना.

0

🎭 Series Post

View all