एखादी व्यक्ती आपल्याला दिसायला आवडणार नाही, एखादा प्राणी ओंगळवाणा वाटू शकतो पण एखाद फूल कुरुप वाटल अस कधी होत नाही किंवा आवडल नाही अस होत नाही.
फुलं तर सगळीच आवडतात. आता एकच कस सांगाव? साधेपणा जपणारा प्राजक्त, मन मोहीत करणारा गावठी गुलाब, धुंद करणारी रातराणी, मनभर बहरणारा मोगरा, सुगंधाची कोमल उधळण करणारी जाई-जुई, चमेली हे सगळेच जिवाभावाचे सोबती.
यांच्या बरोबरीनेच आणखी कुणी आहे ज्याचा अनमोल गंध श्वासात,मनात हलकेच डोकावून मनाला उभारी देतो तो आहे आवडता गंधराज *निशिगंध*. रजनीगंधा, गुलछडी.
त्याच फुल शुभ्र, शुचितेची कांती असलेल, ताठा नसलेल तरी डौलदार, नितळ देखण रुप. सुगंध तर तनामनाला वेढून टाकणारा.
मला स्वतः ला फुलांच आणि घरात जागोजागी त्यांची पखरण करण्याच वेड. त्यात निशिगंधाचा कायम वरचा नंबर. माझ लग्न झाल्यापासून दिल्लीला येई पर्यत कायम आमच्या घरात निशिगंधाचे छडे असायचेच. दिल्लीत आल्यावरही मी प्रयत्न केला पण इथे मिळणारे छडे शिळे असतात, टिकत नाहीत हा माझा अनुभव.
घरी कुणी येणार कळल्यावर माझ लक्ष आधी घरात फुल लावलेली आहेत ना याकडे नाहीतर मग धावाधाव आणि आणण्यासाठी आटापिटा. घरी येणाऱ्याला निशिगंधाचा गंध हलकेच जवळ करतो,आपलेपणाची जवळीक देतो. घरात निशिगंध ठेवला की त्याचा गंध वा-याच्या झुळूकीवर अलगद स्वार होऊन नाकाशी सलगी करत स्वतःच्या अस्तित्वाची हलकेच जाणीव करुन देतो. भसकन अंगावर येत नाही हा सुगंध. मग हा सुवास असा भिनतो की दिवसभर तो आपली साथ देत रहातो आपल्या मागे रेंगाळत. अशा गंधलावण्याने वेढलेल, नटलेल घर मला फार आवडत, आश्वस्त करत.
सुगंध आणि आठवणी यांचा तर जणू मेळच आहे मनाला ताजेतवाने करण्याचा. माझ्या पण आहेत दोन सुगंधी त आठवणी निशिगंधाच्या.
माझी निशिगंधावरची ही आसक्ती बघून माझ्या नव-याने लग्न झाल्यानंतर काही दिवसातच निशिगंधाच्या फुलांच खूप सुंदर painting करुन लावल होत. या लहानशा कृत्याने आणि माझ्या निशिगंधाच्या वेडाला अशी दाद मिळाल्याने माझ जगण अधिकच सुंदर होत गेल.
दुसरी आठवण म्हणजे आमच्या आईंनी टेरेसवर निशिगंध फुलवला होता. मी त्याचा कंद आणून कुंडीत लावला. काही दिवसातच आमच्या आई गेल्या. मला बरे वाटेना. मी तो कंद खाली आंगणात विहिरीपाशी लावला. तो मस्त वाढला. अजुनही तो सुगंध पसरवत आपल अस्तित्व टिकवून आहे, माझ्या मनात पण.
*रजनीगंधा फुल तुम्हारे*
*युँही महके जीवन मे*
फेसबुकवरील सर्व ब्लॉग लिंक ओपन होण्यासाठी, आपल्या आवडत्या लेखकाला पाठिंबा देण्यासाठी आणि वाचन अखंड सुरू ठेवण्यासाठी आजच सबस्क्रिप्शन घ्या
Subscription Plan
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा