Login

निष्काळजी- भाग 1

मराठी कथा
"इथे मी 'आपला' संसार उभा करायचा प्रयत्न करतेय आणि तू आई बाबांच्या घरातून अजूनही बाहेर येतच नाहीयेस?"

समीरने ऐकून न ऐकल्यासारखं केलं, पण निशाने यावेळी ताणून धरलं, खोलीकडे जात असणाऱ्या समीरला तिने अडवलं आणि जाब विचारला,

"मला उत्तर हवं आहे, मी एकटीनेच हा संसाराचा गाडा ओढायचा आहे का? तसं असेल तर सांग.."

"काय कटकट आहे यार तुझी, एक दिवस आईकडे गेलो तर इतकं झोंबतय तुला..तू तर..."

"मी तर काय? मी आठवड्यातून चार वेळा माहेरी जाते? अहो वर्षभरात चार दिवसही माहेरी गेलेलं आठवत नाही.."

चुकून तोंडातून सुटलेले शब्द समीरच्याच अंगावर पडले आणि त्याने जीभ चावली, तो हसू लागला,

त्याला असं हसताना बघून निशाचा पारा अजूनच चढला. निशा आणि समीर नवीन घरात राहायला आल्यापासून हेच सुरू होतं. समीरला ऑफिसला जायला यायला घरापासून अंतर खूप पडायचं आणि सियाची शाळाही दूर होती, त्यामुळे मध्यवर्ती अश्या ठिकाणी दोघांनी घर घेतलं, हा निर्णय खरं तर समीरच्या वडिलांनीच आग्रह करून घ्यायला लावला. समीर आणि त्याच्या आईला हे पटलं नव्हतं, पण वडिलांचा वचक असल्याने त्यांना ऐकावं लागलं. समीरचे वडील कडक शिस्तीचे, समीरला सगळं आयतं न मिळता त्याने सगळं शून्यातून मिळवावं हा वडिलांचा हेतू होता. घर घेण्यासाठी त्यांनी पैसे न देता समीरला लोन काढायला लावलं, त्या निमित्ताने समीर नोकरीवर टिकून राहील आणि पैशाची किंमत त्याला कळेल हे वडिलांनी हेरलं होतं.

पण नव्या घरात येऊनही समीरचं मन त्याच्या गावच्या घरातच लागून असायचं. संधी मिळाली की सतत गावी जायचा, वडिलांनी त्याला असं बघून चांगलीच ताकीद दिली होती, तेव्हापासून वडील घरी नसले की तेव्हाच आईला फोन करून तो जात असे. घरी गेला की आई सगळं आयतं हातात देई, चमचमीत खायला करून देई, अंगावर कोणतेही कामं पडत नसत...तेच तर त्याला हवं असायचं..

निशाला तिच्या नव्या घराला सजवायचं होतं, घराची नीट व्यवस्था लावून द्यायची होती पण समीरची तिला यापैकी कशातच मदत मिळत नसे. अगदी बाजारात जाऊन वस्तू आणण्यापर्यंत ते बिल भरण्यापर्यंत सगळं तिला करावं लागे. घरात काय सुरू आहे समीरला माहितही नसायचं. त्याची आईसुद्धा त्याला याबद्दल सांगायची नाही, तिला तर चांगलंच होतं.. मुलगा स्वतःहून त्याच्या बायकोमागे न लागता आपल्याकडे येतो म्हणून..पण दुसऱ्या दिवशी जे घडलं त्यानंतर समीरचा चेहरा पांढराफटक पडला..त्याचा हा स्वभाव त्याच्या असा अंगाशी आला की त्याला आयुष्यभराची अद्दल घडली.

क्रमशः
0

🎭 Series Post

View all