Login

नि: संग भाग १

Detached Life
नि:संग
भाग १

©® सौ.हेमा पाटील.

लग्नाच्या पस्तिसाव्या वाढदिवसानिमित्त मुलांनी जंगी कार्यक्रम आयोजित केला होता. दोन्ही मुले गुणी होती. आपापल्या संसारात रमली होती. सुमेध आणि सुनिता दोघे आता रिटायर्ड झाले होते. त्याचे औचित्य साधून मुलांनी हा लग्नाचा वाढदिवस आयोजित केला होता. त्या दोघांची मित्रमंडळी, नातेवाईक जमले होते. हाॅटेल बुक केले होते. त्या कार्यक्रमात सुमेध आपल्या सुखी संसाराचे अनुभव अगदी भावनिक होऊन सांगत होता. शेजारीच त्याची सहधर्मचारिणी सुनिता खुर्चीवर बसली होती. सुमेधचे बोलणे ऐकता ऐकता ती भूतकाळातील स्मृतींमध्ये कधी ओढली गेली हे तिचे तिलाच समजले नाही.

मुले लहान असतानाची गोष्ट तिला आठवली. काही काही घटना मनावर अगदी कोरल्या जातात. त्यातलीच ही एक...सुनिता किचनमध्ये स्वयंपाक करत होती. रोजच्या सारखी सकाळची डब्याची गडबड सुरू होती. भाजी फोडणीला टाकून झाली होती. एकीकडे चहा ठेवला होता. पोळ्या लाटायला सुरुवात केली होती. गॅसवर तवा तापायला ठेवला आहे हे ती विसरली अन् तिने हाताने तवा उचलला. दोन तीन क्षण हातांना जाणीव झाली नाही. जेव्हा झाली तेव्हा मेंदूने दिलेल्या आज्ञेनुसार तवा हातातून खाली टाकला गेला. जोरात आवाज झाला. तो ऐकून सुमेध किचनमध्ये आला.
"काय पडले?" सुमेधने विचारले.
तिची बोटे गरम तवा पकडल्यामुळे पोळली होती. त्यामुळे तिने नळाच्या थंड पाण्याखाली हात धरला होता. सुमेधने पाहिले, तवा किचनकट्ट्यावर होता. गॅस चालूच होता. तिच्याकडे रागाने कटाक्ष टाकत सुमेधने आधी गॅस बंद केला. मग तिच्याकडे वळत तो म्हणाला,
"किती वेळा सांगितले आहे की, गॅस जपून वापरत जा."
काय बोलणार यावर...तिने पाण्याचा नळ बंद केला व पक्कडने तवा उचलून गॅसवर ठेवत तिने पोळ्या करण्यासाठी गोळे तयार करायला घेतले. खाली मान घालून ती पोळ्या लाटू लागली. तिच्या पोळलेल्या बोटांची आग होत होती. तिथे लाटण्याचा स्पर्श झाला की खूप दुखत होते. त्यामुळे तिचा पोळी लाटण्याचा वेग जरा मंदावला.
"आई, झाला का डबा?" अशी रोहनची हाक आली आणि "दोनच मिनिटे" असे म्हणत तिने हातांना वेग दिला. मुलाला उशीर होत आहे या भावनेने तिचे हात वेगाने फिरु लागले.
सगळ्यांचे डबे भरुन झाल्यावर तिने किचन कट्टा आवरला व आपला डबा घेऊन ती बेडरुममध्ये आली. पटकन आवरुन तिलाही निघायचे होते. नऊ सव्वीसची फास्ट लोकल चुकली तर नऊ छत्तीसची स्लो लोकल पकडावी लागेल. मग उतरल्यावर वेळेत शेअर रिक्षा मिळाली नाही तर लेटमार्क ठरलेलाच ! त्यामुळे तिने पटकन अंगावर ड्रेस चढवला. पर्समध्ये डबा कोंबून केस सारखे करुन ती बाहेर पडली.

ट्रेनमध्ये आज कधी नव्हे ते जागा मिळाली होती. बसल्यावर तिचे लक्ष बोटांकडे गेले. तिथे दोन टळटळीत फोड आले होते. पाण्याखाली लगेच हात धरला म्हणून बरे झाले असा विचार तिच्या मनात आला.