Login

नि:संग भाग २

Detached life

नि:संग भाग २

©® सौ.हेमा पाटील.

ट्रेनमध्ये आज कधी नव्हे ते जागा मिळाली होती. बसल्यावर तिचे लक्ष बोटांकडे गेले. तिथे दोन टळटळीत फोड आले होते. पाण्याखाली लगेच हात धरला म्हणून बरे झाले असा विचार तिच्या मनात आला.

सुमेध आत आला होता तेव्हा तिच्या मनात आले होते,
आता हा विचारेल " काय झाले?"
त्याने विचारलेही होते, पण गॅस चालू बघून तो चिडला व गॅस बंद करुन तिला रागावून बाहेर निघून गेला. ती नोकरी करत असली तरी गृहिणी ही होती. घरात काटकसर करायची तिला सवय होती. मगाशी गरम तवा चुकून उचलला गेला त्यामुळे पोळलेली बोटे पाण्याखाली धरण्यासाठी ती गेली. गॅस बंद करावा हे तिच्या लक्षात आले नाही. सुमेधने तिच्याकडे टाकलेला कटाक्ष आणि तिखट स्वरांत उच्चारलेले ते वाक्य तिच्या काळजाला घरे पाडून गेले. माझ्या हाताला भाजलेय याकडे याचे अजिबात लक्ष गेले नाही, गॅस चालू आहे इकडे मात्र लक्ष गेले. हातापेक्षा मनाला झालेल्या वेदना जास्त तीव्र होत्या...
या आठवणीला जोडूनच दुसरी आठवण झाली. तसे बघितले तर दोन्ही घटनांचा एकमेकींशी अजिबात संबंध नव्हता, तरीही दोन्ही गोष्टी एकमेकींशी निगडित होत्या.
नवीन लग्न झाले होते तेव्हा साडी नेसताना पदराला पीन करताना पीनेचे टोक तिच्या बोटात घुसले होते. ती "आई गं" असे म्हणाली. ते ऐकून सुमेध म्हणाला," काय झाले?"
तिने आपले बोट त्याच्यासमोर धरले. बोटाच्या टोकावर एक रक्ताचा थेंब दिसत होता. सुमेधने ते बोट पटकन आपल्या तोंडात घातले.
"जरा जपून काम करत जा. रक्त आले ना बोटातून..." असे तो म्हणाला.
"अरे, टोचते असे कधीकधी. त्यात काय एवढे?" ती म्हणाली.
"नाही. मला चालणार नाही. जपून करत जा. तुला टाचणी जरी टोचली तरी माझ्या हृदयात कालवाकालव होते."
असे म्हणणाऱ्या सुमेधला आज मात्र फक्त गॅस चालू असलेला दिसला. माझ्या पोळलेल्या बोटांची त्याने दखल सुद्धा घेतली नाही.

माणसे इतकी बदलतात? असा विचार तिच्या मनात आला होता. प्रेम म्हणजे नक्की काय असते? तेव्हा माझ्या बोटाला टोचलेली टाचणी याला सहन होत नव्हती, अन् आज? शारिरीक आकर्षणाभोवतीच माणसाचे मन फिरत असते का?
लग्नानंतर पुरुषांच्या दिनचर्येत फारसा फरक पडत नाही, पण स्त्रीचे सगळे आयुष्यच बदलून जाते. नवरा, घर, नोकरी, मुले या चक्रात फिरताना तिला दिवस उगवतो कधी अन् मावळतो कधी हे जाणवत नाही. त्याच्या अपेक्षेप्रमाणे तिने त्याला प्रतिसाद द्यावा अशी त्याची इच्छा असते. ती मात्र दमून गेलेली असते. पुरुष नराच्या भूमिकेत असतो, पण स्त्रीला नेहमी मादीच्या भूमिकेत वावरता येत नाही. आईच्या भूमिकेतून यु टर्न घेऊन लगेच मादीच्या भूमिकेत शिरणे तिला जमत नाही. हे सुमेधच्या का बरं लक्षात येत नाही असे तिला वाटले होते.
क्रमशः
©® सौ.हेमा पाटील.

🎭 Series Post

View all