निवड
©® सौ. हेमा पाटील.
तर ही गोष्ट आहे मैत्रिणींची! या मैत्रिणी फिरायला कोकणात गेल्या होत्या. अगदी तरुण नाही, अन् वयस्कर ही नाही अशा चाळीशीत पोहोचलेल्या. संसारात गुलाबजामसारख्या मुरलेल्या, पण चार दिवस स्वतःसाठी जगावे म्हणून ठरवून सगळ्याजणींनी हा बेत केलेला.
राहण्याची व्यवस्था एका घरीच केली होती. हाॅटेलिंग नको अशी सगळ्यांचीच इच्छा होती. संध्याकाळी पोहोचल्यावर चहा आणि गरमागरम भजीच्या प्लेट्स समोर आल्या तेव्हा सगळ्याजणी एकदम खुश झाल्या. भजीवर ताव मारुन, चहा पिऊन त्या समुद्रकिनारी गेल्या. मस्तपैकी पाण्यात डुंबून मजामस्ती करत त्यांनी बराचवेळ घालवला.
परत आल्यावर सुरमई, कोळंबी आणि तांदळाची मऊ लुसलुशीत भाकरी असलेली ताटे समोर आली. त्यावर मनसोक्त ताव मारला आणि या सख्यांची अंगणात मैफील बसली. अंधार पसरला होता. नुकतीच पोर्णिमा होऊन गेली होती. वर आकाशात चंद्र मध्यावर आला होता. त्याच्या शीतल प्रकाशात गप्पा रंगल्या.
हळूहळू गप्पा काॅलेजजीवनाकडे सरकल्या. रश्मीने तेजुला विचारले,
"विशाल कुठे असतो गं आता?" तेजु एकदम गोरीमोरी झाली.
"मला कसे माहीत असणार? तो तर काॅलेजच्या शेवटच्या दिवशी गेला, त्यानंतर परत कधीही भेटला नाही मला." तेजु म्हणाली. तिच्या डोळ्यांत वेदना दिसली, त्यामुळे रश्मीने विषय वाढवला नाही.
पुन्हा त्यांच्या गप्पा रंगल्या, पण तेजु मात्र गप्पच झाली, जणूकाही ती तिथे फक्त शरीरानेच उपस्थित आहे, तिचे मन मात्र कुठेतरी भलतीकडेच आहे असे वाटत होते. मैत्रिणींच्या कंपूने मग गप्पा आवरत्या घेतल्या व त्या झोपायला आल्या.
"मुलींनो, दार नीट लावून घ्या हो. नाहीतर पाहुणा शिरायचा घरात." घरमालकीण बाईंनी सांगितले.
"कोण पाहुणा? इथे चोऱ्या होतात का?" विद्याने विचारले.
"साप किरडू हो." घरमालकीण बाई म्हणाल्या. ते ऐकून मुलींना वाटले,
"एवढा घरात शिरतोय होय साप! गरम तर मरणाचे होतेय, दार उघडे ठेवूया. कुठला येतोय साप?" वर्षा म्हणाली.
"बघा बाई, शिरला तर व्हायची आपली फजिती." तेजु म्हणाली.
"तू अजूनही भित्री भागुबाईच आहेस ना! आपल्या सगळ्याजणींचे घोरणे ऐकून तो बेजार होऊन परत निघून जाईल. बघ, मी खात्रीने सांगते. " वीणा म्हणाली.
"ओके. मी आपली झोपते. तुम्हाला काय करायचेय ते करा." असे म्हणत तेजुने अंगावरची चादर डोक्यापर्यंत ओढून घेतली. बाकीच्या सगळ्या प्रवासाने कंटाळलेल्या होत्या, त्यामुळे पुढच्या पंधरा मिनिटांत त्या डाराडूर झोपल्या. खोलीचे मागचे दार वारा आला की करकर वाजत होते. आसमंतात भरुन राहिलेली शांतता, अन् त्या पार्श्वभूमीवर हा दाराचा आवाज अस्वस्थ करत होता, पण ती अस्वस्थता जाणून घ्यायला तिच्याशिवाय कुणीच जागेच नव्हते.
मगाशी रश्मीने विशालचा विषय काढला, त्यामुळे ती अस्वस्थ झाली होती. विशालसोबतच्या कितीतरी आठवणी तिच्याभोवती फेर धरून नाचू लागल्या. काॅलेजमध्ये असताना ब्युटी क्वीन असे तिचे टोपणनाव पडले होते. ती होतीच तशी देखणी! गोरापान रंग,उंच, सडसडीत पण आकर्षक बांधा, चाफेकळी नाक, केसांची वेणी पाठीवर नितंबापर्यंत डोलायची. तिच्या काळ्याभोर टपोऱ्या डोळ्यांकडे पाहिले की, कुणाचीही नजर तिथेच गुंतून पडायची.
अशी ही तेजु उर्फ तेजस्विनी मात्र विशालवर लट्टू झाली होती. त्याच दरम्यान 'एक दुजे के लिये' हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. तरुणाई हा सिनेमा पाहून वेडावली होती. तेजुही याला अपवाद नव्हती. ती विशालच्या प्रेमात आकंठ बुडाली होती. विशालची अवस्था ही वेगळी नव्हती, पण त्याला परिस्थितीचे भान होते. प्रेमात वाहवत जाणे त्याला मंजूर नव्हते. आधी शिक्षण पूर्ण करायचे, मग स्वतःच्या पायावर उभे राहायचे. त्यानंतर एकमेकांच्या घरी सांगून लग्न करायचे असे त्याचे ठरले होते.
काॅलेजच्या शेवटच्या दिवशी विशालने तिचा निरोप घेतला. लवकरच कायमचे सोबत राहण्यासाठी हा दुरावा सहन केला पाहिजे अशी तेजुची समजूत घालून तो शहरात जातो असे सांगून गेला. ती त्याची वाट पाहत राहिली. त्यानंतर तो परत आलाच नाही. तिने जंग जंग पछाडले, पण त्याचा कुठेही पत्ता लागला नाही. लग्नाला किती दिवस नकार देणार? पटेल असे कोणते कारण सांगायचे? अशा अडचणीत ती सापडली. शेवटी तीन वर्षांनंतर तिने नाईलाजाने लग्नाला होकार दिला होता. आज रश्मीच्या प्रश्नामुळे खोलवर मुजलेल्या जखमा ओल्या झाल्या. अशातच कधीतरी तिचा डुलका लागला.
अचानक तेजुला जाग आली. आपण गाढ झोपलो होतो. कुणीतरी जोरजोराने हलवले असा भास झाल्याने ती जागी झाली होती. ती दचकून अंथरुणावर उठून बसली, मात्र समोरचे दृश्य दिसताच तिची भीतीने बोबडी वळली. तिने डोक्यापर्यंत घेतलेली चादर अंगावरून दूर सारून ती उठणार होती, तेवढ्यात तिला तिच्यासमोर अंथरुणात फडा काढून बसलेला काळाकभिन्न नाग दिसला. तिने घाबरून आपली मान एकदा उजवीकडे एकदा डावीकडे वळवली. त्याबरोबर त्या नागाने ही तीच कृती केली. आता तिला घाम फुटला.
शेजारी झोपलेल्या कुणाला हाक मारावी तर हालचालीमुळे नागाने दंश केला तर? ही भीती वाटली. जेव्हा असे आकस्मिक संकट येते तेव्हा त्यावर मात करण्याची बुद्धी चटकन झाली तर संकटातून सही सलामत सुटका होते ही. तशीच तेजुला बुध्दी झाली.
तिने डोळ्यांचे पाते लवण्याच्या आत पटकन अंगावरची चादर त्या नागाच्या डोलणाऱ्या फण्यावर टाकली व ती तेथून दूर पळाली. दार उघडून ती बाहेर आली. बाकीच्या झोपलेल्या मैत्रिणींना नागाबाबत सांगावे असे तिला सुचले नाही. ती स्वतःच खूप भेदरलेली होती.
मगाशी समुद्रावर जाण्यापूर्वी तिने घराच्या कोपऱ्यावर असलेले दत्ताचे मंदिर पाहिले होते. आत्ता ती धावतच त्या मंदिरात गेली. तिचा ऊर धपापत होता. तिथे जाऊन ती शांत बसली. आजचा दिवसच बेकार आहे असे तिला वाटले. आधी रश्मीने विशालची आठवण काढल्याने जखमेवरची खपली निघाली, त्यात भित्यापाठी ब्रह्मराक्षस म्हणून तो नाग नेमका आपल्याच पुढ्यात आला असा विचार ती करत असतानाच तिला कुणाची तरी चाहूल लागली आणि ती प्रचंड घाबरली.
क्रमशः ©® सौ. हेमा पाटील.
मध्यरात्री कोण आले असेल तिथे? तेजु संकटात सापडली आहे का? हे जाणून घेण्यासाठी पुढील भाग वाचा.
Download the app
आता वाचा ईराच्या कथा सोप्या पद्धतीने, आजच ईरा app इंस्टॉल करा