ईरा चॅम्पियन ट्रॉफी २०२५
द्वितीय फेरी:- लघू कथा
टीम श्रावणी
लेखन:- कृतिका कांबळे
द्वितीय फेरी:- लघू कथा
टीम श्रावणी
लेखन:- कृतिका कांबळे
" आईss नको उठवूस तिला. झोपू दे. किती तरी दिवसांनी तिला अशी शांत झोप लागली आहे. नेहमी रात्री झोपेत तिला त्रास व्हायचा. सारखी रडत बसायची रात्र रात्रभर. झोपू दे तिला." विहान एका कोपऱ्यात गुडघे पोटाशी धरून बसला होता.
" विहान... काय बोलतोयस बाळा तू? अरे... अवनी... ती... झोपली नाही रे. ती आपल्याला सोडून गेली." विहानची आई समीरा नाईक रडत त्याच्या जवळ येऊन बसल्या.
" काही काय बोलतेस तू आई? अवनी झोपली आहे. कालच मला बोलत होती ती... विहान, लवकरच आपण फिरायला जाऊ या. आता मी निवांत झाले. मुले मोठी झालीत. त्यांचे ते बघायला शिकलीत. आता माझा संपूर्ण वेळ फक्त तुझाच असेल. फक्त आजची रात्र मला निवांत झोपू दे. असंच म्हणाली होती ती मला. झोपू दे अजून थोडा वेळ तिला. ती उठली की आम्ही दोघे फिरायला जाऊ. तुला माहितेय का आई, या दिवसाची वाट मी आणि ती कितीतरी वर्षे झाले पाहत होतो. लग्न झाले त्यानंतर लगेच ध्रुव झाला. पहिला मुलगा म्हणून त्याच करण्यातच अवनीचा सगळा वेळ जायचा. आई म्हणून कुठेच कमी पडायचं नव्हते तिला. त्याचं झालं की माझं, माझं झालं की तुमचं... सगळ्या घराची जबाबदारी तिने स्वतःच्या खांद्यावर घेतली. ध्रुव थोडा मोठा झाला की आपण सगळे अजून एका बाळासाठी तिच्या मागे लागलो. आणि मग काय... झाली अजून एक मुलगी. अक्षराच्या मागे तर पळताना तिला दिवस देखील कमी पडू लागला होता. त्यात तिचे स्वतःचे दुखणे, तिचा त्रास, तिचे आजार याकडे नेहमीच ती दुर्लक्ष करत होती आणि आपण ती करते ना सगळी कामे व्यवस्थित मग ती चांगलीच असेल हा विचार करून आपआपल्या कामात व्यस्त झालो." विहान रडत अवनीच्या निपचित पडलेल्या देहाकडे पाहत होता.
" तसंच होतं रे बाळा. बाईचा जन्मचं मुळात खूप घाईचा असतो. बालपण लगेच सरते, तारुण्य येण्याआधीच जबाबदारी अंगावर येऊन पडते. जबाबदारी घराची, जबाबदारी घराण्यांची मान मर्यादा जपण्याची, त्यानंतर लग्न, मुले, संसार, सासरची माणसे, नातेवाईक, पाहुणे, सगळ्यांचे सगळे करत कर्तव्यदक्ष गृहिणीची जबाबदारी पार पाडताना स्वतःला नेहमीच दुय्यम स्थान प्रत्येक बाईने दिले. विहान बाळा, आपली अवनी एक चांगली बायकोच नाही तर एक चांगली सून, एक चांगली आई देखील होती रे... तिने खूप काही केले आपल्या सगळ्यांसाठी." समीरा त्याला आधार देत होत्या.
अवनीच्या आठवणीने त्यांचा देखील कंठ दाटून आला होता. अवनी जेव्हा पहिल्यांदा त्यांच्या घरी आली तेव्हापासूनच ती समीरा यांना आई सारखीच जपत होती. कधी भांडणं नाही की कधी रुसाफुगी नाही. तिने स्वतःला तिच्या संसारात अक्षरश गुंतवून घेतले होते. संसाराशिवाय तिला दुसरे काहीच दिसत नव्हते. आपले घर, सासू सासरे, नवरा, मुले या व्यतिरिक्त तिला काहीच आवडत नव्हते. विहान आणि समीरा देखील तिला फार समजून घेत होते. विहान तर सुरुवातीला तिची खूप काळजी घ्यायचा. नंतर ध्रुव आणि अक्षरा झाल्यावर त्याने त्याच्या कामाकडे जास्त लक्ष दिले. अवनीला अक्षरा झाल्यावर शरीराच्या व्याधीने ग्रासले होते. परंतु, त्याकडे ना तिने लक्ष दिले ना घरातील इतर कोणी. आज त्याचाच दुष्यपरिणाम म्हणून अवनी या जगात नव्हती.
" सगळ्यांसाठी सगळं करताना स्वतःकडे का म्हणून दुर्लक्ष करावे माणसाने? आई, तुम्ही बायका ना खूपच मतलबी असता. आनंद तुमच्या पोटात राहत नाही आणि दुःख, वेदना माहित नाही पोटाच्या कोणत्या अशा कोपऱ्यात दडवून ठेवता की जवळच्या व्यक्तीला देखील त्या जाणवत नाही. तुला माहितेय आई... अवनीला मी खूप वेळा म्हणालो होतो. की, अवनी आपण छान असं दोन तीन दिवस बाहेर फिरायला जाऊ या. घरातील कामातून तू पण फ्री होशील आणि मी देखील कामाच्या टेन्शन मधून रिलॅक्स होईन. त्यावर ती नेहमीच हेच सांगायची मला, विहान... अरे घरातील कामे कधी संपतात का रे? अजून मुलांचं नीट व्हायचे आहे. आई बाबा थकलेत, त्यांना आता आरामाची गरज आहे. अशा वेळी मुलांची जबाबदारी त्यांच्यावर टाकून मी कसं येणार तुझ्या सोबत. माझं सगळं लक्ष घराकडेच लागून राहील त्यावेळी. त्यापेक्षा मुले मोठी झाली ना तेव्हा ते त्यांचं स्वतःचं बघतील. मग आपण जाऊ या एकत्र फिरायला. तो दिवस काही आमच्या आयुष्यात आलाच नाही आई. माहित नाही अशा किती अपूर्ण इच्छा, अधुरे स्वप्न उराशी घेऊन माझी अवनी आज मला अर्ध्यावरच सोडून गेली आहे. नंतर जगू आपण आपले आयुष्य निवांत असं म्हणणारी माझी अवनी एकटीच पुढे निघून गेली. तिच्या नशिबी निवांत वेळ आलाच नाही आई."
विहान जोरजोरात रडू लागला. काय बोलणार होती आई त्याच्या बोलण्यावर. ज्यावेळी अवनीला जास्त गरज होती आपली तेव्हा आपणच तिला समजून घेतले नाही हि सल आयुष्यभर त्यांना सलत राहणार होती. काही दिवसांपूर्वी घडलेली घटना समीरा यांना आठवली. असंच दुपारच्या वेळी पुस्तक वाचत खोलीत बसलेल्या समीरा जवळ अवनी आली.
" आई, जेवण झाले बनवून. अक्षराला देखील जेवण भरवून झाले आहे. ध्रुवची व्हॅन येईल आता तर तुम्ही आणि बाबा जेवून घ्या लवकर म्हणजे भांडी घासून किचन आवरून जाते मी ध्रुवला घ्यायला." साडीच्या पदराला हात पुसत अवनी समीरा समोर उभी होती.
" आता भूक नाही गं मला. एक काम कर. तू आधी ध्रुवला घेऊन ये घरी मग जेवतो आम्ही." समीराने पुन्हा पुस्तक वाचायला सुरुवात केली.
" ते... आई... ते आम्ही... म्हणजेच ते ध्रुवच्या फ्रेंडच्या मम्मी आणि मी, आम्ही मुलांना घेऊन गार्डनमध्ये जाणार होतो आता. म्हणून म्हंटलं, तुम्ही जेवला असता तर सगळी कामे आवरून लागलीच गेले असते मी." अवनी हळू आवाजात बोलते.
" अगं, इतक्या दुपारी कशाला जाता गार्डनमध्ये? नंतर जा कधी तरी. आजच कशाला जायला हवं का?" पुस्तकाचे पान पालटत समीराने जस सांगितले तसं अवनीचा चेहरा पडला.
" ठीक आहे आई. नंतर कधी तरी प्लॅन करतो आम्ही. मी आलेच ध्रुवला घेऊन लगेच." अवनी खाली मान घालून निघून गेली.
वर्तमानकाळात...
" त्या दिवशी तुला जाऊ दिले नाही मी. त्याच दिवशी कशाला, तुला कधीच तुझ्या मनासारखे वागू दिले नाही मी. तू माझी लेक झालीस पण मला तुझी आई होता नाही आले अवनी बाळा. तुला तुझ्या मनासारखे करायला, कुठे जाताना नेहमीच आमच्या सवडीने आणि परवानगीने करायला लागायचे. स्वतःसाठी थोडंसं देखील जगण्यासाठी तुला आम्हाला विचारावं लागायचं अवनी. माफ कर आम्हाला पोरी. तुझं आयुष्य तू आमच्या सेवेत आणि घराच्या जबाबदारी साठीच खर्ची केलेस. माफ कर बाळा..." समीरा देखील हात जोडून रडू लागली.
मैत्रिणींनो... वेळ आणि वय आहे तोपर्यंत थोडं स्वतःसाठी जगा. स्वतःकडे लक्ष द्या. कोणताही आजार किंवा दुखणं अंगावर न काढता त्यावर वेळीच उपाय करा.
समाप्त
