#नियती
©️Anjali Minanath Dhaske (Elgire)
अरुंधतीने पदवी शिक्षण पूर्ण केले होते. ती दिसायला अतिशय सुंदर असूनआई वडिलांची लाडकी लेक होती. तिच्यासाठी महेशचे स्थळ सांगून आले होते. महेश उच्चशिक्षित असून दिसायला देखणा होता. घरी पंचवीस ऐकर शेती होती . घरचे पिढीजात शेतकरी असल्याने त्यांच्या शेतीतून दमदार उत्पन्न निघत होते. महेशचे अॅग्रिकल्चर मधेच पदिव्योत्तर शिक्षण झाल्याने अनेक प्रयोग तो स्वतःच्या शेतीत करत होता. सोबतच सरकारी नोकरीसाठी तो एम.पी.एस. सी. ची तयारीही करत होताच. त्याने एम.पी.एस. सी. ची परीक्षा दिली आणि घरचे लग्नाच्या मागे लागले होते. त्याच्या नोकरी वाचून घरी काही अडत नव्हते. तो आईवडिलांचा एकुलता एक मुलगा असल्याने त्याचे लग्न योग्य वयातच झाले पाहिजे म्हणून घरचे काही ऐकून घ्यायला तयार नव्हते. नोकरी लागल्यावरच लग्न करण्याचा महेशचा निर्णय घरच्यामुळे मोडीत निघाला. अखेर तो अरुंधतीला बघण्यासाठी तयार झाला. बघता क्षणीच
महेशला अरुंधती आवडली होती.
दोघे एकांतात बोलायला म्हणून गेले तेव्हा अरुंधतीने स्पष्टच सांगितले की तिच्या वडिलांना नोकरी करणारा जावई हवा आहे. त्यावर महेशनेही तिला खात्री दिली की दोन महिन्यात एम.पी.एस. सी. चा निकाल येणार आहे आणि त्याला खात्री आहे की त्याची निवड नक्की होईल. खरं तर अरुंधतीलाही महेश आवडला होता. तरी विचारायचे म्हणून तिने विचारले," आणि जर निवड झाली नाही तर?"
त्यावर महेश पटकन् बोलून गेला," निवड होणार नाही असे होणारच नाही... तरी तसे झालेच तर.... घरी शेती आहेच. त्यात अनेक प्रयोग करून मी यशस्वी शेतकरी नक्किच बनेन..... आणि हो माझ्या बायकोला मी शेतीची कामे लावणार नाही. घरी गडीमाणसं भरपूरआहेत . तिला मी राणी सारखी ठेवेन"
त्याने असं सांगितल्यावर अरूंधती स्वप्नात गेली ," महेश तिला ट्रॅक्टर मधे बसवून सगळी शेती दाखवतो आहे, मालकीण बाई म्हणून ती ही रुबाबात बसली आहे " .
तिच्या या स्वप्नावर तिलाच हसू आलं. तिला गालातल्या गालात हसतांना बघून महेश ने अंदाज बांधला की तिलाही तो पसंत आहे.
बघण्याचा कार्यक्रम नीट पार पडला. महेश आणि त्याच्या घरची मंडळी निघून गेल्यावर अरुंधतीचे बाबा मध्यास्तांवर चिडले. मुलाला नोकरी नसतांना हे स्थळ त्यांनी सुचविलेच का?
शहरात वाढलेल्या अरूंधतीला खेड्यात जावून शेतीची कामे करणे झेपणार आहे का? शहरातल्या मोकळेपणाची सवय असलेल्या अरूंधतीला सासरी कायम डोक्यावर पदर घेऊन वावरणे शक्य होईल का? असे एक ना अनेक प्रश्नांनी त्यांच्या मनात काहूर उठलं होत.
मुलगा कितीही चांगला असला तरी सध्या खेडयात राहतो. पूढे नोकरी लागलीच नाही तर कायमचे खेडयात राहणे अरूंधतीला झेपणार नाही. अरुंधतीने नोकरी करावी अशी वडीलांची इच्छा होती. शेतीतून निघणाऱ्या उत्पन्नावर सगळं घर चालतं. ज्यांना मुलाच्याच नोकरीची गरज नाही ते पुढे सूनेला नोकरी करू देतील का? असं वाटून महेशच्या स्थळा ला स्पष्ट नकार कळवावा असे अरुंधतीच्या वडिलांची भूमिका होती.
वडिलांनी उपस्थित केलेल्या शंका ऐकून अरूंधतीलाही पटले की कायम स्वरुपी खेडयात रहाणे कठिण आहे. महेशने सांगितले त्या प्रमाणे शेतीची कामे केली नाहीत तरी घरात माणसांचा राबता बघता इतर कामांची कमतरता नक्कीच नाही. नविन नवलाईने डोक्यावरून पदर घेणे ठीक परंतू कायम डोक्यावरून पदर घेण्यानेच आपला जीव दमेल.
मध्यास्तांचे म्हणणे पडले की , दोन महिन्यात महेशच्या एम.पी.एस. सी. परीक्षेचा निकाल येणार आहे. तोपर्यंत वेळ काढू. सरकारी नोकरी लागली तर लग्नाची बोलणी करायची नाहीतर नकार देऊन मोकळे व्हायचे. अरुंधतीच्या वडिलांना खरं तर असे करणे योग्य वाटतं नसले तरी जनरित बघता मुलीकडच्यांनी आलेल्या स्थळाला तडक नकार देणे कोणालाही रुचणारे नव्हते हे त्यांनी जाणले होते. दोन महिने स्वतःहून होकार किंवा नकार कळवयचा नाही असे ठरले. महेशच्या घरच्यांनी विचारलेच तर अरुंधतीच्या मोठ्या बहिणीचे बाळंतपण असल्याने सध्या घाई नाही. तुम्हाला घाई असल्यास तुम्ही दुसरी स्थळे बघू शकता असे सांगून मोकळे व्हायचे.
अरुंधती महेशच्या घरच्यांनाही खूप पसंत होती. ती शहरातली असल्याने तिला सासरी सहज रुळता यावे म्हणुन महेशला नोकरी लागली नाही तरी अरुंधतीला आपल्या गावात करण्यासारखी तिला आवडेल ती नोकरी करू द्यावी असे सगळ्यांना वाटू लागले. तिच्यासाठी घरच्यांनी त्यांच्या अनेक अपेक्षाना मुरड घालण्याचे ठरविले.
एक आठवडा उलटून गेला. महेशला दुसरी स्थळे सांगून येवू लागली . महेश मनावर घेत नव्हता. अरुंधतीच्या घरच्यांचा नकार आल्यावरच दुसरी स्थळे बघण्याचा त्याचा मानस होता. स्वतःहून मुलिकडच्याना विचारणे महेशच्या घरच्यांना पटत नव्हते. महेशच्या आग्रहाखातर अखेर मध्यास्ताना विचारण्याचे ठरले. महेशला अरूंधती पसंत आहे तो इतर मुली बघण्यास उत्सूक नाही म्हंटल्यावर महेशच्या घरच्यामंडळींपैकी कोणाचेही मन न दुखावता मध्यास्ताना दोन महिने वेळ काढणे गरजेचे होते. त्यांनाही काहीच कल्पना नाही म्हणत ,"शहरातली मुलगी शेतीतल्या कामाला घाबरत असेल" म्हणून निर्णय घ्यायला वेळ घेत असेल असा अंदाज वर्तवला.
हे ऐकल्यावर महेशच्या घरी नव्याने चर्चा सूरू झाली. या वेळी चर्चेचा सूर पूर्ण बदलला होता . घरी कामासाठी माणसं खूप आहेत. परंतू कधी गडी आला नाही तर पुढे होवून काम करण्याची तयारी हवी. गायी म्हशीना चारा देता यायला हवा . गोठा स्वच्छ करता यायला हवा. नाहीतर गरज पडल्यावरही दुसऱ्याच्या तोंडाकडे बघणारी सून आणली तर हा डोलारा पुढे कोण नेईल? गडी माणसाच्या बरोबरीने राबल तरच ते आपलं समजून काम करतात. मालकीण बाई म्हणून बसलं तर सगळं बुडीत जाईल. उद्या महेशला नोकरी जरी लागली तरी सणवार असला तर चार आठ दिवस गावच्या घरी येणारच की, या शहरातल्या पोरीला ते तरी झेपेल का? आपले सगळे सगे सोयरे गावातच आहे. या पोरीला त्यांची उस्तवार तरी निभेल का?
महेशचे संयुक्त कुटुंब होते. घरात आई वडील, दोन काका, दोन काकू आणि त्यांच्या चार मुली होत्या. शहरी मुलींना असा गोतावळा झेपत नाही. त्यांना नवर्याला वेगळे घेवून फक्त राजा राणीचा संसार करायचा असतो.
आपले शेतकऱ्याचे कुटुंब आहे महेशला नोकरी लागेल तेव्हा लागेल पण घरात शहरी सून नकोच. असे घरातल्यांचे म्हणणे पडले.
शहरात वाढलेल्या मुलीला त्याच्या घरच्या वातावरणात रुळणे किंवा रुळवणे कठीणच होते. महेशलाही खर तर हे सगळं पटत होत परंतू अरूंधती त्याला आवडली होती हेही तो नाकारू शकत नव्हता. नोकरी लागली तर आपोआपच अर्धे प्रश्न मोडीत निघतील असे वाटून दोन महिने वेळ काढावा असे महेशच्या मनाने घेतले.
दोन महिने झाले . महेशचा एम.पी.एस. सी. चा निकाल लागला नाही. काही तांत्रिक अडचणी आल्या असल्याने निकालाची तारीख पूढे ढकलण्यात आली होती.
याच दरम्यान अरुंधतीसाठी त्यांच्याच नात्यातील प्रोफेसर मुलाचे स्थळ सांगून आले. गावी मुलाचे कुटुंब मोठे होते . सहा सात एकर शेती ही होती . त्याचे दोन्ही भाऊ तीच शेती करत होते. मुलगा मात्र नोकरी निमित्त नागपूर शहरातच स्थाईक होणार होता. बायकोने नोकरी करण्याला त्याची काहीच हरकत नव्हती. दिसायलाही मुलगा चांगला होता. अरुंधतीच्या घरी सगळ्यानाच हे स्थळ आवडले होते.
दोन महिन्यात त्यांचे लग्न पार पडले.
अरुंधती संसाराला लागली. शहरात दोघांचा राजाराणीचा संसार सुरू झाला. अरुंधतीने नवऱ्याच्याच महाविद्यालयात पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश ही घेतला .
इकडे महेशच्या परिक्षेचा निकाल काही केल्या लागत नव्हता. दर वेळी काही ना काही अडचण येवून निकाल पूढे ढकलला जात होता. महेशला त्यांच्याच शेजारच्या गावात राहणाऱ्या गौरीच स्थळ सांगून आले. गौरीने जेमतेम पदवीचे शिक्षण पूर्ण केले होते. तिच्या घरी शेती असली तरी फार उत्पन्न निघत नव्हते. आईवडील परिस्थितीने गरीब होते . घरात एकूण सहा बहिणी आणि दोन भाऊ. परिस्थितीमूळे मुलींना शिकविणे शक्य नव्हते.
त्यातही एकदा गौरीचा साखरपुडा ठरला होता. मुलगा शहरात खासगी कंपनीत कामावर होता. मुलाच्या मित्रांनी त्याला अनेकदा बोलून दाखविले की "गावाकडच्या मुलीचा शहरात टिकाव लागणार नाही" त्यावर विचार करून मुलाने गौरी सोबत होणारा साखरपुडा मोडला होता.
त्यानंतर तर गौरीला कोणी पसंतच करत नव्हते म्हणून लोकांना सांगण्यासाठी तिचे शिक्षण तेवढे सुरू ठेवले होते. बहिणींच्या वयातही फार अंतर नव्हते. गौरीच्या लहान बहिणीसाठी स्थळ सांगून आले आणि वडिलांनी तिचे लग्न उरकून टाकले होते. गौरी दिसायला साधारण त्यात शिकलेली म्हणून खेड्यातली स्थळ नकार देत होती आणि शिकलेली असून खेड्यातली म्हणून शहरी मुलेही नकार कळवत होती. शिक्षणामुळे लग्न जुळत नाही त्यात गौरीला नोकरी करायला परवानगी दिली तर ती आयुष्यभर बिन लग्नाची राहील असे वाटून घरच्यांनी तिला नोकरी करू दिली नाही. घरच्यांच्या मताला प्राधान्य देतांना तिला स्वतःची स्वप्ने बाजूला ठेवून द्यावी लागली.
अरुंधतीच्या बाबतीतला अनुभव बघता शहरातली मुलगी नकोच असा महेशच्या घरच्यांचा होरा होता तर मूलगी शिकलेलीच हवी असा महेशचा निश्चय असल्याने त्यांना गौरीचे स्थळ सुचविल्या गेले.
गौरीच्या घरी तिला बघण्यासाठी म्हणून महेश आणि त्याच्या घरचे दिलेल्या वेळेआधीच अर्धा तास पोहचले. शेतीची कामे ऐनभरात असल्याने गौरीला घरची सगळीच काम करायला लागत. महेश आणि घरचे पोहचले तेव्हा गौरी गोठ्यातले शेण साफ करत होती. पाहूणे आले म्हंटल्यावर ती ओशाळली. हात पायधुण्यासाठी म्हणून तशीच मागच्या हौदावर गेली.
तिच्या आईने परस्पर शेजारच्या घरी तिला पाठवले. साडी नेसून तयार केले.
खरं तर तिला गोठा स्वच्छ करताना पाहिले तेव्हाच महेशच्या घरच्यांना ती पसंत पडली होती. महेशला तिच्याशी एकांतात बोलून तिच्या अपेक्षा जाणून घ्यायच्या होत्या परंतू गौरीच्या घरच्यांसाठी ही पद्धत पचनी पडणारी नव्हती. अखेर जुजबी प्रश्न उत्तरांचा कार्यक्रम करून सगळ्यांनी बघण्याचा सोहळा उरकता घेतला.
मुलगी गरीब घरची असली तरी शिकलेली असून घरातल्या कामांना सरावलेली आहे म्हंटल्यावर महेशच्या घरच्यांना आवडली होती. महेशचा होकार आला तर महिन्यात लग्न उरकायचा त्यांचा मानस होता.
महेशच्या परिक्षेचा निकाल लागण्याची चिन्हे दिसत नव्हती. भविष्यात महेशचा शेती हाच मुख्य व्यवसाय असणार होता. दिसायला फार सुंदर नसली तरी घरच्यांना सांभाळून घेणारी मुलगीच घरी सून म्हणून आणण्यात शहाणपण आहे असे वाटून महेशने गौरीला होकार दिला.
महिन्यात लग्न पार पडले. घरात सगळया कामाला गडी माणसं होती. गौरीने स्वतः कामे करण्याची गरज नाही असे तिला सासरच्यांनी सांगितले तरी घरातली मोठी मंडळी आणि महेश पहाटेच शेतावर जायचे. घरी फक्त लहान काकू असायच्या. त्याही सकाळचा स्वयंपाक करून सगळ्याचे जेवण घेवून शेतावर गेल्या की संध्याकाळीच सगळ्यांसोबत परत येत.
नव्या नवरीला शेतीची कामे लावली नसली तरी घरातील कामाचा डोंगर उपसतांना नाकी नऊ येतील अशी परिस्थिती होती.
तिच्या माहेरची परिस्थिती बेताचीच होती त्यामानाने सासरी कामे खूप असली तरी बरीच सुबत्ताही होती. माहेरच्या तुलनेत सासरी व्याप मोठा असला तरी तिला त्या तुलनेत बरेच स्वातंत्र्य मिळाले होते आणि ती त्यातच खूश होती. गौरी सगळ्या कामात स्वतःहून रस घेत होती. गडी माणूस नाही म्हंटल्यावर गौरी स्वतः पूढे होवून काम करत होती. माहेरी अनुभव असल्याने सासरीही कोणत्याच कामात तिला कमी पणा वाटतं नव्हता. मालकीण बाईचा तोरा न मिरविता ती त्यांच्यातली एक होवून त्यांच्या बरोबरीने राबत होती.
महेशने अरुंधतीला अगदी सहज सांगितले होते की, " तिला शेतीची किंवा ईतर कामे करावी लागणार नाही " परंतु प्रत्यक्षात गौरीला घरची सगळीच कामे करावी लागत होती. परिस्थिती अशी होती की गौरीच्या अपेक्षाही फार नसल्याने ती आहे त्यात समाधानी होती.
त्यांच्या लग्नाला जेमतेम तीन महिने झाले नाहीत तोवर महेशच्या उप जिल्हाधिकारी या पदासाठी दिलेल्या परिक्षेचा निकाल लागला. त्याला मुलाखतीसाठी बोलाविण्यात आले.
महेशने मुलाखतीची जय्यद तयारी केली. मुलाखतीमध्ये ही त्याची निवड झाली आणि त्याला वर्षभराच्या ट्रेनिंग साठी पुण्यात पाठविण्यात आले. महेशच्या घरच्यांनी याचे सगळे श्रेय " गौरीचा पायगुण" याला दिले. महेशला मात्र वाटे की,' निव्वळ परिस्थितीने साथ न दिल्याने अरुंधतीला त्याला नकार द्यावा लागला. '
अरुंधतीच्या आठवणीने तो दुखी होई . बायको म्हणुन गौरी बद्द्ल आदर होता परंतु अजूनही तो तिच्या प्रेमात पडला नव्हता.
महेशचे सरकारी नोकरीचे स्वप्न पूर्ण होणार होते परंतू अरुंधतीशी लग्न करण्याची संधी आधीच हातातून गेली होती या जाणिवेने त्याचा सगळा उत्साह मावळला होता. मन मारून त्याने आयुष्याला स्विकारले होते .
पोस्टींग कुठे मिळते हे निश्चित झाल्यावरच त्याने गौरीला सोबत घेऊन जावे असे सगळयांचे मत होते.
मुलगा आता साहेब होतोय तर सूनही त्याला शोभली पाहिजे म्हणून गौरीने पूढे शिकावे असे महेशच्या घरच्यांचे म्हणणे पडले. गौरीला शिक्षिका बनण्याची इच्छा आहे हे समजल्यावर त्यांनी गौरीला BEd च्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेवून दिला.
बघता बघता महेशचे ट्रेनिंग सुरळीत पार पडले. त्याला नागपूरला पोस्टींग मिळाली. गौरीने ही तिचा अभ्यासक्रम पूर्ण केला.
ईकडे लग्नानंतर सहा महिन्यातच अरुंधतीच्या नवर्याला सरकारी चौकशीला सामोरे जावे लागले. त्याने सरकारी नोकरी मिळवण्याच्या मोहात जातीचे खोटे दाखले सादर केले होते. चौकशी वर्ष दीड वर्षे चालली. चौकशीत तो दोषी आढळल्याने त्याची सरकारी नोकरी तर गेलीच परंतु आता भविष्यात तो कोणत्याही सरकारी नोकरीसाठी पात्र राहणार नाही अशी तरतूद करण्यात आली.
अरुंधतीच्या नवर्याने केलेल्या चुकीने ओढवलेल्या संकटाचे खापर ,'अरुंधतीचा पायगुण ' यावर फोडण्यात आले.
अरुंधतीचा नवरा मानसिक नैराश्यात गेला. अरुंधतीचे पदव्युत्तर शिक्षण अपूर्ण राहिले. त्याही परिस्थितीत अरुंधतीने मिळेल ती नोकरी करून संसार सावरण्याची तयारी केली परंतु नवर्याचे नैराश्य बघता तिच्या सासरच्यांनी गावी परत येण्याचा आग्रह धरला. सासरच्या आग्रहापुढे अरुंधतीचे आणि तिच्या वडिलांचे काहीच चालले नाही.
नियतीचा फेरा असा काही फिरला होता की एक विचित्र योगायोग निर्माण झाला.
ज्या दिवशी अरुंधती आपला नागपूरचा संसार गुंडाळून गावाकडे रवाना झाली नेमकी त्याच दिवशी महेशने गौरीच्या साथीने नागपूरमधे त्यांचा नवा कोरा संसार मांडायला घेतला.
नियतीचा खेळ खूप निराळा असतो. आपण कुठे पोहोचणार आहोत हे निश्चित असले तरी तिथपर्यंत पोहचण्याचा मार्ग मात्र आपल्याला निवडायचा असतो.
आज दहा वर्षानंतर....
अरुंधती गावाकडच्या सहकारी बँकेत नोकरी करते. नवर्याने शेतीत नवनवीन प्रयोग करावे यासाठी त्याला प्रोत्साहन देत रहाते. आपल्या दोन मुलांचे संगोपनही उत्तम करते. संसारासाठी तिने खाल्लेल्या खस्ता बघून तिच्या नवर्याचेही तिच्यावर असलेले प्रेम वृद्धिंगत झाले आहे. संसाराची गाडी रूळावर आणण्यासाठी कराव्या लागणार्या कष्टांमुळे तिचे पूर्वीचे सौंदर्य मात्र लयाला गेले. माहेरी8 लाडात वाढलेल्या तिला सासरी मात्र खूप कष्ट उपसावे लागले.
माहेरी कशाचेही स्वातंत्र्य नसणार्या गौरीला सासरी मात्र तिची स्वप्ने पूर्ण करण्यासाठी कायम सहाय्य मिळाले.
गौरीला शहरी वातावरणाशी जुळवून घेतांना, नोकरी करतांना खूप अवघड गेले. परंतु तिने जिद्दीने स्वतःला शहरी आव्हानांसाठी तयार केले. या सगळ्यात तिला सासरची साथ मिळाली आणि तिचा संघर्ष थोडा सोपा झाला. यात सर्वसाधारण दिसणार्या तिचे व्यक्तिमत्त्व मात्र प्रभावी बनले. महेशचि बायको याव्यतिरिक्त तिने स्वतःची अशी खास ओळख बनवली. शाळेतल्या मुलांसोबत ती स्वतःच्या मुलांनाही योग्य संस्कार देते. सुरुवातीच्या काळात महेशने नाईलाजाने आपला बायको म्हणुन स्विकार केला आहे हे वाटून ती दुखावली जायची. काळाच्या ओघात हेही दुःख मागे पडले.नोकरी करूनही गौरीने गावाकडच्या सासरशी असलेले संबंधात कधी अंतर पडू दिले नाही. तिच्या मेहनती आणि संयमी स्वभावाने महेश अखेर प्रभावित झाला. तीच आपली योग्य जोडीदार आहे याची त्याला मनोमन खात्री पटली.
थोडक्यात काय तर....
अरुंधतीच्या नवर्याच्या नशिबी सुंदर बायको होती. अल्प कालावधीसाठी का होईना टिकलेल्या त्याच्या नोकरीमुळेच अरुंधतीने त्याची निवड केली होती. त्याच्या नोकरी प्रमाणे अरुंधतीचे सौंदर्य ही जीवनाच्या तडाख्यात फार काळ टिकले नाही.
अरुंधतीला शेतीची कामे करण्याची ईच्छा नव्हती. शहरात राहून नोकरी करायची होती. आता तिच्या मुलांच्या शिक्षणासाठी तिने शहरी भागात बदली करून घेतली आहे. तिच्या नवर्याने देखील शहरात नवा व्यवसाय सुरू केला आहे.
महेशला सरकारी नोकरी आणि आपल्या सौंदर्याने प्रभावित करणारी बायको हवी होती. गौरीच्या व्यक्तिमत्त्वाने त्याला ईतके प्रभावित केली की त्याच्याही नकळत त्याची सौंदर्याची असलेली जुनी व्याख्या बदलून गेली आहे.
गौरीचे शिक्षिका बनण्याचे स्वप्न होते .आज ती मुख्याध्यापिका पदाचा कार्यभार सांभाळते आहे.
त्यांच्या नशीबाने त्यांना जे हवे होते ते दिले. अरुंधतीला नशिबाने नियतीचा मार्ग निवडण्याचे स्वातंत्र्य दिले होते तर गौरीने मात्र नशिबालाच नियतीचा मार्ग म्हणुन स्विकारले होते.
परंतु ध्येय पूर्तीसाठी करावा लागणारा संघर्ष कोणालाही टाळता आला नाही.
©️Anjali Minanath Dhaske (Elgire)
टिप: कथा आवडल्यास नावासहित शेयर करा. ईतर लिखाण वाचण्यासाठी खाली दिलेल्या "आशयघन रांगोळी " या ब्लॉग वर