नियती - एक भयकथा - भाग 32

भयकथा

#नियती
भाग 32
©पूनम पिंगळे
ओळखीचा आवाज : काय खूप प्रेम उतू चाललंय तुमचं ? आता मी आणि माझी आई येतोय तुमच्या प्रेमाचा भंग करायला ..विचार पण नाही करू शकत तुम्हि ...भेटूया लवकरच.. तोपर्यंत चालुदेत तुमचं प्रेम ...हाहा हा हा हा..तुम्हाला वाटत आहे तुम्ही जिंकलात.. गैरसमज आहे तो तुमचा..आता तयार रहा तुम्ही...आणि ही मुक्ती हाहा !! ही ..ही हरवणार आम्हाला? हाहा !!..अग मुक्ती ...तुला काय वाटलं आम्हाला माहीत नाही ..तुझं काय चालू होतं ते इतके वर्ष? सगळं माहीत आहे आम्हाला ..पण जंगलचा राजा कधी लांडग्यांना घाबरत नसतो ...तो किती धूर्त असला तरी ...तुला काय करायचं ते तू केलंस ..आता ...आता आमची वेळ आहे ...आणि ती हसत हसत गेली ..जाताना तो आवाज हळू हळू दूर गेला ...त्यावरून ती तिथून गेली हे समजलं 
आता सगळ्यांना एक प्रश्न पडला ..ही बाई काहीच न करता कशी काय गेली ? इथे ती हसायला आली होती काय? की उगाच आम्हाला घाबरवायला? हिचा काही अंदाजच येत नाहीये ...काय करणार होती आता मंदाकिनी? तिला खरच माहीत होत का?मुक्ती ची तपस्या आणि सगळं ? 
हेमंत ने वर्षाला स्वतःच्या जवळ घेतलं :वर्षा घाबरू नगस ग आपण करू समद नीट ..आणि आता तर देवीचा आशीर्वाद बी हाय आपल्या सोबत ..आणि त्या गुरुजींनी सांगितलेलं त्रिशूल बी हाय आपल्याकडं... आता एकडाव गुरुजींना भेटाय पायजेल ..मंजी त्या त्रिशूलानी त्यांना कस मारायचं ते समजलं आपल्याला ..चल आपण जाऊया त्यांच्याकड..
वर्षा : हो रे हेमंत खर आहे तुझं ..आता गुरुजींच सांगू शकतील आपल्याला काय करायचं ते..पण आता इतक्या रात्री नको आपण उद्या सकाळी जाऊ त्यांच्या आश्रमात... ती हे बोलतच होती आणि एकदम खूप मोठा प्रकाश तिथे आला त्या तेजपुंजातून गुरुजी दिसू लागले ...सगळ्यांना खूपच आनंद झाला 
गुरुजी: वाह ग पोरी !!तू तर कामगिरी फत्ते केलीस की..खूप आनंद झाला ग मला तुझं हे धाडस पाहून ..
वर्षा : गुरुजी हे मी एकटीने नाही केलं हो ..तुमचे आशीर्वाद , मार्गदर्शन आणि हा हेमंत पण होता माझ्याबरोबर ..
गुरुजी : हा कसा काय होता तुझ्या बरोबर? 
वर्षा : तुम्ही दिलेला ताविज घालून मी निघाले तेव्हा याचा हात माझ्या खांद्यावर होता ..आणि हा पण नकळतपणे आला माझ्यासोबत..पण त्यानेच मला हिंमत दिली हो..मी तर पुरतीच गोंधळले होते ..पण हा मला सारख धैर्य देत राहिला ..आणि मला मार्ग मिळत गेला..आणि गुरुजी,आम्हा दोघांना देवी मातेने आशीर्वाद दिलाय ..आम्ही एकत्र राहू आणि सुखी रहु असा ..बोलता बोलताच वर्षा लाजली ..आणि हेमंत सोबत तिची नजरानजर झाली..हे काय अचानक हेमंत चे डोळे बदलले होते ...त्यांचा रंग ..त्यातले भाव बदलले होते ...सगळेच घाबरले ..
गुरुजींनी त्यांच्या कमंडलूतील पाणी हेमंतवर शिंपडल आणि तो बरा झाला ..पण त्याला अस का झालं होतं अचानक? 
वर्षा : गुरुजी काय झालं हेमांतला अचानक? 
गुरुजी : बेटा ती मंदाकिनी कोणाच्या तरी शरीराचा कब्जा घ्यायचा प्रयत्न करत आहे तुम्ही सगळे सांभाळून रहा ..हिची आई कुठे आहे काही कळेना? या दोघी सोबत भेटल्या तर एकसाथ त्यांचा नाश करता येईल आपल्याला ..मातेचं त्रिशुळ एकसाथ दोघीच्या डोक्यावर मरावं लागेल..मग त्या दोघी पुन्हा कधीच येऊ शकणार नाहीत ...आणि हा त्रिशूल त्यांच्या डोक्यावर घालेल अशी ताकद फक्त मुक्ती मध्येच आहे ...
वर्षा : गुरुजी पण आता ती आमच्या कोणाच्यापण शरीरावर कब्जा करू शकते ना ? मग आता आम्ही त्यापासून कस वाचवायचे स्वतःला? 
गुरुजी : हो पोरी मी आत्ता तेच सांगणार होतो ...हा त्रिशूल इथेच राहुद्यात.. आणि हे घ्या हे ताविज सगळ्यांनी गळ्यात बांधायचे.. काही झालं तरी ते गळ्यातून बाहेर काढायचे नाहीत..मी निघतो आता सगळ्यांनी काळजी घ्या ..अरे हो एक महत्वाचा सांगायचं राहील ग...सध्या तू आणि हेमंत जवळच रहा पण अति जवळ नव्हे ..आणि सध्या कोणावरही विश्वास ठेवू नका ..आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे . दोघे नको इतके जवळ येऊ नका आणि एकदम रोखून त्यांनी हेमंतकडे पाहिलं: काय समजलं ना ? ,हेमंत आणि वर्षाने लाजून मान खाली घातली ..
गुरुजी :अरे लाजू नका!मी काय सांगितले ते समजून घ्या नीट..येतो मी ..आणि आता सगळे सावध रहा..काहीही वाटलंच तर मला लगेच संपर्क करा..
हेमंत: आवो काय संपर्क करा ..तुम्ही इतक्या लांब राव्ह्ता.. तुमच्यापाशी फोन बि नाही..आश्रमात फोन करिपर्यंत इथं आमचं हे राम हुयाच ..कस संपर्क करायच ओ तुमास्नी? 
गुरुजी : अरे फक्त मनात 3 वेळा गुरुजी धावा अस म्हणा, मी आलोच म्हणून समजा लगेच 
हेमंत : अव्हो निस्त समजून काय करायचं ..तुम्ही यायला पायजेल नव्ह..
गुरुजी : अरे बाबां म्हणजे मी येईल असं म्हणायच होत मला ...चला निघतो आता ..आणि क्षणार्धात तो प्रकाश तिथून गेला ..
संपतराव: आपण सगळे सध्या एकाच रूम मध्ये राहू या ...आपल्या गेस्ट हाऊस मध्ये 4बेड आहेत आणि बाकी पण सगळी सोय आहेच 
इतका वेळ गप्प बसलेला संभा एकदम आशाळभूत पणे बोलला: अरे वाह समदा बंदोबस्त . म्हंजी ग्लास न बाटली बी असलं ना? हेमंत ने त्याच्याकडे रंगात पाहिलं आणि संभा एकदम गप्प झाला ..
हेमंत : हो तुम्ही बरुबर बोलताय .. आपण एकाच खोलीत राहू या समदे..आणि सगळे गेस्ट हाऊसकडे गेले.. गेस्ट हाऊस कसलं ते तर झक्कास आ प्रशस्त घरच होत दुसरं ...
संभा:बायो कसलं मोठं गेस्ट हाऊस ह्ये !!!आमचं अख्ख घरबी इतकं मोठ न्हाई की ओ ..
हेमंत: रागात बघत: संभा...गप बस ना.. चल पटकन सामान नीट लाव आणि रूम थोडा स्वच्छ करून घे..
संभा:अवो मालक..म्या का करू ओ रूम स्वच्छ? यांच्या नोकरांना सांगा की ..म्या ड्रायव्हर हाय तुमचा ...अहो हे काम म्या कस करू? आजपतूर तुम्ही असली काम मला सांगितली नाय कधी ..अस का वो करताय तुमी?पार बदलून गेले बगा तुमी...
संपतराव:बरोबर रे तुझं संभा ....जा बाहेर जाऊन गंगी ला बोलावं ती करेल सगळं स्वच्छ ..तिला जेवणाची पण तयारी करायला सांगूया.. जा बोलावं तिला ...ते तरी जमेल ना ?की जाऊ मी ? 
संभा : अव्हो मालक अस नका हो बोलू, जातो की म्या ..आणि तो गेला ..
थोड्याच वेळात तिथे गंगी आली ...
संपतराव:   गंगे आम्ही 2-3दिवस याच खोलीत असू आमची जेवणाची व्यवस्था इथेच कर ...रोज लागणार सामान इथे आणून ठेव आमचं ...पाणी पण आणून ठेव इथेच ...
गंगी : आता ग बया!! ह्ये काय वो नवीन? इथं कशापायी राव्ह्ता मालक तुम्ही ?
संपतराव: गंगे ...सांगितल तेवढं कर ..जास्त वटवट करू नकोस 
गंगी : व्हय जी ...माफी मालक ...करते म्या समद ..तिने झाडू आणला सगळं स्वच्छ केलं...फरशी पुसली त्यात मस्त सेंट घातला होता त्यामुळे सगळीकडे मस्त सुगंध पसरला होता...आता सगळ्यांना फ्रेश वाटू लागलं होतं ...थोड्याच वेळात ...आचारी स्वयंपाक तयार आहे असा निरोप घेऊन आला ...नोकरांनी सर्व जेवण तिथेच टेबलवर मांडलं ..आता सगळ्यांना भुका लागल्या होत्या ...पटकन हातपाय धुवून सगळे जेवायला बसले ...
संभा सगळ्या जेवणाकडे आधाशासारखा बघत होता ...तो हेमंतच्या बाजूलाच बसला होता ...हेमांतने त्याच्याकडे पाहिलं आणि टेबलाखली त्याच्या पायावर जोरात पाय दिला ..
संभा जोरात ओरडला: आयो आयो काय वो मालक ? काय झालंय काय तुमास्नी? आवो माझा पाय मोडून, ती मंदाकिनी आणि तिची आई काय पळून न्हाय जाणार ..का वो माझ्या गरीबाच्या माग लागलात तुमी.. हेमंत आता खूप  चिडला होता ...
हेमंत : संभा तू जा नंतर जेव ...म्हंजी  मला राग येणार नाय ...तू कोण हायस याच भान न्हाय तुला ...
संभा उठायला लागला आणि संपतराव नी त्याला अडवलं :अरे अस का बोलता त्याला काही हरकत नाही..थोडा फटकळ आहे तो पण माणूस चांगला आहे ..बस रे संभा खाऊन घे ...इतकंच बोलायचा अवकाश संभा पटकन खाली बसला आणि समोर असणारी तंदुरी घेऊन पटापट खाऊ लागला ...हेमांतला त्याचा इतक्या वर्षात प्रथमच खूप राग येत होता ...आयुष्यात कधीच न मिळाल्यासारखे तो खात होता ...आणि संपतराव त्याची मजा घेत होते..जे हेमंतला सहन होत नव्हतं.. आपल्या दोस्ताला कोणी अस बघणं आणि नाव ठेवण हेमांतला कधीही मान्य नव्हत...पण सांभाला ते समजतच नव्हतं ...
जेवण झाली आणि सगळे आपआपल्या बेडवर झोपले ...प्रत्येकाने काळजीने ताविज घातला होता ...सगळे झोपले असता रात्री अचानक कोणाच्या तरी हसण्याचा आवाज आला ..संपतराव आणि संभा जागे झाले..बाकी सगळे झोपले होते ..
तो आवाज ऐकून संपतराव झोपतच ओरडले ..ए झोपा रे ..ही काय हसायची वेळ आहे का?कोण हसतय? 
तोच ओळखीचा आवाज : अरे माझ्या राजा ..मी तुझी जुनी राणी रे ..आजून कोणी नाही बघ ..
संभा: ओ बाई आवो झोपी जावा की आता. आणि अमास्नी बी झोपुद्याकि..अन वाईच तुमी बी झोपा की..तुमचं राह्यलेल हसायचं सकाळी पूर्णकरा ...तुमचा त्यो कोण राजा हाय ना ..तुम्हाला उद्या भेटल आता ते राजे  बी झोपलेत... जावा जावा झोपायला... बंद करा तुमचं ह्ये हसणं पहिला.. झोप मोडून राहिली माझी ..
संपतराव : अग ए बाई तू जाकी आता इथुन ..तू आमचं काही वाईट करू शकणार नाहीस ..माहिती आहे ना तुला आम्ही तावीज घातलेत..
मंदाकिनी: जोरजोरात हसू लागली अरे संपत तू काहीही कर, पण तुला मी नाही सोडणार.. ते तावीज माझं काहीही वाकडं करू शकत नाही.. मी का घाबरु
संपतराव:  हे बघ मंदाकिनी तू जा सध्या.. आम्ही सगळे खूप दमलोय आम्हाला थोडा वेळ झोपू दे शांत ..मला माहित आहे तू आमचा काहीही वाकडे करू शकत नाही ...आणि त्यामुळेच तर आम्हाला शांत झोप लागतीये झोपुदे आम्हाला शांत..
मंदाकिनी आता एकदम गडगडाटी हसली हसत ती म्हणाली: अरे संपत तुला कायमच झोपवणार आहे मी आता ..आणि तुझ्या आत्म्याला माझ्यासोबत घेऊन जाणार ..त्यालाही कधीच मुक्त होऊ देणार नाही ..जशी आज मी तडफडते ना , तशी तुला तडफडवणारे.. बघ तू बघतच राहा .. 
आणि तिथून निघून गेली आता संपतराव शांतपणे झोपले .. 
संभा झोपेतच होता तो बरळत हळूच म्हणाला: गेली वाटतं हसून-हसून ..काय वैताग हाय रात्री पण हस्ती ही बया चला आता झोपतो शांत.. संपतराव काय बोलू नका बाबा तुम्ही..झोपा आता सकाळच्याला बोलू..आणि तो घोरू लागला ..
पण संपत रावांची झोप उडाली होती ते विचार करत होते ही मंदाकिनी खरंच का माझ्या मुलीचा जीव घेईल?.. खरच मी काहीच करू शकणार नाही? गुरुजींचा ताविज कामाला येईल का? आम्ही वाचू का?  माझी मुक्ती खरंच या सगळ्यातून आम्हाला मुक्त करेल का? माझ्या पापाची शिक्षा माझ सगळं कुटुंब भोगत आहे.. त्यांची यातून सुटका होईल का देवा? तुला माझी प्रार्थना आहे मी केलेल्या पापांची माझ्या कुटुंबाला शिक्षा नको रे ..नियती प्रमाणे ही शिक्षा व्हायला हवी, पण ती मलाच व्ह्यायला हवी ना ..ते स्वतःला खूप वाईट बोलत होते ...ते स्वतःवरच खूप चिडले होते ..त्यांना राहून राहून एकच वाटत होत , जर मी त्यावेळी स्वतःला आवर घातला असता, तर आज मी केलेल्या पापाची शिक्षा या सगळ्यांना भोगावी लागली नसती ...ही खरंच नियती आहे मी केलं ते मला भोगावे लागत आहे..पण माझ्यासोबत माझ कुटुंब ही ते भोगत आहे..माझी पत्नी भूत योनी मध्ये आहे ..माझी मुलगी एका भीतीच्या सावटाखाली जगत आहे ..खरच माझी खूप मोठी चूक झाली..
विचार करत करतच संपतराव ना झोप लागून गेली सकाळी ते दचकून जागे झाले त्यांनी सगळीकडे नजर मारली.. पण त्यांना आजूबाजूला कोणीच दिसलं नाही.. ते खूप घाबरले त्यांनी जोरजोरात आवाज द्यायला सुरुवात केली: अरे कुठे गेली तू बेटा वर्षा ? कुठे आहेस? हेमंत ..हेमंत तू कुठे आहेस? संभा, अरे संभा तू कुठे गेला? कुठे गेले हे सगळे? काय झालं? संपतरावांना बाजूला फक्त आणि फक्त धुर दिसत होता ..पण त्याच्यामध्ये त्यांना आपली माणसं कुठे दिसत नव्हती.. असं वाटत होतं त्यांना आता अटॅक येईल.. ते पूर्ण घामाघूम झाले होते..त्यांचे डोळे मोठे मोठे झाले होते. ते भीतीने ओरडत होते. त्यांना आता सगळ्यांना पहायची ओढ लागली होती . ते भीतीने कासावीस झाले होते.. इतक्यात तिथे आली गंगी आली ..तिने पेटवलेल्या गौऱ्या ज्यावर तिने उद् घातला होता ..ते उचलून न्यायला आली ..तिला कोणीतरी सांगितलं होतं म्हणे ..यांनी दूषित वातावरण चांगलं होत ..भूत खेत येत नाहीत ..तिने संपतरावांचा आवाज ऐकला ...
गंगी : ओ मालक काय झालं वो? अस का वरडताय? आता काय माणसांनी सकाळची काम कराय बी नाय जायचं व्हय? आव्ह वर्षा ताई आंघुळीला गेल्यात आन हेमंत भाऊ न संभा वसरीला बसल्यात बोलत..तुम्हांसनी चांगली झोप लागली व्हती न्हवं ..ती मोडाय नग म्हणून दोघ बाहेर बसल्यात..थांबा बोलीवते.. आणि गंगी तिथुन गेलीआणि पाच मिनिटांमध्ये सोबत हेमंत आणि संभा ला घेऊन आली ..त्या दोघांना पाहून संपत रावांचे डोळे भरून आले ..
हेमंत :अहो काय झालं संपतराव? तुम्ही इतके का कावरेबावरे झालात?
संपतराव :अहो रात्री ती मंदाकिनी आली होती इथे ..मला तुम्हा सगळ्यांची खूप काळजी वाटते.माझ्यामुळे तुम्ही सगळे आज खूप मोठ्या अडचणीत आहात. माझ्या मुलीवर तुम्ही अगदी मनापासून प्रेम करता माहित आहे मला.. याची ग्वाही तर देवी मातेने सुद्धा दिली.. आणि तुम्ही फक्त आणि फक्त तिच्यासाठी मलाही मदत करत आहात..मला असं वाटतं माझ्यामुळे तुम्हाला काही व्हायला नको.. माझी.. माझी वर्षा कुठे आहे? अग गंगे वर्षाला पण बोलावंग.. मला बघू दे तिला.. इतक्यात तिथे वर्षा पण आली ..
वर्षा : काय झालं? का घाबरलात असे तुम्ही ??
हेमंतने वर्षाला खुनवलं की त्यांच्या जवळ बस ..त्यांना जवळ घे ..डोळे पूस त्यांचे ..त्यांचं खूप प्रेम आहे आपल्या सगळ्यांवर.. वर्षालाही ते समजलं आणि तिने जाऊन संपतरावांना मिठी मारली ...सांगा ना बाबा काय झालं?
संपतराव : काही नाही बाळा ...माझ्या कर्माचे भोग . दुसरं काय ..? गंगे माझं अंघोळीच पाणी काढ बर ...आणि फक्कड नाश्ता बनव आम्हाला सगळ्यांना ...काय संभा भूक लागली ना ?
संभा : ओशाळत - व्हय जी ...लागली नव्ह भूक मला बी ..पर म्या भी आंघुळ करतोय की, मग करू की नाश्ता निवांत ...आणि तो तिथून गेला ..
हेमंत : बर मी बी जातो...आवरून येतो ..तो ही गेला...सगळे थोड्यावेळात डायनिंग टेबल वर बसले ..गरम गरम इडली सांबर..उत्तपे, बटाटा वडा सांबर ..उडीद वडा सांबर समोर होत .. 
हेमंत : तुम्हांसनी राग नसलं येणार तर एक ईचारू? न्हाय म्हंजी तुमास्नी राग नग यायला ..
संपतराव: बोल हेमंत बोल...काय बोलतोय तू?
हेमंत: हा इतका नाश्ता कशापायी?एकच कायतरी पोटभर खाऊ ना..
संपतराव: अहो आमचं राजेशाही कुल आहे ..चालायचंच..अस मोजून मापून खाण आणि बनवणं जमत नाही हो आम्हाला..परंपराच तशी हाय..
हेमंत: पण मग जेवण वाया जात ना कितीतरी..
संपतराव: अरे नाही नाही जेवण कधीच वाया जात नाही आपल्याकडे ...अरे हे जे माझे कामगार आहेत ना ते खातात सगळं ...जे आपण खातो तेच ते खातात ...आमच्या कडे कधीच नोकरांना वेगळं जेवण नसत ...
हेमंत: वाह!खूपच छान हो ...मानलं  तुम्हाला..इतके छान विचार..
संपतराव : धन्यवाद मुला... पण आता खाऊन घे लवकर ..अन्न नेहमी गरम गरम  खावे ..चांगलं असत शरीरासाठी..
हेमंत : हो हो ..,अवरतो ...इतक्यात कोणीतरी विक्षिप्त हसल...कोण होत ? 
संपतराव: आली ही बया आली ...आता काय करणार ही कोणास ठाऊक ..
क्रमशः

🎭 Series Post

View all