Login

नियती भाग ५

Love Story
नियती भाग ५
©® सौ.हेमा पाटील.

नियती या कथेत आपण आजपर्यंतच्या भागांमध्ये बालपणापासून एकत्र वाढलेल्या शरु आणि अभिच्या आयुष्याची कहाणी अनुभवत आहोत. एकमेकांवर जीवापाड प्रेम करणाऱ्या या दोन निष्पाप जीवांना एका अपघाताने दूर केले होते.आता पुन्हा दोघे समोरासमोर आले आहेत. शरु तर अभिला पाहणेच आहे, पण अभि शरुला ओळखतो का? तिच्या अस्तित्वाची जाणीव त्याला होते का? प्रेम जिंकते की शारिरीक आकर्षण हे पहाण्याची उत्सुकता पुढील भागात...

शरु जर्मनी येथे सेमिनार साठी गेली आहे.तिथेच अभि सुद्धा आहे. आता पाहूया यापुढे काय घडते ते...

आता नियती अभिची परीक्षा घेणार होती.शरुची परीक्षा घेऊन झाली होती.ती या परीक्षेत उत्तम गुण मिळवून उत्तीर्ण झाली होती.आता अभिची पाळी होती. या परीक्षेत पास होणे वा नापास होणे एवढी ढिल नियतीने दिली होती.पास झाले तर नियतीने दिलेल्या चकव्याला न फसता अंतरात्म्याला शरुची जाणीव होईल आणि दोघांचे मनोमिलन होईल.आणि जर ते प्रेम वरवरचे , शारीरिक आकर्षण असेल तर ते तेवढ्यावरच थांबेल.शरु तर अभिला पाहूनही आपल्या निश्चयापासून ढळली नव्हती.तेव्हाच नियतीने तिला पैकीच्या पैकी गुण बहाल केले होते.आता अभि काय करतोय याकडे नियती डोळे लावून बसली होती.

सेमिनार चार दिवस चालणार होते.विविध देशातील कंपन्यांचे प्रतिनिधी म्हणून अनेक तरुण तरुणी या सेमिनार मध्ये सहभागी झाले होते.लेक्चरला सुरवात झाली आणि डोक्यातील सगळे विचार बाजूला सारून अभिने लेक्चर वर लक्ष केंद्रित केले.दिवसभर अगदी भरगच्च कार्यक्रम असल्याने त्याने सर्व लेक्चर्स अटेंड केली.संध्याकाळी चहापानाच्या कार्यक्रमाच्या वेळी शरु त्याच्या डोक्यात पुन्हा पिंगा घालू लागली.ती इथेच आहे असे त्यांचे मन त्याला वारंवार सांगू लागले.त्याची भिरभिरती नजर सगळीकडे फिरुन पुन्हा पुन्हा शरुवरच स्थिरावत होती हे शरुच्या ही लक्षात आले.आपला आवाज ऐकून त्याची उरलीसुरली शंकाही नाहिशी होईल असा विचार करून शरु त्याला म्हणाली, “Hii, are you from India”?
यावर अभि म्हणाला,”I am Indian, but coming from Berlin”.
तिचा घोगरा आवाज ऐकून ही शरु नाही असे त्याला वाटले तरीही त्याचे मन मात्र अनामिक अशा ओढीने धडधडत होते.त्याने तिच्याकडे निरखून पाहिले.तिच्या डोळ्यांवर काळा चष्मा असल्याने डोळे स्पष्टपणे जरी दिसत नसले तरी त्या डोळ्यांकडे पाहून ही शरुच असावी असे त्याला वाटू लागले.त्याने तिला विचारले,”आपण भारतातून आला आहात का”?
यावर तिने होकारार्थी मान हलविली. त्यानंतर मात्र शरुने तेथून काढता पाय घेतला कारण कदाचित संभाषण लांबले तर आपल्या बोलण्यातून एखादा धागा सापडला तरी अभि सत्यापर्यंत पोहोचेल याची तिला खात्री होती. अभिच्या डोळ्यात तिला तिचा शोध घेत असलेली त्याची बेचैन नजर दिसत होती. त्याची ती आपल्याबद्दलची बेचैनी पाहून तिला बरे ही वाटत होते.पण अभिच्या भविष्याचा विचार करून ती स्वतःला त्याच्यापासून दूर ठेवत होती.पण ती यापासून अनभिज्ञ होती की, आपण फक्त मनाशी ठरवायचे...ते पूर्णत्वास जाणार की नाही हे आपण ठरवू शकत नाही.कर्ताकरविता कुणीतरी दुसराच असतो.बघा ना..एखादे दिवशी आपण ठरवतो,उद्या सकाळी मी सिद्धीविनायकाच्या दर्शनाला जाईन. आपण लवकर उठून सगळे आवरतो ही..पण जाण्यासाठी तयार होऊन दार उघडतो व बाहेर पाऊल ठेवणार तेवढ्यात आपल्या नणंदबाई दारात उभ्या राहतात.मग तो बेत रद्द करुन घरात येऊन चहा नाष्टा जेवणाची तयारी सुरू करावी लागते.अन एखादे दिवशी अजिबात मनी ध्यानी नसताना मैत्रीण आपल्या नावाने कोकलतच येते व आपल्याला पाचच मिनिटांत तिच्या गाडीत कोंबून सिद्धीविनायकाच्या दर्शनाला घेऊन जाते.तर असे असते..


असाच सेमिनारचा दुसरा दिवस उजाडला.दुसऱ्या दिवशी दुपारच्या सत्रात घोषणा केली गेली की, वेगवेगळ्या देशांतून आलेले असले तरी आपापल्या मूळ देशातील सर्व सहभागी प्रतिनिधींनी आपला गृप तयार करावा व सर्वांनी एकत्र येऊन आपापसात चर्चा करुन आपल्या देशासाठी आपण काय योजना राबवू शकतो यावर विचारविनिमय करून सेमिनारच्या शेवटच्या दिवशी त्यापैकी एका प्रतिनिधीने स्टेजवर येऊन त्याबाबत खुलासा करावा. हे ऐकून भारतीय सगळे एका बाजूला आले.अर्थातच शरु व अभि ही त्यात होतेच...प्रत्येकाने आपापले विचार मांडायला सुरुवात केली.कुणी सुक्या कचऱ्याची विल्हेवाट कशी लावायची याबाबत विचार मांडले.कुणी भाजी जास्त वेळ हिरवी व ताजी कशी ठेवता येईल याबाबत मत मांडले.कुणी पाण्याचा फेर वापर कसा करावा याबाबत सांगितले. खेड्यातून आलेल्या शरुने सौरऊर्जा आणि शेतीसाठी जे पाणी वापरले जाते त्यासाठी सौर पंप हा शेतकऱ्यांचा शेतीचा खर्च कमी करण्यासाठी कसा उपयुक्त ठरेल हे आकडेवारीनुसार सांगितले.हा उपाय सर्वांनाच खूप आवडला त्यामुळे सर्वानुमते तोच पक्का करण्यात आला.पण याबाबत स्टेजवर जाऊन कोण बोलणार याबाबत चर्चा झाली व ते काम अभिजितकडे सोपवण्यात आले.अर्थातच याबाबत अधिक विस्तृत चर्चा करण्यासाठी त्या दोघांना अधिक वेळ द्यावा लागला. बाकीचे सगळे आपल्या काम संपल्याने इकडेतिकडे फिरत होते.या दोघांची कामानिमित्त जवळपास तासभर चर्चा सुरू होती.ती संपल्यावर अभिने काऊंटरवर जाऊन दोन काॅफीचे मग आणले.काॅफीचा पहिला घोट घेताच शरुला खूप बरे वाटले.आत्ता खरंच काॅफीची गरज होती असे तिला वाटले.ती अभिला “Thanks for coffee” असे म्हणाली.यावर अभि जे म्हणाला ते ऐकून ती तीन ताड उडाली. आपल्या हातातून काॅफीचा मग निसटून खाली कधी पडला हे ही तिला समजले नाही.जेव्हा खळssखट्याक असा आवाज झाला तेव्हा ती भानावर आली. आपण असे कसे अजागळपणे वागलो असे वाटून ती खाली काचा गोळा करायला जमिनीवर बसली, अभिही हातातील मग टेबलावर ठेवून खाली बसून तिला काचा गोळा करायला मदत करु लागला तेव्हा ती डोळ्यांच्या कोपऱ्यातून हळूच अभिकडे पहात होती. अन् त्याने तिच्याकडे पाहिले की नजर वळवत होती.तेलढ्यात तेथील व्यवस्थापक तेथे आला व तेथील काचा व स्वच्छतेची जबाबदारी त्याने स्वतःकडे घेतली.अभिने काऊंटरवर जाऊन पुन्हा एक कप काॅफी आणली.आणि तो कप शरुच्या हातात देताना तो म्हणाला,”ऐ बाई, आता परत कप फोडू नकोस.मला पॅ़ंंट घालून फरशीवर बसता येत नाही”.
हे त्याचे वाक्य ऐकून शरु खळखळून हसली.अपघात झाल्यानंतर गेल्या कित्येक दिवसांत ती अशी मनमोकळेपणाने हसली नव्हती.तिला हसताना पाहून अभिला खूप आनंद झाला.पण असे कुठले वाक्य अभिने उच्चारले होते की ज्यामुळे आश्चर्यचकित होऊन शरुच्या हातातून कप निसटून खाली पडला? आणि त्या एका वाक्यामुळे शरु आपले अनोळखीपणाचे नाटक विसरुन खळखळून हसली होती ते जाणून घेण्यासाठी पुढील भाग नक्की वाचा...
...इति हेमा उवाच
©® सौ.हेमा पाटील.
दिनांक – २४/७/२०२४

🎭 Series Post

View all