Login

नियतीचा न्याय भाग १

नियतीचा न्याय भाग १
नियतीचा न्याय
भाग १

" अगं ए कारटे ! साधं पूजेचं सामान नीट सांभाळता येत नाही तुला ? काय शिकवलंय ग तुझ्या आई-बापाने ? की त्यांना फक्त मुलगी दुसऱ्याच्या  गळ्यात मारता येते, संस्कारांचं गाठोडं बांधून द्यायला ते विसरले ? "

वसुधाबाईंचा तो कर्कश आवाज एखाद्या विजेसारखा पूर्ण हॉलमध्ये कडाडला. नुकताच पूजेचा कलश ईशानीच्या हातून निसटला होता आणि मंगल कलशातील पाणी जमिनीवर सांडले होते.

शुभ कार्यात झालेला हा अपशकुन पाहून पाहुणे-रावळे एकमेकांकडे बघून कुजबुजू लागले. ईशानीच्या डोळ्यांत क्षणात पाणी साचले, सर्वांसमोर झालेल्या या अपमानाने ती गोरीमोरी झाली.

पुण्याच्या एका उच्चभ्रू वस्तीतील तो आशीर्वाद प्रशस्त बंगला. बाहेरून अत्यंत शांत आणि देखणा वाटणारा, पण आत मात्र आज अपमानाचे विष कालवले जात होते. ईशानी सुन्न होऊन उभी होती. तिने थरथरत्या हातांनी आपली साडी सावरली आणि हळू आवाजात म्हणाली,

" आई, सॉरी... साडीचा घोळ चुकून पायदळी आला आणि तो कलश निसटला. माझा हेतू..."

" आई नका म्हणू मला सुनबाई ! तुझ्यासारख्या फालतू आणि फालतू घरच्या मुलीला सून म्हणून या घरात आणलं, हीच आमच्या आयुष्यातली सगळ्यात मोठी चूक झाली ! "

वसुधाबाईंचे हे शब्द एखाद्या टोकदार बाणासारखे ईशानीच्या काळजाला आरपार चिरून गेले. त्यांनी केवळ ईशानीचा नाही, तर तिच्या मध्यमवर्गीय पण सुसंस्कृत आई-वडिलांचाही सरेआम लिलाव केला होता.

ईशानीची नजर सोफ्यावर बसलेल्या उन्मेषला शोधू लागली. तिला वाटलं होतं की गेल्या पाच वर्षांच्या या सहवासात किमान आज तरी तिचा नवरा तिच्या बाजूने दोन शब्द बोलेल. उन्मेषने नजर वर केली, पण त्याच्या डोळ्यांत ईशानीबद्दल सहानुभूती नव्हतीच, उलट एक प्रकारचा संताप होता.

" उन्मेष अहो तुम्ही तरी सांगा काहीतरी... आई काय बोलतायत हे सगळं तुम्हाला पटतंय का ? मी मुद्दाम केलं का हे सगळं ? " ईशानीने आशेने विचारले.

उन्मेष चिडून उभा राहिला. त्याने हातातला पाण्याचा ग्लास जोरात टेबलावर आदळला. काचेचे तुकडे फरशीवर पसरले.

" आई बरोबरच बोलतेय ईशानी ! तुझ्या या दरवेळच्या निष्काळजी पणामुळे प्रत्येक वेळी आम्हाला पाहुण्यांसमोर खाली मान घालावी लागते.
माझं ऐकशील तर आईंची गुपचूप माफी माग आणि आत जा. विनाकारण इथे सीन क्रिएट करू नकोस, आधीच खूप तमाशा झालाय."

ईशानीला धक्का बसला. ज्या माणसाला तिने आपले सर्वस्व मानले, ज्याच्या करिअरसाठी तिने स्वतःच्या चांगल्या नोकरीचा त्याग केला, तोच आज तिच्या अस्तित्वाचे धिंडवडे निघत असताना आईच्या पदरामागे लपून उभा होता.

" माफी ? " ईशानी हसली, पण त्या हास्यात दुःख कमी आणि स्वतःबद्दलची कीव जास्त होती.

" उन्मेष, चूक कोणाची आहे हे तुम्हाला खरंच कळत नाहीये की तुम्ही ते समजून घेऊ इच्छित नाहीत ? आईंनी माझ्या माहेरचा, माझ्या स्वाभिमानाचा अपमान केलाय."

" केला असेल ! कारण तुझी लायकीच ती आहे," वसुधाबाई मध्येच कडाडल्या.

" आमच्या पैशावर जगताय तुम्ही लोक. तुझे वडील रिटायर्ड झाल्यानंतर त्यांच्या हार्ट सर्जरीचा खर्च कोणी दिला ? आम्हीच ना ? मग उपकाराची जाणीव ठेवून वागायचं सोडून ही कसली जीभ चालवतेयस ? आमच्या पैशाने सोन्याने मढवलेली आहेस , अशी आमच्याकडून घेतलेली रेशमी साडी नेसून आम्हालाच कायदा शिकवतेयस ? "

ईशानीला आता श्वास घेणे कठीण झाले होते. वडिलांच्या आजारपणात उन्मेषने मदत केली होती, हे खरं होतं. पण त्यासाठी त्याने आणि त्याच्या आईने ईशानीला प्रत्येक दिवशी मानसिक गुलाम बनवून ठेवले होते. तिच्या स्वभावातील नम्रतेला त्यांनी तिची कमजोरी मानले होते.

" माणूस म्हणून माझी काय किंमत आहे या घरात उन्मेष ? की मी फक्त एक वस्तू आहे जिचा तुम्ही हवा तेव्हा अपमान करू शकता ? " ईशानीने शेवटचा प्रयत्न म्हणून विचारले.

" किंमत ? तू या घरची सून आहेस, बस तेवढीच तुझी ओळख आहे. त्या पलीकडे तुझं स्वतःचं असं काहीच अस्तित्व नाहीये. सो, जस्ट शट अप ! " उन्मेष ओरडला आणि रागाने बेडरूममध्ये निघून गेला.

हॉलमध्ये शांतता पसरली होती. पाहुण्यांच्या नजरा ईशानीला टोचत होत्या. वसुधाबाईंनी विजयाचा आविर्भाव आणत पुन्हा एकदा ईशानीकडे तुच्छतेने पाहिले आणि म्हणाल्या,

" चल, आता हे पाणी पुसून घे.काचेचे तुकडे नीट गोळा कर.आणि मग पुन्हा पूजेला बस."

ईशानी तिथेच जमिनीवर बसली. तिचे डोळे कोरडे पडले होते. कधीकधी दुःख इतकं मोठं असतं की डोळ्यांतून पाणीही येत नाही. तिला आठवलं, पाच वर्षांपूर्वी लग्नाच्या मांडवात तिने पाहिलेली स्वप्नं. तिने फक्त तडजोड केली होती. सासूचे टोमणे, नवऱ्याचा चिडखोर स्वभाव... तिने स्वतःला सून या चौकटीत बसवण्यासाठी स्वतःची राख केली होती.
पण आज तिचा अंतरात्मा जागा झाला होता.
फालतू हा शब्द तिच्या कानात घुमत होता.

' जर मी फालतू आहे, तर मग या श्रीमंत घरातील सोन्याच्या पिंजऱ्यात मी कैद का राहू ?
जिथे माणूस म्हणून किंमत नाही, तिथे नात्याचा उरलासुरला मान तरी कशासाठी जपायचा? '

नात्याची वीण उसवली होती, आणि ती आता पुन्हा सांधणे अशक्य होते. ईशानीने हळूहळू आपले डोळे पुसले. ती उभी राहिली. तिचा चेहरा आता रडका नव्हता, तर त्यावर एक प्रखर ठामपणा होता. तिने पूजेच्या ताटाकडे पाहिले आणि मग सरळ आपल्या खोलीकडे पावले टाकली.

" कुठे चालली आहेस ? अजून पाहुण्यांचे जेवण बाकी आहे, वाढायला कोण येणार ? तुझे आई बाप येणार आहेत का ? " वसुधाबाई मागून ओरडल्या.

ईशानीने मागे वळून पाहिले नाही. तिने फक्त शांतपणे पण खोल आवाजात म्हटलं,
" आजपासून या घरची सून मेली आहे वसुधाबाई. आता फक्त ईशानी जिवंत असेल."

खोलीत गेल्यावर ईशानीने कपाटातून आपली जुनी बॅग काढली. तिने दिलेले दागिने, भारी साड्या, महागामोलाचे कपडे तिथेच बेडवर पसरवून ठेवले. तिने सोबत घेतले ते फक्त तिचे पदवीचे दाखले, आई-वडिलांचा एक जुना फोटो आणि मोजके कपडे.

तिने घराच्या उंबरठ्याकडे पाहिले. बाहेर रात्र होत आली होती, पण ईशानीला तिच्या आयुष्यातील नवीन पहाट स्पष्ट दिसत होती. शब्दांच्या ज्या वारांनी तिला घायाळ केले होते, त्याच वारांनी आज तिला मुक्त होण्याची आणि स्वतःचे विश्व पुन्हा शून्यातून उभे करण्याची शक्ती दिली होती.