Login

नोकरी

नोकरीसाठी धडपडणाऱ्या एकाची कथा..


नोकरी..

"आजतरी काम झाले का?" बाहेरून आलेल्या रोहितला सुमतीबाईंनी विचारले..
" ते फोन करतो म्हणाले.." रोहित उत्तरला.. पण त्याच्या आवाजावरूनच मुलाखत कशी झाली असणार याचा अंदाज त्यांना आला..
" आमचंच मेलं नशीब फुटकं. लोकांच्या मुलांना कशा चांगल्या पगाराच्या नोकऱ्या लागतात.. तुलाच बरी लागत नाही.. एवढे पोटाला चिमटे काढून तुला शिकवले ते कशासाठी हेच कळत नाही.. सुमतीबाईंचा तोंडाचा पट्टा सुरू झाला.
" अग, त्याला जरा दम तर घेऊ दे. नंतर तुझा तोंडाचा पट्टा सुरू कर." श्रीधरराव म्हणाले.
" मला ना पोटात काही ठेवायची सवय नाही. बोलून मोकळी होते मी. याला तोंडाचा पट्टा म्हणता? जीव तुटतो माझा म्हणून बोलते ना? तुम्हाला काय वाटते मला हौस आहे बोलायची?"
" बरं. नाही बोलत. झाले समाधान? आता जरा दोन घोट चहा तरी दे." श्रीधररावांनी सुमतीबाईंना आत पाठवले. त्या आत जाताच थकलेल्या रोहितने सोफ्यावर डोके ठेवले आणि डोळे मिटले. सकाळपासून चाललेली इंटरव्हयुची दगदग आणि घरी आल्यावर आईचे हे बोलणे. त्याच्याही नकळत त्याच्या डोळ्यातून पाणी आले.
" नको मनावर घेऊस. होईल सगळे नीट." श्रीधरराव त्याच्या डोक्यावरून हात फिरवत म्हणाले.
" मी मुद्दाम करत नाही. मी सगळी चौकशी करून गेलो होतो. पण बहुतेक त्यांची आधीच प्रोसेस पूर्ण झाली होती. माणसे घेऊन झाली होती. हा इंटरव्ह्यू म्हणजे एक फार्सच होता. मी तरी काय करू?" रोहित पोटतिडकीने बोलत होता. श्रीधरराव काही न बोलता फक्त ऐकत होते.
" मला माहीत आहे, तुम्ही माझ्या शिक्षणासाठी खूप खस्ता खाल्ल्या आहेत. पण आता या फिल्डची मागणीच कमी झाली आहे त्याला मी तरी काय करू? खूप कमी प्रमाणात नोकऱ्या आहेत. आणि ज्या मिळतात त्यांचा पगार एवढा कमी आहे की त्यापेक्षा जास्त पगार एखाद्या झाडूवाल्याला असेल. ते ही काम काही हलके नाही. मला तर असे वाटते की आता जर तीही नोकरी मिळाली तरी चालेल."
" आता तेच करा. म्हणजे तोंड दाखवायला मला कुठे जागा उरणार नाही. वडिल एवढे मोठे अधिकारी आणि मुलगा कोण झाडूवाला?" रोहितचे शेवटचे वाक्य ऐकून सुमतीबाई अजूनच चिडल्या.
" आधीच बाप प्रामाणिक. लोकांचा एक पैसाही न घेणारा. यांच्याच सारख्या कितीतरी अधिकाऱ्यांची मोठी मोठी घरे झाली आणि आम्ही राहतो आहोत या स्टाफ क्वार्टर्स मध्ये.. येऊन जाऊन तुझ्याकडून अपेक्षा होत्या माझ्या तर तुझ्या नोकरीचाच पत्ता नाही. काय बोलावं माणसाने तरी?" सुमतीबाई थांबतच नव्हत्या.
" तू चहा देतेस ना? आणि तुला पश्चाताप होतो का माझ्यासारख्या प्रामाणिक माणसाशी लग्न करून?"
" मी कुठे असे म्हटले?" वरमत सुमतीबाई म्हणाल्या.
" अजून वेगळे काय बोलायचे? आणि त्याच्या नोकरीबद्दल म्हणशील तर तुझाच हट्ट होता त्याने या क्षेत्रात जावे म्हणून. तुझ्या कोणाकोणाला चांगले पगार होते म्हणून. दिसतंय ना तो करतो आहे त्याच्यापरीने प्रयत्न.. पण नाही. माणूस दमूनभागून आलं की त्याच्या डोक्याला त्रास द्यायचाच असंच ठरवलं आहेस बहुतेक तू."
" हो.. मीच दोषी. बसते हो गप्प. तोंडाला अगदी कुलूप लावून." त्या वातावरणात रोहितला बसवेना. बाबांना वाईट वाटेल म्हणून कसातरी तो चहा पिऊन घराबाहेर पडला.
" आताच तर आलास ना, कुठे निघालास लगेच?" सुमतीबाईंनी विचारले.
" आलोच पाय मोकळे करून." असे म्हणत रोहित बाहेर पडला.


मिळेल का रोहितला नोकरी? बसेल का त्याच्या आयुष्याची घडी? पाहू पुढील भागात. हा भाग कसा वाटला ते सांगायला विसरू नका..


सारिका कंदलगांवकर
दादर मुंबई
0

🎭 Series Post

View all